शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४

१६. भूल-भुलैया

आशयच्या घराजवळच्या मेगा स्टोअरमध्ये खरेदीला गेलो होतो. ही अमेरिकेतील स्टोअर्स म्हणजे एक भूल-भुलैयाच असतो म्हणा ना. त्यांचे वर्णन करण्यासाठी 'भूल-भुलैया' हाच अगदी योग्य शब्द आहे. कारण इथे शिरण्याची भूल तुम्ही एकदा केलीत, की तुम्हाला इथल्या सर्व वस्तू पूर्णपणे भुलवणार आणि आपण नेमके काय घ्यायला आलो होतो, ते मात्र आपल्याला  भुलायला लावणार!

'राल्फ', 'वॉलमार्ट', 'कॉस्टको', 'टार्गेट', 'रॉस', 'ट्रेडर जोझ' अशा अनेक कंपन्यांची संपूर्ण अमेरिकेत जवळजवळ प्रत्येक गावात मोठ्ठाली स्टोअर्स असतात. या दुकानांची अजून एक खासियत म्हणजे, प्रत्येक दुकानाचा अगडबंब पसारा. दुकानातल्या दुकानात हिंडताना अक्षरश: पायाचे तुकडे पडतात. ग्राहकांच्या शंभर ते दीडशे गाड्या एकावेळी उभ्या राहू शकतील इतके मोठमोठाले वाहनतळ दुकानाच्या बाहेर असतात. गाड्या ठेवण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत, हे विशेष. सतत मोठमोठाले सेल्स, वेगेवेगळ्या वस्तूंवर डिस्काउन्ट, मेम्बरशिप कार्ड्सवर केलेल्या खरेदीवर विशेष सूट किंवा येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी रोज एखादे सलाड किंवा कपभर कॉफी फुकट देणे, अशा नित्य-नवनवीन क्लृप्त्या वापरून ही स्टोअर्स गिऱ्हाईकांसाठी गळ टाकत असतात.  

अमेरिकेत जगातल्या अनेक देशांचे, धर्मांचे आणि वंशाचे लोक अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. प्रत्येक देशाचे लोक आपापली खाद्यसंकृती, वेशभूषा, सण-वार आणि जीवनशैली असं बरंच काही अमेरिकेत घेऊन आले. तसं बघायला गेलं तर हे सर्व जेमतेम गेल्या चारशे वर्षांत घडलेलं आहे. त्यामुळे, या देशाची संस्कृती आणि इथल्या लोकांचे राहणीमान म्हणजे एक अजब रसायनच म्हणावे लागेल. काही लोकांनी इथे येउन  नवीनच राहणीमान स्वीकारले; तर काहीनी 'आपापले' असे सर्व काही अगदी जपून ठेवले आहे. इथे येऊन स्थायिक झालेल्या लोकांची इतर देश, धर्म आणि वंशांच्या लोकांशी लग्ने होऊन नवीनच जातकुळीचे लोक तयार झाले आहेत. बऱ्याचशा अमेरिकन लोकांची जीवनशैली आधुनिक असली तरी काही लोक अगदी पुरातन काळांत राहत असल्याप्रमाणे जगतात. त्यामुळे इथे मायक्रोवेव्हमध्ये रेडीमेड अन्नाची पाकिटे फक्त गरम करून खाणारे लोक दिसतील तसेच रोज घरी धान्य दळून कोळश्याच्या किंवा लाकडाच्या चुली फुंकून अन्न शिजवणारे लोकदेखील दिसतात. शाकाहारी, मांसाहारी असे लोक तर असतातच; त्यांशिवाय, दुग्धजन्य पदार्थ न खाणारे, ग्लुटेन-विरहित आहार घेणारे, एगटेरियन्स, 'कोशर' अन्न खाणारे किंवा केवळ ऑर्गनिक  अन्नच  खाणारे, असे वेगवेगळे चोचले असलेले लोक असतात. कदाचित त्यामुळेच जगाच्या पाठीवरचे जवळ-जवळ सगळे पदार्थ इथल्या मेगास्टोअर्समधून मिळतात. पण कुठलाही खाद्यपदार्थ विकत घ्यायला गेलात, तर त्याचे कमीतकमी पाच ते दहा प्रकार समोर येतात. सुरुवातीला मला फार चक्रावून जायला व्हायचे. साधे दूध जरी घ्यायचे झाले तरी दहा-दहा प्रकारच्याबरण्यांवरची लेबल्स वाचत बसावे लागायचे. पण हळू-हळू या खरेदीतही मजा यायला लागली. 

अमेरिकनांचा दिनक्रम सोमवार ते शुक्रवार फारच धावपळीचा असतो. सर्वसाधारण व्यक्ति रोजचे आठ म्हणजे आठवड्याचे सुमारे चाळीस तास काम करते. कित्येक जण अधिक पैसे मिळवण्यासाठी त्याहीपेक्षा जास्त काम किंवा दोन-दोन नोकऱ्या करतात. बरेच लोक शहरापासून दूर राहतात. त्यामुळे रोज कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी  त्यांचे दोन ते चार तास प्रवासात जातात. घरासाठीच्या सामानाची खरेदी करायला, आपल्याकडे असतात तशी, गल्लोगल्ली किराणामालाची किंवा भाजीची दुकानेही नाहीत. घराजवळ जर एखादे मेगास्टोअर नसेल किंवा घरातील सर्वजण दिवसातले बारा-पंधरा तास बाहेर असतील, तर एकदा दुकानात गेले की आठवडा-दहा दिवसाचे सामान आणून ठेवायची सर्वसाधारण पद्धत असते. पण कुणालाही कितीही घाई असली तरी सगळे रांगेने आणि पुढच्या माणसापासून दोन पावले अंतर ठेऊन  बिलिंग काउंटरमागे उभे राहतात. पुढच्या माणसाचे बिल तयार होऊन, त्याने पैसे देऊन, सामान घेऊन जाईपर्यंत मागचा माणूस आपले सामान पुढे सरकवतसुद्धा नाही. हा समंजसपणा बघून मला सुरुवातीला जरा विचित्रच वाटायचे आणि थोडासा त्रासही व्हायचा. भारतात आपण किती बेशिस्तपणे उभे असतो आणि कुठल्याही रांगेमधून निर्लज्जपणे पुढे घुसायचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे तिथे गेल्यावर सुरुवातीला अगदी चुकल्या-चुकल्यासारखे व्हायचे! 

विविध भाज्या, फळे, मांस-मच्छी, किराणामाल, असंख्य प्रकारचे चीज, ब्रेड्. चिप्स, गोळ्या. चॉकलेट्स, बिस्किट्स अशा पॅकेटबंद वस्तूंनी ही स्टोअर्स भरलेली असतात. या स्टोअरमध्ये आपण एखादी वस्तू जितक्या अधिक प्रमाणात घेऊ तितकी ती स्वस्त होत जाते. म्हणजे समजा, दोनशे ग्रॅम लोणी दोन डॉलरला असेल, त्या प्रमाणात पाचशे ग्रॅम किंवा एक किलो लोणी पाच किंवा दहा डॉलरला असले पाहिजे. पण प्रत्यक्षात पाचशे ग्रॅम लोणी चार डॉलरला आणि एक किलो लोणी सहा डॉलरला मिळू शकते. तुम्हाला अधिकाधिक प्रमाणात विकत घ्यायला उद्युक्त करण्यासाठी अशी भुलवणारी किंमत ठेवलेली असते. स्वस्त मिळतेय म्हणून जास्तीत जास्त घ्यायची इच्छा ग्राहकाला होतेच. त्यामुळे मेगास्टोअर्समध्ये अमेरिकन ग्राहक खूप सामान विकत घेताना दिसतात. पंधरा-वीस लोकांची जेवणावळ उठणार आहे असे वाटावे, इतके सामान जवळ-जवळ प्रत्येकाकडे असते. आपल्या तुलनेत अमेरिकन लोकांचा आहार जरी खूप जास्त असला तरी त्यांच्या घरातल्या फ्रीजमध्ये आणि तळघरातल्या डीप फ्रीझरमध्ये इतके सामान भरून ठेवलेले असते की, केंव्हाही दुष्काळी परिस्थिती उद्भवणार आहे की काय असे वाटावे. घरच्या फ्रीझमध्ये महिना-महिना पडून राहिलेल्या एखाद्या पदार्थासाठी माझ्या चुलतभावाने, शिरीषने, "वस्तू 'कोमा'त जाणे" अशी एक समर्पक शब्द-योजना केलेली आहे. अमेरिकेतल्या घरांच्या डीप-फ्रीझर्समधून बरेच पदार्थ 'डीप कोमा' त पडलेले असतात, असेही तो हसत-हसत आम्हाला एकदा सांगत होता! 

अमेरिकेत काही काळ राहून नुकत्याच परतलेल्या पूनम सिन्हा नावाच्या माझ्या मैत्रिणीला एकदा मी तिथल्या मेगा स्टोअर्सचे कौतुक सांगता सांगता, थोड्याशा खेदानेच म्हणाले, "आपल्याकडे अजून तितकी चांगली स्टोअर्स आलेली नाहीत. तिकडच्या मानाने आपली दुकाने किती छोटी वाटतात नाही?" पण ती म्हणाली, "ही मेगा स्टोअर्स कितीही सुसज्ज असली तरी ती अमेरिकन्ससाठी धोक्याची ठरली आहेत. एकतर या स्टोअर्समुळे गेल्या काही दशकांत अमेरिकेतले छोटे दुकानदार नाहीसेच झाले. दुसरे म्हणजे ताजे दूध, भाजीपाला, मांस-मच्छी मिळणे जवळ-जवळ अशक्यच झाले आहे. अधिक स्वस्त म्हणून बरेचदा गरज नसलेले अनेक खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात विकत घेतले जातात. ते वापरले न जाता पडून-पडून खराब होतात आणि फेकले जातात त्यामुळे अप्रत्यक्षपणे बराच पैसाही वाया जातो. शरीराला अनावश्यक असलेले, आणि 'हाय-कॅलरी' पदार्थदेखील केवळ स्वस्त आणि मुबलक आहेत म्हणून हे लोक खातात. यामुळे त्यांची जाडी आणि आरोग्यसेवांवर होणारा खर्च, दोन्हीही वाढतेय.एकूण काय, या मेगा स्टोअर्सवाल्यांनी अमेरिकेत बिनडोक ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्या तयार केल्या आहेत. स्टोअर्समध्ये पडून असलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात आवक झालेल्या वस्तू कमी दरात विकायला ठेवल्या जातात. या व्यवसायात उत्पादक, वितरक आणि ही स्टोअर्स, सगळ्यांचाच खूप पैसा गुंतलेला असतो. त्यामुळे, अमेरिकन्सनी काय खायचे आणि काय नाही हे त्यांच्याही नकळत ही मेगा स्टोअर्सच ठरवत असतात. आपल्याकडे सर्रास ही अशी मेगा स्टोअर्स आलेली नाहीत आणि अजूनही कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार, भाजीवाला, आणि दूधवाला टिकून आहेत हे नशीब समज. त्यामुळे आपल्याला ताजे अन्न तरी खायला मिळतेय " 

मी माझी विचारशक्ती गमावून कोमात किंवा डीप कोमात जायच्या आधीच पूनमने मला जागे केले, हे चांगलेच झाले म्हणायचे! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा