शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

१८. वाह ताज

माझे चहा प्रेम तुम्हाला आत्तापर्यंत निश्चितच लक्षांत आलं  असेल. ते प्रेम आहे असं मी म्हणत असले तरी आनंदच्या मते ते केवळ प्रेम नसून त्याचे  केंव्हाच व्यसनात रुपांतर झाले आहे. कुणीही कुठल्याही वेळी, " चहा घेणार का ?" हा प्रश्न विचारला की मला नाही म्हणणे अशक्य होते. सकाळी उठल्याबरोबर आणि दुपारी एका ठराविक वेळी कपभर चहा मिळाल्याखेरीज मला चैनच पडत नाही. इतकेच काय मला चहाच्या जाहिराती बघायलाही मनापासून आवडते.उस्ताद झाकीर हुसेनच्या तबल्याच्या थापेवर रंगलेली 'वाह ताज' ची जाहिरात मला फार आवडायची. हल्ली येणारी रेड लेबल चहाची "कुछ घरोंकी चाय में अपनेपन का स्वाद होता है" ही जाहिरातही मनाला फारच भावते. काही घरांच्या चहामध्ये खरोखरीच आपलेपणा अनुभवायला मिळतो. अशा घरी चहा प्यायलाही मजा येते. 'एक कप चहा' या तीन शब्दांना, आपल्या संस्कृतीत किती अनन्यसाधारण महत्व आहे, हे आपल्याला सगळ्यांना चांगलेच  माहिती आहे.  'साधा एक कप चहा सुद्धा दिला नाही' या वाक्यातला फणकारा किंवा 'साहेब, जरा एक कप चहाचं बघा ना' या वाक्यामधली अजीजी कुणी अनुभवली नसेल असे मला वाटत नाही. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांचा फक्कड जमलेला 'एक कप च्या' हा सिनेमा बघितल्यानंतर, चहा हेच आपल्या देशाचे राष्ट्रीय पेय म्हणून घोषित केले पाहिजे, असे मला मनापासून वाटले होते.

या चहापुराणाचा 'चहाटळपणा' कधी संपणार असे तुम्हाला वाटले असेल. पण गरमागरम चहाच्या कपाबरोबर गप्पा थोड्या लांबणारच. अमेरिकेच्या प्रवासांत मनासारखा एक कप चहा मिळण्यात किती अडचणी येऊ शकतात हे मी सांगत होते. पहिल्या अमेरिका वारीमध्ये डिप-डिप चहा वर कसेबसे दिवस काढत होते. त्याच वारीमध्ये बॉस्टनला असताना एक दिवस आमच्या भाचीने प्रिया वैद्यने तिच्या घरी बोलावले होते. एकूण तीन आठवड्याच्या आमच्या अमेरिका दौऱ्यामध्ये तिच्या घरी एक दिवस मला घरचा चांगला चहा मिळाला. दुसऱ्या वारीमध्ये चहाचे 'मिच्चर' सोबत असल्यामुळे निदान सकाळच्या चहाची उत्तम सोय होत होती. बाहेर पडल्यावर मात्र कॉफीला पर्याय नसायचा. तिसऱ्या वारीत आशयच्या घरी पोहोचून, थोडी विश्रांती घेऊन, चहा पिऊन ताजे तवाने झालो. मग मेगा मार्टमधून फळे, भाजी दूध अशा सगळ्या वस्तू घेऊन आलो आणि जेवून झोपलो. आशयच्या अपार्टमेंन्टमध्ये स्वैंपाकघरात, बाहेरच्या  खोलीत आणि  बाथरूममध्येही जुन्या पद्धतीचे हीटिंग रॉड होते. जूनचा महिना होता आणि लॉस एंजेलिस मधली हवा अगदी थंड आणि कोरडी होती. रात्री हीटर लावून झोपलो तरीही रजईच्या आत हुडहुडी भरायला लागली. स्वैंपाकघरातली एक मोठी जाळीची खिडकी उघडी होती आणि त्यातून अतिशय थंड बोचरे वारे यायला लागले. रात्री जरा जास्तच थंडी वाजायला लागल्यावर आनंदने स्वैंपाकघरात जाउन खिडकीचे काचेचे तावदान बंद करण्याऐवजी स्वैंपाकघर आणि बाहेरची खोली यामधले दारच बंद करून घेतले. त्यानंतर खोली चांगली उबदार झाली आणि आम्ही गुडूप झोपून गेलो.

मी झोपून उठले तेंव्हां चागलेच फटफटलेले होते. मला वाटले सकाळचे आठ वाजून गेले असणार. पण जून महिन्यात कॅलिफोर्नियामध्ये लवकर उजाडत असल्यामुळे घड्याळात जेमतेम सहाच वाजले होते.माझ्यां नेहमीच्या सवयीप्रमाणे चहाचे आधण ठेवण्यासाठी स्वैंपाकघराचे दार उघडायला गेले तर काय ते दार आतून बंद! आनंद मस्त गाढ झोपलेला होता. बाहेरच्या खोलीतून त्याने दार ओढून बंद केले होते पण ते आतून बंद कसे झाले हे मला कळेना. आत कोणीतरी असेल की काय या विचाराने, क्षणभर मी चांगलीच घाबरून गेले. पण जरा  डोके शांत ठेवून विचार केल्यावर दुसरी एक शक्यता मनात डोकावली. स्वैंपाकघराच्या दरवाज्याचा लॅच आतून चुकून आमच्याकडून उलट्या बाजूला फिरला असणार. अमेरिकेमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात त्याच्या उलट असतात. म्हणजे दिव्यांचे स्विच, दरवाज्याचे लॅच, रस्त्यावरची वाहतूक, सगळेच उलटे. बाहेरून दरवाजा ओढून घेतल्यावर तो आतून लॉक झाला असणार. आता स्वैंपाकघराचे दार बंद म्हणजे मला लगेच चहा मिळणार नाही, या कल्पनेने मी कासावीस झाले. बरं, ते उघडायचे कसे हा प्रश्न तर होताच. मी तातडीने आनंदला उठवून त्याच्या निद्रानंदात बिब्बा घातला! दार आतून बंद असल्यामुळे मला चहा करता येत नाही आहे हे सांगितल्यावर माझ्या समस्येचे गंभीर स्वरूप त्याला लगेच कळले.

आता कसेतरी करून ते दार उघडणे आवश्यक होते. बाहेरच्या खोलीत होत्या नव्हत्या त्या सगळ्या किल्ल्या लावून पाहिल्या. अगदी सेफ्टी पिन, हेयर पिन, कात्री वापरुनही खटपट केली. पण काही उपयोग झाला नाही. इतक्यात अचानक मला काहीतरी आठवले. आदल्या दिवशी स्वैंपाकघराची साफ-सफाई करताना मी खिडकीचे काचेचे तावदान उघडले होते आणि जाळीच्या तावदानाची खिट्टी नीटशी बंद झालेली नव्हती. त्यामुळे, जाळी बाहेरून उघडणे आणि खिडकीतून स्वैंपाकघरामध्ये शिरून आतून दार  उघडणे शक्य झाले असते. आनंदला मी हे सांगताच त्याला चार-पाच वर्षांपूर्वीची एक घटना आठवली. हार्वर्ड विद्यापीठातील हेन्री गेट्स नावाच्या एका  कृष्णवर्णीय प्रोफेसरना एकदा त्यांच्या घराचे कुलूप उघडायला त्रास झाल्यामुळे, ते आणि त्यांचा मोरोक्कन ड्रायव्हर मिळून दार ढकलत होते. कुणा 'जागरूक आणि तत्पर' शेजाऱ्याने लगेच  पोलिसांना फोन करून कळवले की दोन अनोळखी कृष्णवर्णीय माणसे शेजारच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसूण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रोफेसरसाहेबांना स्वत:च्याच घरात शिरण्याच्या प्रयत्न करीत असतांना अटकेला सामोरे जावे लागले होते! परंतु, ते  प्रोफेसर अमेरिकन नागरिक होते, प्रतिष्ठित होते आणि मुख्य म्हणजे स्वत:च्याच घरात शिरत होते. आमची मात्र सगळीच पंचाईत होती. आम्ही अमेरिकेचे नागरिक नाही, ते घर आमचे नाही, घर ज्याने भाडेकराराने घेतले आहे ती व्यक्ती म्हणजे आशय लॉस एंजेलिसमध्ये नाही आणि घरमालक कोण आहे याचा आम्हाला पत्ता नाही! अशा अडचणीच्या परिस्थितीत असताना  कुणी बघेल की काय, अटक झाली तर काय अशी धाकधुक मनात सुरु झाली. पूर्वी मी 'स्मगल' केलेला माल पकडला गेला असता तर, "माझा आणि हिचा काही संबध नाही' असे म्हणून मी सुटका करून घेईन" असे आनंद म्हणाला होता.  ते आठवून मी आनंदला लगेच सांगून टाकले, "तू खिडकीतून आत शिरत असताना पकडला गेलास तर 'माझा आणि याचा काहीही संबध नाही' असेच मी सांगणार!"

आनंद पुढच्या दारातून बाहेर पडून स्वैंपाकघराच्या मागच्या बाजूला गेला. महत्प्रयासाने भिंतीवर चढून, खिडकीचे जाळीचे तावदान उघडून आत शिरला, आमचे नशीब म्हणून त्याला कोणी बघितले नाही. सुट्टीच्या सुरुवातीलाच, इतका द्राविडी प्राणायाम केल्यानंतर, बायकोला अजून खूष करण्यासाठी माझ्यासाठी मस्त एक कप गरम चहा पण आनंदने बनवून आणला. शहाजहानने मुमताजच्या प्रेमासाठी ताजमहाल बांधला असेलही. पण आनंदने प्रेमाने आणलेला तो चहाचा कप बघितल्यावर माझे डोळे ओलावले आणि पटकन माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले."वाह ताज"! 

११ टिप्पण्या:

 1. Ditto चहाप्रेमी, पण अजून असं स्टंट करावं लागलं नाही आहे,I could actually live your pain n bliss of not getting n getting the tea... fantastic writing

  उत्तर द्याहटवा
 2. दुसरा चहाची पण,
  तितकीच जक्कास भट्टी जमलीय.

  उत्तर द्याहटवा
 3. प्रेयसिला जसे प्रियकर आगोदर आकाशातले चंद्तुरतारे आणिन सांगतो तसे तुमच्या पतिराजांनी तुमच्या चहाच्या प्रेमापायी आपला जीव धोक्यात घातला आणि वर चहाही करुन आणला.
  दोघांचेही अभिनदन

  उत्तर द्याहटवा