गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

१७. चाय गरम

अमेरिकेतल्या कित्येक मोठ्या मोठ्या गोष्टी चांगल्या वाटल्या, तरी अगदी छोट्या गोष्टी खुपतात.
 
मला सकाळी उठल्याबरोबर गरम  चहा लागतो. दात न घासता बेड-टी घेणे माझ्या स्वच्छतेच्या कल्पनेत बसत नाही पण उठल्या उठल्या मी आधी चहाचे आधण ठेऊन नंतर दात घासायला लागते. खदखदत्या आधणात चहापत्ती घालून आणि थोडेसेच उकळून चहा झाकून ठेवायचा. चहा मुरला की गाळून, त्यात अगदी उकळते दूध घालून, गरम चहा प्यायचा, ही माझी रोजची पद्धत. चहा ताजा बनवलेला आणि गरमचअसायला हवा. केंव्हातरी करून ठेवलेला चहा पुन्हा-पुन्हा उकळून पिण्यामध्ये कितीही सोय असली तरी माझ्या मनाला आणि जिभेला ते पटत नाही. अमेरिकेच्या पहिल्या प्रवासांत सगळ्यात जास्त खुपलेली गोष्ट म्हणजे वाफाळता चहाचा कप न मिळणे, ही होती. आधीच विमानप्रवासांत दीड दिवस बेकार चहा पिऊन मी वैतागलेले होते. विमानातल्या जेमतेम कोमट आणि मवाळ चहामध्ये, क्रीमर नामक दुधाची भुकटी घातली, की तो अजूनच थंड होतो. राजधानी आणि शताब्दी सारख्या महागड्या ट्रेनच्या प्रवासांतसुद्धा तसलाच बेकार, बेचव चहा देतात. निदान रेल्वेच्या प्रवासात, पहाटे एखाद्या स्टेशनवर पटकन उतरून ताजा बनत असलेला चहा पिण्याचे थ्रिल तरी अनुभवायला मिळते. विमानप्रवासात असे काही करणेही अशक्य! कुठल्यातरी स्टेशनवर, स्टोव्हवरच्या पातेल्यातल्या उकळता वाफाळणारा चहा, त्याचा दरवळणारा सुगंध, गुलाबी थंडी आणि सिग्नलकडे बघत बघत, मनातली धडधड काबूत ठेवत प्यायलेला, तो गरमा -गरम चहा… त्या वातावरणाच्या आठवणीनेही माझ्या मनांत उकळ्या फुटतात. सांगायचा मुद्दा म्हणजे मी अगदी चहांबाज आहे.  


अमेरिकेत बाहेर कुठेच मनासारखा चहा मिळणार नाही हे, पहिल्याच वारीत लक्षांत आले. त्या प्रवासांत डिप-डिप चहाच्या बॅग्स बरोबर होत्या. घरी त्या चहावर कसेबसे दिवस काढले. खरंतर, डिप-डिप चहात पण तसा काही दम नसतो. एकतर त्या बुडवलेल्या चहाच्या पुडीचा लिडबिडाट होतो आणि तरीही चहाचा अर्क काही नीट उतरत नाही. चहा कडक व्हावा म्हणून पुडी जास्त वेळ बुडवून ठेवली, की चहा निश्चित थंड होतो. बरं, कितीही महागातल्या टी बॅग्स आणल्या तरीही, मेंदूला किक येईल असा चहा तयार होत नसल्यामुळे, चहा प्यायल्याचे समाधानच मिळत नाही. हल्लीच्या ग्रीन टी, यलो टी , लेमन  टी, आईस टी, मिंट टी, हर्बल टी  असल्या प्रकारांत तर मला अजिबात रस नाही. नुसतेच स्टाईलसाठी बनवलेले प्रकार वाटतात. घरच्या  फक्कड चहाच्या खालोखाल मला इराण्याकडचा गोड, कडक चहा आणि रस्त्यावर मिळणारा 'अमृततुल्य' चहा आवडतो. टपरीवर चहा बनवणारे लोक, मला कुठल्याही महान कलाकारापेक्षा कमी वाटत नाहीत. त्यांची चहा बनवताना होणारी लयबद्ध हालचाल मला अगदी मंत्रमुग्ध करून टाकते. वर्षानुवर्षे आपल्या हातच्या चहाची विशेष चव जपत, ते नेहमीच्या गिऱ्हाईकांना अक्षरश: नादी लावतात. सरकारी कार्यालये किंवा कॉलेजच्या आसपासच्या टपऱ्यांवर वर फक्त गरजू लोकांची गर्दी असते असे माझे मत आहे. मात्र एखाद्या आडबाजूच्या चहाच्या टपरीपाशी विशेष गर्दी दिसली, की तिथे उत्तम चहाचे दर्दीच असणार हे लक्षात घ्यायचे. अशा ठिकाणी उभे राहून चहा घ्यावा असे खूपवेळा वाटते. परंतु, माझे 'बाईपण' आणि डॉक्टरी व्यवसाय, हे दोन्हीही या इच्छेच्या आड येते. जिथे फारसे कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी मात्र गाडीवरचा चहा प्यायची तल्लफ मी निश्चित भागवून घेते. 

आम्ही लहानपणी भातुकली खेळताना ज्या आकाराचे कप वापरायचो, त्या कपांपेक्षा लहान कपांमधून आजकाल चहा विकतात. जेमतेम चव लागेस्तोवर, एक-दोन  घोटातच तो संपूनही  जातो. त्यामुळे एका वेळी दोन चहा घेतल्याशिवाय माझे समाधान होत नाही. हल्ली ज्या पिचपिच्या कपांमधून चहा देतात, ते तर मला मुळीच आवडत नाही. चहा आता सांडून कपडे खराब होणार की काय, अशा धास्तावलेल्या अवस्थेत चहा प्यायला मजा येत नाही. चहा कसा मोठ्या आणि चागल्या धडधाकट कपातच पाहिजे. कित्येकवेळा असे वाटते की आपण आपापला चहाचा कप बरोबर ठेऊन हिंडावे! 'ताकाला जाताना भांडे लपवू नये' म्हणतात तसे 'चहाला जाताना कप लपवू नये' अशी म्हणही तयार करता येईल, पुढेमागे!  हल्ली व्हॉट्स ऍप च्या अनेक ग्रुप्स वर येणारी चहाच्या कपांची थंड आणि 'निर्जीव' चित्रे बघून होणारी माझी चिडचिड,  एखादा गरम चहाचा कप पिऊन मी शांत करते.


लहानपणी माझ्या माहेरी, सोलापूरसारख्या संथ गतीच्या शहरांत, 'टी-कोझी'च्या खाली ठेवलेला मोठ्या किटलीमधला गरम चहा,  निवांतपणे गप्पा मारत प्यायला मजा यायची. आज मात्र स्मार्टफोन, इंटरनेट आणि कम्प्यूटर मुळे  माझेच आयुष्य इतके गतिमान झाले आहे की, माहेरी गेले आणि तिथे सर्वजण पूर्वीच्याच संथ गतीत चहा पीत असले तरीही त्या चहाचा पूर्वीसारखा आस्वाद मला घेता येत नाही. माहेरच्याच उत्तम चहाची, अजून एक अविस्मरणीय आठवण म्हणजे माझ्या आजीच्या हातचा चहा.  ती नेहमी खास एकाच चवीचा, उत्कृष्ट चहा बनवायची. मला तिच्या हातचा चहा हवा असला की मी तिला विचारायचे, "तुझ्या हातचा चहा,  हमखास  इतका मस्त कसा होतो गं?" ती मग थोडेसे हसून, लाजून त्यामागचे कारण सांगायची. माझे आजोबा उत्तम चहाचे चाहते होते. त्यांना एका विशिष्ट चवीचा चहा, त्यांच्या आवडीच्या एका मोठ्या कपातून प्यायला आवडायचा. आजीने केलेला चहा त्यांच्या पसंतीला उतरला नाही तर  काहीही न बोलता ते फक्त कप बाजूला सारायचे आणि तो चहा प्यायचे नाहीत. मग आजीला आजोबांच्या पसंतीच्या चवीचा चहा होईपर्यंत, परत-परत चहा करायला लागायचा म्हणे. आजोबांच्या गोड आठवणी तिच्या मनांत ताज्या होत असल्यामुळेच तिने चहा करून द्यावा यासाठी मी लावलेली लाडी-गोडी तिला आवडत असावी. आजीला वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षीच वैधव्य आले होते. पण, आजोबांच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आजीच्या हातचा चहा प्यायचे सुख मी तिच्या वयाच्या नव्वदीपर्यंत अनुभवले. शेवटची काही वर्षे ती अल्झाइमरने आजारी असली तरी चहा मात्र न चुकता अगदी त्याच विशिष्ट चवीचा करायची, हे विशेष. ती स्वत: आयुष्यात कधीही चहा प्यायली नाही, पण शेवटपर्यंत ती आजोबांच्या चहाच्या कपात कॉफी प्यायची! त्यावरून आणखी एक आठवण आली! सोलापूरच्या दिवंगत डॉक्टर वैशंपायनांच्या पत्नी माझ्या आजीकडे यायच्या.  डॉक्टर वैशंपायन स्वतः किटलीमध्ये चहाची पत्ती घालून, त्यावर गरम पाणी ओतून, म्हणजे ब्रिटिश पद्धतीने चहा 'ब्रू' करून प्यायचे.  वैशंपायनकाकू फ़ुलपात्रात चहा घेत असत. पण डॉक्टर वैशंपायनांची आठवण म्हणून त्या फुलपात्रात दिलेल्या चहात वरून गरम पाणी घालून प्यायच्या! चहाबरोबरच्या आठवणींमध्ये या दोघींचे पातिव्रत्य आठवल्यावाचून राहिले नाही. 

अमेरिकन्सना मात्र, चहापेक्षा कॉफीचे कौतुक फार. मोठ्या शहरांमधून कोपऱ्या-कोपऱ्यावर कॉफीची दुकाने असतात. आता आपल्याकडेही स्टार बक्स, कॅफे कॉफी डे  वगैरे दुकाने आली आहेत. पण तिथल्या कॉफी पेक्षा मला उडप्याच्या हॉटेलातली "कापी"जास्त आवडते. एक्स्प्रेसो, कॅफे लाटे अशी 'इम्पोर्टेड' नावे आणि महागड्या असल्यामुळे या कॉफ्यांचे  उगीचच कौतुक होते असे मला वाटते. उद्या आपल्याकडचा  इलायची चहा, मसाला चहा, आल्याचा चहा किंवा 'मारामारी' आपण कार्डमम-लेस्ड टी, मलाबार स्पाईस्ड टी, जिंजर मॅजिक टी, किवा टी-कॉफी ब्लेंड, अशा फॅन्सी नावाने आणि कपाला दीड-दोनशे रुपये लावून विकायला लागलो तर त्याचेही देशोदेशी असेच कौतुक होईल!

अमेरिकेत कॉफी देतात ती मात्र चांगली मोठा कप भरून. आमच्या पहिल्याच वारीत बॉस्टन-न्यूयॉर्क बस प्रवासांत, चहापाण्यासाठी थांबलो असताना, मी कॉफी पिण्याची इच्छा बोलून दाखवताच, आनंदने खाली उतरून, मोठ्या प्रेमाने माझ्यासाठी एक्स्प्रेसो कॉफी आणली. पण आपल्याकडे मिळणाऱ्या एक्स्प्रेसो कॉफीपेक्षा ती अगदीच वेगळी निघाली. ती घोटभर, कडवट कॉफी मला काही आवडली नाही. नंतरच्या अमेरिका-भ्रमणात मात्र आम्ही वेगवेगळ्या कॉफी प्रकारांचा आस्वाद घेतला. पुढच्या दोन वाऱ्यामध्ये  आमचे 'फॅमिली मिक्स्चर' बरोबर नेऊन घरच्याघरी मी माझी चहाची तल्लफ भागवली. पण घराबाहेर पडल्यावर चहाची तल्लफ भागवायला अमेरिकेत  टपरी, 'अमृततुल्य' किंवा इराणी वगैरे नाहीत.  

Iowa विद्यापीठात एका फेलोशिप कार्यक्रमात आम्ही होतो तेंव्हा आमच्या बरोबरच्या काही सहपाठी अमेरिकन बायकांनी 'इंडियन मसाला चाय' नामक उत्तम पेय ब्युफे मध्ये कुठेतरी ठेवले आहे, अशी खुशखबर  मोठ्या कौतुकाने आम्हाला  दिली. मग  हिरीरीने तो स्टॉल शोधून, आम्ही चांगले मोठे कपभरून ते पेय घेऊन आलो. एक घोट प्यायल्यावर मात्र त्या 'चाय' ला उघडपणे नावे ठेवली नाहीत इतकेच. पण संस्कार वगैरेचा विचार न करता मनोमन "च्यायला" म्हणालो आणि पुन्हा अमेरिकेत चहाची चाहत ठेवायची नाही असा  निग्रह मनाशी केला!

अमेरिकेत सकाळच्या चहाच्या कपावरून घडलेले एक मोठे नाट्य आता मी चहाच्या पुढच्या कपाबरोबर सांगेन !   

१६ टिप्पण्या:

  1. तुमची अमेरिकन गाथा व चहा पुराण आवडले.
    चहाची चाहत आणि त्यांचा चस्का एकदा लागला की सुटत नाही , हॉटेल वाला असल्याने सर्व प्रकारची कॉफ्या मी आनंदाने पितो मात्र घरी आले घालून फक्कड चहा तोही चहाची भुकटी टाकून पितो , थंड वातावरणात रोज चाहत आले तब्येतीला मानवते.
    माझी दोन वर्षाच्या लेकीला चहाची रेसिपी माहिती झाली आहे तिच्या आईला चहाचा त्रीव सुगंध सहन होत नाही ,
    पण अमृततुल्य चहा साठी तडजोड निव्वळ अशक्य
    मुंबईच्या कटिंग ची सर आम जगात कुठेही नाही ,

    उत्तर द्याहटवा
  2. नेहमी प्रमाणे झक्कास लिहिलंय.
    तूझ्या लिखाणाची खासियत म्हणजे,
    ते वाचणाऱ्याला आपलं स्वत:चंच वाटतं....!!!

    उत्तर द्याहटवा
  3. स्वाती नेहमी प्रमाणे चहा चर्चा खूपच छान. अमेरिकेत घडलेला किस्सा वाचण्याची प्रतीक्षा करतोय. ऑल the best. 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. बाहेर आपल्यासारखा वाफाळलेला चहा मिळत नाही म्हणून खूप गैरसोय होते.सकाळी डिप डिप चहामुळे सकाळची कामे आडतात.चहाच्या वेळेस चहाच हवा.उठल्याबरोबर त्याला पर्याय नाही.
    आमच्या घरी या.मोठ्या मगातून भरपुर वाफाळलेला चहा देईन
    चहाला वेळेच बंधन नाही.

    उत्तर द्याहटवा