रविवार, २१ जून, २०१५

चिनी-हिंदी बहन-भाई!

आमचा UCLA दर्शनाचा दौरा चालू होता.  आशयने मला, आनंदला आणि अनिरुद्धला थोडावेळ UCLA चा कॅम्पस  दाखवला. पण काही वेळानंतर त्याची एका फ्रेंच प्रोफेसरांबरोबर भेट ठरलेली असल्यामुळे त्याला जाणे भाग होते. त्याने त्याच्या मैत्रिणीला, शाओ जिंगला, आम्हाला विद्यापीठ दाखवण्यासाठी बोलावून घेतले. मग आम्हाला तिच्याकडे सुपूर्त करून तो आपल्या कामासाठी निघून गेला. हसतमुख आणि तुडतुड्या शाओ जिंगने आमचा ताबा घेतला. तिने मोठ्या आपुलकीने आम्हाला तिच्या युनिवर्सिटी बद्दल सर्व  माहिती द्यायला सुरुवात केली. शाओ जिंग ही मुलगी चीनमध्ये गणितातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून, आशय बरोबरच UCLA मध्ये गणितामध्ये PhD करत होती. आशयसारखेच तिलाही UCLAला  येऊन  जेमतेम वर्षभर झालेले होते. आम्हांला UCLA बद्दल माहिती सांगता-सांगता तिला वरचेवर चीनमधील आपल्यां गावाची आणि तिच्या कॉलेजची आठवण येत होती. त्यामुळे भारतातील आणि चीनमधील शिक्षण पद्धती, त्यातील साम्य व फरक यावर आमची आपोआपच खूप चर्चा झाली. गप्पां-गप्पांमधून  चिनी, भारतीय आणि अमेरिकन कॉलेज शिक्षण, उच्च शिक्षण व त्यामधले  बारकावेही आम्हाला उलगडत गेले .

अमेरिकेत छोटी कम्युनिटी कॉलेजेस किंवा चार वर्षांचा अभ्यासक्रम असलेली मोठी डिग्री कॉलेजेस अशी वेगवेगळ्या प्रकारची कॉलेजेस असतात. बारावीनंतर कम्युनिटी कॉलेजमधून दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना असोसिएट पदव्या घेता येतात. पण त्या पदवीला फारसा मान नसतो व त्यानंतर खूप प्रतिष्ठेच्या अथवा मोठ्या पगाराच्या नोकऱ्याही मिळत नाहीत. पण कम्युनिटी कॉलेजमधले शिक्षण हे चार वर्षांच्या डिग्री कॉलेजच्या मानाने स्वस्त व सोपे असते. त्यामुळे सर्वसाधारण परिस्थितीतील बरेच विद्यार्थी, एखादी नोकरी सांभाळून दोन वर्षांत असोसिएट डिग्री पूर्ण करतात. मग पुढे पैशाच्या आणि बुद्धीच्या कुवतीने जमलेच तर बॅचलर्स डिग्री पूर्ण करतात. अमेरिकेत चार वर्षांचा बॅचलर्स डिग्रीचा कोर्स असलेली अनेक विद्यापीठे आहेत. अमेरिकन नागरिकत्व नसलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोजक्याच, म्हणजे विद्यापीठातील एकूण जागांच्या फक्त आठ ते दहा टक्के जागांवरच प्रवेश दिला जातो. त्यामुळे बॅचलर्स डिग्रीसाठी प्रवेश मिळवायला जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस असते. बॅचलर्स डिग्रीचे शिक्षण अमेरिकन विद्यार्थ्यांनाही महाग वाटते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी तर ते जास्तच महाग असते  कारण त्यांना कुठलीही शिष्यवृत्ती मिळणे अतिशय कठीण असते. तसेच अभ्यासात विशेष चमकदार कामगिरी केल्याशिवाय फीमध्ये माफी मिळू शकत नाही आणि काम करून पैसे उभे करण्यावरही काही प्रमाणात निर्बंध असतात.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना, अमेरिकेत चार वर्षांचा बॅचलर्स डिग्रीचा कोर्स करण्यासाठी आज जवळजवळ  दीड कोटी रुपये खर्च येतो. कोवळ्या वयांतील मुला-मुलींना इतका खर्च करून अमेरिकेत पदवीपूर्व शिक्षणासाठी  पाठवायला बरेचसे पालक मनाने तयार नसतात. बऱ्याच पालकांना ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखेही  नसते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी आपापल्या देशांत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतात व नंतर दोन वर्षांच्या मास्टर्सच्या अभ्यासक्रमासाठी अमेरिकेत येतात. या अभ्यासक्रमासाठी एकूण वीस ते तीस लाख रुपये खर्च येतो. पण हे विद्यार्थी पदवीधर असल्यामुळे त्यांना काही छोट्या मोठ्या नोकऱ्या सहजी मिळू शकतात ज्यायोगे ते शिक्षणाचा खर्च बऱ्याच अंशी कमी करू शकतात. तसेच बावीस तेवीस वर्षे वयाच्या आणि थोडी वैचारिक परिपक्वता आलेल्या मुला-मुलींना अमेरिकेत शिक्षणाला पाठवताना त्यांचे पालकही फारसे बिचकत नाहीत. 
फक्त चार वर्षांचा बॅचलर्स डिग्रीचा कोर्स केलेल्या काही मोजक्या आणि विशेष हुशार विद्यार्थ्यांना मास्टर्स डिग्री नसली तरीही अमेरिकेत PhD साठी प्रवेश मिळतो हे विशेष. PhD करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाठ्यवृत्ती मिळते. त्यातून त्यांचा राहण्या-जेवण्याचा सर्व खर्च भागतो आणि पैसे वाचवून वर्षातून एखादेवेळी आपापल्या घरी जाण्यासाठीचा तिकीट खर्चही विद्यार्थी करू शकतात. आशय आणि शाओ जिंगने आपापल्या देशांमधून केवळ तीन वर्षांचा डिग्री कोर्स संपवून PhD ला प्रवेश मिळवला होता हे ऐकून आम्हाला अभिमान वाटला.

शाओ जिंगने आम्हाला ही सर्व माहिती दिली आणि मग ती आम्हाला UCLA  विद्यापीठाचा गणित विभाग दाखवायला घेऊन गेली. UCLA मधील गणित विभाग खूपच मोठा आहे. तिथे जवळ जवळ पन्नास ते साठ प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यातले अनेक प्राध्यापक नामवंत संशोधक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. आम्ही गेलो होतो तेंव्हा कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे बऱ्याचशा प्राध्यापकांची ऑफिसेस बंद होती. आम्ही आशयचे PhD चे मार्गदर्शक हारुझो हिडा या जपानी प्राध्यापकाच्या ऑफिसबाहेर जरा घुटमळलो. काही ऑफिसेस मधून थोडे आत डोकावूनही बघायचा प्रयत्न केला. प्रोफेसर चंद्रशेखर खरे या मराठी प्राध्यापकांचे  ऑफिस बघून आम्हाला अतिशय अभिमान वाटला. प्रोफेसर खरे यांनी गणितात किती महत्वाचे संशोधन केले आहे हे शाओ जिंगने आम्हाला सांगितले. आपल्या मराठी माणसाचे, एका चीनी मुलीकडून अमेरिकेत होणारे अमाप कौतुक आम्ही कान देऊन ऐकत होतो आणि मनोमन खुश होत होतो. एकेका प्राध्यापकांची ऑफिसेस बघत आम्ही पुढे निघालो होतो. तेव्हड्यात 'प्रोफेसर टेरेन्स टाओ ' यांच्या नावाची पाटी बघून आश्चर्य आणि आनंदाने अनिरुद्ध ओरडलाच. मग त्याने आणि शाओ जिंगने 'प्रोफेसोर टेरेन्स टाओ' यांच्या अचाट बुद्धिमत्तेबद्दल आम्हाला थोडीशी कल्पना दिली. टेरेन्स टाओ यांनी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सुवर्णपदक मिळवलेले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री पूर्ण करून एकविसाव्या वर्षी त्यांनी प्रिन्सटन विद्यापीठातून गणितामध्ये PhD पूर्ण केलेले आहे. गणितामधील अत्यंत मानाचे समजले जाणारे 'फिल्ड्स मेडल' देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहे. अनिरुद्ध अगदी भारावून गेला होता आणि 'प्रोफेसोर टेरेन्स टाओ' यांच्या नावाच्या पाटीसमोर उभे राहून स्वत:चे एक दोन फोटो काढून घेतल्यावरच त्याचा पाय तिथून निघाला.

शाओ जिंग मोठ्या उत्साहाने आम्हाला कॉलेजमध्ये हिंडवत होती. गणित विभागाचा फेरफटका झाल्यानंतर   तिने आम्हाला UCLA च्या स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्सची मोठी इमारत दाखवायला नेले. आपल्याकडच्या कित्येक कॉलेजेसच्या संपूर्ण इमारती त्या इमारतीपेक्षा छोट्या असतील! तिथल्या सुविधा तर पाहताच राहाव्या अशा  होत्या. एका मोठ्या हॉलमध्ये अनेक 'ट्रेड मिल्स'ची रांग  होती. त्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी व काही प्राध्यापक घाम गाळत होते. दुसऱ्या एका मोठ्या हॉलमध्ये  टेबल टेनिसची टेबल्स होती. त्या विद्यापीठात शिकत अथवा शिकवत नसल्यामुळे आम्हाला आत जाता येणार नाही असे शाओ जिंगने सांगितले. पण आतल्या इतर अनेक सोयींचे वर्णन तिने केले आणि आम्ही थक्क झालो. अमेरिकेतल्या कॉलेज शिक्षणामध्ये खेळालाही महत्व असते. प्रत्येक विद्यार्थ्याला चार वर्षांच्या अभ्यासक्रमात खेळांच्या किंवा व्यायामाच्या कुठल्यातरी प्रकारचे काही तास पूर्ण करावेच लागतात हे विशेष!

तास-दोन तासांत आमचे विद्यापीठ दर्शन होईपर्यंत आम्हाला अगदी प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली. एखाद्या मोठ्या बहिणीने आपल्या लहान भावाला प्रेमाच्या ओलाव्याने वागवावे तशी शाओ जिंग अनिरुद्धशी बोलत-वागत होती. अनिरुद्धला चार वर्षांच्या बॅचलर्स कोर्ससाठी कॅलटेक विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याचे तिला माहिती होते. आमचा निरोप घेताना तिने अनिरुद्धला एका बाजूला घेऊन सांगितले," या अमेरिकन्सच्या मानाने आपण आशियाई लोक खूपच गरीब आहोत. पण इथल्या मुलांपेक्षा आपणच जास्त हुशार असतो हे निश्चित लक्षात ठेव. अमेरिकन कॉलेजेस बाहेरच्या विद्यार्थ्यांकडून खूप पैसे उकळतात. त्यामुळे पुढच्या चार वर्षांमध्ये इथल्या सर्व सुखसोयींचा पुरेपूर फायदा उठवायचा बरं का! आपल्याकडून घेतलेल्या प्रत्येक डॉलरचीस पूर्ण वसुली करून घ्यायची. त्याचबरोबर तू शिक्षणासाठी आला आहेस हे विसरायचे नाही. अमेरिकेत मेरीटला खूप महत्त्व असते. त्यामुळे अभ्यासातही मागे पडायचे नाही." असे सांगून अनिरुद्धच्या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देऊन  शाओ जिंगने आमचा निरोप घेतला

पंडित नेहरूंनी कधी काळी "हिंदी-चिनी भाई-भाई" असा एक पोकळ नारा पुकारला होता. पण शाओ जिंगचे ते कळकळीचे बोलणे ऐकून मात्र मला "चिनी-हिंदी बहन-भाई!" असा नारा द्यावासा वाटला. आपल्या चिनी बहिणीचा कानमंत्र मनात साठवत, अनिरुद्ध आपल्या भावी विद्यापीठाच्या भेटीसाठी आणि तिथल्या यशस्वी वाटचालीसाठी सज्ज झाला.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा