शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

१४. अमेरिकेच्या नावाने….!

अमेरिकेला पोहोचल्याबरोबर आणि परत भारतात आल्यानंतरही काही काळ, मला जेट-लॅगचा फार त्रास होतो. विचित्र वेळी जाग येते आणि काही केल्या परत झोप येत नाही. आमच्या पहिल्या अमेरिका भेटीत, बॉस्टनमध्ये असताना एक दिवस, पहाटे चार-साडेचार पासून मी जागी होते. तासाभरात आनंद जागा झाल्यावर आम्ही बाहेर फिरायला निघालो. बरेच चालल्यानंतर  भूक लागल्याची जाणीव झाली. एक 'सबवे आउटलेट' दिसले आणि आम्ही त्यात शिरलो. अगदी भारतीयच वाटावी अशी एक मुलगी आमची ऑर्डर घ्यायला आली, त्यामुळे आम्ही जरा सुखावलो.आत ती एकटीच होती आणि बाहेर फक्त आम्ही दोघेच गिऱ्हाइक होतो. आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर तीही खूष झाली आणि आमच्याशी लगेच हिंदीमध्ये बोलायला लागली. मूळ बांगलादेशची ही मुलगी, दहा-बारा वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेली होती. 

अमेरिकेतल्या 'सबवे' वगैरे दुकानात खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करणे मला तेंव्हा फार त्रासाचे वाटायचे. "हा सॉस का तो सॉस, हे टॉपिंग का ते टॉपिंग", असले हजार प्रश्न तिथे विचारतात. या मुलीने मात्र मोठ्या आस्थेने, आम्ही काय घ्यावे काय नाही याचा  सल्ला दिला आणि सढळ हाताने चीझ घालून आम्हाला एक 'फूटलाँग' बनवून दिला. "इच्छा असूनही मी तुमचे बिल कमी करू शकत नाही, पण माझ्यातर्फे दोन चॉकलेट कुकीज घ्या",  असे सांगून शेवटी तिने अगदी प्रेमाने आम्हाला निरोप दिला !
आधी, आमच्यासाठी 'फूटलाँग' बनवत असताना, ती मुलगी गप्पाही मारत होती. बोलता बोलता अमेरिकन लोकांच्या 'थंडपणावर'  ती घसरली. अमेरिकन लोकांचे अगदी निर्लेप असणे, जेवढ्यास तेवढे  म्हणजे अगदी "cut & dry" बोलणे आणि 'Business-like' वागणे या सगळ्याचा तिला फार त्रास होत होता. तिच्या म्हणण्यात तथ्य होते आणि तिला त्याचा त्रास होणेही स्वाभाविकच होते. एकीकडे, अमेरिकेत स्थायिक होण्यामुळे मिळालेले आयुष्य तिला सुखाचे वाटत होते, तर दुसरीकडे आपल्या भागातल्या लोकांचा मनमोकळेपणा, बोलकेपणा आणि प्रेम आठवून बांगलादेश सोडून आल्याचे तिला वाईटही वाटत होते. आपल्या समाजामध्ये आणि नातेसंबंधांमध्ये ओलावा, आपुलकी आणि आदरातिथ्य अजूनतरी थोडेफार टिकून आहे. पण अमेरिकन लोकांचे अंधानुकरण करता-करता भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही अशी थंड आणि निर्लेप वृत्ती आता  हळू हळू फोफावते आहे याची तिला बिचारीला कदाचित कल्पनाही नसेल.

दुसऱ्या वेळी अमेरिकेला जाताना आम्ही लुफ्तांसा कंपनीच्या विमानाने फ्रॅंकफुर्टला विमान बदलून पुढे गेलो होतो. फ्रॅंकफुर्ट-शिकागो प्रवासात माझी आणि आनंदची फारकत झाल्यामुळे मला एका गोऱ्या मड्डमशेजारी जागा मिळाली. अमेरिकेला जाणारी गोरी बाई म्हणजे माझ्या दृष्टीने ती अमेरिकनच होती. प्रत्यक्षात, ती बाई जर्मन असल्याचे बोलण्याच्या ओघात कळले. नंतर आमच्या छान गप्पाही चालू झाल्या. आम्ही जर्मनीत कुठे-कुठे हिंडलो आणि काय-काय बघितले, हे जाणून घेण्यात तिला रस होता. पण आम्ही अमेरिकेला चाललोय आणि फ्रॅंकफुर्टला आम्ही फक्त विमान बदलले, हे ऐकल्यावर ती जरा हिरमुसली. मग त्या बाईने अमेरिकेच्या संस्कृतीवर - खरंतर असंस्कृतपणावर - भरपूर तोंडसुख घेतले. सर्व पाश्चिमात्य देशातल्या तमाम गोऱ्यांची संस्कृती ही साधारण एकच असते, अशी तोपर्यंत माझी समजूत होती. आणि, भारतीय संस्कृतीच्या वृथा अभिमानातून निर्माण झालेल्या माझ्या संकुचित वृत्तीमुळे आणि अज्ञानामुळे  मी सर्वच पाश्चिमात्त्यांना संस्कृतीहीन समजत होते. मात्र पुढचे काही तास, 'युरोपियन सुसंस्कृतपणा', 'जर्मन नागरिकाचे सभ्य वर्तन' आणि 'अमेरिकन अससंस्कृतपणा' या विषयांवर माझी शिकवणीच त्या बाईने घेतली! अमेरिकेला इतकी नावे ठेवणाऱ्या या बाईला केवळ कामानिमित्त नाइलाजास्तव अमेरिकेला जावे लागत असणार, याची मला खात्रीच होती. तरीही मी तिला विचारलं, "तू अमेरिकेला का निघाली आहेस"? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती मूळची जरी जर्मन असली तरी, गेले वीस-एक वर्षे अमेरिकेत स्थायिक होऊन अमेरिकेचे नागरिकत्व पत्करलेली होती!

तिसरा अनुभव यावेळच्या फेरीत आला. कॅलटेक विद्यापीठात अनिरुद्धचा पदवीदान समारंभ झाल्यावर आम्ही संध्याकाळच्या शेवटच्या मेट्रोने आशयच्या घरी परत निघालो होतो. त्यावेळी मेट्रो स्टेशनावर आम्ही दोघे आणि एक मिचमिच्या डोळ्याची, पिवळ्या कांतीची मध्यमवयीन बाई, इतकेच प्रवासी  होतो. ती बाई  आमच्याच डब्यात चढली. तास-दीड तासाचा प्रवास होता. त्या बाईने हसून स्वत:हून माझ्याशी बोलायला सुरुवात केली.  मोलकरीणीचे काम करणारी, अगदी साध्या कपड्यातली ही चीनी बाई, भारतात नुकत्याच आलेल्या मोदी-सरकारविषयी खबर ठेऊन होती! ती अगदी चीनी ढंगाची इंग्रजी भाषा बोलत होती. आमच्या मुलाला 'कॅलटेक' या मान्यवर विद्यापीठातून फिजिक्ससारख्या 'कठीण' विषयांत पदवी - आणि तीही 'ऑनर्स'सह -  मिळाल्याचे कळल्यावर तर ती एकदम बोलतच सुटली. "आपली मुले खूपच हुशार असतात. इथली अमेरिकन मुले म्हणजे अगदी मठ्ठ! गणित, सायन्स आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये अमेरिकन पोरांना मुळीच गति नसते. ती फक्त मोबाईलवर गेम्स खेळत बसतात, अभ्यासासाठी कष्ट घ्यायची त्यांची अजिबात तयारी नसते. थोड्याच वर्षांमध्ये चीन, कोरिया आणि भारतातील मुलेच उच्चशिक्षित होऊन या सगळ्या अमेरिकन मुलाना पार मागे टाकणार आहेत.  इथल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि सगळे व्यवसाय आपल्याच लोकांच्या हाती येणार आहेत." हे सगळे ती अगदी "हिंदी-चीनी भाई-भाई" च्या आवेशात बोलत होती,पण स्वत: मात्र पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकन नागरिकत्व पत्करलेली बाई होती!

पुण्याबाहेरचे लोक नेहमीच खुद्द पुणेकरांच्या "पुणेरी" वृत्तीला आणि "पुणेरी संस्कृतीला" नावे ठेवतात.  पण त्याचबरोबर पुण्यामध्ये स्थायिक व्हावे, पुण्यामध्ये मुलांनी शिकावे किंवा निदान मुलीला पुण्यातले स्थळ मिळावे, यासाठी त्यांची कमालीची धडपड चालू असते. महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातील इतर राज्यातील लोकांनासुद्धा पुण्याला यायचे असते. पण  बाहेरून येऊन पुण्यात स्थायिक झालेले, अगदी पंधरा-वीस वर्षे इथे काढलेले माझ्यासारखे लोकदेखील, स्वत:ला 'पुणेकर' म्हणवून घ्यायला सहज तयार नसतात.  तसेच काहीसे अमेरिकेच्या बाबतीत आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले देशोदेशीचे बरेच लोक, जाता-येता अमेरिकेला आणि अमेरिकन संस्कृतीला नावे ठेवत असतात. पण त्याचबरोबर, अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी आणि मुलांना अमेरिकेत शिकायला पाठवण्यासाठी सर्वच देशातले लोक धडपडत असतात हेही खरे आहे. पुण्याबद्दल, 'पुणे तिथे काय उणे?' आणि अमेरिकेला 'Land of dreams' किंवा 'Land of opportunities'  म्हणतात ते काही उगीच नाही!

इतकी वर्षे पुण्यात राहिल्यांनंतरही "पुणेरी वृत्ती" किंवा "खास पुणेरी" व्यक्तींची मी थोडी चेष्टा करते हे पाहून कुणी-कुणी आक्षेप घेतात, किंवा, "तुला हे बोलण्याचा अधिकार नाही" असे सुनवतात. मात्र, जन्मतः पुण्याची नसल्याने, साक्षात लोकमान्य टिळकांच्या आवेशात मला सांगावेसे वाटते," पुणेरी वृत्तीला नावे ठेवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा