अनिरुद्ध २०१० सालच्या सप्टेंबर महिन्यापासून लॉस एंजेलिसमधल्या कॅलटेक विद्यापीठात बॅचलर्स डिग्रीचा कोर्स चालू करणार होता. असिलताने बोस्टन येथील MIT विद्यापीठातील बॅचलर्स कोर्स नुकताच म्हणजे २०१० जूनमध्ये पूर्ण केला होता. जूनच्या सुरुवातीला झालेल्या तिच्या पदवीदान समारंभाला आम्ही दोघे अमेरिकेला जाऊ शकलो नव्हतो. त्यामुळेच, असिलता MIT सोडून शिकागोला PhD करायला जाण्याआधी तरी तिचे विद्यापीठ पाहावे, या उद्देशाने आम्ही जून-जुलैमध्ये आमचा पहिला अमेरिका दौरा काढला. जवळजवळ त्याच तिकिटात लॉसएंजेलिसचा प्रवासही शक्य होत असल्यामुळे लॉसएंजेलिसला जाऊन कॅलटेक विद्यापीठही बघायचे आम्ही ठरवले. अनिरुद्धचा कोर्स चालू व्हायच्या बरेच आधी, जुलैच्या सुरुवातीला, आम्ही लॉस एंजेलिसला पोहोचलो. पहिल्या दिवशी आशयच्या UCLA विद्यापीठाचा फेरफटका झाल्यावर घरी येऊन आम्ही आशयच्या घरापासून कॅलटेकपर्यंत जाण्याचा बसचा मार्ग बघून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कॅलटेकला जाण्यासाठी निघालो .
लॉस एंजेलिस शहराच्या एकूण प्रगतीच्या आणि अफाट पसाऱ्याच्या मानाने तिथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अगदीच सुमार आहे. एकूणच कॅलिफोर्निया राज्यामध्ये स्वत:ची गाडी असल्यास तुमचा प्रवास सुखद आणि सोयीचा होतो. तसे नसल्यास टॅक्सी घ्यावी. पण आमच्या मनांतला "साठ" चा पाढा, आम्हाला टॅक्सीचा पर्याय घेऊ देत नव्हता. तसेच आमच्याकडे वेळच वेळ असल्यामुळे आम्ही बसने जायचे ठरवले. वेस्टवूडपासून दोन बस बदलून आणि दोन तास प्रवास केल्यावर आपण कॅलटेकला पोहोचतो. टॅक्सीने तोच प्रवास जेमतेम चाळीस मिनिटांचा आहे. टॅक्सीने जाता-येता मिळून एकशेदहा डॉलर पडणार होते तर प्रत्येक बस प्रवासाचे दीड डॉलर असे चार बसेसचे मिळून प्रत्येकी फक्त सहा डॉलर खर्च होता. दिवसभराचा पास तर केवळ पाच डॉलरला! त्यामुळे, प्रत्येकी एक पास काढून आम्ही निघालो. परदेशात दिवसभराचे, अथवा आठवडाभराचे पास फारच सोयीचे पडतात. पण पास काढण्यापूर्वी, 'तो पास किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालतो? बस, मेट्रो, फेरी आणि लोकल ट्रेन्स, सगळ्याला चालतो का?' हे सगळे बारकाईने बघावे लागते. लॉस एंजेलिसमध्ये बऱ्याच खाजगी बस सर्विसेस आहेत. त्यात मात्र हा पास चालत नाही. पासवर जास्तीत जास्त प्रवास केल्यामुळे किती फायदा झाला, हा हिशोब करण्यात एक वेगळीच मजा असते. पुण्यात मला बसप्रवास फारसा कधीच करावा लागत नाही. मुंबईमध्ये कधीतरी बसने प्रवास करते. त्यामुळे भारतात बसप्रवास महाग झाल्यासंबंधी वर्तमानपत्रांत येणाऱ्या ठळक बातम्या वाचण्याचीही तसदी मी कधी घेतली नव्हती. अमेरिकेत मात्र मी एकेक डॉलरचा विचार करत होते. कधी कधी गरीबीचा अनुभवही मिळायला हवा ना!
अमेरिकेत एखाद्या चौकात बसचा थांबा असला तर त्या दोन रस्त्यांची नावे जोडून झालेले जोडनाव त्या स्टॉपला दिलेले असते. आम्हाला लेक अवेन्यू आणि कॉलोराडो बूलेवार्डच्या चौकात, म्हणजेच लेक-कॉलोराडोला जायचे होते. अमेरिकेतील माझा पहिलाच बस प्रवास असल्यामुळे मी सगळ्याच गोष्टी डोळ्याने टिपत होते. लोक तिकीट कसे काढतात, बस थांबवायला कसे सांगतात, कुठून चढतात, कुठून उतरतात हे सगळे मी बघत होते. बसमधल्या तमाम बायका-पुरुषांचे कपडे व्यवस्थित आहेत हे मला जाणवले . अगदी म्हाताऱ्या-कोताऱ्या बायकासुद्धा लिपस्टिक लावलेल्या, मॅचिंग पर्सेस, कपडे आणि पादत्राणे अशा टापटिपीत दिसत होत्या. त्या कदाचित घरकाम करणाऱ्या, साध्या परिस्थितीतल्याच असाव्यात. पण नखरा मात्र जोरात होता. हा सगळा हॉलीवूडचा प्रभाव आहे, हे आमच्या लक्षात आले. त्या मानाने अमेरिकेतील इतर ठिकाणी तेवढा व्यवस्थितपणा आम्हाला जाणवला नाही.
वेस्टवूड ते पासाडेना या बस-प्रवासात बेव्हर्ली हिल्स आणि हॉलीवूड बूलेवार्ड हा भाग लागतो. त्यामुळे तो प्रवास अतिशय आल्हाददायक वाटतो. स्वच्छ, सुंदर रस्ते; रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरेख बंगले; आणि त्याभोवतालच्या सुशोभित केलेल्या बागा; हे सर्व डोळ्यांत साठवून घेतांना वेळ मजेत जातो. आमची बस 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम' जवळून जात असताना तिथे अहोरात्र जगभरातील टूरिस्टची झुंबड उडालेली दिसायची. उन्हाळ्यातले आल्हाददायक हवामान असल्यामुळेही भलतीच गर्दी होती. तिथे 'हॉलीवूड सूवेनियर्स' विकणारी बरीच दुकाने आहेत. तो सर्व भाग पूर्णपणे टूरिस्टना आकर्षित करण्यासाठी सजवलेला आहे. इथल्या सिनेमा थिएटर्सवर दिवसरात्र दिव्यांची रोषणाई केलेली असते. हॉलीवूडमधली सर्व आधुनिक फॅशन रस्त्यावर उतरलेली जाणवते. दुकानांची सजावट, रस्त्यांवरची रोषणाई आणि रेस्टॉरंट चा झगमगाट काही विचारूच नका. या रस्त्यांवर बस खूप थांबत-थांबत जाते आणि बरेच पुढे दूरच्या एका टेकडीवर आपल्याला हॉलीवूड अशी अक्षरे लिहिलेली दिसतात. बसमधल्या इतर लोकाना त्याची नवलाई नव्हती, पण मला मात्र हॉलीवूड च्या भागातून जाण्याचे आणि हॉलीवूड हिलच्या प्रथमदर्शनाचे खूपच अप्रूप वाटत होते. शेवटी लेक-कॉलोराडोला उतरून आम्ही चालत कॅलटेक विद्यापीठाकडे निघालो.
१२०० ईस्ट कॅलिफोर्निया बुलेवार्ड, असा सुटसुटीत पत्ता असलेले 'कॅलिफोर्निया इन्सटिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' अर्थात "कॅलटेक" हे खाजगी विद्यापीठ मूलभूत संशोधनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. उत्तरेला डेल्मार बुलेवार्ड, दक्षिणेला ईस्ट कॅलिफोर्निया बुलेवार्ड, पश्चिमेला साउथ कॅटलिना अव्हेन्यू आणि पूर्वेला हिल अव्हेन्यू; यादरम्यान जेमतेम पाच-सहा ब्लॉक्स पसरलेला, सव्वाशे एकरचा नेटका कॅम्पस आहे. भारतातील अनेक विद्यापीठांच्या मानाने हे आकारमान मोठे वाटेल, परंतु, पण अमेरिकेतील बऱ्याच विद्यापिठांच्या तुलनेत कॅलटेक विद्यापीठ खूपच छोटे आहे. इथे कित्येक विद्यापीठे हजारो एकर जमिनीवर वसलेली असतात. अमेरिकेतील छोट्या विद्यापीठांमध्ये पाच हजारपेक्षा कमी, तर मध्यम आकारांच्या विद्यापीठांमध्ये पाच ते पंधरा हजार आणि मोठ्या विद्यापीठांमध्ये पंधरा हजारांच्यावर विद्यार्थी, एकावेळी शिकत असतांत. कॅलटेकमध्ये जेमतेम सव्वादोन हजार विद्यार्थीआहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने कॅलटेकच्या सोळापट आणि क्षेत्रफळाने चौपट असलेल्या, भव्य आणि शानदार UCLA चा तोरा नुकताच आम्ही बघून आलेलो होतो. त्यामानाने कॅलटेक अगदीच छोटेखानी आणि साधे वाटले तरी शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या व स्थापत्यकलेचे एकाहून एक सुंदर नमुने असलेल्या इथल्या इमारतींमुळे, प्रथम दर्शनी त्यात एकप्रकारचा खानदानीपणा जाणवला.
कॅलटेक सायन्स विषयात जगातील अव्वल दर्जाची शिक्षणसंस्था म्हणून नावाजले गेलेले विद्यापीठ आहे. या टिचक्या विद्यापीठात आजी व माजी प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी मिळून चौतीस नोबेल पारितोषिकांचे मानकरी आहेत! इथल्या प्राध्यापकांना गेली कित्येक वर्षे नासा, अमेरिका सरकारची संरक्षण, उर्जा व आरोग्य मंत्रालये, नॅशनल सायन्स फाउंडेशन अशा अनेक संस्थांकडून करोडो अमेरिकन डॉलर्स संशोधनासाठी दिले गेलेले आहेत. कॅलटेक विद्यापीठाचे सायन्स आणि इंजिनियरिंग या विषयांचे मिळून सहा शैक्षणिक विभाग आहेत आणि त्यामध्ये होणाऱ्या अत्युच्च प्रतीच्या संशोधनासाठी कॅलटेक जगभरात नावाजलेले आहे. कॅलटेकचा बॅचलर्स डिग्रीचा अभ्यासक्रम अतिशय अवघड समजला जातो. सायन्स आणि गणिताचे अनेक अवघड कोर्सेस घेतल्याशिवाय विद्यार्थ्याला डिग्री कोर्स पूर्णच करता येत नाही. त्यामुळे सायन्स आणि गणितात विशेष प्राविण्य असलेल्या मोजक्या विद्यार्थ्यांनाच इथे बॅचलर्स डिग्रीसाठी प्रवेश दिला जातो.
कॅलटेक विद्यापीठातल्या वातावरणातच सायन्स आहे आणि इथे शिकत असलेले बहुतेक विद्यार्थी छोटे शास्त्रज्ञच आहेत असे वाटते. आमच्या पहिल्याच भेटीत तिथल्या वातावरणातील ती जादू आम्हाला जाणवली. दुसऱ्या दिवशीही कॅलटेक बघायला आम्ही परत गेलो. तसेच पुढे २०१२ साली विद्यापीठाच्या वसतिगृहातल्या अनिरुद्धच्या खोलीत ४ दिवस मुकाम केला आणि २०१४ साली अनिरुद्धच्या दीक्षांत समारंभासाठी गेलो. प्रत्येक भेटीमध्ये आम्हाला कॅलटेकचा जादूई करिष्मा जाणवल्याशिवाय राहिला नाही .
कॅलटेक विद्यापीठातल्या वातावरणातच सायन्स आहे आणि इथे शिकत असलेले बहुतेक विद्यार्थी छोटे शास्त्रज्ञच आहेत असे वाटते. आमच्या पहिल्याच भेटीत तिथल्या वातावरणातील ती जादू आम्हाला जाणवली. दुसऱ्या दिवशीही कॅलटेक बघायला आम्ही परत गेलो. तसेच पुढे २०१२ साली विद्यापीठाच्या वसतिगृहातल्या अनिरुद्धच्या खोलीत ४ दिवस मुकाम केला आणि २०१४ साली अनिरुद्धच्या दीक्षांत समारंभासाठी गेलो. प्रत्येक भेटीमध्ये आम्हाला कॅलटेकचा जादूई करिष्मा जाणवल्याशिवाय राहिला नाही .
खुप छान
उत्तर द्याहटवाआपण रदेशात पास काढून बसने प्रवास पर्याय निवडला तोआर्थिक दृष्टीचा विचार करुन केला असला तरी बसमुळे ती ज्या ज्या भागातून गेली तो भागनिसटता का होईना पहायला मिळाला.प्रवास वर्णन सुरेख.डोळ्यासमोर उभे रहाणारे
उत्तर द्याहटवा