बुधवार, २० मे, २०१५

२०. ड्रीम कॉलेज

अमेरिका हा एक मोठा आणि अजब देश आहे. जगभरातील अनेक देशातील लोक इथे वास्तव्याला असल्यामुळे अनेक संस्कृतीची सरमिसळ होऊन या देशाची संस्कृती तयार झालेली आहे. अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांचे राहणीमान वेगळे आहे आणि तिथल्या चालीरीती विशिष्ट प्रकारच्या आहेत. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरची राज्ये आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्यांतील संस्कृती आणि हवामान यामध्ये खूपच फरक आहे. लॉस एंजेलीस हे अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरचे एक प्रमुख शहर खूप मोठे, पसरलेले आणि वेगवेगळ्या छोट्या-छोट्या वस्त्यांनी बनलेले आहे. लोकसंख्येचा विचार करता लॉस एंजेलीस हे न्यूयॉर्कच्या खालोखालचे अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

आमचा मित्र आशय जिथे शिकतो ते, म्हणजे UCLA हे विदयापीठ लॉस एंजेलीस शहराच्या वेस्ट वूड या भागात आहे. UCLA (युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलीस) कॅलिफोर्निया राज्यामधले सर्वात मोठे आणि सर्वात प्रसिद्ध विदयापीठ आहे. UC Berkeley च्या पाठोपाठ, म्हणजे १८१९ साली हे विदयापीठ सुरु झाले. UCLA मध्ये एकाचवेळी चाळीस हजारहून जास्त विद्यार्थी शिकतात. कॅलिफोर्निया राज्यात युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अशा नावाची एकूण दहा विदयापीठे आहेत. प्रत्येक विदयापीठाला युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि त्यापुढे त्या त्या गावाचे अथवा शहराचे नाव, असे संबोधले जाते. या सर्वच विदयापीठांच्या इमारती आणि परिसर एकापेक्षा एक सरस आहेत असे म्हणतात. त्यापैकी आत्तापर्यंत आम्ही फक्त UCLA  हे एकच विदयापीठ बघितलेले आहे. UCLA चा संपूर्ण परिसर अतिशय सुरेख आहे. या विदयापीठात वेगवेगळी कॉलेजेस आहेत व प्रत्येक कॉलेजची इमारत वैशिष्ट्यपूर्ण आहे. UCLA च्या जवळच लॉस एंजेलीस शहरातील अतिश्रीमंत लोकांची व फिल्म स्टार्सची वस्ती असलेला 'बेव्हर्ली हिल्स' हा भाग आहे. त्यामुळेच कॉलेजच्या आसपासचा परिसरही अतिशय सुंदर आहे.
 
अमेरिकेमधले आणि आपल्याकडचे कॉलेज शिक्षण यात बराच फरक आहे. केवळ बारावी झालेल्या मुलामुलींना भारतात सहजी आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत. तसेच, भारतीय कॉलेज शिक्षण अमेरिकेतल्या कॉलेज शिक्षणाच्या मानाने स्वस्त आणि सोपे असते. म्हणूनच, भारतात बरेचसे विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण घेऊ शकतात. शिवाय अनेक शिक्षण सम्राटांच्या कृपेने, बारावी पास झालेल्या सर्व मुला-मुलींना कुठल्या ना कुठल्या कॉलेजच्या कसल्यातरी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतोच! आपल्याकडे बऱ्याचशा   मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च पालकच करतात. 
अमेरिकेत मात्र बारावीपर्यंत शिक्षण फुकट असते. परंतु, कॉलेज शिक्षण फारच महाग असल्यामुळे मुले लहान असल्यापासूनच पालक त्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायला लागतात. मुलेही शिकता-शिकता कामे करून पैसे मिळवतात. मुलांनी बारावी पास होणे म्हणजेच 'हायस्कूल ग्रॅजुएट' होणे, ही अमेरिकेत फार मोठ्ठी गोष्ट समजली जाते. त्यानंतर त्यांना बऱ्या पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात. मुलांनी कॉलेज शिक्षणाचा बराचसा खर्च शक्यतो स्वकमाई मधूनच करावा असा अलिखित नियमही असतो. कॉलेज शिक्षण महागडे असल्यामुळे सर्व मुले सरसकट कॉलेजमध्ये प्रवेश घेतातच असेही नाही. बारावी झाल्या-झाल्या बरीच मुले पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात. इतकेच काय, आई-वडिलांपासून वेगळे राहून आपापले बिऱ्हाडही थाटतात. बरीचशी मुले दोन तीन वर्षे काम करून आपापल्या कॉलेजच्या शिक्षणासाठी पैसे साठवून मगच कॉलेजला प्रवेश घेतात. 
अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकणारी मुले सहसा पालकांसोबत घरी राहत नाहीत. कॉलेजच्या वसतीगृहांमधून किंवा इतरत्र भाड्याने खोल्या घेऊन राहतात. पदवी-अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मुलांना सातत्याने अभ्यास करणे आवश्यक असते. त्या काळांत विद्यार्थी आपापली कामे व अभ्यास सांभाळतात आणि प्रसंगी आपापला स्वैंपाकही बनवतात. त्याशिवाय त्यांना बाहेर काम करून पैसे मिळवून आई वडिलांचा आर्थिक भार कमी करायचा असतो. या ओढाताणीत काही मुलांना अभ्यासात सातत्य राखणे अवघड जाते. पण एखाद्या मुलाला  शिक्षणात गति नसेल,  किंवा तो मन लावून शिकत नसेल तर कुठलीही दयामाया न दाखवता त्याचे आई-वडील शिक्षणाचा खर्च द्यायला नकार देतात आणि क्वचित मुलांना कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. या व अशा इतर बऱ्याच कारणांमुळे, कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारण ६० ते ७० टक्के विद्यार्थीच कॉलेजचा अभ्यासक्रम  पूर्ण करू शकतात. 

सर्वसाधारणपणे मुले नववीत म्हणजे हायस्कूल मध्ये गेली की आई वडील कॉलेजेस बद्दल समग्र माहिती गोळा करायला सुरुवात करतात. आपल्या पाल्याला ज्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता असेल अशा सर्व कॉलेजांची फी, इतर खर्च, तिथले वातावरण, मिळणाऱ्या सवलती अशा बऱ्याच बाबींचा विचार पालक करतात. इतकेच नव्हे तर दहावी आणि अकरावी नंतर आई-वडील पाल्याला घेऊन अशा कॉलेजेसना प्रत्यक्षांत भेट देतात. प्रत्येक कॉलेज आपल्या खिशासाठी आणि पाल्याच्या प्रगतीसाठी योग्य आहे की नाही, याचा अगदी चिकित्सकपणे अंदाज घेतला जातो. स्वत:च्या कष्टाचा पैसा शिक्षणासाठी वापरणार असल्यामुळे मुलेही आपले भावी कॉलेज, अभ्यासक्रमाची निवड आणि एकंदरीत भावी कॉलेज आयुष्याबद्दल स्वतंत्र विचार करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सहकुटुंब कॉलेज-दर्शनाचे दौरे काढायची तिकडे पद्धत आहे. कॉलेज बघायला आलेल्या अशा कुटुंबाना कॉलेज दाखवण्यासाठी आणि कॉलेजच्या वतीने त्यांचे शंका निरसन करण्यासाठी, त्याच कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी 'कॅम्पस टूर गाईड'चे काम करतात. त्याबद्दल त्याना ताशी १० ते १५ डॉलर्स असे  पैसेही मिळतात. आम्ही प्रत्येकवेळी जून महिन्यात अमेरिकेत गेल्यामुळे अनेक कॉलेजमध्ये 'कॉलेज-दर्शनोच्छुक' कुटुंबांचे जथे आम्हाला पाहायला मिळाले. आम्हीही तशाच काही जथ्यांबरोबर एक दोन कॉलेजचे दर्शन घेतले.

अमेरिकेतील शाळेच्या वर्गातून मुला-मुलींची संख्या जेमतेम १५ ते २० इतकीच असते. घराच्या आसपासही फारशी मुले नसल्याने शालेय विद्यार्थी बरेच एकलकोंडे असतात. कॉलेजमध्ये समवयस्क तरुण-तरुणींबरोबर घरापासून दूर राहून शिकायचे आणि मजाही करायची याचे त्यांना मोठे आकर्षण असते. अनेक कॉलेजमधले वातावरण बघून, सर्वंकष विचार करून अमेरिकन मुले-मुली आपापले 'ड्रीम कॉलेज' ठरवतात. हॉलीवूड हा लॉस एंजेलीसचा एक भाग असल्यामुळे तरुणाईला या शहराबद्दल कमालीचे आकर्षण आहे. अशा या स्वप्न नगरीतील एक उत्तम कॉलेज असल्यामुळे अनेक अमेरिकन तरुण तरुणींचे UCLA हे 'ड्रीम कॉलेज' असते यात काहीच नवल नाही.

कॅलिफोर्नियातल्या उन्हाळ्यात हवा अतिशय आल्हाददायक असते. आमच्या पहिल्या अमेरिका वारीत पहिल्याच दिवशी आम्ही UCLA बघायला गेलो. मोठ्या मोठ्या व उत्तम निगराणी असलेल्या सुरेख बागा, डवरलेली फुलांची झाडे, उत्तमोत्तम टोलेजंग इमारती, दोन इमारतींमध्ये पसरलेली मोठमोठ्ठाली हिरवीगार लॉन्स व त्यावर किलबिलाट करत उत्साहाने हिंडणारी तरुणाई बघून आमचे मन अगदी प्रसन्न झाले. त्या लॉन्सवर बऱ्याच ठिकाणी अनेक कमनीय बांध्याच्या गौरांगना अगदीच तुटपुंज्या कपड्यात सूर्यस्नान घेत पहुडलेल्या होत्या. UCLA मधल्या स्वप्नवत वातावरणातल्या या रंभा-मेनका बघितल्यानंतर मला प्रश्नच पडला की कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांचे अभ्यासात लक्ष कसे लागत असेल? अमेरिकेतल्या पहिल्याच दिवशी तिथल्या कॉलेज जीवनाची अगदी 'उघडी' ओळख आम्हाला झाली. पण  इथल्या सर्वच कॉलेजमध्ये असे मोकळे वातावरण असते हे सत्य आम्हाला नंतर उघड झाले . 

२ टिप्पण्या:

  1. तिथल्या मुलांची शैक्षणिक अवस्था कशी आहे.तेथिल मुले उशिरा वयात का शिक्षण घेतात याची सविस्तर माहिती उपयीक्त आहे.लहानपणापासून ती मुले वेगळी रहात असल्यामुळे बर्याच मुलांचे प्रांबलेम झालेले वाचनात आले होते.
    आपण खुप सुदैवी आहोत आपला जन्म भारतातला आहे त्यामुळे सर्वच बाबतित आईवडिलांचा भरभक्कम आधार असतो.मुल वाया जाण्याचे प्रमाण अमेरिकैत जेवढे आहे त्यापेक्षा कमी आहे.आपल्याला काय किंवा आपल्या मुलांना धाकही असतो व तेवढेच मुले व पपालक एकमेकांवर प्रेमही करतात.
    स्वतंत्रता जास्त असल्यामुळे स्वैराचारही जास्त आहे.

    उत्तर द्याहटवा