रविवार, २ ऑगस्ट, २०१५

कॅलटेकचा करिष्मा

अनिरुद्ध २०१० सालच्या सप्टेंबर महिन्यापासून लॉस एंजेलिसमधल्या कॅलटेक विद्यापीठात बॅचलर्स डिग्रीचा कोर्स चालू करणार होता. असिलताने बोस्टन येथील MIT विद्यापीठातील बॅचलर्स कोर्स नुकताच म्हणजे २०१० जूनमध्ये पूर्ण केला होता. जूनच्या सुरुवातीला झालेल्या तिच्या पदवीदान समारंभाला आम्ही दोघे अमेरिकेला जाऊ शकलो नव्हतो. त्यामुळेच, असिलता MIT सोडून शिकागोला PhD करायला जाण्याआधी तरी तिचे विद्यापीठ पाहावे, या उद्देशाने आम्ही जून-जुलैमध्ये आमचा पहिला अमेरिका दौरा काढला. जवळजवळ त्याच तिकिटात लॉसएंजेलिसचा प्रवासही शक्य होत असल्यामुळे लॉसएंजेलिसला जाऊन कॅलटेक विद्यापीठही बघायचे आम्ही ठरवले. अनिरुद्धचा कोर्स चालू व्हायच्या बरेच आधी, जुलैच्या सुरुवातीला, आम्ही लॉस एंजेलिसला पोहोचलो. पहिल्या दिवशी आशयच्या UCLA विद्यापीठाचा फेरफटका झाल्यावर घरी येऊन  आम्ही आशयच्या घरापासून कॅलटेकपर्यंत जाण्याचा बसचा मार्ग बघून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कॅलटेकला जाण्यासाठी निघालो .

लॉस एंजेलिस शहराच्या एकूण प्रगतीच्या आणि अफाट पसाऱ्याच्या मानाने तिथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अगदीच सुमार आहे. एकूणच कॅलिफोर्निया राज्यामध्ये स्वत:ची गाडी असल्यास तुमचा प्रवास  सुखद आणि सोयीचा होतो. तसे  नसल्यास टॅक्सी घ्यावी. पण आमच्या मनांतला "साठ" चा पाढा, आम्हाला टॅक्सीचा पर्याय घेऊ देत नव्हता. तसेच आमच्याकडे वेळच वेळ असल्यामुळे आम्ही बसने जायचे ठरवले.  वेस्टवूडपासून दोन बस बदलून आणि दोन तास प्रवास केल्यावर आपण कॅलटेकला पोहोचतो. टॅक्सीने तोच प्रवास जेमतेम चाळीस मिनिटांचा आहे. टॅक्सीने जाता-येता मिळून एकशेदहा डॉलर पडणार होते तर प्रत्येक बस प्रवासाचे दीड डॉलर असे चार बसेसचे मिळून प्रत्येकी फक्त सहा डॉलर खर्च होता. दिवसभराचा पास  तर केवळ पाच डॉलरला! त्यामुळे, प्रत्येकी एक पास काढून आम्ही निघालो. परदेशात दिवसभराचे, अथवा आठवडाभराचे पास फारच सोयीचे पडतात. पण पास काढण्यापूर्वी, 'तो पास किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालतो? बस, मेट्रो, फेरी आणि लोकल ट्रेन्स, सगळ्याला चालतो का?' हे सगळे बारकाईने बघावे लागते. लॉस एंजेलिसमध्ये बऱ्याच खाजगी बस सर्विसेस आहेत. त्यात मात्र हा पास चालत नाही. पासवर जास्तीत जास्त प्रवास केल्यामुळे किती फायदा झाला, हा हिशोब करण्यात एक वेगळीच मजा असते. पुण्यात मला बसप्रवास फारसा कधीच करावा लागत नाही. मुंबईमध्ये  कधीतरी बसने प्रवास करते. त्यामुळे भारतात बसप्रवास महाग झाल्यासंबंधी वर्तमानपत्रांत येणाऱ्या ठळक बातम्या वाचण्याचीही तसदी मी कधी घेतली नव्हती. अमेरिकेत मात्र मी एकेक डॉलरचा विचार करत होते. कधी कधी गरीबीचा अनुभवही  मिळायला हवा ना!

अमेरिकेत एखाद्या चौकात बसचा थांबा असला तर त्या दोन रस्त्यांची नावे जोडून झालेले जोडनाव त्या स्टॉपला दिलेले असते. आम्हाला लेक अवेन्यू आणि कॉलोराडो बूलेवार्डच्या चौकात, म्हणजेच लेक-कॉलोराडोला जायचे होते. अमेरिकेतील माझा पहिलाच बस प्रवास असल्यामुळे  मी सगळ्याच गोष्टी डोळ्याने टिपत होते. लोक तिकीट कसे काढतात, बस थांबवायला कसे सांगतात, कुठून चढतात, कुठून उतरतात हे सगळे मी बघत होते. बसमधल्या तमाम बायका-पुरुषांचे कपडे व्यवस्थित आहेत हे मला जाणवले . अगदी म्हाताऱ्या-कोताऱ्या बायकासुद्धा लिपस्टिक लावलेल्या,   मॅचिंग पर्सेस, कपडे आणि पादत्राणे अशा टापटिपीत दिसत होत्या. त्या कदाचित  घरकाम करणाऱ्या, साध्या परिस्थितीतल्याच असाव्यात. पण नखरा मात्र जोरात होता. हा सगळा हॉलीवूडचा प्रभाव आहे, हे आमच्या लक्षात आले. त्या मानाने अमेरिकेतील इतर ठिकाणी तेवढा व्यवस्थितपणा आम्हाला जाणवला नाही.

वेस्टवूड ते पासाडेना या बस-प्रवासात बेव्हर्ली हिल्स आणि हॉलीवूड बूलेवार्ड हा भाग लागतो. त्यामुळे तो प्रवास अतिशय आल्हाददायक वाटतो. स्वच्छ, सुंदर रस्ते; रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरेख बंगले; आणि त्याभोवतालच्या सुशोभित केलेल्या बागा; हे सर्व डोळ्यांत साठवून घेतांना वेळ मजेत जातो. आमची बस 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम' जवळून जात असताना तिथे अहोरात्र जगभरातील टूरिस्टची झुंबड उडालेली दिसायची. उन्हाळ्यातले आल्हाददायक हवामान असल्यामुळेही भलतीच गर्दी होती. तिथे 'हॉलीवूड सूवेनियर्स' विकणारी बरीच दुकाने आहेत. तो सर्व भाग पूर्णपणे टूरिस्टना आकर्षित करण्यासाठी सजवलेला आहे. इथल्या सिनेमा थिएटर्सवर दिवसरात्र दिव्यांची रोषणाई केलेली असते. हॉलीवूडमधली सर्व आधुनिक फॅशन रस्त्यावर उतरलेली जाणवते. दुकानांची सजावट, रस्त्यांवरची रोषणाई आणि रेस्टॉरंट चा झगमगाट काही विचारूच नका. या रस्त्यांवर बस खूप थांबत-थांबत जाते आणि बरेच पुढे दूरच्या एका टेकडीवर आपल्याला  हॉलीवूड अशी अक्षरे लिहिलेली दिसतात. बसमधल्या इतर लोकाना त्याची नवलाई नव्हती, पण मला मात्र हॉलीवूड च्या भागातून जाण्याचे आणि हॉलीवूड हिलच्या प्रथमदर्शनाचे खूपच अप्रूप वाटत होते. शेवटी लेक-कॉलोराडोला उतरून आम्ही चालत कॅलटेक विद्यापीठाकडे निघालो.

१२०० ईस्ट कॅलिफोर्निया बुलेवार्ड, असा  सुटसुटीत पत्ता असलेले 'कॅलिफोर्निया इन्सटिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' अर्थात "कॅलटेक" हे खाजगी विद्यापीठ मूलभूत संशोधनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. उत्तरेला डेल्मार बुलेवार्ड, दक्षिणेला ईस्ट कॅलिफोर्निया बुलेवार्ड, पश्चिमेला साउथ  कॅटलिना अव्हेन्यू आणि पूर्वेला हिल अव्हेन्यू; यादरम्यान जेमतेम पाच-सहा ब्लॉक्स पसरलेला, सव्वाशे एकरचा नेटका कॅम्पस आहे. भारतातील अनेक विद्यापीठांच्या मानाने हे आकारमान मोठे वाटेल, परंतु, पण अमेरिकेतील बऱ्याच विद्यापिठांच्या तुलनेत कॅलटेक विद्यापीठ खूपच छोटे आहे. इथे कित्येक विद्यापीठे हजारो एकर जमिनीवर वसलेली असतात. अमेरिकेतील छोट्या विद्यापीठांमध्ये पाच हजारपेक्षा कमी, तर मध्यम आकारांच्या विद्यापीठांमध्ये पाच ते पंधरा हजार आणि मोठ्या विद्यापीठांमध्ये पंधरा हजारांच्यावर विद्यार्थी, एकावेळी शिकत असतांत. कॅलटेकमध्ये जेमतेम सव्वादोन हजार विद्यार्थीआहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने कॅलटेकच्या सोळापट आणि क्षेत्रफळाने चौपट असलेल्या, भव्य आणि शानदार UCLA चा तोरा नुकताच आम्ही  बघून आलेलो होतो. त्यामानाने कॅलटेक अगदीच छोटेखानी आणि साधे वाटले तरी शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या व स्थापत्यकलेचे एकाहून एक सुंदर नमुने असलेल्या इथल्या इमारतींमुळे, प्रथम दर्शनी त्यात एकप्रकारचा खानदानीपणा जाणवला. 

कॅलटेक सायन्स विषयात जगातील अव्वल दर्जाची शिक्षणसंस्था म्हणून नावाजले गेलेले विद्यापीठ आहे. या टिचक्या विद्यापीठात आजी व माजी प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी मिळून चौतीस नोबेल पारितोषिकांचे मानकरी आहेत! इथल्या प्राध्यापकांना गेली कित्येक वर्षे नासा, अमेरिका सरकारची संरक्षण, उर्जा व आरोग्य मंत्रालये, नॅशनल सायन्स फाउंडेशन अशा अनेक संस्थांकडून करोडो अमेरिकन डॉलर्स संशोधनासाठी दिले गेलेले आहेत. कॅलटेक विद्यापीठाचे सायन्स आणि इंजिनियरिंग या विषयांचे मिळून सहा शैक्षणिक विभाग आहेत आणि त्यामध्ये होणाऱ्या अत्युच्च प्रतीच्या संशोधनासाठी कॅलटेक जगभरात नावाजलेले आहे. कॅलटेकचा बॅचलर्स डिग्रीचा अभ्यासक्रम अतिशय अवघड समजला जातो. सायन्स आणि गणिताचे अनेक अवघड कोर्सेस घेतल्याशिवाय विद्यार्थ्याला डिग्री कोर्स पूर्णच करता येत नाही. त्यामुळे सायन्स आणि गणितात विशेष प्राविण्य असलेल्या मोजक्या विद्यार्थ्यांनाच इथे बॅचलर्स डिग्रीसाठी प्रवेश दिला जातो.

कॅलटेक विद्यापीठातल्या वातावरणातच सायन्स आहे आणि इथे शिकत असलेले बहुतेक विद्यार्थी छोटे  शास्त्रज्ञच आहेत असे वाटते. आमच्या पहिल्याच भेटीत तिथल्या वातावरणातील ती जादू आम्हाला जाणवली. दुसऱ्या दिवशीही कॅलटेक बघायला आम्ही परत गेलो. तसेच पुढे २०१२ साली विद्यापीठाच्या वसतिगृहातल्या अनिरुद्धच्या खोलीत ४ दिवस मुकाम केला आणि २०१४ साली अनिरुद्धच्या दीक्षांत समारंभासाठी गेलो. प्रत्येक भेटीमध्ये आम्हाला कॅलटेकचा जादूई करिष्मा जाणवल्याशिवाय राहिला नाही . 









रविवार, २१ जून, २०१५

चिनी-हिंदी बहन-भाई!

आमचा UCLA दर्शनाचा दौरा चालू होता.  आशयने मला, आनंदला आणि अनिरुद्धला थोडावेळ UCLA चा कॅम्पस  दाखवला. पण काही वेळानंतर त्याची एका फ्रेंच प्रोफेसरांबरोबर भेट ठरलेली असल्यामुळे त्याला जाणे भाग होते. त्याने त्याच्या मैत्रिणीला, शाओ जिंगला, आम्हाला विद्यापीठ दाखवण्यासाठी बोलावून घेतले. मग आम्हाला तिच्याकडे सुपूर्त करून तो आपल्या कामासाठी निघून गेला. हसतमुख आणि तुडतुड्या शाओ जिंगने आमचा ताबा घेतला. तिने मोठ्या आपुलकीने आम्हाला तिच्या युनिवर्सिटी बद्दल सर्व  माहिती द्यायला सुरुवात केली. शाओ जिंग ही मुलगी चीनमध्ये गणितातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून, आशय बरोबरच UCLA मध्ये गणितामध्ये PhD करत होती. आशयसारखेच तिलाही UCLAला  येऊन  जेमतेम वर्षभर झालेले होते. आम्हांला UCLA बद्दल माहिती सांगता-सांगता तिला वरचेवर चीनमधील आपल्यां गावाची आणि तिच्या कॉलेजची आठवण येत होती. त्यामुळे भारतातील आणि चीनमधील शिक्षण पद्धती, त्यातील साम्य व फरक यावर आमची आपोआपच खूप चर्चा झाली. गप्पां-गप्पांमधून  चिनी, भारतीय आणि अमेरिकन कॉलेज शिक्षण, उच्च शिक्षण व त्यामधले  बारकावेही आम्हाला उलगडत गेले .

अमेरिकेत छोटी कम्युनिटी कॉलेजेस किंवा चार वर्षांचा अभ्यासक्रम असलेली मोठी डिग्री कॉलेजेस अशी वेगवेगळ्या प्रकारची कॉलेजेस असतात. बारावीनंतर कम्युनिटी कॉलेजमधून दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना असोसिएट पदव्या घेता येतात. पण त्या पदवीला फारसा मान नसतो व त्यानंतर खूप प्रतिष्ठेच्या अथवा मोठ्या पगाराच्या नोकऱ्याही मिळत नाहीत. पण कम्युनिटी कॉलेजमधले शिक्षण हे चार वर्षांच्या डिग्री कॉलेजच्या मानाने स्वस्त व सोपे असते. त्यामुळे सर्वसाधारण परिस्थितीतील बरेच विद्यार्थी, एखादी नोकरी सांभाळून दोन वर्षांत असोसिएट डिग्री पूर्ण करतात. मग पुढे पैशाच्या आणि बुद्धीच्या कुवतीने जमलेच तर बॅचलर्स डिग्री पूर्ण करतात. अमेरिकेत चार वर्षांचा बॅचलर्स डिग्रीचा कोर्स असलेली अनेक विद्यापीठे आहेत. अमेरिकन नागरिकत्व नसलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोजक्याच, म्हणजे विद्यापीठातील एकूण जागांच्या फक्त आठ ते दहा टक्के जागांवरच प्रवेश दिला जातो. त्यामुळे बॅचलर्स डिग्रीसाठी प्रवेश मिळवायला जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस असते. बॅचलर्स डिग्रीचे शिक्षण अमेरिकन विद्यार्थ्यांनाही महाग वाटते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी तर ते जास्तच महाग असते  कारण त्यांना कुठलीही शिष्यवृत्ती मिळणे अतिशय कठीण असते. तसेच अभ्यासात विशेष चमकदार कामगिरी केल्याशिवाय फीमध्ये माफी मिळू शकत नाही आणि काम करून पैसे उभे करण्यावरही काही प्रमाणात निर्बंध असतात.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना, अमेरिकेत चार वर्षांचा बॅचलर्स डिग्रीचा कोर्स करण्यासाठी आज जवळजवळ  दीड कोटी रुपये खर्च येतो. कोवळ्या वयांतील मुला-मुलींना इतका खर्च करून अमेरिकेत पदवीपूर्व शिक्षणासाठी  पाठवायला बरेचसे पालक मनाने तयार नसतात. बऱ्याच पालकांना ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखेही  नसते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी आपापल्या देशांत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतात व नंतर दोन वर्षांच्या मास्टर्सच्या अभ्यासक्रमासाठी अमेरिकेत येतात. या अभ्यासक्रमासाठी एकूण वीस ते तीस लाख रुपये खर्च येतो. पण हे विद्यार्थी पदवीधर असल्यामुळे त्यांना काही छोट्या मोठ्या नोकऱ्या सहजी मिळू शकतात ज्यायोगे ते शिक्षणाचा खर्च बऱ्याच अंशी कमी करू शकतात. तसेच बावीस तेवीस वर्षे वयाच्या आणि थोडी वैचारिक परिपक्वता आलेल्या मुला-मुलींना अमेरिकेत शिक्षणाला पाठवताना त्यांचे पालकही फारसे बिचकत नाहीत. 
फक्त चार वर्षांचा बॅचलर्स डिग्रीचा कोर्स केलेल्या काही मोजक्या आणि विशेष हुशार विद्यार्थ्यांना मास्टर्स डिग्री नसली तरीही अमेरिकेत PhD साठी प्रवेश मिळतो हे विशेष. PhD करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाठ्यवृत्ती मिळते. त्यातून त्यांचा राहण्या-जेवण्याचा सर्व खर्च भागतो आणि पैसे वाचवून वर्षातून एखादेवेळी आपापल्या घरी जाण्यासाठीचा तिकीट खर्चही विद्यार्थी करू शकतात. आशय आणि शाओ जिंगने आपापल्या देशांमधून केवळ तीन वर्षांचा डिग्री कोर्स संपवून PhD ला प्रवेश मिळवला होता हे ऐकून आम्हाला अभिमान वाटला.

शाओ जिंगने आम्हाला ही सर्व माहिती दिली आणि मग ती आम्हाला UCLA  विद्यापीठाचा गणित विभाग दाखवायला घेऊन गेली. UCLA मधील गणित विभाग खूपच मोठा आहे. तिथे जवळ जवळ पन्नास ते साठ प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यातले अनेक प्राध्यापक नामवंत संशोधक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. आम्ही गेलो होतो तेंव्हा कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे बऱ्याचशा प्राध्यापकांची ऑफिसेस बंद होती. आम्ही आशयचे PhD चे मार्गदर्शक हारुझो हिडा या जपानी प्राध्यापकाच्या ऑफिसबाहेर जरा घुटमळलो. काही ऑफिसेस मधून थोडे आत डोकावूनही बघायचा प्रयत्न केला. प्रोफेसर चंद्रशेखर खरे या मराठी प्राध्यापकांचे  ऑफिस बघून आम्हाला अतिशय अभिमान वाटला. प्रोफेसर खरे यांनी गणितात किती महत्वाचे संशोधन केले आहे हे शाओ जिंगने आम्हाला सांगितले. आपल्या मराठी माणसाचे, एका चीनी मुलीकडून अमेरिकेत होणारे अमाप कौतुक आम्ही कान देऊन ऐकत होतो आणि मनोमन खुश होत होतो. एकेका प्राध्यापकांची ऑफिसेस बघत आम्ही पुढे निघालो होतो. तेव्हड्यात 'प्रोफेसर टेरेन्स टाओ ' यांच्या नावाची पाटी बघून आश्चर्य आणि आनंदाने अनिरुद्ध ओरडलाच. मग त्याने आणि शाओ जिंगने 'प्रोफेसोर टेरेन्स टाओ' यांच्या अचाट बुद्धिमत्तेबद्दल आम्हाला थोडीशी कल्पना दिली. टेरेन्स टाओ यांनी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सुवर्णपदक मिळवलेले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री पूर्ण करून एकविसाव्या वर्षी त्यांनी प्रिन्सटन विद्यापीठातून गणितामध्ये PhD पूर्ण केलेले आहे. गणितामधील अत्यंत मानाचे समजले जाणारे 'फिल्ड्स मेडल' देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहे. अनिरुद्ध अगदी भारावून गेला होता आणि 'प्रोफेसोर टेरेन्स टाओ' यांच्या नावाच्या पाटीसमोर उभे राहून स्वत:चे एक दोन फोटो काढून घेतल्यावरच त्याचा पाय तिथून निघाला.

शाओ जिंग मोठ्या उत्साहाने आम्हाला कॉलेजमध्ये हिंडवत होती. गणित विभागाचा फेरफटका झाल्यानंतर   तिने आम्हाला UCLA च्या स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्सची मोठी इमारत दाखवायला नेले. आपल्याकडच्या कित्येक कॉलेजेसच्या संपूर्ण इमारती त्या इमारतीपेक्षा छोट्या असतील! तिथल्या सुविधा तर पाहताच राहाव्या अशा  होत्या. एका मोठ्या हॉलमध्ये अनेक 'ट्रेड मिल्स'ची रांग  होती. त्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी व काही प्राध्यापक घाम गाळत होते. दुसऱ्या एका मोठ्या हॉलमध्ये  टेबल टेनिसची टेबल्स होती. त्या विद्यापीठात शिकत अथवा शिकवत नसल्यामुळे आम्हाला आत जाता येणार नाही असे शाओ जिंगने सांगितले. पण आतल्या इतर अनेक सोयींचे वर्णन तिने केले आणि आम्ही थक्क झालो. अमेरिकेतल्या कॉलेज शिक्षणामध्ये खेळालाही महत्व असते. प्रत्येक विद्यार्थ्याला चार वर्षांच्या अभ्यासक्रमात खेळांच्या किंवा व्यायामाच्या कुठल्यातरी प्रकारचे काही तास पूर्ण करावेच लागतात हे विशेष!

तास-दोन तासांत आमचे विद्यापीठ दर्शन होईपर्यंत आम्हाला अगदी प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली. एखाद्या मोठ्या बहिणीने आपल्या लहान भावाला प्रेमाच्या ओलाव्याने वागवावे तशी शाओ जिंग अनिरुद्धशी बोलत-वागत होती. अनिरुद्धला चार वर्षांच्या बॅचलर्स कोर्ससाठी कॅलटेक विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याचे तिला माहिती होते. आमचा निरोप घेताना तिने अनिरुद्धला एका बाजूला घेऊन सांगितले," या अमेरिकन्सच्या मानाने आपण आशियाई लोक खूपच गरीब आहोत. पण इथल्या मुलांपेक्षा आपणच जास्त हुशार असतो हे निश्चित लक्षात ठेव. अमेरिकन कॉलेजेस बाहेरच्या विद्यार्थ्यांकडून खूप पैसे उकळतात. त्यामुळे पुढच्या चार वर्षांमध्ये इथल्या सर्व सुखसोयींचा पुरेपूर फायदा उठवायचा बरं का! आपल्याकडून घेतलेल्या प्रत्येक डॉलरचीस पूर्ण वसुली करून घ्यायची. त्याचबरोबर तू शिक्षणासाठी आला आहेस हे विसरायचे नाही. अमेरिकेत मेरीटला खूप महत्त्व असते. त्यामुळे अभ्यासातही मागे पडायचे नाही." असे सांगून अनिरुद्धच्या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देऊन  शाओ जिंगने आमचा निरोप घेतला

पंडित नेहरूंनी कधी काळी "हिंदी-चिनी भाई-भाई" असा एक पोकळ नारा पुकारला होता. पण शाओ जिंगचे ते कळकळीचे बोलणे ऐकून मात्र मला "चिनी-हिंदी बहन-भाई!" असा नारा द्यावासा वाटला. आपल्या चिनी बहिणीचा कानमंत्र मनात साठवत, अनिरुद्ध आपल्या भावी विद्यापीठाच्या भेटीसाठी आणि तिथल्या यशस्वी वाटचालीसाठी सज्ज झाला.  

बुधवार, २० मे, २०१५

२०. ड्रीम कॉलेज

अमेरिका हा एक मोठा आणि अजब देश आहे. जगभरातील अनेक देशातील लोक इथे वास्तव्याला असल्यामुळे अनेक संस्कृतीची सरमिसळ होऊन या देशाची संस्कृती तयार झालेली आहे. अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांचे राहणीमान वेगळे आहे आणि तिथल्या चालीरीती विशिष्ट प्रकारच्या आहेत. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरची राज्ये आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्यांतील संस्कृती आणि हवामान यामध्ये खूपच फरक आहे. लॉस एंजेलीस हे अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरचे एक प्रमुख शहर खूप मोठे, पसरलेले आणि वेगवेगळ्या छोट्या-छोट्या वस्त्यांनी बनलेले आहे. लोकसंख्येचा विचार करता लॉस एंजेलीस हे न्यूयॉर्कच्या खालोखालचे अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

आमचा मित्र आशय जिथे शिकतो ते, म्हणजे UCLA हे विदयापीठ लॉस एंजेलीस शहराच्या वेस्ट वूड या भागात आहे. UCLA (युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलीस) कॅलिफोर्निया राज्यामधले सर्वात मोठे आणि सर्वात प्रसिद्ध विदयापीठ आहे. UC Berkeley च्या पाठोपाठ, म्हणजे १८१९ साली हे विदयापीठ सुरु झाले. UCLA मध्ये एकाचवेळी चाळीस हजारहून जास्त विद्यार्थी शिकतात. कॅलिफोर्निया राज्यात युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अशा नावाची एकूण दहा विदयापीठे आहेत. प्रत्येक विदयापीठाला युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि त्यापुढे त्या त्या गावाचे अथवा शहराचे नाव, असे संबोधले जाते. या सर्वच विदयापीठांच्या इमारती आणि परिसर एकापेक्षा एक सरस आहेत असे म्हणतात. त्यापैकी आत्तापर्यंत आम्ही फक्त UCLA  हे एकच विदयापीठ बघितलेले आहे. UCLA चा संपूर्ण परिसर अतिशय सुरेख आहे. या विदयापीठात वेगवेगळी कॉलेजेस आहेत व प्रत्येक कॉलेजची इमारत वैशिष्ट्यपूर्ण आहे. UCLA च्या जवळच लॉस एंजेलीस शहरातील अतिश्रीमंत लोकांची व फिल्म स्टार्सची वस्ती असलेला 'बेव्हर्ली हिल्स' हा भाग आहे. त्यामुळेच कॉलेजच्या आसपासचा परिसरही अतिशय सुंदर आहे.
 
अमेरिकेमधले आणि आपल्याकडचे कॉलेज शिक्षण यात बराच फरक आहे. केवळ बारावी झालेल्या मुलामुलींना भारतात सहजी आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत. तसेच, भारतीय कॉलेज शिक्षण अमेरिकेतल्या कॉलेज शिक्षणाच्या मानाने स्वस्त आणि सोपे असते. म्हणूनच, भारतात बरेचसे विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण घेऊ शकतात. शिवाय अनेक शिक्षण सम्राटांच्या कृपेने, बारावी पास झालेल्या सर्व मुला-मुलींना कुठल्या ना कुठल्या कॉलेजच्या कसल्यातरी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतोच! आपल्याकडे बऱ्याचशा   मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च पालकच करतात. 
अमेरिकेत मात्र बारावीपर्यंत शिक्षण फुकट असते. परंतु, कॉलेज शिक्षण फारच महाग असल्यामुळे मुले लहान असल्यापासूनच पालक त्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायला लागतात. मुलेही शिकता-शिकता कामे करून पैसे मिळवतात. मुलांनी बारावी पास होणे म्हणजेच 'हायस्कूल ग्रॅजुएट' होणे, ही अमेरिकेत फार मोठ्ठी गोष्ट समजली जाते. त्यानंतर त्यांना बऱ्या पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात. मुलांनी कॉलेज शिक्षणाचा बराचसा खर्च शक्यतो स्वकमाई मधूनच करावा असा अलिखित नियमही असतो. कॉलेज शिक्षण महागडे असल्यामुळे सर्व मुले सरसकट कॉलेजमध्ये प्रवेश घेतातच असेही नाही. बारावी झाल्या-झाल्या बरीच मुले पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात. इतकेच काय, आई-वडिलांपासून वेगळे राहून आपापले बिऱ्हाडही थाटतात. बरीचशी मुले दोन तीन वर्षे काम करून आपापल्या कॉलेजच्या शिक्षणासाठी पैसे साठवून मगच कॉलेजला प्रवेश घेतात. 
अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकणारी मुले सहसा पालकांसोबत घरी राहत नाहीत. कॉलेजच्या वसतीगृहांमधून किंवा इतरत्र भाड्याने खोल्या घेऊन राहतात. पदवी-अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मुलांना सातत्याने अभ्यास करणे आवश्यक असते. त्या काळांत विद्यार्थी आपापली कामे व अभ्यास सांभाळतात आणि प्रसंगी आपापला स्वैंपाकही बनवतात. त्याशिवाय त्यांना बाहेर काम करून पैसे मिळवून आई वडिलांचा आर्थिक भार कमी करायचा असतो. या ओढाताणीत काही मुलांना अभ्यासात सातत्य राखणे अवघड जाते. पण एखाद्या मुलाला  शिक्षणात गति नसेल,  किंवा तो मन लावून शिकत नसेल तर कुठलीही दयामाया न दाखवता त्याचे आई-वडील शिक्षणाचा खर्च द्यायला नकार देतात आणि क्वचित मुलांना कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. या व अशा इतर बऱ्याच कारणांमुळे, कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारण ६० ते ७० टक्के विद्यार्थीच कॉलेजचा अभ्यासक्रम  पूर्ण करू शकतात. 

सर्वसाधारणपणे मुले नववीत म्हणजे हायस्कूल मध्ये गेली की आई वडील कॉलेजेस बद्दल समग्र माहिती गोळा करायला सुरुवात करतात. आपल्या पाल्याला ज्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता असेल अशा सर्व कॉलेजांची फी, इतर खर्च, तिथले वातावरण, मिळणाऱ्या सवलती अशा बऱ्याच बाबींचा विचार पालक करतात. इतकेच नव्हे तर दहावी आणि अकरावी नंतर आई-वडील पाल्याला घेऊन अशा कॉलेजेसना प्रत्यक्षांत भेट देतात. प्रत्येक कॉलेज आपल्या खिशासाठी आणि पाल्याच्या प्रगतीसाठी योग्य आहे की नाही, याचा अगदी चिकित्सकपणे अंदाज घेतला जातो. स्वत:च्या कष्टाचा पैसा शिक्षणासाठी वापरणार असल्यामुळे मुलेही आपले भावी कॉलेज, अभ्यासक्रमाची निवड आणि एकंदरीत भावी कॉलेज आयुष्याबद्दल स्वतंत्र विचार करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सहकुटुंब कॉलेज-दर्शनाचे दौरे काढायची तिकडे पद्धत आहे. कॉलेज बघायला आलेल्या अशा कुटुंबाना कॉलेज दाखवण्यासाठी आणि कॉलेजच्या वतीने त्यांचे शंका निरसन करण्यासाठी, त्याच कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी 'कॅम्पस टूर गाईड'चे काम करतात. त्याबद्दल त्याना ताशी १० ते १५ डॉलर्स असे  पैसेही मिळतात. आम्ही प्रत्येकवेळी जून महिन्यात अमेरिकेत गेल्यामुळे अनेक कॉलेजमध्ये 'कॉलेज-दर्शनोच्छुक' कुटुंबांचे जथे आम्हाला पाहायला मिळाले. आम्हीही तशाच काही जथ्यांबरोबर एक दोन कॉलेजचे दर्शन घेतले.

अमेरिकेतील शाळेच्या वर्गातून मुला-मुलींची संख्या जेमतेम १५ ते २० इतकीच असते. घराच्या आसपासही फारशी मुले नसल्याने शालेय विद्यार्थी बरेच एकलकोंडे असतात. कॉलेजमध्ये समवयस्क तरुण-तरुणींबरोबर घरापासून दूर राहून शिकायचे आणि मजाही करायची याचे त्यांना मोठे आकर्षण असते. अनेक कॉलेजमधले वातावरण बघून, सर्वंकष विचार करून अमेरिकन मुले-मुली आपापले 'ड्रीम कॉलेज' ठरवतात. हॉलीवूड हा लॉस एंजेलीसचा एक भाग असल्यामुळे तरुणाईला या शहराबद्दल कमालीचे आकर्षण आहे. अशा या स्वप्न नगरीतील एक उत्तम कॉलेज असल्यामुळे अनेक अमेरिकन तरुण तरुणींचे UCLA हे 'ड्रीम कॉलेज' असते यात काहीच नवल नाही.

कॅलिफोर्नियातल्या उन्हाळ्यात हवा अतिशय आल्हाददायक असते. आमच्या पहिल्या अमेरिका वारीत पहिल्याच दिवशी आम्ही UCLA बघायला गेलो. मोठ्या मोठ्या व उत्तम निगराणी असलेल्या सुरेख बागा, डवरलेली फुलांची झाडे, उत्तमोत्तम टोलेजंग इमारती, दोन इमारतींमध्ये पसरलेली मोठमोठ्ठाली हिरवीगार लॉन्स व त्यावर किलबिलाट करत उत्साहाने हिंडणारी तरुणाई बघून आमचे मन अगदी प्रसन्न झाले. त्या लॉन्सवर बऱ्याच ठिकाणी अनेक कमनीय बांध्याच्या गौरांगना अगदीच तुटपुंज्या कपड्यात सूर्यस्नान घेत पहुडलेल्या होत्या. UCLA मधल्या स्वप्नवत वातावरणातल्या या रंभा-मेनका बघितल्यानंतर मला प्रश्नच पडला की कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांचे अभ्यासात लक्ष कसे लागत असेल? अमेरिकेतल्या पहिल्याच दिवशी तिथल्या कॉलेज जीवनाची अगदी 'उघडी' ओळख आम्हाला झाली. पण  इथल्या सर्वच कॉलेजमध्ये असे मोकळे वातावरण असते हे सत्य आम्हाला नंतर उघड झाले . 

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५

१९. तपोभंग

माझ्या आतापर्यंतच्या प्रवास वर्णनात आमच्या मुलीचा, असिलताचा मित्र आशय याचा उल्लेख वरचेवर आलेला आहे. आशय आता फक्त तिचाच मित्र नसून आमचाही मित्र आहे. आशयबरोबर माझी आणि आनंदची अगदी वेगळ्या पातळीवरची मैत्री आहे.

आशय हा मूळचा साताऱ्याचा  मुलगा. अगदी मितभाषी, नाकासमोर बघून चालणारा, थोडासा लाजाळू असा. असिलताची आणि त्याची मैत्री २००५ व २००६ या दोन वर्षीच्या गणित Olympiad शिबिरामधली. उच्च गणिताची आवड, हा एकच त्या दोघांच्या मैत्रीतला समान पण कमालीचा घट्ट दुवा. त्यांचे स्वभाव आणि बाकी सगळेच तसे अगदी वेगवेगळे. २००६ साली बारावी झाल्यानंतर आशय बंगळूरच्या Indian Statistical Institute मध्ये आणि असिलता बॉस्टनमधल्या MIT या संस्थेमध्ये गणितात पदवी घ्यायला गेले. असिलताला काव्य, साहित्य, संगीत, नाटक, खेळ, भाषा, पाककला अशा अनेक गोष्टीची आवड, तर आशयला मुख्यत्वेकरून उच्च गणित आणि सिनेमा, या दोनच विषयांमध्ये रुची. गंमत म्हणजे फक्त हे दोन विषय चालू असतील तेंव्हाच आपल्याला कळते की आशयसुद्धा खूप बोलू शकतो. इतरवेळी, हा शांतपणे  इतरांचे बोलणे ऐकण्याचे काम करत असतो. आशय उच्च गणिताचा अतिशय प्रतिभावंत विद्यार्थी आहे. तो गणिताचा अभ्यास करत असला की एखादे ऋषीमुनी ध्यानधारणेला बसले आहेत असेच  वाटते. मग जवळपास कुणीही असले, कितीही आवाज करत असले किंवा काहीही चालले असले तरी त्याचे चित्त विचलित होत नाही. अशा ध्यानमुद्रेमध्ये असताना त्याला तहान-भुकेचाही विसर पडतो. त्यामुळेच आमच्या पहिल्या आणि तिसऱ्या अमेरिका वारीत आम्ही आशयच्या घरी उतरणार आहोत हे कळल्यावर, त्याच्या आईला खूप आनंद झालेला होता. दूरवर असलेल्या आपल्या मुलाच्या खाण्यापिण्याची काळजी निदान काही दिवस तरी घेतली जाणार हा विचार कुठल्याही आईला आनंदी करतोच.

असिलता जरी भारताबाहेर असली तरी आशय पुण्याला आमच्या घरी येत राहिला आणि आमचा मित्र होऊन गेला. आम्हाला उच्च गणितात अजिबात गति नाही, पण सिनेमाचे मात्र आम्ही दोघेही शौकीन आहोत. आशय तर सर्व प्रकारच्या सिनेमाचा विशेष दर्दी आहे. जगभरातील अनेक भाषांमधील, अनेक देशातील, प्रसिद्ध दिग्दर्शकांचे उत्तमोत्तम असे हजारो सिनेमे त्याच्या संग्रही आहेत. कितीतरी चांगल्या सिनेमांच्या DVD आणि डाउनलोड केलेले, एक मोठ्ठी हार्ड डिस्कभरून सिनेमे असा त्याचा बहुमोल खजिना आहे. त्याची गंमत म्हणजे, गणिताचा अभ्यास सांभाळून तो रोज एक नवीन सिनेमा आपल्या laptopवर  बघतोच. आम्ही बरेचसे चांगले  मराठी, हिंदी आणि निवडक  इंग्रजी सिनेमे बघितलेले असतात. त्यामुळे सिनेमा या विषयावर आमच्या आणि त्याच्या बऱ्याच गप्पा होऊ शकतात. मी आजही एखादा चांगला सिनेमा बघितला की  त्याला त्याबद्दल ईमेल वरून कळवते. एकूणच, कसे  कुणास ठाऊक, आमचे आणि आशयचे सूर पहिल्यापासूनच जुळले आणि सिनेमा या विषयाव्यतिरिक्तही तो आमच्याशी बोलू लागला. २००९ साली आशयला UCLA सारख्या प्रसिद्ध युनिवर्सिटीमध्ये PhD ला प्रवेश मिळाल्यावर तो खुश झाला होता. पण हॉलिवूडच्या अगदी जवळच UCLA असल्यामुळेही तो विशेष आनंदी होता की  काय असे मला त्यावेळी वाटले होते.

२०१० साली आमच्या अमेरिकेच्या पहिल्या वारीत आशयच्या लॉस एंजेलिसच्या घरी आलो त्या वेळची गोष्ट. आम्ही रात्री विमानतळावरून त्याच्यासोबत flyaway बसने घरी निघालो. विमानप्रवासात झोप फारशी झालेली नव्हती आणि खाणे पोटभरीचे असले तरी आपल्या चवीचे नसल्यामुळे समाधान झालेले नव्हते. आता घरी जावे आणि अगदी गरमागरम वरण-भात खावे असे वाटत होते. आमच्याकडे डाळ-तांदूळ होते आणि आशयकडे कुकर असल्याचे माहिती होते. मी आशयला म्हणाले, "मी आता घरी जाऊन भात-वरण करते मग आपण जेऊ या"
आशय म्हणाला,"घरी स्वैंपाक तयार आहे. माझी एक मैत्रीण आहे तिने सगळे बनवून तयार ठेवलेले आहे. घरी पोहोचलो की आपण लगेच जेवण करून घेऊन झोपूया. मग उद्या आरामात उठून माझे कॉलेज बघायला जाऊ या"
घरी जेवण तयार आहे हे ऐकल्यावर मी मनोमन सुखावले. परंतु, आमच्यासाठी जेवण बनवून तयार ठेवणारी ही आशयची मैत्रीण कोण असेल, असा प्रश्न मनात आलाच!

"इथे आल्या-आल्या कोणी जवळची मैत्रीण झाली आहे वाटते?" हसत-हसत मी आशयला प्रश्न विचारला . माझ्या प्रश्नातील गर्भित आशय समजल्यामुळे तो कमालीचा लाजला आणि गडबडीने सफाई देत म्हणाला, "तुम्हाला वाटतेय तसे काही नाही आहे हो काकू. शाओ जिंग  नावाची माझी ही मैत्रीण चीनमधल्या एका अगदी लहानश्या बेटावरच्या छोट्या कॉलेजमधून UCLA सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये PhD करण्यासाठी आलेली आहे. तिच्या त्या छोट्या कॉलेजमध्ये उच्च गणितातले फारसे topics तिला शिकायला मिळालेले नाहीत. केवळ त्यामुळे सध्या सुरुवातीला तिला आमचा अभ्यासक्रम जरासा अवघड पडतो आहे. म्हणून मग मी तिला बरेचदा गणित शिकवतो. त्या बदल्यात ती मला टेबल-टेनिस शिकवते. ती तो खेळ उत्तम खेळते. अशी माझी आणि तिची मैत्री आहे. मला काही स्वैंपाक येत नाही. तुम्ही येणार म्हणून तिने आमच्या मैत्रीखातर तुमच्यासाठी स्वत:हून स्वैंपाक केला आहे."
आम्ही आशयच्या घरी सामान ठेऊन शाओ जिंग च्या घरी गेलो. शाओ जिंगने मोठ्या हौसेने सगळी जय्यत तयारी केली होती आणि आम्ही लगेच जेवायला बसलो. पण गरमा-गरम भात वरणा ऐवजी आम्हाला भाताचाच एक दुसरा प्रकार म्हणजे थंडगार सुशी खायला मिळाली. आशय शाकाहारी असल्यामुळे शाओ जिंगने त्याच्यासाठी शाकाहारी सुशी केली होती. शाओ जिंगने इतक्या खुशीने खिलवलेली सुशी मी खाल्ली खरी, पण सुशीतला कच्चा मासा खायची कल्पना माझ्या गळी उतरायला जरा जडच पडली. जेवणे उरकली आणि आम्ही लगेच पुढच्या तीन दिवसांत काय-काय करायचे याचे नियोजन करून ठेवले. पहिला दिवस आम्ही UCLA बघणे आणि वेस्ट वूड भागात हिंडणे यासाठी ठेवला होता .

सर्वप्रथम वेबर्न टेरेस मधल्या त्याच्या घरापासून आशय आम्हाला UCLA आणि आसपासचा वेस्ट वूड भाग  दाखवायला घेऊन गेला. आम्ही चालत-चालत UCLA कडे  निघालो होतो. वाटेतच सुप्रसिद्ध Fox थिएटर लागले. आशयचा आवडीचा विषय आल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने आम्हाला सर्व माहिती सांगू लागला. Fox   थिएटरमध्ये कित्येक प्रसिद्ध सिनेमांचे पहिले शो - म्हणजे 'प्रिमिअर' - होतात. त्यामुळे  हे या भागातले मोठ्ठे आकर्षण आहे. आसपास आमच्यासारख्या पर्यटकांची गर्दी होतीच. अनेक तरुण-तरुणीही होते. हॉलीवूडमध्ये काही काम मिळावे असे स्वप्न डोळ्यात घेऊन हे तरुण लोक  इथे येतात, असे आशयने आम्हाला सांगितले. आसपास एकापेक्षा एक सुंदर अशा तरुणी दिसत होत्या. नंतर आम्हाला  UCLA कॉलेजमध्येही अतिशय कमनीय बांध्याच्या बऱ्याच सुंदर विद्यार्थिनी दिसल्या. आम्ही त्यांच्याकडे बघतोय हे लक्षांत आल्यावर, मान खाली करून त्याच्या खास शैलीमध्ये अगदी दबक्या आवाजात आशय म्हणाला," आमच्या कॉलेजमधल्या बऱ्याचशा मुली इतक्या सुंदर आहेत की त्या सहज हॉलीवूड सिनेमांच्या नायिका होऊ शकतात". आशयकडून मुलींबद्दल असे हे भाष्य अगदीच अनपेक्षित होते आणि त्यावरून आम्ही त्याची बरीच चेष्टाही केली.

२०१० मध्ये मी पहिल्यांदाच भारताबाहेर पाउल ठेवले  होते आणि ते सुद्धा अगदी स्वर्गवत वाटाव्या अशा लॉस एंजेलिस शहराच्या वेस्ट वूड या भागांत. तिथे पहिल्याच दिवशी पाहिलेल्या सर्व गौरांगना म्हणजे मला स्वर्गातल्या रंभा आणि उर्वशीच वाटल्या.

२०१४  मध्ये आमच्या तिसऱ्या वारीमध्ये आम्ही पुन्हा वेस्टवूड भागातच राहिल्यामुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. चार वर्षांत आशयचे राहणे, वागणे, बोलणे यामध्ये मला काडीचाही फरक दिसला नाही. तो होता तसाच मितभाषी, एकाग्रचित्त, अभ्यासू वृत्तीचा राहिलेला आहे, आणि आता जून २०१५ मध्ये उच्च गणितातील PhD पूर्ण करणार आहे.  त्याच्या  चार वर्षांच्या वास्तव्यामध्ये, या स्वर्गातली कुठलीही अप्सरा, त्याच्या गणिताच्या ध्यानधारणेमध्ये वितुष्ट आणून त्याचा तपोभंग करू शकली नाही हे विशेष!

शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

१८. वाह ताज

माझे चहा प्रेम तुम्हाला आत्तापर्यंत निश्चितच लक्षांत आलं  असेल. ते प्रेम आहे असं मी म्हणत असले तरी आनंदच्या मते ते केवळ प्रेम नसून त्याचे  केंव्हाच व्यसनात रुपांतर झाले आहे. कुणीही कुठल्याही वेळी, " चहा घेणार का ?" हा प्रश्न विचारला की मला नाही म्हणणे अशक्य होते. सकाळी उठल्याबरोबर आणि दुपारी एका ठराविक वेळी कपभर चहा मिळाल्याखेरीज मला चैनच पडत नाही. इतकेच काय मला चहाच्या जाहिराती बघायलाही मनापासून आवडते.उस्ताद झाकीर हुसेनच्या तबल्याच्या थापेवर रंगलेली 'वाह ताज' ची जाहिरात मला फार आवडायची. हल्ली येणारी रेड लेबल चहाची "कुछ घरोंकी चाय में अपनेपन का स्वाद होता है" ही जाहिरातही मनाला फारच भावते. काही घरांच्या चहामध्ये खरोखरीच आपलेपणा अनुभवायला मिळतो. अशा घरी चहा प्यायलाही मजा येते. 'एक कप चहा' या तीन शब्दांना, आपल्या संस्कृतीत किती अनन्यसाधारण महत्व आहे, हे आपल्याला सगळ्यांना चांगलेच  माहिती आहे.  'साधा एक कप चहा सुद्धा दिला नाही' या वाक्यातला फणकारा किंवा 'साहेब, जरा एक कप चहाचं बघा ना' या वाक्यामधली अजीजी कुणी अनुभवली नसेल असे मला वाटत नाही. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांचा फक्कड जमलेला 'एक कप च्या' हा सिनेमा बघितल्यानंतर, चहा हेच आपल्या देशाचे राष्ट्रीय पेय म्हणून घोषित केले पाहिजे, असे मला मनापासून वाटले होते.

या चहापुराणाचा 'चहाटळपणा' कधी संपणार असे तुम्हाला वाटले असेल. पण गरमागरम चहाच्या कपाबरोबर गप्पा थोड्या लांबणारच. अमेरिकेच्या प्रवासांत मनासारखा एक कप चहा मिळण्यात किती अडचणी येऊ शकतात हे मी सांगत होते. पहिल्या अमेरिका वारीमध्ये डिप-डिप चहा वर कसेबसे दिवस काढत होते. त्याच वारीमध्ये बॉस्टनला असताना एक दिवस आमच्या भाचीने प्रिया वैद्यने तिच्या घरी बोलावले होते. एकूण तीन आठवड्याच्या आमच्या अमेरिका दौऱ्यामध्ये तिच्या घरी एक दिवस मला घरचा चांगला चहा मिळाला. दुसऱ्या वारीमध्ये चहाचे 'मिच्चर' सोबत असल्यामुळे निदान सकाळच्या चहाची उत्तम सोय होत होती. बाहेर पडल्यावर मात्र कॉफीला पर्याय नसायचा. तिसऱ्या वारीत आशयच्या घरी पोहोचून, थोडी विश्रांती घेऊन, चहा पिऊन ताजे तवाने झालो. मग मेगा मार्टमधून फळे, भाजी दूध अशा सगळ्या वस्तू घेऊन आलो आणि जेवून झोपलो. आशयच्या अपार्टमेंन्टमध्ये स्वैंपाकघरात, बाहेरच्या  खोलीत आणि  बाथरूममध्येही जुन्या पद्धतीचे हीटिंग रॉड होते. जूनचा महिना होता आणि लॉस एंजेलिस मधली हवा अगदी थंड आणि कोरडी होती. रात्री हीटर लावून झोपलो तरीही रजईच्या आत हुडहुडी भरायला लागली. स्वैंपाकघरातली एक मोठी जाळीची खिडकी उघडी होती आणि त्यातून अतिशय थंड बोचरे वारे यायला लागले. रात्री जरा जास्तच थंडी वाजायला लागल्यावर आनंदने स्वैंपाकघरात जाउन खिडकीचे काचेचे तावदान बंद करण्याऐवजी स्वैंपाकघर आणि बाहेरची खोली यामधले दारच बंद करून घेतले. त्यानंतर खोली चांगली उबदार झाली आणि आम्ही गुडूप झोपून गेलो.

मी झोपून उठले तेंव्हां चागलेच फटफटलेले होते. मला वाटले सकाळचे आठ वाजून गेले असणार. पण जून महिन्यात कॅलिफोर्नियामध्ये लवकर उजाडत असल्यामुळे घड्याळात जेमतेम सहाच वाजले होते.माझ्यां नेहमीच्या सवयीप्रमाणे चहाचे आधण ठेवण्यासाठी स्वैंपाकघराचे दार उघडायला गेले तर काय ते दार आतून बंद! आनंद मस्त गाढ झोपलेला होता. बाहेरच्या खोलीतून त्याने दार ओढून बंद केले होते पण ते आतून बंद कसे झाले हे मला कळेना. आत कोणीतरी असेल की काय या विचाराने, क्षणभर मी चांगलीच घाबरून गेले. पण जरा  डोके शांत ठेवून विचार केल्यावर दुसरी एक शक्यता मनात डोकावली. स्वैंपाकघराच्या दरवाज्याचा लॅच आतून चुकून आमच्याकडून उलट्या बाजूला फिरला असणार. अमेरिकेमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात त्याच्या उलट असतात. म्हणजे दिव्यांचे स्विच, दरवाज्याचे लॅच, रस्त्यावरची वाहतूक, सगळेच उलटे. बाहेरून दरवाजा ओढून घेतल्यावर तो आतून लॉक झाला असणार. आता स्वैंपाकघराचे दार बंद म्हणजे मला लगेच चहा मिळणार नाही, या कल्पनेने मी कासावीस झाले. बरं, ते उघडायचे कसे हा प्रश्न तर होताच. मी तातडीने आनंदला उठवून त्याच्या निद्रानंदात बिब्बा घातला! दार आतून बंद असल्यामुळे मला चहा करता येत नाही आहे हे सांगितल्यावर माझ्या समस्येचे गंभीर स्वरूप त्याला लगेच कळले.

आता कसेतरी करून ते दार उघडणे आवश्यक होते. बाहेरच्या खोलीत होत्या नव्हत्या त्या सगळ्या किल्ल्या लावून पाहिल्या. अगदी सेफ्टी पिन, हेयर पिन, कात्री वापरुनही खटपट केली. पण काही उपयोग झाला नाही. इतक्यात अचानक मला काहीतरी आठवले. आदल्या दिवशी स्वैंपाकघराची साफ-सफाई करताना मी खिडकीचे काचेचे तावदान उघडले होते आणि जाळीच्या तावदानाची खिट्टी नीटशी बंद झालेली नव्हती. त्यामुळे, जाळी बाहेरून उघडणे आणि खिडकीतून स्वैंपाकघरामध्ये शिरून आतून दार  उघडणे शक्य झाले असते. आनंदला मी हे सांगताच त्याला चार-पाच वर्षांपूर्वीची एक घटना आठवली. हार्वर्ड विद्यापीठातील हेन्री गेट्स नावाच्या एका  कृष्णवर्णीय प्रोफेसरना एकदा त्यांच्या घराचे कुलूप उघडायला त्रास झाल्यामुळे, ते आणि त्यांचा मोरोक्कन ड्रायव्हर मिळून दार ढकलत होते. कुणा 'जागरूक आणि तत्पर' शेजाऱ्याने लगेच  पोलिसांना फोन करून कळवले की दोन अनोळखी कृष्णवर्णीय माणसे शेजारच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसूण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रोफेसरसाहेबांना स्वत:च्याच घरात शिरण्याच्या प्रयत्न करीत असतांना अटकेला सामोरे जावे लागले होते! परंतु, ते  प्रोफेसर अमेरिकन नागरिक होते, प्रतिष्ठित होते आणि मुख्य म्हणजे स्वत:च्याच घरात शिरत होते. आमची मात्र सगळीच पंचाईत होती. आम्ही अमेरिकेचे नागरिक नाही, ते घर आमचे नाही, घर ज्याने भाडेकराराने घेतले आहे ती व्यक्ती म्हणजे आशय लॉस एंजेलिसमध्ये नाही आणि घरमालक कोण आहे याचा आम्हाला पत्ता नाही! अशा अडचणीच्या परिस्थितीत असताना  कुणी बघेल की काय, अटक झाली तर काय अशी धाकधुक मनात सुरु झाली. पूर्वी मी 'स्मगल' केलेला माल पकडला गेला असता तर, "माझा आणि हिचा काही संबध नाही' असे म्हणून मी सुटका करून घेईन" असे आनंद म्हणाला होता.  ते आठवून मी आनंदला लगेच सांगून टाकले, "तू खिडकीतून आत शिरत असताना पकडला गेलास तर 'माझा आणि याचा काहीही संबध नाही' असेच मी सांगणार!"

आनंद पुढच्या दारातून बाहेर पडून स्वैंपाकघराच्या मागच्या बाजूला गेला. महत्प्रयासाने भिंतीवर चढून, खिडकीचे जाळीचे तावदान उघडून आत शिरला, आमचे नशीब म्हणून त्याला कोणी बघितले नाही. सुट्टीच्या सुरुवातीलाच, इतका द्राविडी प्राणायाम केल्यानंतर, बायकोला अजून खूष करण्यासाठी माझ्यासाठी मस्त एक कप गरम चहा पण आनंदने बनवून आणला. शहाजहानने मुमताजच्या प्रेमासाठी ताजमहाल बांधला असेलही. पण आनंदने प्रेमाने आणलेला तो चहाचा कप बघितल्यावर माझे डोळे ओलावले आणि पटकन माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले."वाह ताज"! 

गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

१७. चाय गरम

अमेरिकेतल्या कित्येक मोठ्या मोठ्या गोष्टी चांगल्या वाटल्या, तरी अगदी छोट्या गोष्टी खुपतात.
 
मला सकाळी उठल्याबरोबर गरम  चहा लागतो. दात न घासता बेड-टी घेणे माझ्या स्वच्छतेच्या कल्पनेत बसत नाही पण उठल्या उठल्या मी आधी चहाचे आधण ठेऊन नंतर दात घासायला लागते. खदखदत्या आधणात चहापत्ती घालून आणि थोडेसेच उकळून चहा झाकून ठेवायचा. चहा मुरला की गाळून, त्यात अगदी उकळते दूध घालून, गरम चहा प्यायचा, ही माझी रोजची पद्धत. चहा ताजा बनवलेला आणि गरमचअसायला हवा. केंव्हातरी करून ठेवलेला चहा पुन्हा-पुन्हा उकळून पिण्यामध्ये कितीही सोय असली तरी माझ्या मनाला आणि जिभेला ते पटत नाही. अमेरिकेच्या पहिल्या प्रवासांत सगळ्यात जास्त खुपलेली गोष्ट म्हणजे वाफाळता चहाचा कप न मिळणे, ही होती. आधीच विमानप्रवासांत दीड दिवस बेकार चहा पिऊन मी वैतागलेले होते. विमानातल्या जेमतेम कोमट आणि मवाळ चहामध्ये, क्रीमर नामक दुधाची भुकटी घातली, की तो अजूनच थंड होतो. राजधानी आणि शताब्दी सारख्या महागड्या ट्रेनच्या प्रवासांतसुद्धा तसलाच बेकार, बेचव चहा देतात. निदान रेल्वेच्या प्रवासात, पहाटे एखाद्या स्टेशनवर पटकन उतरून ताजा बनत असलेला चहा पिण्याचे थ्रिल तरी अनुभवायला मिळते. विमानप्रवासात असे काही करणेही अशक्य! कुठल्यातरी स्टेशनवर, स्टोव्हवरच्या पातेल्यातल्या उकळता वाफाळणारा चहा, त्याचा दरवळणारा सुगंध, गुलाबी थंडी आणि सिग्नलकडे बघत बघत, मनातली धडधड काबूत ठेवत प्यायलेला, तो गरमा -गरम चहा… त्या वातावरणाच्या आठवणीनेही माझ्या मनांत उकळ्या फुटतात. सांगायचा मुद्दा म्हणजे मी अगदी चहांबाज आहे.  


अमेरिकेत बाहेर कुठेच मनासारखा चहा मिळणार नाही हे, पहिल्याच वारीत लक्षांत आले. त्या प्रवासांत डिप-डिप चहाच्या बॅग्स बरोबर होत्या. घरी त्या चहावर कसेबसे दिवस काढले. खरंतर, डिप-डिप चहात पण तसा काही दम नसतो. एकतर त्या बुडवलेल्या चहाच्या पुडीचा लिडबिडाट होतो आणि तरीही चहाचा अर्क काही नीट उतरत नाही. चहा कडक व्हावा म्हणून पुडी जास्त वेळ बुडवून ठेवली, की चहा निश्चित थंड होतो. बरं, कितीही महागातल्या टी बॅग्स आणल्या तरीही, मेंदूला किक येईल असा चहा तयार होत नसल्यामुळे, चहा प्यायल्याचे समाधानच मिळत नाही. हल्लीच्या ग्रीन टी, यलो टी , लेमन  टी, आईस टी, मिंट टी, हर्बल टी  असल्या प्रकारांत तर मला अजिबात रस नाही. नुसतेच स्टाईलसाठी बनवलेले प्रकार वाटतात. घरच्या  फक्कड चहाच्या खालोखाल मला इराण्याकडचा गोड, कडक चहा आणि रस्त्यावर मिळणारा 'अमृततुल्य' चहा आवडतो. टपरीवर चहा बनवणारे लोक, मला कुठल्याही महान कलाकारापेक्षा कमी वाटत नाहीत. त्यांची चहा बनवताना होणारी लयबद्ध हालचाल मला अगदी मंत्रमुग्ध करून टाकते. वर्षानुवर्षे आपल्या हातच्या चहाची विशेष चव जपत, ते नेहमीच्या गिऱ्हाईकांना अक्षरश: नादी लावतात. सरकारी कार्यालये किंवा कॉलेजच्या आसपासच्या टपऱ्यांवर वर फक्त गरजू लोकांची गर्दी असते असे माझे मत आहे. मात्र एखाद्या आडबाजूच्या चहाच्या टपरीपाशी विशेष गर्दी दिसली, की तिथे उत्तम चहाचे दर्दीच असणार हे लक्षात घ्यायचे. अशा ठिकाणी उभे राहून चहा घ्यावा असे खूपवेळा वाटते. परंतु, माझे 'बाईपण' आणि डॉक्टरी व्यवसाय, हे दोन्हीही या इच्छेच्या आड येते. जिथे फारसे कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी मात्र गाडीवरचा चहा प्यायची तल्लफ मी निश्चित भागवून घेते. 

आम्ही लहानपणी भातुकली खेळताना ज्या आकाराचे कप वापरायचो, त्या कपांपेक्षा लहान कपांमधून आजकाल चहा विकतात. जेमतेम चव लागेस्तोवर, एक-दोन  घोटातच तो संपूनही  जातो. त्यामुळे एका वेळी दोन चहा घेतल्याशिवाय माझे समाधान होत नाही. हल्ली ज्या पिचपिच्या कपांमधून चहा देतात, ते तर मला मुळीच आवडत नाही. चहा आता सांडून कपडे खराब होणार की काय, अशा धास्तावलेल्या अवस्थेत चहा प्यायला मजा येत नाही. चहा कसा मोठ्या आणि चागल्या धडधाकट कपातच पाहिजे. कित्येकवेळा असे वाटते की आपण आपापला चहाचा कप बरोबर ठेऊन हिंडावे! 'ताकाला जाताना भांडे लपवू नये' म्हणतात तसे 'चहाला जाताना कप लपवू नये' अशी म्हणही तयार करता येईल, पुढेमागे!  हल्ली व्हॉट्स ऍप च्या अनेक ग्रुप्स वर येणारी चहाच्या कपांची थंड आणि 'निर्जीव' चित्रे बघून होणारी माझी चिडचिड,  एखादा गरम चहाचा कप पिऊन मी शांत करते.


लहानपणी माझ्या माहेरी, सोलापूरसारख्या संथ गतीच्या शहरांत, 'टी-कोझी'च्या खाली ठेवलेला मोठ्या किटलीमधला गरम चहा,  निवांतपणे गप्पा मारत प्यायला मजा यायची. आज मात्र स्मार्टफोन, इंटरनेट आणि कम्प्यूटर मुळे  माझेच आयुष्य इतके गतिमान झाले आहे की, माहेरी गेले आणि तिथे सर्वजण पूर्वीच्याच संथ गतीत चहा पीत असले तरीही त्या चहाचा पूर्वीसारखा आस्वाद मला घेता येत नाही. माहेरच्याच उत्तम चहाची, अजून एक अविस्मरणीय आठवण म्हणजे माझ्या आजीच्या हातचा चहा.  ती नेहमी खास एकाच चवीचा, उत्कृष्ट चहा बनवायची. मला तिच्या हातचा चहा हवा असला की मी तिला विचारायचे, "तुझ्या हातचा चहा,  हमखास  इतका मस्त कसा होतो गं?" ती मग थोडेसे हसून, लाजून त्यामागचे कारण सांगायची. माझे आजोबा उत्तम चहाचे चाहते होते. त्यांना एका विशिष्ट चवीचा चहा, त्यांच्या आवडीच्या एका मोठ्या कपातून प्यायला आवडायचा. आजीने केलेला चहा त्यांच्या पसंतीला उतरला नाही तर  काहीही न बोलता ते फक्त कप बाजूला सारायचे आणि तो चहा प्यायचे नाहीत. मग आजीला आजोबांच्या पसंतीच्या चवीचा चहा होईपर्यंत, परत-परत चहा करायला लागायचा म्हणे. आजोबांच्या गोड आठवणी तिच्या मनांत ताज्या होत असल्यामुळेच तिने चहा करून द्यावा यासाठी मी लावलेली लाडी-गोडी तिला आवडत असावी. आजीला वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षीच वैधव्य आले होते. पण, आजोबांच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आजीच्या हातचा चहा प्यायचे सुख मी तिच्या वयाच्या नव्वदीपर्यंत अनुभवले. शेवटची काही वर्षे ती अल्झाइमरने आजारी असली तरी चहा मात्र न चुकता अगदी त्याच विशिष्ट चवीचा करायची, हे विशेष. ती स्वत: आयुष्यात कधीही चहा प्यायली नाही, पण शेवटपर्यंत ती आजोबांच्या चहाच्या कपात कॉफी प्यायची! त्यावरून आणखी एक आठवण आली! सोलापूरच्या दिवंगत डॉक्टर वैशंपायनांच्या पत्नी माझ्या आजीकडे यायच्या.  डॉक्टर वैशंपायन स्वतः किटलीमध्ये चहाची पत्ती घालून, त्यावर गरम पाणी ओतून, म्हणजे ब्रिटिश पद्धतीने चहा 'ब्रू' करून प्यायचे.  वैशंपायनकाकू फ़ुलपात्रात चहा घेत असत. पण डॉक्टर वैशंपायनांची आठवण म्हणून त्या फुलपात्रात दिलेल्या चहात वरून गरम पाणी घालून प्यायच्या! चहाबरोबरच्या आठवणींमध्ये या दोघींचे पातिव्रत्य आठवल्यावाचून राहिले नाही. 

अमेरिकन्सना मात्र, चहापेक्षा कॉफीचे कौतुक फार. मोठ्या शहरांमधून कोपऱ्या-कोपऱ्यावर कॉफीची दुकाने असतात. आता आपल्याकडेही स्टार बक्स, कॅफे कॉफी डे  वगैरे दुकाने आली आहेत. पण तिथल्या कॉफी पेक्षा मला उडप्याच्या हॉटेलातली "कापी"जास्त आवडते. एक्स्प्रेसो, कॅफे लाटे अशी 'इम्पोर्टेड' नावे आणि महागड्या असल्यामुळे या कॉफ्यांचे  उगीचच कौतुक होते असे मला वाटते. उद्या आपल्याकडचा  इलायची चहा, मसाला चहा, आल्याचा चहा किंवा 'मारामारी' आपण कार्डमम-लेस्ड टी, मलाबार स्पाईस्ड टी, जिंजर मॅजिक टी, किवा टी-कॉफी ब्लेंड, अशा फॅन्सी नावाने आणि कपाला दीड-दोनशे रुपये लावून विकायला लागलो तर त्याचेही देशोदेशी असेच कौतुक होईल!

अमेरिकेत कॉफी देतात ती मात्र चांगली मोठा कप भरून. आमच्या पहिल्याच वारीत बॉस्टन-न्यूयॉर्क बस प्रवासांत, चहापाण्यासाठी थांबलो असताना, मी कॉफी पिण्याची इच्छा बोलून दाखवताच, आनंदने खाली उतरून, मोठ्या प्रेमाने माझ्यासाठी एक्स्प्रेसो कॉफी आणली. पण आपल्याकडे मिळणाऱ्या एक्स्प्रेसो कॉफीपेक्षा ती अगदीच वेगळी निघाली. ती घोटभर, कडवट कॉफी मला काही आवडली नाही. नंतरच्या अमेरिका-भ्रमणात मात्र आम्ही वेगवेगळ्या कॉफी प्रकारांचा आस्वाद घेतला. पुढच्या दोन वाऱ्यामध्ये  आमचे 'फॅमिली मिक्स्चर' बरोबर नेऊन घरच्याघरी मी माझी चहाची तल्लफ भागवली. पण घराबाहेर पडल्यावर चहाची तल्लफ भागवायला अमेरिकेत  टपरी, 'अमृततुल्य' किंवा इराणी वगैरे नाहीत.  

Iowa विद्यापीठात एका फेलोशिप कार्यक्रमात आम्ही होतो तेंव्हा आमच्या बरोबरच्या काही सहपाठी अमेरिकन बायकांनी 'इंडियन मसाला चाय' नामक उत्तम पेय ब्युफे मध्ये कुठेतरी ठेवले आहे, अशी खुशखबर  मोठ्या कौतुकाने आम्हाला  दिली. मग  हिरीरीने तो स्टॉल शोधून, आम्ही चांगले मोठे कपभरून ते पेय घेऊन आलो. एक घोट प्यायल्यावर मात्र त्या 'चाय' ला उघडपणे नावे ठेवली नाहीत इतकेच. पण संस्कार वगैरेचा विचार न करता मनोमन "च्यायला" म्हणालो आणि पुन्हा अमेरिकेत चहाची चाहत ठेवायची नाही असा  निग्रह मनाशी केला!

अमेरिकेत सकाळच्या चहाच्या कपावरून घडलेले एक मोठे नाट्य आता मी चहाच्या पुढच्या कपाबरोबर सांगेन !   

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४

१६. भूल-भुलैया

आशयच्या घराजवळच्या मेगा स्टोअरमध्ये खरेदीला गेलो होतो. ही अमेरिकेतील स्टोअर्स म्हणजे एक भूल-भुलैयाच असतो म्हणा ना. त्यांचे वर्णन करण्यासाठी 'भूल-भुलैया' हाच अगदी योग्य शब्द आहे. कारण इथे शिरण्याची भूल तुम्ही एकदा केलीत, की तुम्हाला इथल्या सर्व वस्तू पूर्णपणे भुलवणार आणि आपण नेमके काय घ्यायला आलो होतो, ते मात्र आपल्याला  भुलायला लावणार!

'राल्फ', 'वॉलमार्ट', 'कॉस्टको', 'टार्गेट', 'रॉस', 'ट्रेडर जोझ' अशा अनेक कंपन्यांची संपूर्ण अमेरिकेत जवळजवळ प्रत्येक गावात मोठ्ठाली स्टोअर्स असतात. या दुकानांची अजून एक खासियत म्हणजे, प्रत्येक दुकानाचा अगडबंब पसारा. दुकानातल्या दुकानात हिंडताना अक्षरश: पायाचे तुकडे पडतात. ग्राहकांच्या शंभर ते दीडशे गाड्या एकावेळी उभ्या राहू शकतील इतके मोठमोठाले वाहनतळ दुकानाच्या बाहेर असतात. गाड्या ठेवण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत, हे विशेष. सतत मोठमोठाले सेल्स, वेगेवेगळ्या वस्तूंवर डिस्काउन्ट, मेम्बरशिप कार्ड्सवर केलेल्या खरेदीवर विशेष सूट किंवा येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी रोज एखादे सलाड किंवा कपभर कॉफी फुकट देणे, अशा नित्य-नवनवीन क्लृप्त्या वापरून ही स्टोअर्स गिऱ्हाईकांसाठी गळ टाकत असतात.  

अमेरिकेत जगातल्या अनेक देशांचे, धर्मांचे आणि वंशाचे लोक अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. प्रत्येक देशाचे लोक आपापली खाद्यसंकृती, वेशभूषा, सण-वार आणि जीवनशैली असं बरंच काही अमेरिकेत घेऊन आले. तसं बघायला गेलं तर हे सर्व जेमतेम गेल्या चारशे वर्षांत घडलेलं आहे. त्यामुळे, या देशाची संस्कृती आणि इथल्या लोकांचे राहणीमान म्हणजे एक अजब रसायनच म्हणावे लागेल. काही लोकांनी इथे येउन  नवीनच राहणीमान स्वीकारले; तर काहीनी 'आपापले' असे सर्व काही अगदी जपून ठेवले आहे. इथे येऊन स्थायिक झालेल्या लोकांची इतर देश, धर्म आणि वंशांच्या लोकांशी लग्ने होऊन नवीनच जातकुळीचे लोक तयार झाले आहेत. बऱ्याचशा अमेरिकन लोकांची जीवनशैली आधुनिक असली तरी काही लोक अगदी पुरातन काळांत राहत असल्याप्रमाणे जगतात. त्यामुळे इथे मायक्रोवेव्हमध्ये रेडीमेड अन्नाची पाकिटे फक्त गरम करून खाणारे लोक दिसतील तसेच रोज घरी धान्य दळून कोळश्याच्या किंवा लाकडाच्या चुली फुंकून अन्न शिजवणारे लोकदेखील दिसतात. शाकाहारी, मांसाहारी असे लोक तर असतातच; त्यांशिवाय, दुग्धजन्य पदार्थ न खाणारे, ग्लुटेन-विरहित आहार घेणारे, एगटेरियन्स, 'कोशर' अन्न खाणारे किंवा केवळ ऑर्गनिक  अन्नच  खाणारे, असे वेगवेगळे चोचले असलेले लोक असतात. कदाचित त्यामुळेच जगाच्या पाठीवरचे जवळ-जवळ सगळे पदार्थ इथल्या मेगास्टोअर्समधून मिळतात. पण कुठलाही खाद्यपदार्थ विकत घ्यायला गेलात, तर त्याचे कमीतकमी पाच ते दहा प्रकार समोर येतात. सुरुवातीला मला फार चक्रावून जायला व्हायचे. साधे दूध जरी घ्यायचे झाले तरी दहा-दहा प्रकारच्याबरण्यांवरची लेबल्स वाचत बसावे लागायचे. पण हळू-हळू या खरेदीतही मजा यायला लागली. 

अमेरिकनांचा दिनक्रम सोमवार ते शुक्रवार फारच धावपळीचा असतो. सर्वसाधारण व्यक्ति रोजचे आठ म्हणजे आठवड्याचे सुमारे चाळीस तास काम करते. कित्येक जण अधिक पैसे मिळवण्यासाठी त्याहीपेक्षा जास्त काम किंवा दोन-दोन नोकऱ्या करतात. बरेच लोक शहरापासून दूर राहतात. त्यामुळे रोज कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी  त्यांचे दोन ते चार तास प्रवासात जातात. घरासाठीच्या सामानाची खरेदी करायला, आपल्याकडे असतात तशी, गल्लोगल्ली किराणामालाची किंवा भाजीची दुकानेही नाहीत. घराजवळ जर एखादे मेगास्टोअर नसेल किंवा घरातील सर्वजण दिवसातले बारा-पंधरा तास बाहेर असतील, तर एकदा दुकानात गेले की आठवडा-दहा दिवसाचे सामान आणून ठेवायची सर्वसाधारण पद्धत असते. पण कुणालाही कितीही घाई असली तरी सगळे रांगेने आणि पुढच्या माणसापासून दोन पावले अंतर ठेऊन  बिलिंग काउंटरमागे उभे राहतात. पुढच्या माणसाचे बिल तयार होऊन, त्याने पैसे देऊन, सामान घेऊन जाईपर्यंत मागचा माणूस आपले सामान पुढे सरकवतसुद्धा नाही. हा समंजसपणा बघून मला सुरुवातीला जरा विचित्रच वाटायचे आणि थोडासा त्रासही व्हायचा. भारतात आपण किती बेशिस्तपणे उभे असतो आणि कुठल्याही रांगेमधून निर्लज्जपणे पुढे घुसायचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे तिथे गेल्यावर सुरुवातीला अगदी चुकल्या-चुकल्यासारखे व्हायचे! 

विविध भाज्या, फळे, मांस-मच्छी, किराणामाल, असंख्य प्रकारचे चीज, ब्रेड्. चिप्स, गोळ्या. चॉकलेट्स, बिस्किट्स अशा पॅकेटबंद वस्तूंनी ही स्टोअर्स भरलेली असतात. या स्टोअरमध्ये आपण एखादी वस्तू जितक्या अधिक प्रमाणात घेऊ तितकी ती स्वस्त होत जाते. म्हणजे समजा, दोनशे ग्रॅम लोणी दोन डॉलरला असेल, त्या प्रमाणात पाचशे ग्रॅम किंवा एक किलो लोणी पाच किंवा दहा डॉलरला असले पाहिजे. पण प्रत्यक्षात पाचशे ग्रॅम लोणी चार डॉलरला आणि एक किलो लोणी सहा डॉलरला मिळू शकते. तुम्हाला अधिकाधिक प्रमाणात विकत घ्यायला उद्युक्त करण्यासाठी अशी भुलवणारी किंमत ठेवलेली असते. स्वस्त मिळतेय म्हणून जास्तीत जास्त घ्यायची इच्छा ग्राहकाला होतेच. त्यामुळे मेगास्टोअर्समध्ये अमेरिकन ग्राहक खूप सामान विकत घेताना दिसतात. पंधरा-वीस लोकांची जेवणावळ उठणार आहे असे वाटावे, इतके सामान जवळ-जवळ प्रत्येकाकडे असते. आपल्या तुलनेत अमेरिकन लोकांचा आहार जरी खूप जास्त असला तरी त्यांच्या घरातल्या फ्रीजमध्ये आणि तळघरातल्या डीप फ्रीझरमध्ये इतके सामान भरून ठेवलेले असते की, केंव्हाही दुष्काळी परिस्थिती उद्भवणार आहे की काय असे वाटावे. घरच्या फ्रीझमध्ये महिना-महिना पडून राहिलेल्या एखाद्या पदार्थासाठी माझ्या चुलतभावाने, शिरीषने, "वस्तू 'कोमा'त जाणे" अशी एक समर्पक शब्द-योजना केलेली आहे. अमेरिकेतल्या घरांच्या डीप-फ्रीझर्समधून बरेच पदार्थ 'डीप कोमा' त पडलेले असतात, असेही तो हसत-हसत आम्हाला एकदा सांगत होता! 

अमेरिकेत काही काळ राहून नुकत्याच परतलेल्या पूनम सिन्हा नावाच्या माझ्या मैत्रिणीला एकदा मी तिथल्या मेगा स्टोअर्सचे कौतुक सांगता सांगता, थोड्याशा खेदानेच म्हणाले, "आपल्याकडे अजून तितकी चांगली स्टोअर्स आलेली नाहीत. तिकडच्या मानाने आपली दुकाने किती छोटी वाटतात नाही?" पण ती म्हणाली, "ही मेगा स्टोअर्स कितीही सुसज्ज असली तरी ती अमेरिकन्ससाठी धोक्याची ठरली आहेत. एकतर या स्टोअर्समुळे गेल्या काही दशकांत अमेरिकेतले छोटे दुकानदार नाहीसेच झाले. दुसरे म्हणजे ताजे दूध, भाजीपाला, मांस-मच्छी मिळणे जवळ-जवळ अशक्यच झाले आहे. अधिक स्वस्त म्हणून बरेचदा गरज नसलेले अनेक खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात विकत घेतले जातात. ते वापरले न जाता पडून-पडून खराब होतात आणि फेकले जातात त्यामुळे अप्रत्यक्षपणे बराच पैसाही वाया जातो. शरीराला अनावश्यक असलेले, आणि 'हाय-कॅलरी' पदार्थदेखील केवळ स्वस्त आणि मुबलक आहेत म्हणून हे लोक खातात. यामुळे त्यांची जाडी आणि आरोग्यसेवांवर होणारा खर्च, दोन्हीही वाढतेय.एकूण काय, या मेगा स्टोअर्सवाल्यांनी अमेरिकेत बिनडोक ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्या तयार केल्या आहेत. स्टोअर्समध्ये पडून असलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात आवक झालेल्या वस्तू कमी दरात विकायला ठेवल्या जातात. या व्यवसायात उत्पादक, वितरक आणि ही स्टोअर्स, सगळ्यांचाच खूप पैसा गुंतलेला असतो. त्यामुळे, अमेरिकन्सनी काय खायचे आणि काय नाही हे त्यांच्याही नकळत ही मेगा स्टोअर्सच ठरवत असतात. आपल्याकडे सर्रास ही अशी मेगा स्टोअर्स आलेली नाहीत आणि अजूनही कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार, भाजीवाला, आणि दूधवाला टिकून आहेत हे नशीब समज. त्यामुळे आपल्याला ताजे अन्न तरी खायला मिळतेय " 

मी माझी विचारशक्ती गमावून कोमात किंवा डीप कोमात जायच्या आधीच पूनमने मला जागे केले, हे चांगलेच झाले म्हणायचे! 

शनिवार, २० डिसेंबर, २०१४

१५. पेनी वाईज!

मिड्वेल अव्हेन्यूवर असलेल्या आशयच्या घरी पोहोचलो, आंघोळी उरकल्या, थोडेफार काहीतरी खाल्ले आणि मग सरळ ताणून दिली. जाग आली तेंव्हा संध्याकाळचे सात वाजत आले होते. रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हातपाय हलवणे आवश्यक होते. अमेरिकेत भाड्याच्या फ्लॅटमध्येसुद्धा फ्रीज, मायक्रोवेव्ह, गॅस, ओव्हन, सेन्ट्रल हीटिंग आणि इंटरनेट अशा सर्व सुविधा उपलब्ध असतात. चोवीस तास वीज, पाणी, आणि गरमपाण्याचीही सोय असते. भाडेकरूला या सर्व सोयी-सुविधांचे वेगळे पैसे लावले जात नाहीत. क्वचित काही वेळा "युटिलिटीज" या नावाखाली, थोडे जास्तीचे पैसे मोजावे लागतात. वीज, पाणी, उष्णता वगैरे गोष्टींचा तुम्ही किती वापर करता त्यावर किती पैसे ते अवलंबून असते. एखाद्या  इमारतीतल्या आठ ते दहा फ्लॅटसाठी मिळून तीन ते चार अशी वॉशिंग मशीन आणि एखाद-दोन ड्रायर असतात. सर्वसाधारणपणे ही मशीन्स इमारतीच्या तळघरामध्ये ठेवलेली असतात. कपडे धुण्यासाठी वेगळे आणि वाळवण्यासाठी वेगळे असे ठराविक पैसे मशीनमध्ये घातल्यावरच, ही मशीन्स चालतात. त्या मशीनमध्ये घालण्यासाठी अमेरिकेतील 'पावली' म्हणजे क्वार्टरची नाणीच लागतात. प्रत्येक वेळी योग्य तेवढी नाणी मशीनमध्ये टाकायची, साबण घालायचा, आपल्याला हवा तो प्रोग्रॅम निवडायचा, पाण्याचे तापमानही ठरवायचे आणि मशीन चालू करायचे. मशीनमधून कपडे धुऊन निघाले की ते काढून ड्रायरमध्ये घालायचे, पुन्हा कपडे वाळवण्यासाठी काही क्वार्टर घालायचे अशी पद्धत असते. ती वॉशिंग मशीन्स आपल्या घरातल्या मशीन्सपेक्षा बरीच मोठी असतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे एका माणसाच्या कपड्यांसाठी आठवड्यातून एखादेवेळी मशीन लावले तरीही पुरते. ड्रायरमधून कपडे फिरवून काढले की ते पूर्ण वाळून येतात आणि हाताला अगदी गरम लागतात. बाहेर काढल्या काढल्या लगेच छान दाबून घड्या करून ठेवले की कपडे अगदी इस्त्री केल्यासारखे दिसतात.

आशयच्या घरीसुद्धा सगळ्या सोयी होत्याच. बाहेर एक प्रशस्त खोली, त्यामध्ये एकाबाजूला मोठा पलंग दुसऱ्या बाजूला सोफा-कम-बेड आणि टेबल-खुर्ची ठेवलेली होती. आत एका बाजूला स्वयंपाकघर आणि दुसऱ्या बाजूला मोठी बाथरूम असे सर्व सोयीने सुसज्ज आणि नेटके असे ते घर होते. झोपेतून उठल्याबरोबर मी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. सगळी कपाटे उघडून साफसफाई केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्या कपाटांमध्ये बराच किराणामाल सापडला. आशयच्या घरात हिंग, मोहरी चिंच-गुळापासून ओरेगानोपर्यंत आणि पोह्यांपासून ते पास्तापर्यंत सगळ्याच गोष्टी मला मिळाल्या. पूर्वी ज्या विषयात आशय काठावरही पास होण्याची शक्यता नव्हती त्या विषयात म्हणजे पाककलेत त्याला अचानक रस निर्माण झाला की काय? अशी मला शंका आली. पण दोन दिवसांनंतर आशय परत आला आणि त्याने खुलासा केला. त्याच्या कॉलेजमधले एक मूळचे भारतीय प्राध्यापक, नुकतेच अमेरिकेतले आपले घर बंद करून भारतामध्ये परत गेले होते. जाताना त्यांच्या घरातले उरलेले सामान त्यांनी आशयला दिले होते. आशयकडे ते खाण्याचे सामान पडूनच होते. मी येणार हे कळल्यावर त्याला अगदी हुश्श झाले होते. मी त्यातले बरेचसे सामान सत्कारणी लावणार याची त्याला खात्री होती. ते सर्व सामान बघितल्यानंतर मला कळले की बाहेरून फक्त दूध, भाजीपाला आणि फळे आणले की भागणार होते.

मग बाहेरची खोलीही आवरायला लागलो. आशयच्या घरी आणि आमच्या मुलांच्याही खोल्यांमध्ये नेहमीच अमेरिकन नाण्यांचा साठा असतो. अमेरिकेत कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी मशीनमध्ये क्वार्टरची नाणीच लागतात. त्यामुळे ती नाणी या मुलांनीअगदी जपून वेगळी ठेवलेली असतात. एक डॉलरची नाणीही  वापरली जात असल्यामुळे, तीही जपून ठेवलेली असतात. पण पेनी (१ सेंट), निकेल (५ सेंट), डाइम (१० सेंट) अशा छोट्या किंमतीच्या नाण्यांचा साठा मात्र कुठेतरी एखाद्या मोठ्या डब्यात किंवा टोपलीमध्ये पडलेला असतो. अमेरिकेत शिकणारी आपली मुले, अशी अमेरिकन चिल्लर निदान जमा तरी करत जातात. आपल्या  मुलांना त्या पैशांची इतपत किंमत असते. पण सर्वसाधारण अमेरिकन मुलांना पेनी, निकेल आणि डाइमची काहीच किंमत नसते असे वाटते. तळघरातल्या वॉशिंग मशीन्सच्या जवळपास, कॉलेजच्या आवारात इकडे-तिकडे, अशी ही नाणी पडलेली दिसतात. कधी-कधी सुटे नसले, की अमेरिकन लोक सहज एक-दोन डॉलरसुद्धा वर देऊन टाकतात. मात्र वॉशिंग मशीन्स किंवा ड्रायरमध्यॆ वापरायला लागतात म्हणून, हे लोक जास्तीचे पैसे देऊन दुकानातून क्वार्टरच्या नाण्याचा रोल खरेदी करतात!

आम्हाला प्रत्येक पेनीच्या जागी साठ पैसे, निकेलच्या जागी तीन रुपये आणि डाइमच्या जागी सहा रुपये दिसायला लागतात. साहजिकच आहे म्हणा, आम्ही आपले रिक्षेवाल्याला मीटरप्रमाणे मोजून सतरा रुपये देणारे लोक! पुण्यात एखाद्या रिक्षेवाल्याने सतराच्या जागी वीस रुपये मागितले, की पुढची कमीतकमी तीन मिनिटे, बिनकामाची कमाई कशी वाईट असते, हे सांगून मी त्याचे बौद्धिक घेते! कधी कधी अशा रिक्षेवाल्यांचा निषेध करणारे खरमरीत पत्र लिहून, दै. 'सकाळ' मध्ये छापून आणावे असेही माझ्या मनात येते. नाही म्हटलं  तरी गेल्या वीस वर्षांपासून पुण्यात राहते आहे मी! 
सांगायचा मुद्दा म्हणजे, क्वार्टर आणि डॉलरची नाणी वगळता इतर नाण्यांचा साठा आम्ही गेल्या-गेल्या सुपर मार्केट मध्ये किवा बसमध्ये खपवतो. अलिबाबाला गुहेतला खजिना मिळाल्यावर झाला असेल त्यापेक्षाही जास्त आनंद, या मुलांच्या घरातला अमेरिकन नाण्यांचा साठा बघितला की आनंदला होतो! मग ती नाणी वेगवेगळी करणे आणि त्यांच्या पुरचुंड्या बांधण्याचा उद्योग सुरु होतो. मीही अलीबाबाच्या बायकोप्रमाणे, आनंदला लागेल ती मदत करायला सरसावते. त्यानंतर मग त्यातली एखादी पुरचुंडी बरोबर घेऊन आम्ही खरेदीला बाहेर पडतो. शेकडो पेनींची अशी मोठ्ठी पुरचुंडी किंवा पिशवी बघितली, की सुपरमार्केट मधल्या बिलिंग काउंटर वरच्या बायका-पुरुषांची अगदी भंबेरी उडते. पण एक मात्र पाहिलं आहे. ती माणसे कधीही, नाणी घ्यायला कुरकुर करत नाहीत किंवा तोंड वाकडे करत नाहीत. पण त्याचबरोबर काही वेळा अगदी मजेशीर अनुभव येतात.

मोठ्या स्टोअर्स मध्ये नाणी मोजायची मशिन्स असतात. आम्ही नाण्यांचे पुडके दिल्यावर, लाऊड स्पीकरवर पुकारा करून त्या बिलिंग काउंटरवर नाणी मोजण्याचे मशीन मागवले जाते. जिथे तसे मशीन नसते, तिथल्या काही जणांना इतकी नाणी मोजायची कशी आणि त्यांची बरोबर बेरीज करून रक्कम किती ते कसे ठरवायचे हे समजतच नाही. मग आम्हालाच त्यांना मदत करावी लागते. काही वेळा एखाद-दुसऱ्या दुकानांत आमच्याकडे कुणी संशयाने बघतात. तुम्ही इतकी नाणी कुठून आणली? असेही विचारतात. मग त्या सेल्समनना तो खुलासा करताना आनंदला खूप  मजा येते .
आमच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यामध्ये आशयकडच्या पेनी, निकेल, डाइमची सर्व चिल्लर आम्ही अशाच प्रकारे सत्कारणी लावली होती. दुसऱ्या वेळी म्हणजे २०१२ साली, आम्ही अनिरुद्धच्या हॉस्टेलवर राहिलो होतो. तिथेही असाच उद्योग केला होता. यंदा, २०१४ साली पुन्हा आम्ही आशयच्या घरी उतरलो होतो. पहिल्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी, मी आणि आनंदने आशयकडच्या असलेल्या सगळ्या खुरद्याची वर्गवारी करून ठेवली. मग पेनीचे पुडके घेऊन खरेदीला गेलो. आमच्या दौऱ्यांमधल्या पुढच्या काही दिवसांतच आशयकडे जमा झालेली जी चिल्लर आम्ही संपवली ती जवळ-जवळ ३०-३५ डॉलर एवढी भरली.
प्रत्येक वेळी या मुलांच्या घरून निघताना आम्ही त्यांच्याकडचे ओझे कमी करतो आणि वापरलेल्या चिल्लरच्या बदल्यात बंदे डॉलर्स आणि क्वार्टर त्यांच्यासाठी ठेवून निघतो. इतके पैसे आपल्याकडे होते हे अचानक कळल्यावर ते आश्चर्यचकितच होतात. आम्हाला मात्र अगदी 'पेनी वाईज डॉलर स्मार्ट' झाल्यासारखे वाटते!

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

१४. अमेरिकेच्या नावाने….!

अमेरिकेला पोहोचल्याबरोबर आणि परत भारतात आल्यानंतरही काही काळ, मला जेट-लॅगचा फार त्रास होतो. विचित्र वेळी जाग येते आणि काही केल्या परत झोप येत नाही. आमच्या पहिल्या अमेरिका भेटीत, बॉस्टनमध्ये असताना एक दिवस, पहाटे चार-साडेचार पासून मी जागी होते. तासाभरात आनंद जागा झाल्यावर आम्ही बाहेर फिरायला निघालो. बरेच चालल्यानंतर  भूक लागल्याची जाणीव झाली. एक 'सबवे आउटलेट' दिसले आणि आम्ही त्यात शिरलो. अगदी भारतीयच वाटावी अशी एक मुलगी आमची ऑर्डर घ्यायला आली, त्यामुळे आम्ही जरा सुखावलो.आत ती एकटीच होती आणि बाहेर फक्त आम्ही दोघेच गिऱ्हाइक होतो. आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर तीही खूष झाली आणि आमच्याशी लगेच हिंदीमध्ये बोलायला लागली. मूळ बांगलादेशची ही मुलगी, दहा-बारा वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेली होती. 

अमेरिकेतल्या 'सबवे' वगैरे दुकानात खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करणे मला तेंव्हा फार त्रासाचे वाटायचे. "हा सॉस का तो सॉस, हे टॉपिंग का ते टॉपिंग", असले हजार प्रश्न तिथे विचारतात. या मुलीने मात्र मोठ्या आस्थेने, आम्ही काय घ्यावे काय नाही याचा  सल्ला दिला आणि सढळ हाताने चीझ घालून आम्हाला एक 'फूटलाँग' बनवून दिला. "इच्छा असूनही मी तुमचे बिल कमी करू शकत नाही, पण माझ्यातर्फे दोन चॉकलेट कुकीज घ्या",  असे सांगून शेवटी तिने अगदी प्रेमाने आम्हाला निरोप दिला !
आधी, आमच्यासाठी 'फूटलाँग' बनवत असताना, ती मुलगी गप्पाही मारत होती. बोलता बोलता अमेरिकन लोकांच्या 'थंडपणावर'  ती घसरली. अमेरिकन लोकांचे अगदी निर्लेप असणे, जेवढ्यास तेवढे  म्हणजे अगदी "cut & dry" बोलणे आणि 'Business-like' वागणे या सगळ्याचा तिला फार त्रास होत होता. तिच्या म्हणण्यात तथ्य होते आणि तिला त्याचा त्रास होणेही स्वाभाविकच होते. एकीकडे, अमेरिकेत स्थायिक होण्यामुळे मिळालेले आयुष्य तिला सुखाचे वाटत होते, तर दुसरीकडे आपल्या भागातल्या लोकांचा मनमोकळेपणा, बोलकेपणा आणि प्रेम आठवून बांगलादेश सोडून आल्याचे तिला वाईटही वाटत होते. आपल्या समाजामध्ये आणि नातेसंबंधांमध्ये ओलावा, आपुलकी आणि आदरातिथ्य अजूनतरी थोडेफार टिकून आहे. पण अमेरिकन लोकांचे अंधानुकरण करता-करता भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही अशी थंड आणि निर्लेप वृत्ती आता  हळू हळू फोफावते आहे याची तिला बिचारीला कदाचित कल्पनाही नसेल.

दुसऱ्या वेळी अमेरिकेला जाताना आम्ही लुफ्तांसा कंपनीच्या विमानाने फ्रॅंकफुर्टला विमान बदलून पुढे गेलो होतो. फ्रॅंकफुर्ट-शिकागो प्रवासात माझी आणि आनंदची फारकत झाल्यामुळे मला एका गोऱ्या मड्डमशेजारी जागा मिळाली. अमेरिकेला जाणारी गोरी बाई म्हणजे माझ्या दृष्टीने ती अमेरिकनच होती. प्रत्यक्षात, ती बाई जर्मन असल्याचे बोलण्याच्या ओघात कळले. नंतर आमच्या छान गप्पाही चालू झाल्या. आम्ही जर्मनीत कुठे-कुठे हिंडलो आणि काय-काय बघितले, हे जाणून घेण्यात तिला रस होता. पण आम्ही अमेरिकेला चाललोय आणि फ्रॅंकफुर्टला आम्ही फक्त विमान बदलले, हे ऐकल्यावर ती जरा हिरमुसली. मग त्या बाईने अमेरिकेच्या संस्कृतीवर - खरंतर असंस्कृतपणावर - भरपूर तोंडसुख घेतले. सर्व पाश्चिमात्य देशातल्या तमाम गोऱ्यांची संस्कृती ही साधारण एकच असते, अशी तोपर्यंत माझी समजूत होती. आणि, भारतीय संस्कृतीच्या वृथा अभिमानातून निर्माण झालेल्या माझ्या संकुचित वृत्तीमुळे आणि अज्ञानामुळे  मी सर्वच पाश्चिमात्त्यांना संस्कृतीहीन समजत होते. मात्र पुढचे काही तास, 'युरोपियन सुसंस्कृतपणा', 'जर्मन नागरिकाचे सभ्य वर्तन' आणि 'अमेरिकन अससंस्कृतपणा' या विषयांवर माझी शिकवणीच त्या बाईने घेतली! अमेरिकेला इतकी नावे ठेवणाऱ्या या बाईला केवळ कामानिमित्त नाइलाजास्तव अमेरिकेला जावे लागत असणार, याची मला खात्रीच होती. तरीही मी तिला विचारलं, "तू अमेरिकेला का निघाली आहेस"? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती मूळची जरी जर्मन असली तरी, गेले वीस-एक वर्षे अमेरिकेत स्थायिक होऊन अमेरिकेचे नागरिकत्व पत्करलेली होती!

तिसरा अनुभव यावेळच्या फेरीत आला. कॅलटेक विद्यापीठात अनिरुद्धचा पदवीदान समारंभ झाल्यावर आम्ही संध्याकाळच्या शेवटच्या मेट्रोने आशयच्या घरी परत निघालो होतो. त्यावेळी मेट्रो स्टेशनावर आम्ही दोघे आणि एक मिचमिच्या डोळ्याची, पिवळ्या कांतीची मध्यमवयीन बाई, इतकेच प्रवासी  होतो. ती बाई  आमच्याच डब्यात चढली. तास-दीड तासाचा प्रवास होता. त्या बाईने हसून स्वत:हून माझ्याशी बोलायला सुरुवात केली.  मोलकरीणीचे काम करणारी, अगदी साध्या कपड्यातली ही चीनी बाई, भारतात नुकत्याच आलेल्या मोदी-सरकारविषयी खबर ठेऊन होती! ती अगदी चीनी ढंगाची इंग्रजी भाषा बोलत होती. आमच्या मुलाला 'कॅलटेक' या मान्यवर विद्यापीठातून फिजिक्ससारख्या 'कठीण' विषयांत पदवी - आणि तीही 'ऑनर्स'सह -  मिळाल्याचे कळल्यावर तर ती एकदम बोलतच सुटली. "आपली मुले खूपच हुशार असतात. इथली अमेरिकन मुले म्हणजे अगदी मठ्ठ! गणित, सायन्स आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये अमेरिकन पोरांना मुळीच गति नसते. ती फक्त मोबाईलवर गेम्स खेळत बसतात, अभ्यासासाठी कष्ट घ्यायची त्यांची अजिबात तयारी नसते. थोड्याच वर्षांमध्ये चीन, कोरिया आणि भारतातील मुलेच उच्चशिक्षित होऊन या सगळ्या अमेरिकन मुलाना पार मागे टाकणार आहेत.  इथल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि सगळे व्यवसाय आपल्याच लोकांच्या हाती येणार आहेत." हे सगळे ती अगदी "हिंदी-चीनी भाई-भाई" च्या आवेशात बोलत होती,पण स्वत: मात्र पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकन नागरिकत्व पत्करलेली बाई होती!

पुण्याबाहेरचे लोक नेहमीच खुद्द पुणेकरांच्या "पुणेरी" वृत्तीला आणि "पुणेरी संस्कृतीला" नावे ठेवतात.  पण त्याचबरोबर पुण्यामध्ये स्थायिक व्हावे, पुण्यामध्ये मुलांनी शिकावे किंवा निदान मुलीला पुण्यातले स्थळ मिळावे, यासाठी त्यांची कमालीची धडपड चालू असते. महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातील इतर राज्यातील लोकांनासुद्धा पुण्याला यायचे असते. पण  बाहेरून येऊन पुण्यात स्थायिक झालेले, अगदी पंधरा-वीस वर्षे इथे काढलेले माझ्यासारखे लोकदेखील, स्वत:ला 'पुणेकर' म्हणवून घ्यायला सहज तयार नसतात.  तसेच काहीसे अमेरिकेच्या बाबतीत आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले देशोदेशीचे बरेच लोक, जाता-येता अमेरिकेला आणि अमेरिकन संस्कृतीला नावे ठेवत असतात. पण त्याचबरोबर, अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी आणि मुलांना अमेरिकेत शिकायला पाठवण्यासाठी सर्वच देशातले लोक धडपडत असतात हेही खरे आहे. पुण्याबद्दल, 'पुणे तिथे काय उणे?' आणि अमेरिकेला 'Land of dreams' किंवा 'Land of opportunities'  म्हणतात ते काही उगीच नाही!

इतकी वर्षे पुण्यात राहिल्यांनंतरही "पुणेरी वृत्ती" किंवा "खास पुणेरी" व्यक्तींची मी थोडी चेष्टा करते हे पाहून कुणी-कुणी आक्षेप घेतात, किंवा, "तुला हे बोलण्याचा अधिकार नाही" असे सुनवतात. मात्र, जन्मतः पुण्याची नसल्याने, साक्षात लोकमान्य टिळकांच्या आवेशात मला सांगावेसे वाटते," पुणेरी वृत्तीला नावे ठेवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

१३. मिडवेल अव्हेन्यू मिळाला !

वेस्टवूडकडे जाणाऱ्या बारा वाजताच्या बसमध्ये बसेपर्यंत आम्ही चांगलेच दमलेले होतो. आता कुठे काही गडबड व्हायला नको असे वाटत होते. त्यामुळे आशयचे घर, म्हणजेच मिडवेल अव्हेन्यूसाठी कुठे उतरायचे, ही  चौकशी आम्ही बसमध्ये चढता चढताच चालकाकडे केली. आमचे ते बोलणे ऐकल्याबरोबर बसमधला एक विद्यार्थी म्हणाला," मी पण वेस्टवूडला उतरून, मिडवेल अव्हेन्यू पार करून पुढे  जाणार आहे. मी उतरणार आहे तिथेच तुम्ही उतरा आणि माझ्या मागे मागे या. मी तुम्हाला रस्ता दाखवतो." हे ऐकल्यावर आम्ही निर्धास्त झालो. बस मधून उतरल्यावर हात उंचावून रस्ता दाखवत त्याने आम्हाला सांगितले, "समोरचा मोठा रस्ता दिसतोय तो आहे विल्शर बूलेवार्द. तो पार करून पुढे जायचे. किनरॉस अव्हेन्यू पार करून वेबर्न प्लाझा पकडायचा. डावीकडची तीन वळणे सोडून चौथे वळण घेतले की थेट तुम्ही मिडवेल अव्हेन्यूलाच पोहोचाल."
आम्ही पुण्याहून निघताना गूगलवर घराचा नकाशा बघून ठेवला होता. आमच्या आठवणीप्रमाणे, हा मुलगा दाखवत होता त्याच्या विरुद्ध दिशेला आम्ही जायला पाहिजे होते. त्यामुळे आम्ही बुचकळ्यात पडलो. तुझे काही चुकत तर नाही आहे ना? असे त्याला विचारूनही बघितले. पण तुमची नकाशा बघण्यात काहीतरी चूक झाली असेल, असे तो अगदी छातीठोकपणे म्हणाल्यामुळे आम्ही त्याच्या मागून गेलो. आमच्या दोन मोठ्या, चाके असलेल्या बॅगा ओढत त्याच्या मागे जाताना आम्ही फार भरभर चालू शकत नव्हतो. थोडा वेळ आमच्या बरोबर चालल्यानंतर, "मला जरा गडबड आहे, मी पुढे होतो." असे सांगून तो ताड ताड पुढे चालत निघून गेला. आम्ही त्याने दाखवलेल्या रस्त्याने चालत राहिलो.

अमेरिकेत बऱ्याचशा छोट्या मोठ्या रस्त्यांवरही चाके असलेल्या बॅगा, व्हीलचेअर वगैरे चालवायला आणि फुटपाथवरून खाली आणि वर जाण्यासाठी उतार केलेला असतो. पादचाऱ्याना रस्ता पार करण्यासाठी, सिग्नलवर पांढऱ्या रंगाच्या मनुष्याकृतीचा दिवा येण्याची वाट बघावी लागते. काही काही कमी रहदारीच्या रस्त्यावर, फुटपाथवरील खांबावरचे एक बटण दाबले की मगच तसा पांढरा दिवा येतो आणि त्यानंतरच रस्ता पार करता येतो. "घुसेल त्याचा रस्ता" हा पुणेरी नियम तिथे अजिबात लागू होत नाही. अगदीच छोट्या रस्त्यांवर पादचाऱ्यासाठी पांढऱ्या दिव्याची सोयही नसते. पण आपण रस्ता पार करू पाहतोय असे दिसले तरी वाहनचालक थांबतात आणि अगदी अदबीने आपल्याला वाट देतात. पुण्यासारख्या शहरातून गेल्यानंतर अमेरिकेतल्या चालकांकडून मिळणारी ही वागणूक अगदी सुखद वाटते.

त्या कॉलेजकुमाराने दाखवलेला मोठा रस्ता आम्ही पार केला. आता पुढचा रस्ता चढणीचा होता. सामान ढकलत, धापा  टाकत आम्ही डाव्या हाताच्या चौथ्या वळणाला वळलो आणि काय! समोर मिडवेल अव्हेन्यूची पाटी वाचून अगदी हुश्श झाले. आम्ही पोहोचलो होतो त्या कोपऱ्यावरच्या घरांचे क्रमांक सहाशेपासून चालू होत होते. आम्हाला तेराशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाचे घर शोधायचे होते. आम्ही पुढचा चढणीचा रस्ता चढायला लागलो. पण पुढे पुढे घरांचे क्रमांक कमी होत चालले आहेत असे आमच्या लक्षात आले. म्हणजेच आम्ही शोधत असलेले तेराशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाचे घर आम्हाला पुढे मिळणार नव्हते! आता आमची चांगलीच पंचाईत झाली. रस्ता निर्मनुष्य, विचारायचे तरी कुणाला?

इतक्यात एक विद्यार्थिनी दिसली. आम्ही तिला विचारले पण ती तिथे नवीनच राहायला आलेली होती आणि तिला आसपासची माहिती नव्हती. तरी तिने लगेच तिच्या स्मार्ट फोन  वर गूगलचा नकाशा काढला. बराच वेळ खटपट करूनही तिला तेराशे अठ्ठ्याहत्तर मिडवेल अव्हेन्यू काही सापडेना. ती मुलगी निघून गेली आणि दुपारी दोन वाजताच्या सुमारास, त्या सुनसान रस्त्यावर आता पुन्हा आम्ही दोघेच राहिलो. 'एक ते चार कुणीही दारावरची  घंटा वाजवू नये' अशी 'पुणेरी पाटी' कुठेही नसली, तरीही मनावर संस्कार असतातच नां! कुठल्या घराचे दार ठोठावायची हिम्मत होईना. तेवढ्यात एक माणूस गाडीत बसून घरातून बाहेर पडताना दिसला. आनंदने जवळ जवळ धावतच जाऊन त्या माणसाला गाठले आणि पत्ता विचारला. तो तिथलाच रहिवाशी असल्यामुळे माहितगार होता. त्याने आम्हाला सांगितले की सहाशेपासूनची पुढची घरे विल्शर बूलेवार्दच्या पलीकडच्या मिडवेल अव्हेन्यूवर आहेत! म्हणजे आम्ही बरोब्बर उलट्या दिशेला २ कि. मी. चढण चढत आलेलो होतो!

अमेरिकेतल्या रस्त्यांवर आपल्या इथल्यासारख्या रिक्षा नाहीत. रस्त्यांवरून बऱ्याच Taxi धावताना दिसत असल्या तरी हात केल्यावर त्या थांबत नाहीत. आधी फोन करून Taxi बोलवायाची असते. कुणाला लिफ्ट मागायची तर सोयच नाही. पुण्यातले रिक्षावाले उध्दट असतात म्हटलं तरी चार-सहा जणांकडून नकार घेतल्यानंतर एखाद्याला तरी आपली दया येतेच. पण इथे तीही सोय नव्हती. पुन्हा सामान घेऊन उलटे चालत जाणे भाग आहे,  हे आम्हाला कळल्यामुळे आम्ही हबकलो. पण 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत, सामान फरफटत आम्ही पुन्हा उलटे चालत निघालो. तो उलटा रस्ता उताराचा असला तरीही त्यावेळी आम्हाला अतिशय कष्टाचा वाटत होता .

पंधरा वीस मिनिटांच्या तंगडतोडीनंतर आम्ही तेराशे अठ्ठ्याहत्तर मिडवेल अव्हेन्यू या पत्त्यावर पोहोचलो. दुमजली इमारतीतील तळमजल्यावर आशयचा स्टुडियो फ्लॅट होता. आशयने आमच्यासाठी लपवून ठेवलेली घराची किल्ली शोधून घरात शिरेस्तोवर जवळ-जवळ दुपारचे तीन वाजत आले होते. घरी पोहोचल्यावर आधी इंटरनेट वरून शिकागोमध्ये असिलताशी आणि कॅलटेकमध्ये अनिरुद्धशी संपर्क साधला. तसं पाहता, टेक्नॉलजीमुळे गोष्टी खूप सुकर झाल्या असल्या तरी चिंताही वाढल्या आहेत. आमचे विमान लॉस एंजेलिस विमानतळावर सकाळी दहा वाजता पोहोचलेले मुलांना इंटरनेट वरून कळलेले होते. त्यांच्या अंदाजाप्रमाणे आम्ही बारा वाजेपर्यंत आशयच्या घरी पोहोचायला पाहिजे होते. दोन वाजून गेले तरीही आम्ही अजून पोहोचलेलो नाहीत हे कळल्यामुळे ती दोघेही चिंतेत होती. आमच्या फोनमध्ये तिथले लोकल कार्ड नसल्यामुळे मुलांना फोनही केलेला नव्हता. पण आमच्याशी बोलणे झाल्यामुळे दोघांचाही  जीव भांड्यात पडला. माझ्या व्यवसायामुळे येणाऱ्या रात्री अपरात्रीच्या फोनना कंटाळून, भारताबाहेर फिरायला पडले की मी फोन वापरायचे टाळते. पण यावेळी मात्र फोन असायला हवा होता असे वाटले.

आपण पत्ता विचारल्यावर सर्वसाधारण अमेरिकन माणसे शक्य तेवढी  मदत करतात किंवा माहिती नसल्यास तसे सांगून मोकळे होतात. त्या कॉलेजकुमारासारखे  स्वत:हून मदतीसाठी पुढे येणारे अमेरिकन्स फारसे बघायला मिळत नाहीत. अर्थात, त्या अमेरिकन मुलाने त्याच्या दृष्टीने योग्य तोच पत्ता आम्हाला सांगितला होता. पण मिडवेल अव्हेन्यू नावाचे दोन जुळे भाऊ विल्शर बूलेवार्दच्या अल्याड-पल्याड स्थायिक आहेत याचा त्या बिचाऱ्यालाही कदाचित पत्ता नव्हता!"
काही इरसाल पुणेकर मुद्दाम चुकीचा रस्ता सांगून बाहेरच्या माणसाची गंमत बघतात" असे पुण्याबाहेरचे बरेच लोक सांगतात. 'तशा' पुणेकरांच्या 'पुणेरीपणाला' पुण्याबाहेरचेच नव्हे तर बाहेरून येऊन पुण्यात स्थाईक झालेले आमच्यासारखे लोकही नावे ठेवतात.
यावरून आणखी एक गंमत आठवली. अमेरिकेत काही वर्षांपूर्वीच बाहेरून येऊन स्थाईक झालेले लोक, वेगवेगळ्या कारणांसाठी अमेरिकन संस्कृतीच्या नावाने बोटे मोडतात. त्या गंमतीबद्दल पुढच्या लेखात…