शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५

१९. तपोभंग

माझ्या आतापर्यंतच्या प्रवास वर्णनात आमच्या मुलीचा, असिलताचा मित्र आशय याचा उल्लेख वरचेवर आलेला आहे. आशय आता फक्त तिचाच मित्र नसून आमचाही मित्र आहे. आशयबरोबर माझी आणि आनंदची अगदी वेगळ्या पातळीवरची मैत्री आहे.

आशय हा मूळचा साताऱ्याचा  मुलगा. अगदी मितभाषी, नाकासमोर बघून चालणारा, थोडासा लाजाळू असा. असिलताची आणि त्याची मैत्री २००५ व २००६ या दोन वर्षीच्या गणित Olympiad शिबिरामधली. उच्च गणिताची आवड, हा एकच त्या दोघांच्या मैत्रीतला समान पण कमालीचा घट्ट दुवा. त्यांचे स्वभाव आणि बाकी सगळेच तसे अगदी वेगवेगळे. २००६ साली बारावी झाल्यानंतर आशय बंगळूरच्या Indian Statistical Institute मध्ये आणि असिलता बॉस्टनमधल्या MIT या संस्थेमध्ये गणितात पदवी घ्यायला गेले. असिलताला काव्य, साहित्य, संगीत, नाटक, खेळ, भाषा, पाककला अशा अनेक गोष्टीची आवड, तर आशयला मुख्यत्वेकरून उच्च गणित आणि सिनेमा, या दोनच विषयांमध्ये रुची. गंमत म्हणजे फक्त हे दोन विषय चालू असतील तेंव्हाच आपल्याला कळते की आशयसुद्धा खूप बोलू शकतो. इतरवेळी, हा शांतपणे  इतरांचे बोलणे ऐकण्याचे काम करत असतो. आशय उच्च गणिताचा अतिशय प्रतिभावंत विद्यार्थी आहे. तो गणिताचा अभ्यास करत असला की एखादे ऋषीमुनी ध्यानधारणेला बसले आहेत असेच  वाटते. मग जवळपास कुणीही असले, कितीही आवाज करत असले किंवा काहीही चालले असले तरी त्याचे चित्त विचलित होत नाही. अशा ध्यानमुद्रेमध्ये असताना त्याला तहान-भुकेचाही विसर पडतो. त्यामुळेच आमच्या पहिल्या आणि तिसऱ्या अमेरिका वारीत आम्ही आशयच्या घरी उतरणार आहोत हे कळल्यावर, त्याच्या आईला खूप आनंद झालेला होता. दूरवर असलेल्या आपल्या मुलाच्या खाण्यापिण्याची काळजी निदान काही दिवस तरी घेतली जाणार हा विचार कुठल्याही आईला आनंदी करतोच.

असिलता जरी भारताबाहेर असली तरी आशय पुण्याला आमच्या घरी येत राहिला आणि आमचा मित्र होऊन गेला. आम्हाला उच्च गणितात अजिबात गति नाही, पण सिनेमाचे मात्र आम्ही दोघेही शौकीन आहोत. आशय तर सर्व प्रकारच्या सिनेमाचा विशेष दर्दी आहे. जगभरातील अनेक भाषांमधील, अनेक देशातील, प्रसिद्ध दिग्दर्शकांचे उत्तमोत्तम असे हजारो सिनेमे त्याच्या संग्रही आहेत. कितीतरी चांगल्या सिनेमांच्या DVD आणि डाउनलोड केलेले, एक मोठ्ठी हार्ड डिस्कभरून सिनेमे असा त्याचा बहुमोल खजिना आहे. त्याची गंमत म्हणजे, गणिताचा अभ्यास सांभाळून तो रोज एक नवीन सिनेमा आपल्या laptopवर  बघतोच. आम्ही बरेचसे चांगले  मराठी, हिंदी आणि निवडक  इंग्रजी सिनेमे बघितलेले असतात. त्यामुळे सिनेमा या विषयावर आमच्या आणि त्याच्या बऱ्याच गप्पा होऊ शकतात. मी आजही एखादा चांगला सिनेमा बघितला की  त्याला त्याबद्दल ईमेल वरून कळवते. एकूणच, कसे  कुणास ठाऊक, आमचे आणि आशयचे सूर पहिल्यापासूनच जुळले आणि सिनेमा या विषयाव्यतिरिक्तही तो आमच्याशी बोलू लागला. २००९ साली आशयला UCLA सारख्या प्रसिद्ध युनिवर्सिटीमध्ये PhD ला प्रवेश मिळाल्यावर तो खुश झाला होता. पण हॉलिवूडच्या अगदी जवळच UCLA असल्यामुळेही तो विशेष आनंदी होता की  काय असे मला त्यावेळी वाटले होते.

२०१० साली आमच्या अमेरिकेच्या पहिल्या वारीत आशयच्या लॉस एंजेलिसच्या घरी आलो त्या वेळची गोष्ट. आम्ही रात्री विमानतळावरून त्याच्यासोबत flyaway बसने घरी निघालो. विमानप्रवासात झोप फारशी झालेली नव्हती आणि खाणे पोटभरीचे असले तरी आपल्या चवीचे नसल्यामुळे समाधान झालेले नव्हते. आता घरी जावे आणि अगदी गरमागरम वरण-भात खावे असे वाटत होते. आमच्याकडे डाळ-तांदूळ होते आणि आशयकडे कुकर असल्याचे माहिती होते. मी आशयला म्हणाले, "मी आता घरी जाऊन भात-वरण करते मग आपण जेऊ या"
आशय म्हणाला,"घरी स्वैंपाक तयार आहे. माझी एक मैत्रीण आहे तिने सगळे बनवून तयार ठेवलेले आहे. घरी पोहोचलो की आपण लगेच जेवण करून घेऊन झोपूया. मग उद्या आरामात उठून माझे कॉलेज बघायला जाऊ या"
घरी जेवण तयार आहे हे ऐकल्यावर मी मनोमन सुखावले. परंतु, आमच्यासाठी जेवण बनवून तयार ठेवणारी ही आशयची मैत्रीण कोण असेल, असा प्रश्न मनात आलाच!

"इथे आल्या-आल्या कोणी जवळची मैत्रीण झाली आहे वाटते?" हसत-हसत मी आशयला प्रश्न विचारला . माझ्या प्रश्नातील गर्भित आशय समजल्यामुळे तो कमालीचा लाजला आणि गडबडीने सफाई देत म्हणाला, "तुम्हाला वाटतेय तसे काही नाही आहे हो काकू. शाओ जिंग  नावाची माझी ही मैत्रीण चीनमधल्या एका अगदी लहानश्या बेटावरच्या छोट्या कॉलेजमधून UCLA सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये PhD करण्यासाठी आलेली आहे. तिच्या त्या छोट्या कॉलेजमध्ये उच्च गणितातले फारसे topics तिला शिकायला मिळालेले नाहीत. केवळ त्यामुळे सध्या सुरुवातीला तिला आमचा अभ्यासक्रम जरासा अवघड पडतो आहे. म्हणून मग मी तिला बरेचदा गणित शिकवतो. त्या बदल्यात ती मला टेबल-टेनिस शिकवते. ती तो खेळ उत्तम खेळते. अशी माझी आणि तिची मैत्री आहे. मला काही स्वैंपाक येत नाही. तुम्ही येणार म्हणून तिने आमच्या मैत्रीखातर तुमच्यासाठी स्वत:हून स्वैंपाक केला आहे."
आम्ही आशयच्या घरी सामान ठेऊन शाओ जिंग च्या घरी गेलो. शाओ जिंगने मोठ्या हौसेने सगळी जय्यत तयारी केली होती आणि आम्ही लगेच जेवायला बसलो. पण गरमा-गरम भात वरणा ऐवजी आम्हाला भाताचाच एक दुसरा प्रकार म्हणजे थंडगार सुशी खायला मिळाली. आशय शाकाहारी असल्यामुळे शाओ जिंगने त्याच्यासाठी शाकाहारी सुशी केली होती. शाओ जिंगने इतक्या खुशीने खिलवलेली सुशी मी खाल्ली खरी, पण सुशीतला कच्चा मासा खायची कल्पना माझ्या गळी उतरायला जरा जडच पडली. जेवणे उरकली आणि आम्ही लगेच पुढच्या तीन दिवसांत काय-काय करायचे याचे नियोजन करून ठेवले. पहिला दिवस आम्ही UCLA बघणे आणि वेस्ट वूड भागात हिंडणे यासाठी ठेवला होता .

सर्वप्रथम वेबर्न टेरेस मधल्या त्याच्या घरापासून आशय आम्हाला UCLA आणि आसपासचा वेस्ट वूड भाग  दाखवायला घेऊन गेला. आम्ही चालत-चालत UCLA कडे  निघालो होतो. वाटेतच सुप्रसिद्ध Fox थिएटर लागले. आशयचा आवडीचा विषय आल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने आम्हाला सर्व माहिती सांगू लागला. Fox   थिएटरमध्ये कित्येक प्रसिद्ध सिनेमांचे पहिले शो - म्हणजे 'प्रिमिअर' - होतात. त्यामुळे  हे या भागातले मोठ्ठे आकर्षण आहे. आसपास आमच्यासारख्या पर्यटकांची गर्दी होतीच. अनेक तरुण-तरुणीही होते. हॉलीवूडमध्ये काही काम मिळावे असे स्वप्न डोळ्यात घेऊन हे तरुण लोक  इथे येतात, असे आशयने आम्हाला सांगितले. आसपास एकापेक्षा एक सुंदर अशा तरुणी दिसत होत्या. नंतर आम्हाला  UCLA कॉलेजमध्येही अतिशय कमनीय बांध्याच्या बऱ्याच सुंदर विद्यार्थिनी दिसल्या. आम्ही त्यांच्याकडे बघतोय हे लक्षांत आल्यावर, मान खाली करून त्याच्या खास शैलीमध्ये अगदी दबक्या आवाजात आशय म्हणाला," आमच्या कॉलेजमधल्या बऱ्याचशा मुली इतक्या सुंदर आहेत की त्या सहज हॉलीवूड सिनेमांच्या नायिका होऊ शकतात". आशयकडून मुलींबद्दल असे हे भाष्य अगदीच अनपेक्षित होते आणि त्यावरून आम्ही त्याची बरीच चेष्टाही केली.

२०१० मध्ये मी पहिल्यांदाच भारताबाहेर पाउल ठेवले  होते आणि ते सुद्धा अगदी स्वर्गवत वाटाव्या अशा लॉस एंजेलिस शहराच्या वेस्ट वूड या भागांत. तिथे पहिल्याच दिवशी पाहिलेल्या सर्व गौरांगना म्हणजे मला स्वर्गातल्या रंभा आणि उर्वशीच वाटल्या.

२०१४  मध्ये आमच्या तिसऱ्या वारीमध्ये आम्ही पुन्हा वेस्टवूड भागातच राहिल्यामुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. चार वर्षांत आशयचे राहणे, वागणे, बोलणे यामध्ये मला काडीचाही फरक दिसला नाही. तो होता तसाच मितभाषी, एकाग्रचित्त, अभ्यासू वृत्तीचा राहिलेला आहे, आणि आता जून २०१५ मध्ये उच्च गणितातील PhD पूर्ण करणार आहे.  त्याच्या  चार वर्षांच्या वास्तव्यामध्ये, या स्वर्गातली कुठलीही अप्सरा, त्याच्या गणिताच्या ध्यानधारणेमध्ये वितुष्ट आणून त्याचा तपोभंग करू शकली नाही हे विशेष!