शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४

१६. भूल-भुलैया

आशयच्या घराजवळच्या मेगा स्टोअरमध्ये खरेदीला गेलो होतो. ही अमेरिकेतील स्टोअर्स म्हणजे एक भूल-भुलैयाच असतो म्हणा ना. त्यांचे वर्णन करण्यासाठी 'भूल-भुलैया' हाच अगदी योग्य शब्द आहे. कारण इथे शिरण्याची भूल तुम्ही एकदा केलीत, की तुम्हाला इथल्या सर्व वस्तू पूर्णपणे भुलवणार आणि आपण नेमके काय घ्यायला आलो होतो, ते मात्र आपल्याला  भुलायला लावणार!

'राल्फ', 'वॉलमार्ट', 'कॉस्टको', 'टार्गेट', 'रॉस', 'ट्रेडर जोझ' अशा अनेक कंपन्यांची संपूर्ण अमेरिकेत जवळजवळ प्रत्येक गावात मोठ्ठाली स्टोअर्स असतात. या दुकानांची अजून एक खासियत म्हणजे, प्रत्येक दुकानाचा अगडबंब पसारा. दुकानातल्या दुकानात हिंडताना अक्षरश: पायाचे तुकडे पडतात. ग्राहकांच्या शंभर ते दीडशे गाड्या एकावेळी उभ्या राहू शकतील इतके मोठमोठाले वाहनतळ दुकानाच्या बाहेर असतात. गाड्या ठेवण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत, हे विशेष. सतत मोठमोठाले सेल्स, वेगेवेगळ्या वस्तूंवर डिस्काउन्ट, मेम्बरशिप कार्ड्सवर केलेल्या खरेदीवर विशेष सूट किंवा येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी रोज एखादे सलाड किंवा कपभर कॉफी फुकट देणे, अशा नित्य-नवनवीन क्लृप्त्या वापरून ही स्टोअर्स गिऱ्हाईकांसाठी गळ टाकत असतात.  

अमेरिकेत जगातल्या अनेक देशांचे, धर्मांचे आणि वंशाचे लोक अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. प्रत्येक देशाचे लोक आपापली खाद्यसंकृती, वेशभूषा, सण-वार आणि जीवनशैली असं बरंच काही अमेरिकेत घेऊन आले. तसं बघायला गेलं तर हे सर्व जेमतेम गेल्या चारशे वर्षांत घडलेलं आहे. त्यामुळे, या देशाची संस्कृती आणि इथल्या लोकांचे राहणीमान म्हणजे एक अजब रसायनच म्हणावे लागेल. काही लोकांनी इथे येउन  नवीनच राहणीमान स्वीकारले; तर काहीनी 'आपापले' असे सर्व काही अगदी जपून ठेवले आहे. इथे येऊन स्थायिक झालेल्या लोकांची इतर देश, धर्म आणि वंशांच्या लोकांशी लग्ने होऊन नवीनच जातकुळीचे लोक तयार झाले आहेत. बऱ्याचशा अमेरिकन लोकांची जीवनशैली आधुनिक असली तरी काही लोक अगदी पुरातन काळांत राहत असल्याप्रमाणे जगतात. त्यामुळे इथे मायक्रोवेव्हमध्ये रेडीमेड अन्नाची पाकिटे फक्त गरम करून खाणारे लोक दिसतील तसेच रोज घरी धान्य दळून कोळश्याच्या किंवा लाकडाच्या चुली फुंकून अन्न शिजवणारे लोकदेखील दिसतात. शाकाहारी, मांसाहारी असे लोक तर असतातच; त्यांशिवाय, दुग्धजन्य पदार्थ न खाणारे, ग्लुटेन-विरहित आहार घेणारे, एगटेरियन्स, 'कोशर' अन्न खाणारे किंवा केवळ ऑर्गनिक  अन्नच  खाणारे, असे वेगवेगळे चोचले असलेले लोक असतात. कदाचित त्यामुळेच जगाच्या पाठीवरचे जवळ-जवळ सगळे पदार्थ इथल्या मेगास्टोअर्समधून मिळतात. पण कुठलाही खाद्यपदार्थ विकत घ्यायला गेलात, तर त्याचे कमीतकमी पाच ते दहा प्रकार समोर येतात. सुरुवातीला मला फार चक्रावून जायला व्हायचे. साधे दूध जरी घ्यायचे झाले तरी दहा-दहा प्रकारच्याबरण्यांवरची लेबल्स वाचत बसावे लागायचे. पण हळू-हळू या खरेदीतही मजा यायला लागली. 

अमेरिकनांचा दिनक्रम सोमवार ते शुक्रवार फारच धावपळीचा असतो. सर्वसाधारण व्यक्ति रोजचे आठ म्हणजे आठवड्याचे सुमारे चाळीस तास काम करते. कित्येक जण अधिक पैसे मिळवण्यासाठी त्याहीपेक्षा जास्त काम किंवा दोन-दोन नोकऱ्या करतात. बरेच लोक शहरापासून दूर राहतात. त्यामुळे रोज कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी  त्यांचे दोन ते चार तास प्रवासात जातात. घरासाठीच्या सामानाची खरेदी करायला, आपल्याकडे असतात तशी, गल्लोगल्ली किराणामालाची किंवा भाजीची दुकानेही नाहीत. घराजवळ जर एखादे मेगास्टोअर नसेल किंवा घरातील सर्वजण दिवसातले बारा-पंधरा तास बाहेर असतील, तर एकदा दुकानात गेले की आठवडा-दहा दिवसाचे सामान आणून ठेवायची सर्वसाधारण पद्धत असते. पण कुणालाही कितीही घाई असली तरी सगळे रांगेने आणि पुढच्या माणसापासून दोन पावले अंतर ठेऊन  बिलिंग काउंटरमागे उभे राहतात. पुढच्या माणसाचे बिल तयार होऊन, त्याने पैसे देऊन, सामान घेऊन जाईपर्यंत मागचा माणूस आपले सामान पुढे सरकवतसुद्धा नाही. हा समंजसपणा बघून मला सुरुवातीला जरा विचित्रच वाटायचे आणि थोडासा त्रासही व्हायचा. भारतात आपण किती बेशिस्तपणे उभे असतो आणि कुठल्याही रांगेमधून निर्लज्जपणे पुढे घुसायचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे तिथे गेल्यावर सुरुवातीला अगदी चुकल्या-चुकल्यासारखे व्हायचे! 

विविध भाज्या, फळे, मांस-मच्छी, किराणामाल, असंख्य प्रकारचे चीज, ब्रेड्. चिप्स, गोळ्या. चॉकलेट्स, बिस्किट्स अशा पॅकेटबंद वस्तूंनी ही स्टोअर्स भरलेली असतात. या स्टोअरमध्ये आपण एखादी वस्तू जितक्या अधिक प्रमाणात घेऊ तितकी ती स्वस्त होत जाते. म्हणजे समजा, दोनशे ग्रॅम लोणी दोन डॉलरला असेल, त्या प्रमाणात पाचशे ग्रॅम किंवा एक किलो लोणी पाच किंवा दहा डॉलरला असले पाहिजे. पण प्रत्यक्षात पाचशे ग्रॅम लोणी चार डॉलरला आणि एक किलो लोणी सहा डॉलरला मिळू शकते. तुम्हाला अधिकाधिक प्रमाणात विकत घ्यायला उद्युक्त करण्यासाठी अशी भुलवणारी किंमत ठेवलेली असते. स्वस्त मिळतेय म्हणून जास्तीत जास्त घ्यायची इच्छा ग्राहकाला होतेच. त्यामुळे मेगास्टोअर्समध्ये अमेरिकन ग्राहक खूप सामान विकत घेताना दिसतात. पंधरा-वीस लोकांची जेवणावळ उठणार आहे असे वाटावे, इतके सामान जवळ-जवळ प्रत्येकाकडे असते. आपल्या तुलनेत अमेरिकन लोकांचा आहार जरी खूप जास्त असला तरी त्यांच्या घरातल्या फ्रीजमध्ये आणि तळघरातल्या डीप फ्रीझरमध्ये इतके सामान भरून ठेवलेले असते की, केंव्हाही दुष्काळी परिस्थिती उद्भवणार आहे की काय असे वाटावे. घरच्या फ्रीझमध्ये महिना-महिना पडून राहिलेल्या एखाद्या पदार्थासाठी माझ्या चुलतभावाने, शिरीषने, "वस्तू 'कोमा'त जाणे" अशी एक समर्पक शब्द-योजना केलेली आहे. अमेरिकेतल्या घरांच्या डीप-फ्रीझर्समधून बरेच पदार्थ 'डीप कोमा' त पडलेले असतात, असेही तो हसत-हसत आम्हाला एकदा सांगत होता! 

अमेरिकेत काही काळ राहून नुकत्याच परतलेल्या पूनम सिन्हा नावाच्या माझ्या मैत्रिणीला एकदा मी तिथल्या मेगा स्टोअर्सचे कौतुक सांगता सांगता, थोड्याशा खेदानेच म्हणाले, "आपल्याकडे अजून तितकी चांगली स्टोअर्स आलेली नाहीत. तिकडच्या मानाने आपली दुकाने किती छोटी वाटतात नाही?" पण ती म्हणाली, "ही मेगा स्टोअर्स कितीही सुसज्ज असली तरी ती अमेरिकन्ससाठी धोक्याची ठरली आहेत. एकतर या स्टोअर्समुळे गेल्या काही दशकांत अमेरिकेतले छोटे दुकानदार नाहीसेच झाले. दुसरे म्हणजे ताजे दूध, भाजीपाला, मांस-मच्छी मिळणे जवळ-जवळ अशक्यच झाले आहे. अधिक स्वस्त म्हणून बरेचदा गरज नसलेले अनेक खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात विकत घेतले जातात. ते वापरले न जाता पडून-पडून खराब होतात आणि फेकले जातात त्यामुळे अप्रत्यक्षपणे बराच पैसाही वाया जातो. शरीराला अनावश्यक असलेले, आणि 'हाय-कॅलरी' पदार्थदेखील केवळ स्वस्त आणि मुबलक आहेत म्हणून हे लोक खातात. यामुळे त्यांची जाडी आणि आरोग्यसेवांवर होणारा खर्च, दोन्हीही वाढतेय.एकूण काय, या मेगा स्टोअर्सवाल्यांनी अमेरिकेत बिनडोक ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्या तयार केल्या आहेत. स्टोअर्समध्ये पडून असलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात आवक झालेल्या वस्तू कमी दरात विकायला ठेवल्या जातात. या व्यवसायात उत्पादक, वितरक आणि ही स्टोअर्स, सगळ्यांचाच खूप पैसा गुंतलेला असतो. त्यामुळे, अमेरिकन्सनी काय खायचे आणि काय नाही हे त्यांच्याही नकळत ही मेगा स्टोअर्सच ठरवत असतात. आपल्याकडे सर्रास ही अशी मेगा स्टोअर्स आलेली नाहीत आणि अजूनही कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार, भाजीवाला, आणि दूधवाला टिकून आहेत हे नशीब समज. त्यामुळे आपल्याला ताजे अन्न तरी खायला मिळतेय " 

मी माझी विचारशक्ती गमावून कोमात किंवा डीप कोमात जायच्या आधीच पूनमने मला जागे केले, हे चांगलेच झाले म्हणायचे! 

शनिवार, २० डिसेंबर, २०१४

१५. पेनी वाईज!

मिड्वेल अव्हेन्यूवर असलेल्या आशयच्या घरी पोहोचलो, आंघोळी उरकल्या, थोडेफार काहीतरी खाल्ले आणि मग सरळ ताणून दिली. जाग आली तेंव्हा संध्याकाळचे सात वाजत आले होते. रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हातपाय हलवणे आवश्यक होते. अमेरिकेत भाड्याच्या फ्लॅटमध्येसुद्धा फ्रीज, मायक्रोवेव्ह, गॅस, ओव्हन, सेन्ट्रल हीटिंग आणि इंटरनेट अशा सर्व सुविधा उपलब्ध असतात. चोवीस तास वीज, पाणी, आणि गरमपाण्याचीही सोय असते. भाडेकरूला या सर्व सोयी-सुविधांचे वेगळे पैसे लावले जात नाहीत. क्वचित काही वेळा "युटिलिटीज" या नावाखाली, थोडे जास्तीचे पैसे मोजावे लागतात. वीज, पाणी, उष्णता वगैरे गोष्टींचा तुम्ही किती वापर करता त्यावर किती पैसे ते अवलंबून असते. एखाद्या  इमारतीतल्या आठ ते दहा फ्लॅटसाठी मिळून तीन ते चार अशी वॉशिंग मशीन आणि एखाद-दोन ड्रायर असतात. सर्वसाधारणपणे ही मशीन्स इमारतीच्या तळघरामध्ये ठेवलेली असतात. कपडे धुण्यासाठी वेगळे आणि वाळवण्यासाठी वेगळे असे ठराविक पैसे मशीनमध्ये घातल्यावरच, ही मशीन्स चालतात. त्या मशीनमध्ये घालण्यासाठी अमेरिकेतील 'पावली' म्हणजे क्वार्टरची नाणीच लागतात. प्रत्येक वेळी योग्य तेवढी नाणी मशीनमध्ये टाकायची, साबण घालायचा, आपल्याला हवा तो प्रोग्रॅम निवडायचा, पाण्याचे तापमानही ठरवायचे आणि मशीन चालू करायचे. मशीनमधून कपडे धुऊन निघाले की ते काढून ड्रायरमध्ये घालायचे, पुन्हा कपडे वाळवण्यासाठी काही क्वार्टर घालायचे अशी पद्धत असते. ती वॉशिंग मशीन्स आपल्या घरातल्या मशीन्सपेक्षा बरीच मोठी असतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे एका माणसाच्या कपड्यांसाठी आठवड्यातून एखादेवेळी मशीन लावले तरीही पुरते. ड्रायरमधून कपडे फिरवून काढले की ते पूर्ण वाळून येतात आणि हाताला अगदी गरम लागतात. बाहेर काढल्या काढल्या लगेच छान दाबून घड्या करून ठेवले की कपडे अगदी इस्त्री केल्यासारखे दिसतात.

आशयच्या घरीसुद्धा सगळ्या सोयी होत्याच. बाहेर एक प्रशस्त खोली, त्यामध्ये एकाबाजूला मोठा पलंग दुसऱ्या बाजूला सोफा-कम-बेड आणि टेबल-खुर्ची ठेवलेली होती. आत एका बाजूला स्वयंपाकघर आणि दुसऱ्या बाजूला मोठी बाथरूम असे सर्व सोयीने सुसज्ज आणि नेटके असे ते घर होते. झोपेतून उठल्याबरोबर मी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. सगळी कपाटे उघडून साफसफाई केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्या कपाटांमध्ये बराच किराणामाल सापडला. आशयच्या घरात हिंग, मोहरी चिंच-गुळापासून ओरेगानोपर्यंत आणि पोह्यांपासून ते पास्तापर्यंत सगळ्याच गोष्टी मला मिळाल्या. पूर्वी ज्या विषयात आशय काठावरही पास होण्याची शक्यता नव्हती त्या विषयात म्हणजे पाककलेत त्याला अचानक रस निर्माण झाला की काय? अशी मला शंका आली. पण दोन दिवसांनंतर आशय परत आला आणि त्याने खुलासा केला. त्याच्या कॉलेजमधले एक मूळचे भारतीय प्राध्यापक, नुकतेच अमेरिकेतले आपले घर बंद करून भारतामध्ये परत गेले होते. जाताना त्यांच्या घरातले उरलेले सामान त्यांनी आशयला दिले होते. आशयकडे ते खाण्याचे सामान पडूनच होते. मी येणार हे कळल्यावर त्याला अगदी हुश्श झाले होते. मी त्यातले बरेचसे सामान सत्कारणी लावणार याची त्याला खात्री होती. ते सर्व सामान बघितल्यानंतर मला कळले की बाहेरून फक्त दूध, भाजीपाला आणि फळे आणले की भागणार होते.

मग बाहेरची खोलीही आवरायला लागलो. आशयच्या घरी आणि आमच्या मुलांच्याही खोल्यांमध्ये नेहमीच अमेरिकन नाण्यांचा साठा असतो. अमेरिकेत कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी मशीनमध्ये क्वार्टरची नाणीच लागतात. त्यामुळे ती नाणी या मुलांनीअगदी जपून वेगळी ठेवलेली असतात. एक डॉलरची नाणीही  वापरली जात असल्यामुळे, तीही जपून ठेवलेली असतात. पण पेनी (१ सेंट), निकेल (५ सेंट), डाइम (१० सेंट) अशा छोट्या किंमतीच्या नाण्यांचा साठा मात्र कुठेतरी एखाद्या मोठ्या डब्यात किंवा टोपलीमध्ये पडलेला असतो. अमेरिकेत शिकणारी आपली मुले, अशी अमेरिकन चिल्लर निदान जमा तरी करत जातात. आपल्या  मुलांना त्या पैशांची इतपत किंमत असते. पण सर्वसाधारण अमेरिकन मुलांना पेनी, निकेल आणि डाइमची काहीच किंमत नसते असे वाटते. तळघरातल्या वॉशिंग मशीन्सच्या जवळपास, कॉलेजच्या आवारात इकडे-तिकडे, अशी ही नाणी पडलेली दिसतात. कधी-कधी सुटे नसले, की अमेरिकन लोक सहज एक-दोन डॉलरसुद्धा वर देऊन टाकतात. मात्र वॉशिंग मशीन्स किंवा ड्रायरमध्यॆ वापरायला लागतात म्हणून, हे लोक जास्तीचे पैसे देऊन दुकानातून क्वार्टरच्या नाण्याचा रोल खरेदी करतात!

आम्हाला प्रत्येक पेनीच्या जागी साठ पैसे, निकेलच्या जागी तीन रुपये आणि डाइमच्या जागी सहा रुपये दिसायला लागतात. साहजिकच आहे म्हणा, आम्ही आपले रिक्षेवाल्याला मीटरप्रमाणे मोजून सतरा रुपये देणारे लोक! पुण्यात एखाद्या रिक्षेवाल्याने सतराच्या जागी वीस रुपये मागितले, की पुढची कमीतकमी तीन मिनिटे, बिनकामाची कमाई कशी वाईट असते, हे सांगून मी त्याचे बौद्धिक घेते! कधी कधी अशा रिक्षेवाल्यांचा निषेध करणारे खरमरीत पत्र लिहून, दै. 'सकाळ' मध्ये छापून आणावे असेही माझ्या मनात येते. नाही म्हटलं  तरी गेल्या वीस वर्षांपासून पुण्यात राहते आहे मी! 
सांगायचा मुद्दा म्हणजे, क्वार्टर आणि डॉलरची नाणी वगळता इतर नाण्यांचा साठा आम्ही गेल्या-गेल्या सुपर मार्केट मध्ये किवा बसमध्ये खपवतो. अलिबाबाला गुहेतला खजिना मिळाल्यावर झाला असेल त्यापेक्षाही जास्त आनंद, या मुलांच्या घरातला अमेरिकन नाण्यांचा साठा बघितला की आनंदला होतो! मग ती नाणी वेगवेगळी करणे आणि त्यांच्या पुरचुंड्या बांधण्याचा उद्योग सुरु होतो. मीही अलीबाबाच्या बायकोप्रमाणे, आनंदला लागेल ती मदत करायला सरसावते. त्यानंतर मग त्यातली एखादी पुरचुंडी बरोबर घेऊन आम्ही खरेदीला बाहेर पडतो. शेकडो पेनींची अशी मोठ्ठी पुरचुंडी किंवा पिशवी बघितली, की सुपरमार्केट मधल्या बिलिंग काउंटर वरच्या बायका-पुरुषांची अगदी भंबेरी उडते. पण एक मात्र पाहिलं आहे. ती माणसे कधीही, नाणी घ्यायला कुरकुर करत नाहीत किंवा तोंड वाकडे करत नाहीत. पण त्याचबरोबर काही वेळा अगदी मजेशीर अनुभव येतात.

मोठ्या स्टोअर्स मध्ये नाणी मोजायची मशिन्स असतात. आम्ही नाण्यांचे पुडके दिल्यावर, लाऊड स्पीकरवर पुकारा करून त्या बिलिंग काउंटरवर नाणी मोजण्याचे मशीन मागवले जाते. जिथे तसे मशीन नसते, तिथल्या काही जणांना इतकी नाणी मोजायची कशी आणि त्यांची बरोबर बेरीज करून रक्कम किती ते कसे ठरवायचे हे समजतच नाही. मग आम्हालाच त्यांना मदत करावी लागते. काही वेळा एखाद-दुसऱ्या दुकानांत आमच्याकडे कुणी संशयाने बघतात. तुम्ही इतकी नाणी कुठून आणली? असेही विचारतात. मग त्या सेल्समनना तो खुलासा करताना आनंदला खूप  मजा येते .
आमच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यामध्ये आशयकडच्या पेनी, निकेल, डाइमची सर्व चिल्लर आम्ही अशाच प्रकारे सत्कारणी लावली होती. दुसऱ्या वेळी म्हणजे २०१२ साली, आम्ही अनिरुद्धच्या हॉस्टेलवर राहिलो होतो. तिथेही असाच उद्योग केला होता. यंदा, २०१४ साली पुन्हा आम्ही आशयच्या घरी उतरलो होतो. पहिल्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी, मी आणि आनंदने आशयकडच्या असलेल्या सगळ्या खुरद्याची वर्गवारी करून ठेवली. मग पेनीचे पुडके घेऊन खरेदीला गेलो. आमच्या दौऱ्यांमधल्या पुढच्या काही दिवसांतच आशयकडे जमा झालेली जी चिल्लर आम्ही संपवली ती जवळ-जवळ ३०-३५ डॉलर एवढी भरली.
प्रत्येक वेळी या मुलांच्या घरून निघताना आम्ही त्यांच्याकडचे ओझे कमी करतो आणि वापरलेल्या चिल्लरच्या बदल्यात बंदे डॉलर्स आणि क्वार्टर त्यांच्यासाठी ठेवून निघतो. इतके पैसे आपल्याकडे होते हे अचानक कळल्यावर ते आश्चर्यचकितच होतात. आम्हाला मात्र अगदी 'पेनी वाईज डॉलर स्मार्ट' झाल्यासारखे वाटते!

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

१४. अमेरिकेच्या नावाने….!

अमेरिकेला पोहोचल्याबरोबर आणि परत भारतात आल्यानंतरही काही काळ, मला जेट-लॅगचा फार त्रास होतो. विचित्र वेळी जाग येते आणि काही केल्या परत झोप येत नाही. आमच्या पहिल्या अमेरिका भेटीत, बॉस्टनमध्ये असताना एक दिवस, पहाटे चार-साडेचार पासून मी जागी होते. तासाभरात आनंद जागा झाल्यावर आम्ही बाहेर फिरायला निघालो. बरेच चालल्यानंतर  भूक लागल्याची जाणीव झाली. एक 'सबवे आउटलेट' दिसले आणि आम्ही त्यात शिरलो. अगदी भारतीयच वाटावी अशी एक मुलगी आमची ऑर्डर घ्यायला आली, त्यामुळे आम्ही जरा सुखावलो.आत ती एकटीच होती आणि बाहेर फक्त आम्ही दोघेच गिऱ्हाइक होतो. आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर तीही खूष झाली आणि आमच्याशी लगेच हिंदीमध्ये बोलायला लागली. मूळ बांगलादेशची ही मुलगी, दहा-बारा वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेली होती. 

अमेरिकेतल्या 'सबवे' वगैरे दुकानात खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करणे मला तेंव्हा फार त्रासाचे वाटायचे. "हा सॉस का तो सॉस, हे टॉपिंग का ते टॉपिंग", असले हजार प्रश्न तिथे विचारतात. या मुलीने मात्र मोठ्या आस्थेने, आम्ही काय घ्यावे काय नाही याचा  सल्ला दिला आणि सढळ हाताने चीझ घालून आम्हाला एक 'फूटलाँग' बनवून दिला. "इच्छा असूनही मी तुमचे बिल कमी करू शकत नाही, पण माझ्यातर्फे दोन चॉकलेट कुकीज घ्या",  असे सांगून शेवटी तिने अगदी प्रेमाने आम्हाला निरोप दिला !
आधी, आमच्यासाठी 'फूटलाँग' बनवत असताना, ती मुलगी गप्पाही मारत होती. बोलता बोलता अमेरिकन लोकांच्या 'थंडपणावर'  ती घसरली. अमेरिकन लोकांचे अगदी निर्लेप असणे, जेवढ्यास तेवढे  म्हणजे अगदी "cut & dry" बोलणे आणि 'Business-like' वागणे या सगळ्याचा तिला फार त्रास होत होता. तिच्या म्हणण्यात तथ्य होते आणि तिला त्याचा त्रास होणेही स्वाभाविकच होते. एकीकडे, अमेरिकेत स्थायिक होण्यामुळे मिळालेले आयुष्य तिला सुखाचे वाटत होते, तर दुसरीकडे आपल्या भागातल्या लोकांचा मनमोकळेपणा, बोलकेपणा आणि प्रेम आठवून बांगलादेश सोडून आल्याचे तिला वाईटही वाटत होते. आपल्या समाजामध्ये आणि नातेसंबंधांमध्ये ओलावा, आपुलकी आणि आदरातिथ्य अजूनतरी थोडेफार टिकून आहे. पण अमेरिकन लोकांचे अंधानुकरण करता-करता भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही अशी थंड आणि निर्लेप वृत्ती आता  हळू हळू फोफावते आहे याची तिला बिचारीला कदाचित कल्पनाही नसेल.

दुसऱ्या वेळी अमेरिकेला जाताना आम्ही लुफ्तांसा कंपनीच्या विमानाने फ्रॅंकफुर्टला विमान बदलून पुढे गेलो होतो. फ्रॅंकफुर्ट-शिकागो प्रवासात माझी आणि आनंदची फारकत झाल्यामुळे मला एका गोऱ्या मड्डमशेजारी जागा मिळाली. अमेरिकेला जाणारी गोरी बाई म्हणजे माझ्या दृष्टीने ती अमेरिकनच होती. प्रत्यक्षात, ती बाई जर्मन असल्याचे बोलण्याच्या ओघात कळले. नंतर आमच्या छान गप्पाही चालू झाल्या. आम्ही जर्मनीत कुठे-कुठे हिंडलो आणि काय-काय बघितले, हे जाणून घेण्यात तिला रस होता. पण आम्ही अमेरिकेला चाललोय आणि फ्रॅंकफुर्टला आम्ही फक्त विमान बदलले, हे ऐकल्यावर ती जरा हिरमुसली. मग त्या बाईने अमेरिकेच्या संस्कृतीवर - खरंतर असंस्कृतपणावर - भरपूर तोंडसुख घेतले. सर्व पाश्चिमात्य देशातल्या तमाम गोऱ्यांची संस्कृती ही साधारण एकच असते, अशी तोपर्यंत माझी समजूत होती. आणि, भारतीय संस्कृतीच्या वृथा अभिमानातून निर्माण झालेल्या माझ्या संकुचित वृत्तीमुळे आणि अज्ञानामुळे  मी सर्वच पाश्चिमात्त्यांना संस्कृतीहीन समजत होते. मात्र पुढचे काही तास, 'युरोपियन सुसंस्कृतपणा', 'जर्मन नागरिकाचे सभ्य वर्तन' आणि 'अमेरिकन अससंस्कृतपणा' या विषयांवर माझी शिकवणीच त्या बाईने घेतली! अमेरिकेला इतकी नावे ठेवणाऱ्या या बाईला केवळ कामानिमित्त नाइलाजास्तव अमेरिकेला जावे लागत असणार, याची मला खात्रीच होती. तरीही मी तिला विचारलं, "तू अमेरिकेला का निघाली आहेस"? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती मूळची जरी जर्मन असली तरी, गेले वीस-एक वर्षे अमेरिकेत स्थायिक होऊन अमेरिकेचे नागरिकत्व पत्करलेली होती!

तिसरा अनुभव यावेळच्या फेरीत आला. कॅलटेक विद्यापीठात अनिरुद्धचा पदवीदान समारंभ झाल्यावर आम्ही संध्याकाळच्या शेवटच्या मेट्रोने आशयच्या घरी परत निघालो होतो. त्यावेळी मेट्रो स्टेशनावर आम्ही दोघे आणि एक मिचमिच्या डोळ्याची, पिवळ्या कांतीची मध्यमवयीन बाई, इतकेच प्रवासी  होतो. ती बाई  आमच्याच डब्यात चढली. तास-दीड तासाचा प्रवास होता. त्या बाईने हसून स्वत:हून माझ्याशी बोलायला सुरुवात केली.  मोलकरीणीचे काम करणारी, अगदी साध्या कपड्यातली ही चीनी बाई, भारतात नुकत्याच आलेल्या मोदी-सरकारविषयी खबर ठेऊन होती! ती अगदी चीनी ढंगाची इंग्रजी भाषा बोलत होती. आमच्या मुलाला 'कॅलटेक' या मान्यवर विद्यापीठातून फिजिक्ससारख्या 'कठीण' विषयांत पदवी - आणि तीही 'ऑनर्स'सह -  मिळाल्याचे कळल्यावर तर ती एकदम बोलतच सुटली. "आपली मुले खूपच हुशार असतात. इथली अमेरिकन मुले म्हणजे अगदी मठ्ठ! गणित, सायन्स आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये अमेरिकन पोरांना मुळीच गति नसते. ती फक्त मोबाईलवर गेम्स खेळत बसतात, अभ्यासासाठी कष्ट घ्यायची त्यांची अजिबात तयारी नसते. थोड्याच वर्षांमध्ये चीन, कोरिया आणि भारतातील मुलेच उच्चशिक्षित होऊन या सगळ्या अमेरिकन मुलाना पार मागे टाकणार आहेत.  इथल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि सगळे व्यवसाय आपल्याच लोकांच्या हाती येणार आहेत." हे सगळे ती अगदी "हिंदी-चीनी भाई-भाई" च्या आवेशात बोलत होती,पण स्वत: मात्र पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकन नागरिकत्व पत्करलेली बाई होती!

पुण्याबाहेरचे लोक नेहमीच खुद्द पुणेकरांच्या "पुणेरी" वृत्तीला आणि "पुणेरी संस्कृतीला" नावे ठेवतात.  पण त्याचबरोबर पुण्यामध्ये स्थायिक व्हावे, पुण्यामध्ये मुलांनी शिकावे किंवा निदान मुलीला पुण्यातले स्थळ मिळावे, यासाठी त्यांची कमालीची धडपड चालू असते. महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातील इतर राज्यातील लोकांनासुद्धा पुण्याला यायचे असते. पण  बाहेरून येऊन पुण्यात स्थायिक झालेले, अगदी पंधरा-वीस वर्षे इथे काढलेले माझ्यासारखे लोकदेखील, स्वत:ला 'पुणेकर' म्हणवून घ्यायला सहज तयार नसतात.  तसेच काहीसे अमेरिकेच्या बाबतीत आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले देशोदेशीचे बरेच लोक, जाता-येता अमेरिकेला आणि अमेरिकन संस्कृतीला नावे ठेवत असतात. पण त्याचबरोबर, अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी आणि मुलांना अमेरिकेत शिकायला पाठवण्यासाठी सर्वच देशातले लोक धडपडत असतात हेही खरे आहे. पुण्याबद्दल, 'पुणे तिथे काय उणे?' आणि अमेरिकेला 'Land of dreams' किंवा 'Land of opportunities'  म्हणतात ते काही उगीच नाही!

इतकी वर्षे पुण्यात राहिल्यांनंतरही "पुणेरी वृत्ती" किंवा "खास पुणेरी" व्यक्तींची मी थोडी चेष्टा करते हे पाहून कुणी-कुणी आक्षेप घेतात, किंवा, "तुला हे बोलण्याचा अधिकार नाही" असे सुनवतात. मात्र, जन्मतः पुण्याची नसल्याने, साक्षात लोकमान्य टिळकांच्या आवेशात मला सांगावेसे वाटते," पुणेरी वृत्तीला नावे ठेवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

१३. मिडवेल अव्हेन्यू मिळाला !

वेस्टवूडकडे जाणाऱ्या बारा वाजताच्या बसमध्ये बसेपर्यंत आम्ही चांगलेच दमलेले होतो. आता कुठे काही गडबड व्हायला नको असे वाटत होते. त्यामुळे आशयचे घर, म्हणजेच मिडवेल अव्हेन्यूसाठी कुठे उतरायचे, ही  चौकशी आम्ही बसमध्ये चढता चढताच चालकाकडे केली. आमचे ते बोलणे ऐकल्याबरोबर बसमधला एक विद्यार्थी म्हणाला," मी पण वेस्टवूडला उतरून, मिडवेल अव्हेन्यू पार करून पुढे  जाणार आहे. मी उतरणार आहे तिथेच तुम्ही उतरा आणि माझ्या मागे मागे या. मी तुम्हाला रस्ता दाखवतो." हे ऐकल्यावर आम्ही निर्धास्त झालो. बस मधून उतरल्यावर हात उंचावून रस्ता दाखवत त्याने आम्हाला सांगितले, "समोरचा मोठा रस्ता दिसतोय तो आहे विल्शर बूलेवार्द. तो पार करून पुढे जायचे. किनरॉस अव्हेन्यू पार करून वेबर्न प्लाझा पकडायचा. डावीकडची तीन वळणे सोडून चौथे वळण घेतले की थेट तुम्ही मिडवेल अव्हेन्यूलाच पोहोचाल."
आम्ही पुण्याहून निघताना गूगलवर घराचा नकाशा बघून ठेवला होता. आमच्या आठवणीप्रमाणे, हा मुलगा दाखवत होता त्याच्या विरुद्ध दिशेला आम्ही जायला पाहिजे होते. त्यामुळे आम्ही बुचकळ्यात पडलो. तुझे काही चुकत तर नाही आहे ना? असे त्याला विचारूनही बघितले. पण तुमची नकाशा बघण्यात काहीतरी चूक झाली असेल, असे तो अगदी छातीठोकपणे म्हणाल्यामुळे आम्ही त्याच्या मागून गेलो. आमच्या दोन मोठ्या, चाके असलेल्या बॅगा ओढत त्याच्या मागे जाताना आम्ही फार भरभर चालू शकत नव्हतो. थोडा वेळ आमच्या बरोबर चालल्यानंतर, "मला जरा गडबड आहे, मी पुढे होतो." असे सांगून तो ताड ताड पुढे चालत निघून गेला. आम्ही त्याने दाखवलेल्या रस्त्याने चालत राहिलो.

अमेरिकेत बऱ्याचशा छोट्या मोठ्या रस्त्यांवरही चाके असलेल्या बॅगा, व्हीलचेअर वगैरे चालवायला आणि फुटपाथवरून खाली आणि वर जाण्यासाठी उतार केलेला असतो. पादचाऱ्याना रस्ता पार करण्यासाठी, सिग्नलवर पांढऱ्या रंगाच्या मनुष्याकृतीचा दिवा येण्याची वाट बघावी लागते. काही काही कमी रहदारीच्या रस्त्यावर, फुटपाथवरील खांबावरचे एक बटण दाबले की मगच तसा पांढरा दिवा येतो आणि त्यानंतरच रस्ता पार करता येतो. "घुसेल त्याचा रस्ता" हा पुणेरी नियम तिथे अजिबात लागू होत नाही. अगदीच छोट्या रस्त्यांवर पादचाऱ्यासाठी पांढऱ्या दिव्याची सोयही नसते. पण आपण रस्ता पार करू पाहतोय असे दिसले तरी वाहनचालक थांबतात आणि अगदी अदबीने आपल्याला वाट देतात. पुण्यासारख्या शहरातून गेल्यानंतर अमेरिकेतल्या चालकांकडून मिळणारी ही वागणूक अगदी सुखद वाटते.

त्या कॉलेजकुमाराने दाखवलेला मोठा रस्ता आम्ही पार केला. आता पुढचा रस्ता चढणीचा होता. सामान ढकलत, धापा  टाकत आम्ही डाव्या हाताच्या चौथ्या वळणाला वळलो आणि काय! समोर मिडवेल अव्हेन्यूची पाटी वाचून अगदी हुश्श झाले. आम्ही पोहोचलो होतो त्या कोपऱ्यावरच्या घरांचे क्रमांक सहाशेपासून चालू होत होते. आम्हाला तेराशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाचे घर शोधायचे होते. आम्ही पुढचा चढणीचा रस्ता चढायला लागलो. पण पुढे पुढे घरांचे क्रमांक कमी होत चालले आहेत असे आमच्या लक्षात आले. म्हणजेच आम्ही शोधत असलेले तेराशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाचे घर आम्हाला पुढे मिळणार नव्हते! आता आमची चांगलीच पंचाईत झाली. रस्ता निर्मनुष्य, विचारायचे तरी कुणाला?

इतक्यात एक विद्यार्थिनी दिसली. आम्ही तिला विचारले पण ती तिथे नवीनच राहायला आलेली होती आणि तिला आसपासची माहिती नव्हती. तरी तिने लगेच तिच्या स्मार्ट फोन  वर गूगलचा नकाशा काढला. बराच वेळ खटपट करूनही तिला तेराशे अठ्ठ्याहत्तर मिडवेल अव्हेन्यू काही सापडेना. ती मुलगी निघून गेली आणि दुपारी दोन वाजताच्या सुमारास, त्या सुनसान रस्त्यावर आता पुन्हा आम्ही दोघेच राहिलो. 'एक ते चार कुणीही दारावरची  घंटा वाजवू नये' अशी 'पुणेरी पाटी' कुठेही नसली, तरीही मनावर संस्कार असतातच नां! कुठल्या घराचे दार ठोठावायची हिम्मत होईना. तेवढ्यात एक माणूस गाडीत बसून घरातून बाहेर पडताना दिसला. आनंदने जवळ जवळ धावतच जाऊन त्या माणसाला गाठले आणि पत्ता विचारला. तो तिथलाच रहिवाशी असल्यामुळे माहितगार होता. त्याने आम्हाला सांगितले की सहाशेपासूनची पुढची घरे विल्शर बूलेवार्दच्या पलीकडच्या मिडवेल अव्हेन्यूवर आहेत! म्हणजे आम्ही बरोब्बर उलट्या दिशेला २ कि. मी. चढण चढत आलेलो होतो!

अमेरिकेतल्या रस्त्यांवर आपल्या इथल्यासारख्या रिक्षा नाहीत. रस्त्यांवरून बऱ्याच Taxi धावताना दिसत असल्या तरी हात केल्यावर त्या थांबत नाहीत. आधी फोन करून Taxi बोलवायाची असते. कुणाला लिफ्ट मागायची तर सोयच नाही. पुण्यातले रिक्षावाले उध्दट असतात म्हटलं तरी चार-सहा जणांकडून नकार घेतल्यानंतर एखाद्याला तरी आपली दया येतेच. पण इथे तीही सोय नव्हती. पुन्हा सामान घेऊन उलटे चालत जाणे भाग आहे,  हे आम्हाला कळल्यामुळे आम्ही हबकलो. पण 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत, सामान फरफटत आम्ही पुन्हा उलटे चालत निघालो. तो उलटा रस्ता उताराचा असला तरीही त्यावेळी आम्हाला अतिशय कष्टाचा वाटत होता .

पंधरा वीस मिनिटांच्या तंगडतोडीनंतर आम्ही तेराशे अठ्ठ्याहत्तर मिडवेल अव्हेन्यू या पत्त्यावर पोहोचलो. दुमजली इमारतीतील तळमजल्यावर आशयचा स्टुडियो फ्लॅट होता. आशयने आमच्यासाठी लपवून ठेवलेली घराची किल्ली शोधून घरात शिरेस्तोवर जवळ-जवळ दुपारचे तीन वाजत आले होते. घरी पोहोचल्यावर आधी इंटरनेट वरून शिकागोमध्ये असिलताशी आणि कॅलटेकमध्ये अनिरुद्धशी संपर्क साधला. तसं पाहता, टेक्नॉलजीमुळे गोष्टी खूप सुकर झाल्या असल्या तरी चिंताही वाढल्या आहेत. आमचे विमान लॉस एंजेलिस विमानतळावर सकाळी दहा वाजता पोहोचलेले मुलांना इंटरनेट वरून कळलेले होते. त्यांच्या अंदाजाप्रमाणे आम्ही बारा वाजेपर्यंत आशयच्या घरी पोहोचायला पाहिजे होते. दोन वाजून गेले तरीही आम्ही अजून पोहोचलेलो नाहीत हे कळल्यामुळे ती दोघेही चिंतेत होती. आमच्या फोनमध्ये तिथले लोकल कार्ड नसल्यामुळे मुलांना फोनही केलेला नव्हता. पण आमच्याशी बोलणे झाल्यामुळे दोघांचाही  जीव भांड्यात पडला. माझ्या व्यवसायामुळे येणाऱ्या रात्री अपरात्रीच्या फोनना कंटाळून, भारताबाहेर फिरायला पडले की मी फोन वापरायचे टाळते. पण यावेळी मात्र फोन असायला हवा होता असे वाटले.

आपण पत्ता विचारल्यावर सर्वसाधारण अमेरिकन माणसे शक्य तेवढी  मदत करतात किंवा माहिती नसल्यास तसे सांगून मोकळे होतात. त्या कॉलेजकुमारासारखे  स्वत:हून मदतीसाठी पुढे येणारे अमेरिकन्स फारसे बघायला मिळत नाहीत. अर्थात, त्या अमेरिकन मुलाने त्याच्या दृष्टीने योग्य तोच पत्ता आम्हाला सांगितला होता. पण मिडवेल अव्हेन्यू नावाचे दोन जुळे भाऊ विल्शर बूलेवार्दच्या अल्याड-पल्याड स्थायिक आहेत याचा त्या बिचाऱ्यालाही कदाचित पत्ता नव्हता!"
काही इरसाल पुणेकर मुद्दाम चुकीचा रस्ता सांगून बाहेरच्या माणसाची गंमत बघतात" असे पुण्याबाहेरचे बरेच लोक सांगतात. 'तशा' पुणेकरांच्या 'पुणेरीपणाला' पुण्याबाहेरचेच नव्हे तर बाहेरून येऊन पुण्यात स्थाईक झालेले आमच्यासारखे लोकही नावे ठेवतात.
यावरून आणखी एक गंमत आठवली. अमेरिकेत काही वर्षांपूर्वीच बाहेरून येऊन स्थाईक झालेले लोक, वेगवेगळ्या कारणांसाठी अमेरिकन संस्कृतीच्या नावाने बोटे मोडतात. त्या गंमतीबद्दल पुढच्या लेखात…  

गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

१२. हॉलिवूडला हनिमून !

"हॉलीवूडला हनिमून" साठी निघालेल्या जपानी जोडप्याबद्दल माझ्या मागच्या लेखात मी तुम्हाला सांगितले होते. अर्थात ते हनिमूनला निघाले होते हा आपला माझा अंदाज. खरंतर ते विवाहित होते की नाही,  हे तरी कुठे मला माहिती होते? पण त्यांना बघून माझ्या मनाला वाटले की हे हनिमूनला निघालेले जोडपे आहे. त्यांना हॉलीवूडला जायचे होते, म्हणून मी त्यांना मनानेच  "हॉलीवूडला हनिमून" साठी पाठवून दिले! "हॉलीवूडला हनिमून"  ही कल्पना अगदी romantic  वाटते की नाही? तो विचार माझ्याही मनाला सुखावून गेला होता. पण तेंव्हां सहजच आलेला विचार पुन्हा आज सांगण्यामागे एक वेगळाच संदर्भ आहे. 

सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या सर्व मित्र-मैत्रिणींची एक-एक करून, लग्ने व्हायला लागली होती. हल्ली नवीन जोडपी लग्न झाल्यावर सत्यनारायणाची पूजा करतात की नाही, माहिती नाही. पण त्यावेळी घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे उरकल्यावरच हनिमूनला जायची पद्धत होती. मात्र, हनिमूनसाठी सिंगापूर, स्विझर्लंड किंवा ऑस्ट्रेलिया वगैरे dream destinations रूढ झालेली नव्हती. "हनिमून स्पेशल" टूर्सदेखील निघत नव्हत्या. "सेकंड हनिमून" वगैरे फॅड तर नव्हतेच नव्हते. "हनिमून" बद्दल उघडपणे सर्वांसमोर चर्चा होत नव्हती की फेसबूकवर फोटो टाकणे, स्टेटस अपडेट करणे वगैरे काही नव्हते. चर्चा झालीच तर अगदी खास जवळचे मित्र आणि त्यांच्या बायकांच्या समोर व्हायची. असाच आमचा एक मित्र आणि त्याची बायको नुकतेच महाबळेश्वरहून हनिमून ट्रिप करून आले होते. त्यानंतर जमलेल्या मित्रमैत्रिणींच्या अड्ड्यामध्ये हास्यविनोद आणि गप्पा-टप्पाच्या वातावरणात, कुणीतरी या मित्राला विचारले, "काय म्हणतेय महाबळेश्वर?"

मित्राने गौप्य स्फोट केला. "महाबळेश्वर काय म्हणणार? हनिमूनसाठी काय करायचे आहे महाबळेश्वर आणि माथेरान? महत्वाचा असतो तो एकांत, जो आम्ही पुण्यातल्या  हॉटेलमध्येच राहून मिळवला. उगाच फालतू वेळ आणि पैसा कशाला खर्च करायचा ?"
" काहीतरी थापा मारू नकोस. महाबळेश्वरहून सगळ्यांसाठी presents पण आणलीयत की तुम्ही!" कुणीतरी डाफरले.
"बरोबर आहे. आम्ही presents आणली, पण तुळशीबागेतून, महाबळेश्वरहून नाही! तुळशीबागेत महाबळेश्वरच  काय, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही शहरात मिळणारी कोणतीही वस्तू मिळेल! पुणे तिथे काय उणे?" 
'आ' वासलेल्या सगळ्या चेहऱ्यांकडे पाहून हसत तो मित्र पुढे म्हणाला, "आम्ही रुममध्ये  मस्त लोळत दिवस काढायचो. संध्याकाळी जरा उशिरा बाहेर पडायचो, खरेदीला आणि भटकायला. कुणाला काही कळले सुद्धा नाही. आम्ही presents आणल्यामुळे सासर-माहेरचे सगळे खूष झाले की नाही?"

पण हे असं कसं आणि का? हा विचार सर्वांना अस्वस्थ करत होता. त्यामुळे मग कुणीतरी शंका काढली,
"पण मग महाबळेश्वरला गेलो होतो असंच का सांगितलंत?"
"आम्ही कुठेही गेलो असतो आणि काहीही सांगितले असते तरी कुणाला काही फरक पडणार नव्हता. पण 'हनिमून" म्हटलं की, सगळ्यांच्या डोक्यात महाबळेश्वर, माथेरान, उटी किंवा काश्मीर अशा काही ठराविक जागाच येतात की नाही? मग सगळ्यांना पटण्यासारखे असे ठिकाण, म्हणून मी महाबळेश्वर सांगून टाकले. त्यामुळे कोणीही काही प्रश्न विचारत बसलेच  नाहीत!" 
कुणीतरी अविश्वास दाखवत विचारले, "पण घरच्यांना आधी माहिती असेलच ?"
"छे. आम्ही पुण्यातच राहणार आहोत असे घरी आधी सांगितले असते तर सगळ्यांनी आम्हाला यापैकीच कुठेतरी जायला भाग पाडले नसते का?" 
कुणीतरी म्हणाले, "त्यांच्यापासून लपवून ठेवलेस ते आम्ही समजू शकतो रे.  पण निदान आम्हाला तरी आधी सांगितले असतेस ना ?" 
"तुम्हाला आधी सांगायला काय आम्ही वेडे आहोत काय? तुम्ही हॉटेलवर येऊन आम्हाला छळले नसतेत का!   
तुम्ही जवळचे आहात म्हणून आत्ता तरी सांगतोय.  घरच्यांना अजूनही सांगितलेले नाही."
आपले सांगणे खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी, मित्राने आता आमच्यासमोर पुण्यातल्या हॉटेलचे बिल ठेवले आणि म्हणाला," थोडक्यात काय, आपण आपल्या मर्जीप्रमाणेच करायचे, मात्र इतरांच्या समाधानासाठी, त्यांना पटेल असे काहीतरी सांगायचे म्हणजे मग फारसे प्रश्न येत नाहीत" 
आता मात्र  आम्हा सर्वांना त्यांचे बोलणे पटले. तसेच त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचे आणि कल्पकतेचे कौतुकही  वाटले.

हल्ली 'सेकंड हनिमून' हे एक नवीन फॅड निघाले आहे. 'सेकंड हनिमून' च्या नावाखाली प्रवास कंपन्या अगदी अमेरिका किंवा युरोपचीही पॅकेजेस लोकांना खपवताहेत. खरंतर हल्ली दहावी आणि बारावीनंतरच्या सुट्टीतही बऱ्याच मुलांना आईवडिलांबरोबर प्रवासाला जायचे नसते. त्यांनी आपापले काहीतरी plans  ठरवलेले असतात. मग फक्त नवराबायको निघाले आणि त्याला 'सेकंड हनिमून' असे छान नाव दिले की जरा बरे वाटते. 'सेकंड हनिमून' या संकल्पनेवर आम्हा दोघांचा मुळीच विश्वास नाही. लग्नानंतरचा "हनिमून पिरीयड" संपला की सुरु होतो तो संसार. त्या संसारात 'हनी' ची गोडी आणि 'मून'चा गारवा असतो. अगदीच नाही असे नाही. पण त्याबरोबर बरीच "हाणामारी" देखील असते. काही घरांमध्ये त्याला तात्विक वाद किंवा वैचारिक मतभेद असे सौम्य स्वरूप असते तर काही ठिकाणी अगदी हातापायी असते! थोडक्यात काय, संसारात मुरलेले सगळे नवरा-बायको व्यवस्थित भांडतात. मग उगाच पैशाचा चुराडा करून, 'सेकंड हनिमून' अशा गोंडस नावाखाली परदेशात जाऊन  कशाला भांडायचे? असा आमचा आपला साधा सोपा विचार!

हल्ली मध्यमवर्गीयांकडेही पैसे जरा जास्तच  झाले आहेत किंवा पैसे साठवत बसण्यापेक्षा थोडे सैल हाताने खर्च करायची मानसिकता आली आहे म्हणा. त्यामुळे, अमेरिका अथवा युरोपदर्शनासाठी सहकुटुंब जाणाऱ्या मध्यमवर्गीयांची संख्या खूपच वाढली आहे. "सेकंड हनिमून"च्या नावाखाली असो अथवा सहकुटुंब ट्रिप असो, पण बऱ्याचशा लोकांना, नुकतीच अमेरिकेची ट्रिप करून आलेल्या सर्वांकडून, नायगारा ते  हॉलीवूडपर्यंतच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन  ऐकायचे असते. आम्हा दोघांची प्रवासाची आणि तिथली प्रेक्षणीय स्थळे बघण्याची कल्पना मात्र इतर बऱ्याच टूरिस्ट लोकांच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे. कुठेही गेलो तरी, धापा टाकत सर्व प्रेक्षणीय स्थळांना आम्ही भेट देत नाही. एखाद्या ठिकाणची सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून झालीच पाहिजेत हा आमचा अट्टाहास नसतो. काही लोकांना मात्र आमच्या अमेरिकावारीनंतर "आम्ही हॉलीवूड, नायगारा, Disneyland बघितले, Las Vegas च्या Casino ला भेट दिली" असेच काहीसे आमच्याकडून ऐकायची इच्छा असते. पण तशा खास tourist destinations ना आम्ही आवर्जून जातोच असे नाही. त्यामुळे,त्या लोकांना  जे ऐकायचे असते, ते आमच्याकडून ऐकायला मिळाले नाही की त्यांचा विरस होतो. किंवा मग, "तीन वेळा अमेरिकेला जाऊन आले, पण यांनी काहीसुद्धा बघितले नाही." असा, आमची कीव करणारा भाव काहींच्या आवाजात आणि चेहऱ्यावर आम्हाला जाणवतो. 

अशाच प्रकारात मोडणाऱ्या, आमच्या लांबच्या ओळखीतल्या एक नवश्रीमंत बाई आहेत. आमच्या पहिल्या दोन अमेरिका वाऱ्यांमध्ये आम्ही लॉस एंजेलिसमध्ये  राहूनही हॉलीवूडला आणि Las Vegas भेट दिली नाही हे कळल्यावर त्या भलत्याच अस्वस्थ झाल्या होत्या. "असं कसं? तुम्ही का नाही गेलात? तिथपर्यंत जाऊनही तुम्ही हॉलीवूड कसं नाही बघितलंत ?" असले अनेक प्रश्न विचारून दोन्ही वेळा त्यांनी फार पिडले होते. आमच्या तिसऱ्या ट्रिपनंतर त्या मला भेटल्या आणि आता पुन्हा त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागणार हे माझ्या लक्षात आले. सुदैवाने, मला अचानक, 'महाबळेश्वरला हनिमूनला' गेलेल्या मित्राची आणि   मी मनानेच 'हॉलीवूडला हनिमूनला' पाठवून दिलेल्या जपानी जोडप्याची आठवण झाली. मग काय,  त्या बाईंनी काही विचारायच्या आतच मी त्यांना चक्क एक लोणकढ थाप दिली ठोकून,
"यावेळी की नाही, आम्ही हॉलीवूडला सेकंड हनिमूनला गेलो होतो!"
"अय्या हो! How Nice! 
झालं! त्या बाईंचा चेहरा आनंद, आश्चर्य आणि कौतुकाने फुलून आला. त्यांना ऐकायला आवडेल असे काहीतरी छान ऐकायला मिळाल्यामुळे त्यांना एकदाचे बरे वाटले. त्या इतक्या खूष झाल्या की पुढे त्यांनी मला  आमच्या प्रवासाबद्दल एकही प्रश्न विचारला नाही!

नुकतंच माझ्या कानावर आलंय की त्या बाईंनी "हॉलीवूडला सेकंड हनिमूनकरिता जाऊ या" असा त्यांच्या नवऱ्याच्या मागे लकडा लावला आहे. त्यांचा नवरा मात्र माझ्या नावाने बोटे मोडत असेल,  हे निश्चित!  

११. अठरा डॉलरपायी शिक्षा!

तिसऱ्या अमेरीकावारीमध्येही आम्ही पहिल्या वेळेसारखेच पुन्हा आशयच्या घरी राहणार होतो. पण पूर्वीचे घर बदलून, वेस्ट वूड भागातच एका नवीन flat मध्ये तो राहायला गेला होता. आम्ही लॉस एंजेलिसमध्ये पोहोचायच्या दिवशीच Boston मध्ये सुरु होत असलेल्या गणिताच्या परिषदेसाठी आशय निघून गेलेला होता. त्यामुळे विमानतळापासून वेस्ट वूडपर्यंतची Flyaway बस पकडून त्याचे नवीन घर शोधत आम्ही जाणार होतो. २०१० साली आशयने आम्हाला तशाच Flyaway बसमधून त्याच्या घरी नेले होते. त्यानंतर Flyaway बसने लॉस एंजेलिस विमानतळावर येऊन, आम्ही बोस्टनला जाणारे विमान पकडले होते. त्यामुळे बस कुठे पकडायची, तिकीट कसे काढायचे आणि कुठे उतरायचे, या बारीक-सारीक गोष्टींबद्दल मनात धाकधूक नव्हती. Flyaway च्या वेस्ट वूड थांब्यापासून आशयचे नवीन घर पायी चालत जाण्याच्या अंतरावर असल्याचे त्याने आम्हाला सांगितले होते. घराची किल्ली ज्या 'गुप्त' ठिकाणी लपवून ठेवलेली होती, ती जागाही त्याने  आम्हाला आधीच सांगून ठेवली होती. वेस्ट वूड भागात आम्ही पूर्वी पायी भटकंती केलेली असल्यामुळे तो भाग तसा आमच्या परिचयाचा होता. आता विमानतळावरून बाहेर पडणे, Flyaway बस पकडून वेस्ट वूड थांब्यावर जाणे, तिथून आशयचे नवीन घर व घराची किल्ली शोधून, घरात प्रवेश करणे अशा सहज वाटणाऱ्या काही पायऱ्या  राहिल्या होत्या.

विमानातून उतरताना आम्ही झोपाळलेल्या अवस्थेत उतरलो होतो. पण विमानतळावर, कुत्रेवाला अधिकारी आणि पुढील सामान-तपासणीला सामोरे गेल्यानंतर आमची झोप पार उडून गेलेली होती. विमानातून बाहेर पडायच्या आधी, सुलतान-नामक सहप्रवासी विद्यार्थ्याने आम्हाला एक बहुमूल्य माहिती दिली . त्याच्या म्हणण्याप्रमाणे, UCLA विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना वेस्टवूडला नेण्यासाठी विद्यापीठाचीच एक बस विमानतळावरून दर तासा-तासाला सुटते, जिचे भाडे फक्त एक डॉलर असते. त्याच प्रवासासाठी  Flyaway बसचे भाडे मात्र दहा डॉलर होते. अमेरिकेला निघण्याच्या आधीपासून, नकळतच आमच्या मनात साठचा पाढा चालू झालेला होता. सुलतानने दिलेल्या माहितीमुळे, आता आमचे प्रत्येकी नऊ असे एकूण अठरा डॉलर,  म्हणजेच जवळपास अकराशे रुपये वाचणार, म्हणून आम्ही खुश झालो होतो. विमानतळाबाहेर पडलो तेंव्हां सकाळचे सुमारे साडेदहा वाजले होते. आम्ही दमलेलो असलो तरीही आम्हाला आशयाच्या घरी पोहोचण्याची तशी खास गडबड नव्हती. त्यामुळे विमानतळाबाहेर पडल्यावर UCLA ची ती बस शोधायची आणि तीच बस पकडून दोघांच्या तिकिटाचे मिळून हजार-अकराशे रुपये वाचवण्याचा आनंद मिळवायचा, असे आम्ही ठरवले . Flyaway बसच्या थांब्यावर, मला सामानाजवळ  थांबायला  सांगून, ती एक डॉलरवाली UCLA ची बस शोधायला आनंद गेला.

लॉस एंजेलिस विमानतळावरून वेस्ट वूडला जाणारी Flyaway बससुद्धा दर तासाला एक अशी असते.  अमेरिकेतील बसेसमध्ये कंडक्टर नसतोच, चालकाशेजारीच भाडे स्वीकारणारे एक मशीन असते. बरेचदा बसचालक ढोलगट कृष्णवर्णीय बायका असतात. मी थांब्यावर बसलेली असताना, पाच सात मिनिटांतच Flyaway बस आली. सगळे प्रवासी अगदी शांतपणे रांगेने बसमध्ये चढले. चालक बाईसाहेबांनी हास्य-विनोद करत प्रवाशांना सामान चढवायला मदत केली. त्यानंतर पाच-एक मिनिटे बस उभी करून, अजून 'शिटा' भरण्याची वाट बघत, चालक बाई माझ्यासमोर निवांतपणे सिगारेट शिलगावून उभी होती. " ही बस वेस्टवूडला जाणार आहे आणि पाच मिनिटात सुटणार आहे . तुला वेस्टवूडला जायचे आहे का ? अशी माझी आस्थेने चौकशीही तिने केली. "आम्ही वेस्ट वूडला जाणार आहोत पण माझा नवरा काही चौकशीसाठी गेलेला असल्यामुळे, तो येईस्तोवर मी निघू शकत नाहीए" असे उत्तर मी दिले. पुढे तासभर तुला बस मिळणार नाही, हे सांगून, बरोबर अकरा वाजता बाईसाहेब बस घेऊन निघून गेल्या! पुढच्या  दोन-तीन मिनिटांतच आनंद एक दुःखद बातमी घेऊन परत आला, "UCLA ची एक डॉलर तिकीट असलेली बस वगैरे काही नसतेच"! सुलतानकडून मिळालेली माहिती चुकीची होती. अठरा डॉलर वाचवण्याच्या धडपडीत आम्हाला लॉस एंजेलिस विमानतळाबाहेर पुढचा तासभर थांबण्याची शिक्षा झालेली आहे , हेही आता आमच्या लक्षात आले. खरे तर, आम्हा नवरा बायकोमध्ये अगदी हमखास वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप होण्यासारखा हा प्रसंग होता. पण अठरा डॉलर वाचवण्याचा निर्णय दोघांनी मिळून घेतला असल्याने "तेरीभी चुप, मेरीभी चूप" अशी परिस्थिती झाली!

आता आशयाच्या घरी पोहोचायला उशीर होणार होता . त्यामुळे मग आम्ही बरोबरचे Sandwiches खाऊन  घेतले. आनंद त्याच्या आवडीप्रमाणे, बसथांब्यावर लावलेल्या सगळ्या  बसेसच्या मार्गांच्या नकाशांचा अभ्यास करत होता. त्यामुळेच, बस शोधत आलेल्या आमच्यासारख्याच इतर पर्यटकांना योग्य सल्ला देण्याचे सत्कर्म तो तत्परतेने करत होता. लोकांचे निरीक्षण करणे आणि नवीन माणसांशी गप्प्पा मारणे हा माझा आवडता छंद आहे . त्यामुळे  वेगवेगळ्या वेशातील, विविध चेहरेपट्टीचे आणि नानाविध भाषा बोलणारे लोक बघत तासभर वेळ काढणे मलाही  फारसे अवघड गेले नाही. तिथे थोड्यावेळाने एक तरुण  जोडपे आले . त्यांच्या भाषेवरून ते जपानी वाटत होते . पण त्यांना इंग्रजीचा अजिबात गंध नव्हता. त्यांच्या खाणाखुणावरून त्यांना कुठे जायचे आहे हे कळल्यामुळे आनंदने त्यांना हॉलीवूडला जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले . त्यांच्या वेशभूषेवरून आणि हलचालींवरून ते कदाचित नवविवाहित असावेत आणि अगदी फिल्मी ष्टाईलने "हॉलीवूडला हनिमून" साजरे करायला आले असावेत , असा मी आपला मनोमन अंदाज केला .

इथे बसल्या-बसल्या, मनाने पस्तीस वर्षे मागे जायला लावणारा एक अनुभव मला आला. पूर्वी एकदा आम्ही बरेच जण एकत्र केदारनाथला गेलेलो होतो. केदारनाथची वाट अवघड आणि धोक्याची आहे खरी, पण धडधाकट  माणसांना अशक्य वाटावी अशी नाही . तरीही आमच्या गटामधले बरेच तरुण व धडधाकट लोक, वर चढून जाताना आणि खाली उतरतानाही कमालीची कुरकुर करत होते. केदारनाथाचे  दर्शन घेऊन आम्ही उतरत असताना एका सेवाभावी संस्थेचे दोन कार्यकर्ते वीस-पंचवीस अंध व्यक्तींचा गट घेऊन केदारनाथची वाट चढत होते. ते दृश्य बघून कुरकुरणाऱ्या सर्व लोकांचे डोळे उघडले आणि त्यांना अगदी खजील व्हायला झाले. इकडे लॉस एंजेलिस विमानतळाबाहेर आम्ही बसलेले असताना आमच्यासमोर गतिमंद आणि विकलांग अशा चाळीस-पन्नास ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन पर्यटकांचा जथा आला. त्यातले कित्येक विकलांग वृद्ध wheelchair वर होते. विशेष म्हणजे, हातीपायी धडधाकट पण गतिमंद असलेले त्यांच्यातलेच ज्येष्ठ नागरिक, त्या wheelchairs ढकलून नेत होते. एखाद्या अंध वृद्धेच्या हाताला धरून दुसरी पांगळी वृद्धा वाट काढत होती. अमेरिका-दर्शनासाठी आलेल्या त्या सर्व पर्यटकांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटवीरांच्या गणवेशासारखे पिवळेधमक टी-शर्ट आणि डोक्यावर हिरव्या रंगाच्या टोप्या घातल्या होत्या. चिरतरुण लॉस एंजेलिस शहराचे आणि स्वप्नवत हॉलीवूडचे दर्शन घ्यायला ते सर्वजण अधीर झालेले दिसत होते. त्या सर्व वयस्कर पर्यटकांचा उत्साह, आणि अंगातली धमक बघून आम्ही अचंबित झालो. आमच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण झाली आणि बारा वाजताची बस पकडेस्तोवर आमची उरलीसुरली मरगळ निघून गेलेली होती.




१० इजा बिजा आणि तिसऱ्या वेळची मजा !

लिहिता लिहिता, सहज मला मागच्या दोन वेळच्या अमेरिका प्रवासामधील काही गमती  आठवल्या. पण आता यावेळी उतरल्यावरची गंमत सांगते.  यावेळचा जातानाचा प्रवास फारच लांबला . आदल्या दिवशी दुपारी पुण्याहून निघालो आणि मुंबईच्या भावाच्या,  गिरीशच्या घरी पोहोचलो . रात्री गप्पा रंगल्या आणि जेमेतेम तीन चार तास  झोप घेऊन सकाळी नऊ वाजताच्या  सौदी एयर लाइन्सच्या विमानाने जेद्दा विमानतळावर पोहोचलो . पुढचा पूर्ण दिवस जेद्दा विमानतळावर काढून पहाटे दीड दोन वाजता  लॉस एंजेलिसच्या विमानात बसेस्तोवर आम्ही पार  कांटाळून गेलेलो होतो . जेद्दा ते लॉस एंजेलिसचा प्रवास जवळजवळ पंधरा तासांचा होता. मुंबईहून निघून लॉस एंजेलिसला पोहोचेस्तोवर जवळजवळ तीस तास उलटून गेलेले होते . मुंबई- जेद्दा प्रवासांत आणि जेद्दा विमानतळावर आमची फारशी  झोप झालेली नव्हतीच. जेद्दा ते लॉस एंजेलिस प्रवासात अरबी मेमसाबांचे नखरे, त्यांच्या पिल्लावळीची कलकल, त्या पोराबाळांना घेऊन चाललेल्या  मोलाकरीणींच्या येरझाऱ्या आणि अमेरिकेत शिक्षणासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची बडबड या सर्व गोष्टींमुळे मला झोप लागणे शक्यच नव्हते .  तरी शेवटी शेवटी मात्र आम्ही दोघेही चांगलेच दमलेले आणि झोपाळलेले  होतो. त्यामुळे कधी मी डुलकी काढत होते तर कधी आनंदचा डोळा लागत होता.

प्रवासात आरामात झोपून राहू शकणाऱ्या लोकांचा मला फार हेवा वाटतो . ट्रेन प्रवासांत, विशेषत: AC टू टियर च्या प्रवासांत सलग पंधरा सोळा तास झोपून राहिलेले महाभाग मी बघितलेले आहेत . विमानप्रवासात सुद्धा   सलग दहा बारा  तास  झोपून राहू शकणारे प्रवासीही पहायला मिळतात. राजधानीच्या आणि शताब्दीच्या  प्रवासात किंवा आंतरराष्ट्रीय विमानप्रवासामध्ये आलेल्या खाण्यापिण्या साठीसुद्धा न उठणारे  किंवा  प्रवासात पोटाची काहिही तक्रार उद्भवू नये म्हणून आलेल्या खाण्याला हात न लावणाऱ्या व्यक्ती मला माहिती  आहेत . एखाद्या गाढ झोपलेल्या सहप्रवाशाला हलवून ," उठ आता ,खाणे आले आहे" अशी सांगायची सुद्धा चोरी असते . आम्ही दोघेही खूप झोपाळलेले असलो तरीही हवाईसुंदऱ्यांची खान-पान सेवा सुरु झालेले दोघांपैकी एकाला तरी जाग येते आणि मग वेळीच एकमेकांना उठवण्याची किंवा दुसऱ्यासाठी खाणे घेऊन ठेवण्याची जागरूकता आम्ही दाखवतोच! सौदी एयर लाइन्सच्या प्रवासांत खाण्यापिण्याची रेलचेल होती आणि आलेले सर्व पदार्थ आम्ही घेत होतो . शेवटी शेवटी कसलेसे sandwich आले , ते आम्ही घेतले.  पण त्यावेळी  भूक नव्हती, त्यामुळे मग नंतर खाऊयात अशा विचाराने ते  तसेच ठेवून दिले . त्यानंतर पुढे  कधीतरी हवाई सुंदरीने दिलेला immigration form कसाबसा भरला आणि पुन्हा निद्रादेवीच्या स्वाधीन झालो . काही वेळ गेला आणि लॉस एंजेलिस विमानतळ आल्याची घोषणा झाली आणि आम्ही विमानतळावर उतरलो .

अमेरिकेत उतरल्यावर आपल्या भारतीय माणसांना, आपोआपच सर्व काही रांगेने आणि शिस्तीत करायची बुद्धी होते . त्याप्रमाणे आम्ही foreign nationals साठी असलेल्या immigration  counter वर गेलो . तपासणी साहेबाने विचारलेल्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली . अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणाचे  तपासणी करणारे साहेब अथवा सायाबीण, बरेचदा अमेरिकन पद्धतीने हलका-फुलका वा जरासा चावट  विनोद करून, हसून आपल्याला पुढे सोडतात. यावेळीही तसेच काहीसे झाले आणि आम्ही अगदी चुटकी सरशी 'समान तपासणीसठी असलेल्या ' पुढच्या रांगेत उभे राहिलो . ती रांगही भलीमोठ्ठी होती. पण चट चट पुढे सरकत होती . आता इथून बाहेर पडले की बस पकडून आशयच्या घरी, असा विचार मनात येतो न येतोय तेव्हड्यात काहीतरी वेगळेच घडले . आमच्या रांगेच्या जवळ गळ्यात पट्टा अडकवलेले  हडकुळे कुत्रे घेऊन एक अमेरिकन अधिकारी फिरत होता. मला कुठल्याही प्रकारच्या कुत्र्यांबद्दल मुळीच प्रेम नाही . पण सर्व पाळीव कुत्र्यांना आणि अगदी  रस्त्यावरची  मोकाट कुत्र्यांना मात्र माझे मन कधीतरी बदलेल अशी दुर्दम्य आशा असावी . त्यामुळे ती तमाम कुत्री नेमकी माझ्याशी सलगी करायला येतात . माझ्या अपेक्षेप्रमाणे या अमेरिकन अधिकाऱ्याबरोबरचे कुत्रेदेखील माझ्याजवळच  येऊन पोहोचले आणि भीतीने माझी गळण उडाली . आनंदाला कुत्री खूप आवडत असल्यामुळे तो शांत होता . कुत्रे आमच्याजवळ येताच साहेबांनी आम्हाला रांगेतून बाहेर पडून काढून पलीकडच्या वेगळयाच खोलीकडे जाण्याचा  इशारा केला . कुत्राची भीती वाटणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही , त्यामुळे आम्हाला बाहेर का काढण्यात आले याचा बोध होईना.  पण तिकडे प्रश्न विचारायची सोय नसल्यामुळे आम्ही त्याच्या मागोमाग दुसऱ्या खोलीमध्ये गेलो .

त्या खोलीतल्या counter मागे अमेरिकन तपासणी अधिकारी बसलेले होते आणि  त्यांच्या समोर समोर दोन तीन लोकांचे सगळे सामान उघडलेल्या अवस्थेत पडलेले होते . आमच्या देखतच एका आंध्रवासीय अम्मा आणि आप्पा च्या सर्व bags उघडून बघितल्या गेल्या .  अम्मा आणि आप्पां गयावया करत असले तरीही त्याला दाद न देता ,  त्यांनी बरोबर आणलेले अनेक खाद्यपदार्थ अमेरिकन साहेबांनी आमच्या डोळ्यादेखत धडाधड जवळच्या केराच्या टोपलीत फेकले  .   ते दृश्य बघितल्यावर आम्हाला इकडे का आणण्यात आले आहे याचा अंदाज आला . यावेळी आम्ही खास अनिरुद्धच्या पदवीदान समारंभासाठी गेलेलो होतो त्यामुळे फक्त  लॉस एंजेलिसमध्ये दहा बारा दिवस राहून भारतात परतणार होतो . आमच्याबरोबर कपडे व रोजच्या वापराच्या वस्तू असे अगदी थोडे सामान  होते . अमेरिकेच्या पहिल्या दोन वेळच्या प्रवासांमध्ये सामानात नेलेले खाद्यपदार्थ  पकडले न गेल्यामुळे यावेळी आम्ही बिनधास्तपणे, आमच्या bags च्या उरलेल्या जागेत आणि वजनात बसतील तितके भरपूर खाद्यपदार्थ भरून नेलेले  होते .  आता ते  सर्व पदार्थ केराच्या टोपलीत फेकले जाणार या कल्पनेने माझा जीव कासावीस झाला.

आम्हाला counter वरच्या  तपासणी अधिकारी बाईने आमच्याजवळची पिशवी  उघडायला लावली . त्यातून तिने दोन sandwichs  बाहेर काढून,  असले खाद्यपदार्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना सामानात  ठेवण्यास मनाई असते,  असे सांगितले . तसेच ते  बरोबर  असूनही तुम्ही immigration form मध्ये तसे  का  लिहिले नाहीत?  अशी कडक  विचारणा केली.  असे  हे  पदार्थ बरोबर ठेवणे आणि form मध्ये खोटी  माहिती लिहिणे  हा गुन्हा आहे, हे ही सांगितले . सौदी अरेबियाच्या विमानात शेवटी  दिलेले chicken sandwichs आणि जेवणाबरोबर आलेले पण न खाल्लेले cup cakes   आम्ही हातातल्या पिशवीत ठेवले होते .   असे पदार्थ कोणी आणलेले आहेत याचा वास  खास प्रशिक्षित  कुत्र्याला येतो आणि मग  त्या संशयीत व्यक्तींना पुढील तपासणीसाठी वेगळ्या खोलीत बोलावले जाते.  या सर्व प्रकारामुळे मी तशी चांगलीच घाबरलेले होते . पण आनंदने प्रसंगावधान राखून शांतपणे, "आम्ही विमानात मिळालेले sandwiches  आणलेले आहेत.  ते  भारतातून येताना आमच्याबरोबर आणलेले नाहीत. त्यातून असे अन्न फेकून देणे आणि वाया घालावणे  हे आम्हाला योग्य वाटले नाही. तसेच असे अन्न बरोबर आणणे हा गुन्हा आहे याची आम्हाला कल्पना नव्हती . त्यामुळे जरी हा गुन्हा असेल तरी तो आमच्याकडून अनावधानाने  आणि अज्ञानातून घडलेला आहे " असा तव्तिक मुद्दा   सांगून टाकला. आनंदच्या बोलण्यामुळे बाई निरुत्तर झाल्या. त्यांनी आनंदाच्या immigration form वर काहीतरी खरडले ,  पुन्हा येताना असल्या वस्तू आणत जाऊ  नका, अशी हलकी शाब्दिक तंबी दिली. पण अन्न वाया घालवू नये हा मुद्दा पटल्यामुळे कि काय म्हणा  आमचे sandwiches आणि cup cakes आम्हाला परत  देऊन आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी दिली . आम्ही तिथून बाहेर पडायच्या आधी हसतमुखाने बाईसाहेबांनी आम्हाला  " Enjoy your stay" अशा शुभेच्छाही दिल्या !

आम्ही थोडावेळ निश्चित घाबरलेले होतोच . मागच्या वेळी कढीलिंब आणि हिरव्या मिरच्या स्मगल करण्याचा अनुभव असल्यामुळे एखाद्या सराईत स्मगलर प्रमाणे यावेळीही मी माझ्या सामानात हिरव्या मिरच्या आणि कढीलिंब नेलेले होते . पूर्वीसारखेच  इतर बरेच खाद्यपदार्थ सुद्धा सामानात  होतेच  . पण गंमत म्हणजे अमेरिकन बाईसाहेबांनी माझ्या हातातल्या पिशवी व्यतिरिक्त आमच्या इतर bags उघडून पाहिल्या नाहीत आणि इतर खाद्यपदार्थांना हातही लावला नाही ,  हे आमचे भाग्यच म्हणायचे !

९. स्मगलिंगचा माल !

आमच्या पहिल्याच अमेरिका प्रवेशाच्या वेळी आमच्याकडचे खाण्याचे पदार्थ पकडले जाणार असे आम्हाला वाटले होते, पण तसे काहीच झाले नाही. सामानात आम्ही चिवडा-लाडू आणि काही जुजबी किराणामाल नेला होता. पहिलीच वेळ असल्यामुळे हितचिंतकांच्या मौलिक सूचना ऐकून सगळे  खाद्यपदार्थ, एकावर एक अशा दोन पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अगदी व्यवस्थित सीलबंद करून नेले होते. इतकेच काय, बेसनलाडवांच्या पिशवीवर lentil flour sweets आणि चिवड्याच्या पाकिटावर puffed rice snacks अशा प्रकारच्या चिठ्ठ्याही लावल्या होत्या. इतक्या जय्यत तयारीनंतर, एखाद्या साहेबाने आपल्या bags उघडून बघाव्यात, उत्सुकतेपोटी काय काय आणले आहे ते पाहावे आणि सर्व काही शिस्तीत आहे म्हणून एखादा कौतुकाचा शब्द ऐकवावा किंबहुना, नजरेनेच का होईना पण आमच्या व्यवस्थितपणाला दाद देऊन आम्हाला बाहेर पाठवावे, असे वाटत होते. "अमेरिकन साहेब आपल्याला काहीच कसे बोलू शकला नाही", हे समाधान मिळविण्याची एक सुप्त इच्छाही माझ्या मनात होतीच. आपण नेलेले सर्व खाद्यपदार्थ अमेरिकन साहेबांचा डोळा चुकवून बाहेर काढण्याचा यशस्वी पूर्वानुभव गाठीशी बांधावा, आणि नंतर अमेरिकेला जाणाऱ्या सर्व आप्त आणि मित्रमंडळींना अधिकारवाणीने फुकट सल्ला द्यायला सक्षम व्हावे असेही कुठेतरी वाटत होते. मात्र असले काहीही विचार मनात तरळून गेलेले असले तरी,  कुठलीही तपासणी न होता आम्ही बाहेर पडल्यामुळे आम्हाला हायसे वाटले होते, हे निश्चित .

२०१२ साली, म्हणजे आमच्या दुसऱ्या अमेरिका-वारीत, आम्ही दोघेच प्रवास करत होतो. त्यावेळी शिकागोला असिलताकडे आठ-दहा दिवस राहून त्यानंतर Iowa विद्यापिठामध्ये आठवडाभराच्या एका पाठ्यवृत्ती कार्यक्रमात सहभागी होणार होतो. त्यानंतरचा आठवडा लॉस एंजेलिसला अनिरुद्धच्या कॉलेजमध्ये, त्याच्या होस्टेलवर  राहणार होतो. शिकागो विमानतळावर आम्हाला घ्यायला असिलता येणार होती. तरीही पहिल्या वेळच्या अनुभवानंतर जागरूकपणे आम्ही असिलताच्या घराच्या पत्त्याच्या दोन-दोन चिठ्ठ्या लिहून आपापल्याजवळ जपून ठेवलेल्या होत्या. काही गडबड झालीच तर कसा मार्ग काढायचा, याचाही विचार करून ठेवला होता. पहिल्या वेळी नेलेले खाद्यपदार्थ अमेरिकन तपासणी-अधिकाऱ्यांनी उघडून न बघितल्यामुळे, दुसऱ्यावेळी आम्ही खाद्यजिन्नस नेण्याच्या बाबतीत जरा निर्ढावलेले होतो. खव्याच्या आणि पुरणाच्या पोळ्या, चकल्या, शंकरपाळे, लाडू, शेगदाण्याची चटणी, चिवडा, अनेक प्रकारचे फरसाण आणि बाकरवड्या असे भरपूर खाद्य पदार्थआम्ही बरोबर नेले होते. Iowa च्या कार्यक्रमात आमच्या भावी वर्ग-मित्रांना भारतीय पदार्थांची चव देण्यासाठी आम्ही जास्तीचे काही खाद्यपदार्थ घेतलेले होते. हे सर्व पदार्थ सीलबंद करण्याची विशेष दक्षताही घेतली नव्हती.

अमेरिकेत सगळीकडे जगभरातील अनेक प्रांतातील बरचसे खाद्यपदार्थ मिळतात. त्यामुळे तिथले जेवण-खाण आम्हा दोघांनाही आवडते. तरीही दिवसातले एखादे जेवण तरी आपल्या चवीचे असावे असे मला वाटते. अमेरिकेतल्या मोठ्या शहरांत, सर्व mega stores मध्ये, भारतीय स्वैंपाकाला लागणारा जवळजवळ सर्व किराणामाल आणि भाजीपाला  मिळतो. पहिल्यावेळी मी आशयच्या घरी आणि MIT मध्ये असिलताच्या dormitory मध्ये जवळजवळ रोज एक-दोन वेळचा स्वैंपाक केला. आमची  असिलताही वयाच्या अठराव्या वर्षापासून, म्हणजे अमेरिकेतील कॉलेजच्या वसतिगृहात राहायला गेल्यापासून रोजच एका वेळचा स्वैंपाक स्वत:च्या हातांनी  करून खात होती.परंतु आशय बुरुंगळे मात्र भारतात BSc करून नुकताच एक वर्षापूर्वी अमेरिकेला गेला होता आणि गणिताच्या उच्च शिक्षणामध्ये मग्न झालेला होता. तो शाकाहारी असल्यामुळे बाहेरच्या बऱ्याचशा खाद्यपदार्थांचा आस्वाद त्याला घेता येत नव्हता आणि वेळेअभावी तो स्वत: फारसे काही बनवतही नव्हता. अशा परिस्थितीत तो माझ्या हातचे मराठमोळे जेवण जेवायला आसुसलेला होता.  पहिल्यावेळी त्याच्या घरी गेल्यावर लगेच तो आम्हाला 'Ralphs' या Megamart मध्ये घेऊन गेला.तिथे मी रोजच्या स्वैंपाकासाठी लागणाऱ्या पण आम्ही बरोबर न नेलेल्या सर्व वस्तू भराभर खरेदी करून टाकल्या. पण मला तिथे कढीलिंब आणि झणझणीत तिखट हिरव्या मिरच्या मात्र मिळाल्या नाहीत .

अमेरिकेत बाहेर मिळणारे खाद्यपदार्थ चवदार असतात पण आपल्या मसाल्यांचा स्वाद आणि लाल-हिरव्या मिरच्यांमुळे येणारा तिखटपणा तिथल्या जेवणात नाही. त्यातल्यात्यात मेक्सिकन जेवण आपल्या मराठी जेवणाच्या जवळ जाण्याइतपत तिखट असते. आमच्या सोलापुरी भाषेत सांगायचे झाले तर अमेरिकेतील खाद्यपदार्थ अगदीच 'सप्पक' असतात. माझ्या हातचे पोळी-भाजी, खिचडी, वांग्याचे भरीत, पोहे, उपमा, असे घरगुती खाद्यपदार्थ खाऊन आशय अगदी खूष झाला. पण झणझणीत तिखट हिरव्या मिरच्या आणि कढीलिंबाची फोडणी देता न आल्यामुळे माझी मनोमन चिडचिड झाली. दुसऱ्या वेळी अमेरिकेला जायच्या दिवशी, माझ्या मनाला झोंबणारी ती गोष्ट मी सहज बोलताबोलता प्राचीजवळ, म्हणजे माझ्या मुंबईच्या वहिनीजवळ बोलून गेले. प्राची  म्हणाली," स्वातीताई, इथे आपल्या घरी कढीलिंब आणि हिरव्या लवंगी मिरच्या आहेत. थोड्या मिरच्या आणि कढीलिंब सामानातून न्या." मी काचकूच करते आहे हे लक्षात आल्यावर प्राचीने धीर दिला, "अहो, कशाला घाबरता आहात? पकडले गेलात तर होऊन होऊन असे काय होणार आहे? फार तर या चार-पाच रुपयाच्या मिरच्या आणि कढीलिंब फेकून देतील ते लोक. न्या बिनधास्त 'स्मगल' करून!" वाहिनीच्या या गोड आग्रहामुळे माझ्याही मनाने उचल खाल्ली. आम्ही दोघींनी मिळून तो 'स्मगलिंगचा माल' व्यवस्थित धुऊन कोरडा केला. कागदी पिशव्यांमध्ये घालून माझ्या कपड्यांच्या घड्यांच्यामध्ये नीट लपवून ठेवला. असा हा स्मगलिंगचा माल नेताना  मला अनामिक भीती वाटत असली तरी त्यापेक्षाही जास्त thrill वाटत होते , हेही खरेच!

मी आणि वाहिनीने संगनमताने केलेल्या या 'स्मगलिंगच्या'  कटामध्ये आनंद आणि माझा भाऊ गिरीश हे दोघे मुळीच सामील नव्हते. उलट  आमच्या या कृतीला, त्या दोघांचा कडवा विरोध होता. त्यामुळे, निघायच्या आधीही त्यांनी मला बरेच काही ऐकवले होते. आनंदने तर मुंबईलाच मला निक्षून सांगितले, " पकडली गेलीस तर, माझा या गोष्टीशी काही संबंध नाही, असे सांगून तुला तिथेच सोडून मी निघून जाईन". तरीही प्राचीचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे  मी बधले नाही. पण हा 'स्मगलिंगचा माल' पकडला गेला तर कशा कशाला सामोरे जावे लागेल अशी धाकधुक मनात घेऊनच शिकागो विमानतळावर मी उतरले. अगदी खरे सांगायचे झाले तर अमेरिकन साहेबापेक्षाही, पुढे अनेक दिवस आनंदच्या आणि गिरीशच्या बोलण्याला सामोरे जावे लागणार याची भिती मला जास्त होती. Immigration form मधील 'तुमच्या सामानात काही बिया, पालेभाज्या वगैरे खराब होणारे पदार्थ आहेत का?' या प्रश्नाला 'नाही' असे उत्तर निर्लज्जपणे लिहून टाकले आणि immigration check  झाल्यांनतर, सामान तपासणी साठी असलेल्या  भल्यामोठ्या रांगेत शिरलो .

आमच्या पुढे उभ्या असलेल्या बऱ्याच भारतीय  प्रवाशांचे सामान उघडून तपासले जात होते . काही 'संशयित' प्रवाशांना रांगेतून बाहेर काढून वेगळ्याच तपासणी counter वर पाठवले जात होते. अमेरिकन साहेबांना 'आमचूर' अथवा 'मेतकूट' किंवा 'कसूरी मेथी' वगैरे पदार्थ, तुमच्या नियमांत बसणारे कसे आहेत हे आपल्या 'हिंग्लिश'मध्ये समजावून सांगणाऱ्या भारतीय बायका-पुरुषांची भंबेरी उडताना दिसत होती. अमेरिकन साहेब एखाद्या प्रवाशाला काही खाद्यपदार्थ बरोबर नेण्यास मनाई करत होते. त्यामुळे  अगदी नाईलाजाने त्या प्रवाशांना ते पदार्थ जवळच्या केराच्या टोपलीत फेकावे लागत होते. प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर आता आपले सामान सुखरूप बाहेर पडणार की  नाही? कधी या सगळ्या त्रासातून आपली मुक्तता होणार? अशी प्रश्नचिन्हे दिसत होती. माझी अवस्था तर, सोने किंवा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींच्या अवस्थेपेक्षा फारशी वेगळी नव्हती. एखाद्या नवख्या स्मगलरच्या काळजात सोने लपवून नेताना जशी धडधड होत असेल, तशी धडधड मी काही काळासाठी अनुभवली. पण शिकागोतील तपासनीसाने माझे सामान उघडले नाही आणि आम्ही अल्लद बाहेर पडलो त्यामुळे स्मगलिंगचा माल सहीसलामत सुटल्यावर एखाद्या स्मगलरला काय प्रकारचा आनंद होत असावा, हेही मी अनुभवले .

त्यानंतर पुढे, अगदी आजतागायत, "तुमच्या विरोधाला न जुमानता, अमेरिकन साहेबाच्या नाकावर टिच्चून, कसे आम्ही हिरव्या मिरच्या आणि कढीलिंब 'स्मगल' केले!" हे वाक्य आनंद आणि गिरीशच्या नाकाला झोंबेल इतक्यावेळा बोलायला मी आणि प्राची मोकळ्या झालो !

८. अमेरिकेतले अनोखे स्वागत!

२०१० आणि २०१२ मध्ये आम्ही अमेरिकेला जाऊन आलेलो असल्यामुळे यावेळची आमची अमेरिकेची तिसरी फेरी होती. २०१०च्या प्रवासात आम्ही लॉस एंजेलिसला आमच्या मुलीच्या मित्राच्या, म्हणजे आशय बुरुंगळेच्या अपार्टमेंटमध्ये राहिलो होतो. तसाच बेत यावेळीही होता. त्यामुळेच, आमच्या पहिल्या प्रवासाच्या वेळची फजिती मला आत्ता आठवते आहे. आम्हां दोघांच्या त्या पहिल्यावहिल्या परदेशप्रवासांत आमच्या बरोबर आमचा मुलगा अनिरुद्धपण होता. तो अमेरिकेला आधी दोन वेळा जाऊन सरावलेला असल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. अनिरुद्धला लॉस एंजेलिसमधील Caltech या प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. आणि आमची मुलगी, असिलता MIT मधला BS चा कोर्स संपवून PhD साठी शिकागो विद्यापीठात जाणार होती. ती MIT सोडून जायच्या आधी तिचे कॉलेज  बघून घ्यावे व अनिरुद्धचे भावी कॉलेजही पाहावे अशा दुहेरी हेतूने आम्ही प्रवासाला निघालो होतो. सर्व दृष्टीने सोयीची तिकिटे मिळाल्यामुळे मुंबई-लॉस एंजेलिस-बॉस्टन-मुंबई असा आमचा दौरा होता.

अमेरिकेला निघण्याच्या आधीपासून आम्ही आणि आशय बुरुंगळे ईमेलवर संपर्कात होतो. UCLA विद्यापीठानेच भाड्याने दिलेल्या एका flat मध्ये तो राहत होता. तिथला पत्ता त्याने आम्हाला आधी कळवलेला होता. त्याचा अमेरिकेतला फोन नंबरही आम्ही घेऊन ठेवला होता. पण पहिल्याच परदेशवारीपूर्वीच्या गोंधळात आशयच्या घराचा नेमका पत्ता लिहून बरोबर घ्यायचा आमच्याकडून राहून गेला. तुम्हाला घ्यायला मी विमानतळावर निश्चितच येणार आहे असे आशयने कळवले होते. खरंतर तशी फारशी गरज नव्हती. पण तो येतोय हे वाचून आम्हाला तसे मनोमन बरेही वाटले होते. झुरीख-लॉस एंजेलिस विमानप्रवास संपता-संपता लॉस एंजेलिस जवळ आल्यावर हवाई सुंदरीने Immigration चा फॉर्म भरायला दिला. "अमेरिकेत तुम्ही कुठे राहणार?" या प्रश्नाच्या उत्तरासाठी आशयच्या पत्त्याची शोधाशोध सुरु झाली. तो सोबत घेतला नसल्याचे आमच्या लक्षात येताच, विमानात बसून करता येईल इतपत हलक्या आवाजात, नवरा-बायकोमध्ये नेहमी होते तशी आमची तूतू-मैंमैं सुरु झाली. शेवटी, "आपल्याला घ्यायला आशय येणारच आहे ना; त्यातून काही अडचण आलीच आणि समजा तो विमानतळावर आलेला नसेल तर त्याला फोन करून पत्ता विचारू आणि  घर शोधत जाऊ" अशी समेटाची बोलणी आमच्यात झाली. फॉर्मवर UCLA campus एवढाच पत्ता लिहून आम्ही मोकळे झालो.

Immigration counter वरील अमेरिकन साहेबाने आमचा फॉर्म वाचताच, "UCLA campus हा पत्ता होऊ शकत नाही. तिथे तुम्हाला राहायची सोयच नाही त्यामुळे तुम्ही ज्यांच्या घरी राहणार त्यांचा नेमका पत्ता द्या, तरच पुढे जाता येईल."असे सांगून आम्हाला अडवले. आमच्याकडे नेमका पत्ता नाही पण फोन नंबर आहे असे आम्ही सांगताच गंभीर चेहरा करून त्याने आम्हाला आतल्या बाजूच्या टेबलावरील दुसऱ्या एका साहेबाकडे जायला सांगितले. त्या साहेबापुढे आम्ही पुन्हा तीच टेप वाजवताच टेबलावरच्या फोनकडे बोट दाखवत हसून तो म्हणाला, "मग फोन करून पत्ता विचारून घ्या ना." हे आम्हाला आधी का सुचले नसावे असा भावही त्याच्या चेहऱ्यावर दिसला. आम्ही आशयला फोन लावायचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन काही केल्या लागेना. मग त्या साहेबाने "अमेरिकेत राहण्याऱ्या दुसऱ्या एखाद्या नातेवाईकांचा पत्ता आणि फोन द्या" अशी मागणी केली. आमची मुलगी बोस्टनमध्ये MIT च्या ईस्ट कॅम्पस वर राहते असे सांगून आम्ही तत्परतेने तिचे नांव व फोन नंबर दिला. साहेबाने पटापट आपल्या computer वर बघून आम्हाला सांगितले की तिचा नंबर unlisted आहे आणि तुम्ही दिलेला तिचा पत्ताही अपुरा आहे.

आता मात्र आमची चांगलीच पंचाईत झाली. अमेरिकेतल्या अजून कोणा नातेवाईकाचा अथवा  मित्राचा पत्ता अथवा फोन नंबर तरी द्या असे साहेबाने आम्हाला सांगितले. माझा सख्खा भाऊ जयंत, नुकताच ह्यूस्टनमध्ये  शिफ्ट झालेला होता. परंतु, त्याचा  नवीन  फोन नंबर वा पत्ताही  आमच्याकडे नव्ह्ता. अमेरिकेतील ओळखीच्या इतर कोणा चेही पत्ते किंवा फोन नंबरही जवळ नव्हते. आम्ही कुणाचाही पत्ता किंवा फोन नंबर देऊ शकत नाही हे कळल्यावर त्या साहेबाने आम्हाला एका बाजूला उभे करून ठेवले. तो अमेरिकन अधिकारी आणि जाणारे येणारे लोक आमच्याकडे संशयग्रस्त नजरेने बघत आहेत असा भास होऊन आमच्या मनामध्ये  उगीचच अपराधीपणाची भावना निर्माण व्हायला लागली होती. अमेरिकेमध्ये कुठलेही कारण न देता प्रवेश नाकारला जाऊ शकतो आणि लगेच भारतात परत पाठवले जाते, अशा प्रकारच्या काही नाट्यमय घटना ऐकिवात होत्या. आमचेही तसेच होणार, या विचाराने आम्ही पार गळाठून गेलो. "आम्हाला ईमेल पहायची सोय केलीत तर आम्ही पत्ता देऊ शकू." हे सांगण्याची बुद्धि आम्हाला त्यावेळी का झाली नाही हेही एक गूढच!

शेवटी, आम्ही कोणी भामटे नाही किंवा खोटेही बोलत नाही आहोत हे दाखवण्यासाठी अनिरुध्दला Caltech ने पाठवलेले Admission letter व  इतर कागदपत्रे मी काढली आणि साहेबाला दाखवली. पण ती बघून त्याच्या कडक चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. त्याउपर त्याने आशयचे पूर्ण नाव, वय आणि कुठल्या कॉलेजमध्ये आणि काय शिकतो हेही विचारले. मग आम्हाला एका बाजूला उभे ठेऊन तो साहेब आपल्या कामाला लागला. बराच वेळ काहीच घडले नाही. हा गोरा आमच्याकडे बघतही नव्हता आणि आम्हालाही काही सुचत नव्हते. मग तो आला, एका कागदावर भरभर काहीतरी लिहून काढले आणि म्हणाला,"तुम्ही ज्याच्याकडे जाणार आहात त्या आशय बुरुंगळेचा हा पत्ता आहे, तो त्या फॉर्मवर लिहा आणि पुन्हा आधीच्याच Counter वर जाऊन त्यांना दाखवा" असे सांगितले. "संगणकयुगाचा महिमा अगाध आहे" असे म्हणत आमच्या फॉर्मवर तो पत्ता आम्ही लिहिला आणि पुढच्या Counter वरूनही आमची लगेच सुटका झाली.

हातात आशयचा पत्ता आल्यामुळे आम्हाला हायसे वाटले. जरी काही कारणाने आशय विमानतळावर येऊ शकलेला नसेल तरी आता आपल्याकडे त्याचा पत्ता आहे या कल्पनेने आम्ही निर्धास्त झालो. त्या पुढील तपासणी कक्षामधूनही बरोबरच्या खाण्यापिण्याच्या सामानासकट आम्ही सहीसलामत बाहेर पडलो. विमानातळाबाहेर आशय आमची वाट  बघत उभा होता. पण रेंज नसल्यामुळे त्याचा फोन लागू शकला नव्हता. झालेली फजिती आशयला सांगून गोऱ्या साहेबाने लिहून दिलेली, त्याच्या पत्त्याची चिठ्ठी आम्ही त्याला दाखवली. पण आशयचे उद्गार ऐकून आम्ही चकीतच  झालो. तो पत्ता त्याचा नव्हताच!

हळू हळू सर्व काही आमच्या लक्षात आले. आम्ही अगदी genuine आणि चांगली, सभ्य माणसे आहोत हे ओळखून, केवळ त्या कठीण प्रसंगातून आमची सुटका करण्यासाठी गोऱ्या साहेबाने कुठलातरीच एक पत्ता आम्हाला आशयचा पत्ता आहे असे सांगून दिला होता. कदाचित त्याने स्वत:चाच पत्ता दिला असेल. वरकारणी अगदी कडक वाटणाऱ्या पण आतून माणुसकीचा ओलावा असणाऱ्या, त्या सहृदय अमेरिकन साहेबाच्या आगळया-वेगळ्या स्वागतानंतर आमची पावले प्रत्यक्षात अमेरिकेच्या भूमीवर पडली.

देश, वेश, भाषा, रंग, रूप, धर्म, जात, यांवरून माणसांची वर्गवारी सहसा केली जाते, परंतु माणसे केवळ 'चांगली' आणि 'वाईट' अशा दोनच प्रकारची असतात या आमच्या विचाराचा आम्हालाच एक सुखद प्रत्यय आला!     

७… सोडी सोन्याचा पिंजरा!

जेद्दा ते लॉस एंजेलिस या प्रवासातले सौदी एयर लाइन्सचे विमान हे मुंबई-जेद्दा प्रवासातील विमानापेक्षा विशेष चांगले होते. त्यातल्या खुर्च्या, जेवण, इतर सुविधा आणि हवाई सुंदऱ्या सगळंच उजवे होते. मुंबई-जेद्दा प्रवासात बराचसा यात्रेकरूंचा आणि गरीब कामगारांचा भरणा होता. तर या पुढच्या प्रवासांत मुख्यत्वेकरून धनाढ्य अरब कुटुंबे, अमेरिकेत शिकत असलेले किंवा शिक्षणासाठी प्रथमच अमेरीकेला निघालेले अरब विद्यार्थी आणि एकएकटेच कामाला निघालेले व्यापारी किंवा नोकरदार, असे सहप्रवासी होते. सुट्टीनिमित्त अमेरिका दर्शनाला निघालेल्या  बऱ्याच अरबी कुटुंबांमध्ये एक पुरुष आणि त्याच्या एक वा दोन बायका आणि चार पाच मुले असे चित्र होते. बहुतेक  अरब  कुटुंबे  business class मधून प्रवास करत होती आणि त्यांच्या दिमतीला असलेल्या मोलकरणी, आमच्या आसपास  economy class मध्ये बसलेल्या होत्या! प्रवासांत अरबी मेमसाबना त्यांच्या मुलांना सांभाळण्याचे कष्ट पडू नयेत यासाठी, त्या मोलकरीणींना economy class ते business class अशी ये-जा करावी लागत होती.

माझ्या शेजारी बसलेला तरुण बराच काळ झोपून होता. तो जागा झाल्यावर कळले की सुलतान नावाचा हा रियाधवासी मुलगा सुट्टी संपल्यावर, घरून परत लॉस एन्जेलीसच्या कॉलेजमध्ये चालला होता. गेले वर्षभर English Language & literature  शिकत होता आणि अमेरिकेतच राहून पुढे त्याच विषयांमध्ये  graduation करण्याचा त्याचा मनसुबा होता. पंण त्यामानाने सुलतानची बोली इंग्रजी भाषा अगदीच सुमार होती. त्याचे बोलणे समजून घेत, मी त्याच्याकडून बरीच माहिती गोळा केली. सौदी सरकार अत्यंत श्रीमंत आहे. पण त्या देशात उच्च शिक्षणाच्या सोयी त्यामानाने कमी आहेत. त्यामुळे अनेक सौदी विद्यार्थ्यांना अमेरिकेत अथवा इंग्लंड मध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी, सौदी सरकारतर्फ़े संपूर्ण शिष्यवृत्ती मिळते. त्यात त्यांच्या कॉलेजची फी, प्रवासखर्च, राहण्या-खाण्याच्या व इतर किरकोळ खर्चांसाठी भत्ता अशी तरतूद असते. विद्यार्थ्याचे लग्न झालेले असल्यास, त्याच्याबरोबर बायकोला (कदाचित बायकांना) घेऊन राहण्याची मुभा असते. विशेष म्हणजे त्यांच्याही प्रवासखर्चासकट इतर सर्व खर्चासाठी सरकारमार्फत वेगळे पैसे मिळतात. अशा या विवाहित कुटुबांसाठी राबण्याकरिता एखादी मोलकरीण लागणारच. मग तिचा खर्चही  सरकारकडूनच मिळतो! विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी एक-दोन वर्षे जास्त घेतली तरीही ही शिष्यवृत्ती बंद होत नाही हे विशेष. सरकारच्या शिक्षणाबद्दलच्या या उदार धोरणामुळे अरब विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड अशा देशांत राहून अगदी निवांतपणे शिकतात. त्यामुळे पाश्चात्य  देशातील शिक्षण संस्थाही सौदी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला उत्सुक असतात. शिक्षणाबद्द्लच्या या सुरस आणि रम्य अरबी कथा ऐकून, माझी चांगलीच करमणूक झाली!

आधी मला वाटले होते  की फक्त मुलांच्या, म्हणजे विद्यार्थ्यांच्याच शिक्षणासाठी हे सरकार शिष्यवृत्ती देते. पण मग विमानांत इकडे तिकडे हिंडून चौकशी केल्यावर कळले की बऱ्याच शिष्यवृत्तीधारक अरबी विद्यार्थिनीही अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी निघाल्या होत्या. अर्थात सगळ्याच स्त्रिया बुरखाधारी असल्यामुळे विद्यार्थिनी कोण आणि  बेगमसाहेबा कोण, याचा नीटसा अंदाज लागणे शक्य नव्हते. सौदी स्त्रियांना 'मेहराम' बरोबरच घराबाहेर पडण्याचा नियम आहे. हा नियम मानणाऱ्या कुटुंबातील मुलींना अमेरिकेत शिकायला जाताना 'मेहराम' - म्हणजे भाऊ, वडील किंवा नवरा यापैकी कोणीतरी - बरोबर असेल तरच बाहेर जाता येते. पण  modern विचार असलेल्या कुटुंबातील मुली  'मेहराम' शिवाय एकट्याही शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकतांत. त्यामुळे आमच्या विमानात  तशी एखादी दुसरी एकटीच प्रवास करणारी  विद्यार्थिनीही दिसली,  पण इतर सगळ्या विद्यार्थिनी 'मेहराम' च्या निगराणीतच निघालेल्या होत्या!

सर्व सौदी अरेबियन बेगमा आणि अविवाहित तरुणींचेही नखरे पाहण्यासाराखे होते. चेहरा व हातापायाची बोटे सोडली तर शरीराचा सर्व भाग डिझायनर बुरख्यामध्ये लपलेला, एका हातात fashionable पर्स किंवा vanity case आणि दुसऱ्या हातात महागडा मोबाईल, Ipad, किंवा तत्सम यंत्र, डोळ्यांवर हिरेजडीत गॉगल्स आणि उंची अत्तराचा भपका! या बायकांनी भुवया खूप जाड ठेवलेल्या होत्या आणि त्याही काळ्या रंगाने ठळकपणे कोरल्या होत्या. लाल जांभळ्या, हिरव्या अथवा भडक गुलाबी अशा अनेकविध रंगांच्या नक्षीने हाता-पायाची नखे रंगवलेली होती. प्रवासांत आरशांत बघून गालांना अथवा डोळ्यांच्या वर त्या बायका सतत मेकप फासत होत्या.  सदैव बुरख्यात वावरणाऱ्या तुम्ही मुस्लिम बायका नेहमी इतका नखशिखांत नट्टा पट्टा आणि सारखा मेक ओव्हर का करता? असा प्रश्न मागे मी माझ्या एका मुसलमान पेशंट बाईला विचारला होता. त्यावर अगदी थंडपणे तिने मला, "नवऱ्याच्या मर्जीत राहण्यासाठी आम्हाला हे करावेच लागते" असे उत्तर दिले होते.कदाचित त्या कारणासाठी असेल अथवा नसेल, पण अरबी बायकांची चाललेली ती केविलवाणी धडपड बघून मला त्यांची कीव  आली. पण मग असेही वाटले, नट्टा पट्टा कमी पडला म्हणून तलाकला सामोरे जाऊन आपली परवड होऊ देण्यापेक्षा सतत मेकप करण्याचा चलाखपणा त्यांना परवडत असावा!

सतत चाललेला तो मेकप पाहून आणि 'मेहराम' बद्दल एकून   मला या सौदी बायकांच्या बंदिस्त जीवनाची कीव  आली. मला वाटले यांचे आयुष्य म्हणजे 'सोन्याच्या पिंजऱ्यातल्या चिडीयां' सारखे आहे. पण थोड्याच वेळांत जसे लॉस एन्जेल्स जवळ येऊ लागलेतसे माझा हा विचार बदलावा लागावा, अशा घटना घडत गेल्या. तेरा-चौदा तास आमच्या पाहुणचाराची आणि आम्हाला खायला प्यायला देण्याची लगबग संपल्यावर थकून गेलेल्या हवाई सुंदऱ्या आता झाकपाक करून आमचा रामराम घ्यायला तयार झाल्या होत्या. तर इकडे सौदी अरब स्त्रियाची वेगळीच लगबग सुरु झाली होती. अचानक कोशातून बाहेर पडून सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे तशा, त्या सगळ्याजणी आपापल्या गोशांतून बाहेर आल्या. त्यांनी पुन्हा आपापल्या चेहऱ्यांवर मेकपचे थर चढवले, डोळ्यांच्या पापण्या, भुवया कोरल्या आणि नखे नवीन  रंगानी रंगवली. शरीर झाकून टाकणारे त्यांचे बुरखे, केस झाकून टाकणारे स्कार्फ हे सगळे उतरवून टाकले. बऱ्याचशा बायकांनी आत जीन्स आणि latest fashion चे tops घातले होतेच. तर काही जणींनी कपडे बदलून स्कर्ट-ब्लाउज असा अगदी 'मॉड' वेष परिधान केला. त्यांनी या नवीन कपड्यांवर अत्तरांचे फवारे मारले, केस मोकळे सोडले अथवा नवीन प्रकारची केशरचना केली. आत्तापर्यंत बंदिस्त जीवन जगणाऱ्या या 'अरबी चिडीया', सोनेरी पिंजऱ्यामधून बाहेर पडून अमेरिकेतील मुक्त जीवन उपभोगायला बघता बघता सज्ज झाल्या. अनपेक्षितपणे माझ्या डोळ्यांसमोर घडत गेलेला हा बदल पाहण्यात माझा वेळ इतका छान गेला की आम्ही लॉस एंजेलिस विमानतळावर कधी पोहोचलो ते मला कळलेच नाही!


  

6. अब अच्छे दिन आनेवाले है

शकीलचे कुटुंबीय भारताकडे रवाना झाल्यावर, आपले लोक दूर गेल्याच्या भावनेने आमच्या मनांत पोकळी निर्माण झाली. थोड्या वेळाने मी प्रसाधनगृहात गेले त्यावेळी घडलेला प्रसंग. भाषा आणि पेहरावावरून भारतीय वाटाव्या अशा एका बाईने अचानक माझ्याजवळ येऊन, मला कुठल्याशा दाक्षिणात्य भाषेत काहीतरी विचारले. अंदाजे तिच्या प्रश्नाचा अर्थ लावत मी तिला इंग्रजीमधून उत्तर दिले. त्याच बरोबर हातवारे करत तिला माझे उत्तर समजावूनही दिले. तिची भाषा आणि तिचा वेश बघून मला ती भारतीयच असणार अशी खात्री वाटली होती. म्हणून मी तिला विचारले, " केरळ  या तामिळनाडू?" नकारार्थी मान हलवत ती म्हणाली, "नो, नो इंडिया, श्रीलंका". मग आम्ही दोघीं एकमेकींकडे बघून हसलो आणि निरोप घेऊन बाहेर पडलो.

त्याचवेळी बाहेर, आनंदलाही असाच काहीसा अनुभव आला. त्याच्या शेजारी, हिरवी मुसलमानी टोपी घातलेला एक पुरुष येऊन बसला आणि ओळखीचे हसून हात हलवू लागला. आपली ओळख नसताना हा मनुष्य आपल्याकडे बघून का हसतो आहे, हे आनंदला  काही केल्या कळेना. आनंदच्या चेहऱ्यावरील गोंधळलेला भाव पाहून, जवळ सरकत त्या माणसाने विचारले,"इस्लामाबाद?" त्या माणसाला कदाचित, "तुम्ही इस्लामाबादचे आहात का? किंवा इस्लामाबादला चालला आहात का?असे विचारायचे असावे. पण आनंदने त्याच्या  प्रश्नाचा सोयीस्कर अर्थ घेऊन, हसून उत्तर दिले ,"No, Los Angeles". मग त्याने आनंदला आपुलकीने सांगितले,"हम इस्लामाबाद जा रहें हैं" त्या  पाकिस्तानी व्यक्तीच्या चेहऱ्यावर, आपल्या माणसाला भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता म्हणे. एकाच वेळी आम्हाला दोघांना आलेले हे अनुभव आम्ही एकमेकांना सांगितले आणि दोघेही मनसोक्त हसलो.

थोड्या वेळात भारतीय मुस्लिम वाटावेत असे नवराबायको दोन लहानग्या मुलांना घेऊन आमच्याजवळ येऊन बसले. मी आणि ती बाई  हळूहळू मोकळेपणाने बोलू लागलो.  हे मूळचे पाकिस्तानी कुटुंब कॅनडात स्थायिक झालेले होते. त्या बाईचा नवरा  कॅनडामध्ये taxi चालवून चांगले पैसे मिळवत होता. त्यामुळे त्यांचे राहणीमान उंचावलेले होते. आर्थिक कारणामुळे पाकिस्तानात परत जाणे शक्य नसले, तरी ती दोघे मनाने मात्र अजून कराचीमध्येच होती. मुलाच्या शाळेला सुट्टी लागल्यावर ते लगेच पाकिस्तानला निघाले होते. आपल्या देशांत काही काळासाठी परत जाण्याच्या कल्पनेने ते उल्हसित झालेले होते. त्या दोघांशी बोलताना पुन्हा आम्हाला तोच आपलेपणाचा अनुभव आला.

रात्रीचे अकरा वाजून गेले. फारशी भूक जाणवत नसली तरी आम्ही उरलेल्या कूपनवरचे जेवण घ्यायचे ठरवले. बऱ्याचशा टेबल्सपाशी कोणीना कोणीतरी बसलेले होते. एकच  टेबल रिकामे दिसल्याबरोबर मी ते पकडले. आनंद जेवण घेऊन आला.  इतक्यात एका माणसाने  आमच्या टेबलाजवळ येऊन," मी तुमच्या जवळ बसू का?" असे इंग्रजीमधून विचारले. आम्ही होकार दिल्यावर तो बसला आणि गप्पा मारू लागला. इफ्तेखार नावाचा हा मनुष्य मूळचा बांगलादेशी नागरिक होता. गेली पंचवीस एक वर्षे कॅनडा मध्ये स्थायिक झालेला होता. त्याच्या बायकोने आणि मुलांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतलेले होते. पण त्याने मात्र आपले  बांगलादेशी  नागरिकत्व सोडलेले  नव्हते. तो  सौदी एयरलाइन्स मध्ये finance manager म्हणून  काम करत असल्यामुळे वरचेवर त्याला बांगलादेश, सौदी अरब, भारत आणि पाकिस्तान मध्ये जावे लागत होते. 

आश्चर्य म्हणजे, भारतातील राजकीय घडामोडींपैकी आम्हाला माहिती नसलेल्या कित्येक गोष्टी इफ्तेखारला इत्थंभूत माहिती होत्या. अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्या सभांमधले घडलेले सर्व तपशील तो आम्हाला सांगत होता. त्यामुळे भारत, बांगला देश आणि पाकिस्तान मधील राजकारण, सामाजिक व आर्थिक   परिस्थिती आणि राहणीमान यावर आमची जोरदार चर्चा झाली. आमचे बोलणे 'बांगला देशातील हिंदू लोक', या विषयाकडे वळले. इफ्तेखारच्या कुटुंबाचा आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबाचा खूप घरोबा आहे, हे त्याने आम्हाला आवर्जून सांगितले. हिंदू सण, ते साजरे करण्याची पध्दत, त्यासाठी होणारी  सजावट, पूजा आणि प्रसादाचे चविष्ट पदार्थ याबद्दलच्या त्याच्या सुखद आठवणी आम्हाला तो सांगत होता. 'हिंदु-मुस्लिम' यांच्यामधील तणाव' या विषयावर बोलताना इफ्तेखार म्हणाला, " मला minority हा शब्द अजिबात आवडत नाही. सगळे नागरिक समान असतात आणि सर्वांसाठी समान कायदे असले पाहिजेत. कॅनडात आणि अमेरिकेत तसे कायदे आहेत, म्हणूनच ते देश आज आपल्यापेक्षा बरेच प्रगत आहेत. आज सुद्धा तमाम नागरिकांसाठी समान कायदा ठेवून भारत, बांगला देश आणि पाकिस्तान एकत्र येऊ शकले, तर आपण खऱ्या अर्थाने 'Superpower' होऊ शकू. हे तिन्ही देश एकत्र येऊन एकसंध राष्ट्र व्हावे, हे वर्षानुवर्षे आम्ही मनांमध्ये   जपलेले स्वप्न, इफ्तेखारनेही उत्स्फूर्तपणे बोलून दाखवल्यामुळे आम्ही भारावून गेलो.

इफ्तेखार गेल्यानंतर आम्हाला लक्षात आले की, परभूमीवरच्या काही मिनिटांच्या सहवासातच, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेतील नागरिकांशी आमचे मनोमिलन झालेले होते. मग विचार आला, आता भारतामध्ये 'अच्छे  दिन' येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, तर 'आसेतु हिमाचल' असे एकच राष्ट्र झाले तर खऱ्या अर्थाने या तीनही राष्ट्रांना 'अच्छे दिन' येतील की काय, हे ही मनाला वाटून गेले. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत अशा एकसंध राष्ट्राची स्वप्ने बघत आणि दिवसभरात आलेले सर्व अनुभव मनांमध्ये  घोळवत, आम्ही लॉस एंजेलिसला निघालेल्या विमानात बसलो.


५. एक असेही पुण्य!

शकील आणि कुटुंबियांची पुढची flight रात्री साडेदहाच्या पुढे होती. आमच्या चांगल्या तास-दीड तास गप्पा झाल्या असतील. त्यांच्या आपापसांतील बोलण्यावरून असे लक्षात आले की, दुपारी साडे अकरा-बाराला जेवण केल्यानंतर त्यांनी काहीच खाल्लेले नव्हते. मुंबईकडे जाणाऱ्या विमानात काही खायला मिळेल या भरवशावर ते सर्वजण तसेच  भूक सहन करत बसलेले होते, हे आम्हाला लक्षात आले. त्यांनी यात्रेच्या खर्चापोटी भरलेल्या अठ्ठावीस हजार रुपयांमध्ये मुंबईपासून जेद्दा, आणि परत मुंबईपर्यंतचा प्रवास व यात्रेचा खर्च त्यांचा tour operator करणार होता. जेद्दा पासून नाशिकला घरी जाईस्तोवरचा खाण्यापिण्याचा खर्च आणि मुंबई-नाशिक प्रवासखर्च यात्रेकरूंनी स्वत:च करण्याची बोली झालेली होती. पण त्यांच्याकडे आता जेमतेम मुंबई-नाशिक प्रवासखर्चासाठी पैसे उरले असावेत. त्यामुळे जेद्दा एयरपोर्ट वरील महागडे खाणे विकत घेणे  त्यांना परवडण्यासारखे नव्हते . मग आम्ही बळेबळेच त्या सर्वांना आमच्याकडचे sandwiches व सफरचंद  खायला लावले. आधी त्यांनी बरेच आढेवेढे घेतलेले असले तरी भुकेपोटी त्यांनी ते लगेच फस्त केले. मग आनंदला एक कल्पना सुचली. त्याने आमच्याकडच्या जेवणाच्या एका कूपनवर जेवण आणून त्यांना खायला दिले व सर्वांना ते खायलाही लावले.  



आता मात्र त्या लोकांच्या डोळ्यांत पाणी यायचे तेवढे बाकी राहिले होते. त्या सर्वांनी आमचे मनापासून आभार मानले. त्यांच्यातल्या एका वयस्कर अम्माने आपल्या सामानातून प्रसादाचा खजूर काढून आम्हाला दिला. पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांना जेवायला घालण्याने मोठे पुण्य लागते असे म्हणतात. तसेच उमराहच्या यात्रेबद्दल आहे. तिथेसुद्धा यात्रेकरुंना जेवायला घालणे हे मोठे पुण्याचे काम समजले जाते. आम्हालाही खूप पुण्य लागणार असे सांगून शकीलने आम्हाला दुवा दिला. खरे सांगायचे तर पाप-पुण्य या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. परंतु, आमच्याकडचे  नादियाने दिलेले आणि सौदी इयरलाईन्स च्या कूपन वरचे अन्न सत्कारणी लागल्यामुळे आणि त्यातूनही ते  आपल्या मातीतल्या माणसांना ते खायला घालता आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. 


इतक्यातच शकीलच्या मोबाईलवर भारतातून निरोप आला. 'पुण्यात काही कारणाने हिंदू मुस्लिम वादाची ठिणगी पडली असून मुंबई विमानतळावर उतरल्यावर दंगलीचा अंदाज घेऊन मगच नाशिककडे निघावे'. ही बातमी समजताच, १०-१२ दिवसांसाठी कुणा नातेवाईकांपाशी ठेवलेल्या आपापल्या मुलांच्या काळजीने सर्व  बायका कमालीच्या व्याकूळ आणि रडवेल्या झाल्या. "आधीच यात्रेचा खर्च झालेला, दोन आठवडे उत्पन्न बंद आणि त्याउप्पर आता गेल्यावरही धंदा बंद राहणार. मग खायचे काय?" या विचाराने पुरुषमंडळी जरी सैरभैर झाली असली तरीही उसने आवसान आणून बायकांना धीर देऊ लागली. 'आता मुंबई मधून आपण नाशिकला घरी सुखरूप पोहचणार की नाही?' असे प्रश्नचिन्ह सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसू लागले. 


शकील आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावर इतका वेळ ओसंडून वाहणाऱ्या आनंदाच्या जागी दाटलेले भीतीचे सावट बघून आम्हाला खूप वाईट वाटले. आम्ही सर्वांनीच या दंगलखोर प्रवृत्तीचा धिक्कार केला. त्यांच्या यात्रेला गालबोट लागेल असे काहीही घडू नये अशी मनोमन प्रार्थना करत व त्यांना धीर देत मोठ्या जड अंत:करणाने आम्ही त्यांचा निरोप घेतला. 

४. जेद्दाची जत्रा

जेद्दा  विमानतळावर थोडावेळ फेरफटका मारल्यानंतर, नादियाने दिलेले sandwiches  चे packet उघडले. एक-एक sandwich खाऊनच आमचे पोट भरले.  जेद्दा विमानतळ अगदीच साधा आणि टिचका आहे. तिथे थांबल्यावर क्षणभर मला, आपण एखाद्या तालुक्याच्या जत्रेच्या वेळी तिथल्या S T stand वरच्या वर्दळीत व सावळ्या गोंधळात उभे आहोत की काय असा भास झाला.  संपूर्ण जगभरातल्या वेगवेगळ्या देशांतले, अनेक भाषांचे, अनेकविध वेशातले आबालवृद्ध मुस्लिम भक्तांचे जथेच्या जथे तिथे सतत येत-जात होते. गर्दी, कलकलाट, पोरांचे रडणे, बायकांची बडबड आणि पुरुषांची पळापळ, काही विचारू नका. त्यातून अर्धे लोक बेताच्या आर्थिक परिस्थितीतले आणि इंग्रजीचा गंध नसलेले. जमिनीवर फतकल मारलेल्या बायका आणि त्यांच्या भोवती कलकलाट करणारी त्यांची शेंबडी पोरे बघून आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहोत असे मुळीच वाटत नव्हते.

'उमराह'साठी येणाऱ्या जथ्यातल्या प्रत्येक  यात्रेकरूच्या गळ्यात त्यांच्या tour operator च्या नावाची पिशवी अडकवलेली असते. त्यामुळे त्या त्या जथ्यातले सर्वजण एकत्र  राहतात आणि आपसूकच tour operator ची जाहिरात होऊन जाते. असे जत्थे बघून, मला प्राथमिक शाळेमधले वार्षिक स्नेह सम्मेलन आठवले. मुलामुलींच्या समूह नृत्यासाठी सर्व मुलींना एकसारखा, एखाद्या विशिष्ठ प्रांतातल्या बायका घालतात त्या पद्धतीचा पोशाख व सर्व मुलांना त्याच प्रांतातील पुरुष घालतांत तसा पोशाख दिलेला असतो. प्रत्येक वर्गाचा नाच वेगळा, त्यामुळे त्या वर्गातील मुला-मुलींची वेशभूषा वेगळी. त्या त्या वर्गांची नृत्याची पाळी आली की त्यांच्या वर्ग शिक्षिका त्या सर्व मुला-मुलींना एका रांगेत उभे करून शिस्तीने रंगमंचाकडे नेतात . अगदी तसेच आपापल्या जथ्याला रांगेने विमानाकडे नेण्याचे काम त्यांचे tour operators करत होते. लहानग्या मुलांनी कलकलाट करत, कधी रांग मोडत, आपापल्या शिक्षिकेच्या मागे जावे तसेच हे यात्रेकरूसुद्धा आपापल्या tour operator च्या मागे जात होते. हे सगळे बघत माझा वेळ मस्त जात होता.

मुंबई ते जेद्दा प्रवासात आमच्या बरोबर एक तरूण गोरे जोडपे होते. तेही आमच्यासारखेच   विमानतळावर वेळ काढत हिंडताना दिसले. मग त्यांच्याशी गप्पा झाल्या. मूळचे कॅलिफोर्नियाचे रहिवासी असलेले जेसन आणि जेनिफर, अमेरिकेतून पदवी घेऊन काही वर्षांपूर्वी भारतात हिंडायला म्हणून आले होते. पाच वर्षांपूर्वी भारतात business visa वर येऊन मुंबईतल्या  मानखुर्द  भागांत त्यांनी इंग्रजी संभाषणाचे क्लासेस चालू केले. गरीब वस्तीतल्या तरुणांसाठी अगदी बेताचे मासिक शुल्क घेऊन चालवलेला त्यांचा हा क्लास म्हणजे आम्हाला एकप्रकारची समाजसेवाच वाटली. मात्र दरवर्षीप्रमाणे, मुंबईच्या पावसाळ्यापासून सुटका मिळवणे आणि त्याच वेळी कॅलिफोर्नियातील सुखद हवा अनुभवणे, अशा दुहेरी हेतूने ते अमेरिकेला निघाले होते. त्यांची भाषा इंग्रजी असली तरी त्यांची देहबोली मराठी माणसांसारखीच होती आणि त्यांच्या इंग्रजी भाषेचा लहेजाही मराठमोळा होता. भारत, भारतीय आणि भारतीय खाद्य-संस्कृती याबद्दल ते आमच्याशी अगदी भरभरून बोलत होते. भारतातून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी भारतीयांची चाललेली धडपड आपण नेहमीच पाहतो . पण या अमेरिकन्सची भारतात स्थायिक होण्याची ओढ बघून मी मनोमन सुखावले .



जेसन आणि जेनिफरशी बोलण्यात थोडा वेळ मजेत गेला. पुढचा काही काळ विमानतळावरच्या बाकड्यांवर झोपण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग बराच वेळ 'duty free  window-shopping'  केले आणि शेवटी साधारण तीनच्या सुमारास, फारशी भूक नसतानाही, 'कूपनवरचे' जेवण घेतले. एक मोठ्ठा बनपाव, लोण्याची टिक्की , एक सफरचंद, भात, तळलेल्या chicken चे दोन तुकडे आणि पेप्सी असे बेताच्या चवीचे जेवेण मिळाले. पेप्सीच्या ऐवजी पाण्याची बाटली मागितली तर 'मिळणार नाही' असे 'पुणेरी' 'उत्तर मिळाले. इतक्या गजबजलेल्या जेद्दा विमानतळावर कुठेही पिण्याच्या पाण्याचा नळ नाही.  पाण्याची छोटी बाटली दोन डॉलरला विकून, इथले व्यापारी पाण्यासारखा पैसा करतात! नादियाने बळेबळेच आम्हाला पाण्याची मोठी बाटली का दिली होती ते आम्हाला तेंव्हा कळले !

३. तहानलाडू-भूकलाडू

आम्ही जेद्दा एयरपोर्टवर दुपारी बारा वाजता पोहोचलो. पुढचे पंधरा तास काढायचे असल्यामुळे आम्हाला उतरण्याची मुळीच गडबड नव्हती. सर्व सहप्रवाशांनी आपापले सामान काढेस्तोवर आम्ही आरामात विमानात बसून होतो. शेवटी हवाई सुंदऱ्याही निघाल्या. मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही रमत गमत बाहेर पडलो. सौदी एयरलाईन्सच्या Inquiry Counter वरच्या दोन-तीन पुरुषांनी मोडक्या तोडक्या इंग्रजीत स्वागत करून आम्हां दोघांना, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी प्रत्येकी दोन free coupons दिली. 'नादियाने दिलेले भरपूर खाद्यपदार्थ आहेतच, आता ही coupons काय करायची आहेत?' असेही एकदा वाटले. पण मग 'त्याच तिकिटात फुकट आहेत तर घेऊन ठेवावीत, "वेळप्रसंगी" उपयोगी पडतील असा सोयीस्कर विचार करून coupons ठेऊन घेतली.

या पूर्वी काही बिकट "वेळप्रसंगांना" तोंड द्यावे लागलेले असल्यामुळे,  प्रवासात थोडेफार तरी खाणे जवळ असलेले बरे, असे हल्ली मला वाटते.पूर्वी कॉलेजमध्ये असताना एकदा सोलापूरहून सकाळच्या रेल्वेने   मुंबईला जायला निघाले होते. आठ दहा तासांचा प्रवास होता. पोळीभाजी, दहीभात, उपमा, असे काही घरगुती आणि सात्विक खाणे बरोबर घेऊन जा, असे आई म्हणत होती. पण "दौंडला पट्टी सामोसे किंवा चिकन बिर्याणी खाईन आणि पुढे लोणावळा-कर्जतला बटाटावडा खाईन" असे माझे चमचमीत मनसुबे सांगून, तिचा तो प्रस्ताव मी पार धुडकावून लावला  होता. पण नेमका रल्वे मार्गावर अपघात झाल्यामुळे, आमची गाडी मध्येच कुठेतरी आठ-दहा तास थांबून राहिली. गाडीमध्ये काही विकत मिळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे  मी प्रथमच 'उपासमार' या शब्दाचा अर्थ शिकले. त्या प्रसंगानंतर आजपर्यंत मी कधीही, कुठलाही उपास केलेला नाही. इतकेच काय, अगदी दोन-तीन तासांच्यावर मी उपाशी राहत नाही!

असाच एक गमतीदार प्रसंग आमच्या पहिल्याच अमेरिका प्रवासांत घडला होता. भारताबाहेरचा पहिलाच प्रवास, तोसुद्धा एकदम अमेरिकेचा दौरा! अनेक हितचिंतकांनी अनेक अनाहूत सल्ले देवून 'मदतीचा हात' पुढे केला होता. त्यामुळे आम्ही दोघेही गोंधळलेले होतो. त्यामुळे, बरेच तात्विक वाद होत-होत आमच्या सामानाची बांधाबांध झाली. मुंबईहून निघताना माझ्या वहिनीने, वाटेत खाण्यासाठी म्हणून लाडू, चिवडा वगैरे कोरडे पदार्थ दिले होते. पण अमेरिकेच्या प्रवासांत cabin luggage मध्ये ठेवलेले कोरडे खाणे सुद्धा विमानतळावरच काढून ठेवायला लावतात, असे ऐकिवात आले. लाडू-चिवडा असे वाया जाण्यापेक्षा  पुढे अमेरिकेत गेल्यावर खावे असा सोयीस्कर विचार करून आम्ही ते check-in luggage मध्ये ठेवले.

त्यावेळीही झुरीखला आठ तास थांबायचे होते. त्याउपर आमची पुढची flight सहा-सात तास उशिरा सुटणार आहे हे झुरीखला उतरल्यावर कळले. मुंबई-झुरिख प्रवासातले खाणे रिचल्यानंतर भूक लागायला लागली म्हणून, विमानतळावरच्या दुकानांत काही खाद्यपदार्थ विकत घ्यायला गेलो. तिथे लक्षात आले की आमच्याकडचे सर्व डॉलर्स चुकून checked-in  baggage मध्ये गेले आहेत. काही कारणाने आमचे क्रेडीट कार्ड चालत नव्हते  आणि भारतीय रुपये घ्यायला विमानतळावरील दुकानदार तयार नव्हते! आम्हा तिघांमध्ये मिळून मोजून वीस-तीस डॉलर्स निघाले. त्यात जे काय विकत मिळाले त्यावर कसेबसे पुढचे आठ-दहा तास काढले.पुढच्या विमानात बसल्यावर मात्र मिळालेल्या खाण्यावर इतके तुटून पडलो की, तमाम भारतीय लोक hungry आणि poor असतात, असे स्विस हवाई सुंदऱ्याना निश्चित वाटले असणार!

असा पूर्वानुभव गाठीशी असल्याने यावेळच्या प्रवासात आमच्याबरोबर डॉलर्स, क्रेडीट कार्ड तर होतेच आणि आता तर नादियाच्या कृपेने बरेच खाणे पण होते. तरीही कुठलाही बिकट 'वेळप्रसंग' सांगून येत नाही असा सावध विचार करून सौदी एयरलाईन्सने दिलेली जेवणाची coupons घेऊन आम्ही विमानतळावरील waiting lounge मध्ये येऊन स्थिरावलो.

२. त्याच तिकिटात फुकट

सनोबरचे वडील निर्धास्त होऊन झोपले. परत आमच्या गप्पा रंगात आल्या. तेवढ्यात 'खान-पान' सेवा सुरु झाली. मी चविष्ट चिकन बिर्याणी व फिरनीवर ताव मारला, तर आनंदने फिश आणि भाताचा आस्वाद घेतला.  सोबत चहा, कॉफी, व ज्यूस होतेच.

चटपटीतपणे खाणे वाटताना होणारी हवाई सुंदरीची लगबग मला फारच आवडते.  काही  विमानप्रवासांत आधीच मेनू कार्ड देतात,  ते मला फारसे रुचत नाही. त्यामुळे, 'आता काय खायला मिळणार?' हा 'surprise element ' चा आनंद निघून जातो. काही low cost airlines च्या विमानांमधले  खाणे फुकट नसून , विकत घ्यावे लागते.  यामध्ये  'स्वस्त तिकीटाचा' आनंद मिळत असला तरी, त्याच तिकिटात 'फुकट' जेवण मिळणार नाही, याची हलकीशी खंत मला वाटते ! पण हवाई सुंदरीची लगबग बघायला मिळणार नाही, याचे दुःख, त्याहीपेक्षा जास्त असते. सौदी airlines चे तिकीट इतर कंपन्यांच्या तिकीटांपेक्षा  ४०-५० हजारांने स्वस्त तर होतेच आणि वर खाणे -पिणेही  'फुकट'  होते.  मात्र, त्यांच्या नियमाप्रमाणे, मदिरापान वर्ज्य असल्यामुळे इथे मदिराक्षी मदिरा पाजणार नव्हत्या.

विमानांत झोप काढणे किंवा सिनेमे बघण्यापेक्षा,  इकडे-तिकडे बघणे आणि जमल्यास कुणाशीतरी गप्पा मारणे मला जास्त आवडते. कुणी अबोल किंवा अती औपचारिकता पाळणारा शेजारी मिळाला, की माझी मनोमन चिडचिड होते. मुंबई ते जेद्दा हा पाच तासाचा प्रवास, सनोबरशी गप्पा आणि  हवाई सुंदऱ्या, सहप्रवासी,  आणि बाहेरची  विहंगम दृश्ये बघण्यात मजेत झाला. जेवणानंतर मी पाय मोकळे करायला उठले. सौदी airlines च्या विमानांत नमाझ पढण्यासाठी, मागच्या बाजूला साधारण ८ x १० फुटाची जागा असते. तिथे काही धार्मिक पुस्तके ठेवलेली होती आणि काही प्रवासी नमाझ पढत होते. पण विमानप्रवासांत , कुठल्या देशाची वेळ पाहून आणि कुठल्या दिशेकडे तोंड करून हे  नमाझ पढतात ? हा प्रश्न मला पडला.  मग, नादिया नावाच्या, काश्मिरी हवाई सुंदरीने शंकानिरसन केले. तिचे बरेचसे काम झालले असल्यामुळे तीही गप्पा मारायला उत्सुक होती. आम्हाला जेद्दाला १५ तास थांबावे लागणार आहे, हे मी बोलण्याच्या ओघात बोलून गेले.  नादिया काळजीत पडली.  मी नको नको म्हणत असताना मोठ्या आपुलकीने  तिने आमच्या बरोबर सहा सात मोट्ठे sandwiches, दीड लिटर पाण्याची बाटली आणि दोन सफरचंदे बांधून दिलीच!

जेद्दा जवळ आल्यावर , पवित्र क्षेत्रात पोहोचल्याची घोषणा झाली. बऱ्याच मुस्लिम यात्रेकरूंनी  धार्मिक पुस्तकांचे वाचन चालू केले. प्रथमच उमराहला येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यांवर व्याकुळता मला दिसू लागली.  ते पाहून, माझे मन  नकळत तीस वर्षे मागे गेले. आम्ही पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो तेंव्हा तासनतास भल्या मोठ्ठ्या रांगेत उभ्या असलेल्या खेडूतांच्या चेहऱ्यावर, असाच  'भेटी लागी जीवा लागलीसे आस' हा व्याकूळ भाव होता . धर्म कुठलाही असो, भक्तांच्या चेहऱ्यावर भाव एकच असतो, हेच खरे!

जेद्दाला पोहोचल्यावर लोकांची उतरण्याची गडबड सुरु झाली. काही बड्या घरच्या कार्ट्यांनी सवयीने आपापल्या हातातले अद्ययावत mobiles, tablets, I-pads चालू केली.  त्यांचे गलेलठ्ठ आईवडील आपापले महागडे cabin luggage उतरवू लागले. दुसरीकडे फाटक्या अंगयष्टीचे गरीब कामगार आणि  मुस्लिम यात्रेकरू, पूर्णपणे बावचळलेले होते. अशाच एका तरुणाने आनंदला "जेद्दा आले का? आता उतरायचे का?" असा भाबडा प्रश्न केला. तर एक वयस्कर गरीब प्रवासी, इथे  सगळेच फुकट असते अशा समजुतीने , विमानात वापरायला दिलेले  blanket आपल्या बरोबर घेऊन निघाला. मग हवाई सुंदरीने सौम्य शब्दांत त्याला ते परत  मागितले. पण आसपासचे एक दोन सराईत प्रवासी कुत्सितपणे हसल्यामुळे तो कमालीचा ओशाळला आणि मला फार वाईट वाटले .

गम्मत बघा , 'फुकट' गोष्टींचे सुप्त आकर्षण आपल्यासारख्या सुस्थितीतल्या लोकांनाही असतेच आणि एखादी गोष्ट सहज फुकट मिळाली की आपल्यालाही आनंद होतोच.  फक्त झालेला आनंद आपण उघडपणे दाखवत नसल्यामुळे आणि कुठे, केंव्हा आणि काय फुकट मिळू शकते याची थोडीफार जाण असल्यामुळे, आपले ते आकर्षण आणि तो आनंद  इतरांच्या डोळ्यावर येत नाही इतकेच !

१.प्रवासाला सुरुवात

अमेरिकेला निघायच्या आधी सहज म्हणून सौदी एअरलाईन्स बद्दलचे  reviews वाचले. एकेक अजब अनुभव वाचायला मिळाले. आता आपला प्रवास कसा होणार ?अशी धडकी मनात घेऊनच प्रवासाला सुरूवात केली. पण असाही विचार केला, आजही एसटीच्या लाल डब्ब्यातून किंवा  रेल्वेच्या जनरल डब्यातून मी प्रवास  करू शकते, तर असा काय त्रास होणार आहे? आणि  एखादी एअरलाईन वाईट असून असून किती वाईट असणार आहे ?  स्वस्त आणि मस्त प्रवास घडवून सौदी एअरलाईन्सने सुखद धक्का दिला.  

आमचे बरेचसे सहप्रवासी पांढरे वस्त्र धारण केलेले, मक्का-मदिनेला, म्हणजेच 'उमराहला' चाललेले यात्रेकरू होते. काही सुस्थितीतले लोक हौसेने सहकुटुंब आलेले होते. त्यांचे कपडे फोन्स, सामान अगदी सगळंच चकाचक दिसत होतं. पण बहुसंख्य लोक अगदीच गरीब, प्रथमच विमानप्रवासाला निघालेले, पण मोठ्या भक्तिभावाने बरीच वर्षे पै-पै साठवून आलेले वाटत होते. उरलेले काही सहप्रवासी अशिक्षित वा अर्धशिक्षित होते आणि कदाचित केवळ कामगार म्हणून रुजू व्हायला आलेले होते.

माझी जागा (Aisle) आईलला लागून होती. पलीकडे सनोबर नावाची एक पंचविशीतली हसतमुख  मुस्लिम तरूणी बसली होती. तिच्याकडून 'उमराह' बद्दल बरीचशी माहिती गोळा केली. सनोबरच्या दोन बहिणींची लग्न झालेली होती आणि तिला भाऊ नव्हता . ती तिच्या वयस्कर आई-वडिलांना यात्रेला घेऊन आलेली होती. ते प्रथमच विमान प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळलेला भाव लपत नव्हता. सनोबर मात्र त्यांना बेल्ट कसा लावायचा, खुर्ची कशी मागे-पुढे करायची, जेवण आल्यावर टेबल कसे पुढे ओढायचे, हे गोड शब्दांत शांतपणे समजावून सांगत होती. खरंतर, तिचाही तो पहिलाच अनुभव होता, हे मला नंतर कळले!

विमानाने take off केला आणि थोड्याच वेळांत सनोबरचे वडील घाबरे-घुबरे झाले. त्यांच्या हातापायाला घाम सुटला, संपूर्ण शरीराला हुडहुडी भरली.  सनोबरची धावपळ सुरु झाली. तिने air hostess कडून blankets आणून वडिलांच्या अंगावर घातली, त्यांना पाणी दिले, औषधाची एक गोळी दिली, पण त्यांना काही केल्या बरे वाटेना. ते बघून माझ्यातली डॉक्टर जागी झाली. मी त्यांच्या जवळ बसून त्यांना तपासले. त्यांची bypass surgery झालेली असल्यामुळे ते जरा जास्तच काळजी करत होते. आकाशांत जसे वर जाऊ तसे  प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते, हे त्यांनी वाचलेले होते. त्यामुळे  विमानाने उंच भरारी घेतल्यावर प्राणवायूचे प्रमाण कमी होणार आणि आपण heart patient असल्यामुळे आपल्याला त्रास होणारच, अशी त्यांची पक्की समजूत होती! मी त्यांना शांत केले. मी डॉक्टर आहे हे कळल्यावर तसेही त्यांना एकदम बरे वाटायला लागले होतेच! 

बोलता बोलता ते सहज म्हणून गेले, "मी असा हा हार्ट पेशंट, बायपास ऑपरेशन झालेला . त्यातून मला तीनही  मुलीच, मुलगा नाही. मला काही झाले तर बघणार कोण ? माझे कसे होणार? अशी भीती वाटते ".

"तुम्हाला मुलगा नाही म्हणून काय झाले? तुमची मुलगी, मी आणि या हवाई सुंदऱ्या अशा सर्व तुमच्या मुलींनीच तुम्हाला सावरले आहे"! माझ्या मनात आलेले हे शब्द मी ओठावर येवू दिले नाहीत इतकेच. 

'मुलगा नाही, म्हणजे आपल्याला कोणी नाही' या मानसिकतेतून आपला समाज बाहेर आला तरच सर्व स्तरातील मुली जीवनांत उंच भराऱ्या घेऊ शकतील!