शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

१३. मिडवेल अव्हेन्यू मिळाला !

वेस्टवूडकडे जाणाऱ्या बारा वाजताच्या बसमध्ये बसेपर्यंत आम्ही चांगलेच दमलेले होतो. आता कुठे काही गडबड व्हायला नको असे वाटत होते. त्यामुळे आशयचे घर, म्हणजेच मिडवेल अव्हेन्यूसाठी कुठे उतरायचे, ही  चौकशी आम्ही बसमध्ये चढता चढताच चालकाकडे केली. आमचे ते बोलणे ऐकल्याबरोबर बसमधला एक विद्यार्थी म्हणाला," मी पण वेस्टवूडला उतरून, मिडवेल अव्हेन्यू पार करून पुढे  जाणार आहे. मी उतरणार आहे तिथेच तुम्ही उतरा आणि माझ्या मागे मागे या. मी तुम्हाला रस्ता दाखवतो." हे ऐकल्यावर आम्ही निर्धास्त झालो. बस मधून उतरल्यावर हात उंचावून रस्ता दाखवत त्याने आम्हाला सांगितले, "समोरचा मोठा रस्ता दिसतोय तो आहे विल्शर बूलेवार्द. तो पार करून पुढे जायचे. किनरॉस अव्हेन्यू पार करून वेबर्न प्लाझा पकडायचा. डावीकडची तीन वळणे सोडून चौथे वळण घेतले की थेट तुम्ही मिडवेल अव्हेन्यूलाच पोहोचाल."
आम्ही पुण्याहून निघताना गूगलवर घराचा नकाशा बघून ठेवला होता. आमच्या आठवणीप्रमाणे, हा मुलगा दाखवत होता त्याच्या विरुद्ध दिशेला आम्ही जायला पाहिजे होते. त्यामुळे आम्ही बुचकळ्यात पडलो. तुझे काही चुकत तर नाही आहे ना? असे त्याला विचारूनही बघितले. पण तुमची नकाशा बघण्यात काहीतरी चूक झाली असेल, असे तो अगदी छातीठोकपणे म्हणाल्यामुळे आम्ही त्याच्या मागून गेलो. आमच्या दोन मोठ्या, चाके असलेल्या बॅगा ओढत त्याच्या मागे जाताना आम्ही फार भरभर चालू शकत नव्हतो. थोडा वेळ आमच्या बरोबर चालल्यानंतर, "मला जरा गडबड आहे, मी पुढे होतो." असे सांगून तो ताड ताड पुढे चालत निघून गेला. आम्ही त्याने दाखवलेल्या रस्त्याने चालत राहिलो.

अमेरिकेत बऱ्याचशा छोट्या मोठ्या रस्त्यांवरही चाके असलेल्या बॅगा, व्हीलचेअर वगैरे चालवायला आणि फुटपाथवरून खाली आणि वर जाण्यासाठी उतार केलेला असतो. पादचाऱ्याना रस्ता पार करण्यासाठी, सिग्नलवर पांढऱ्या रंगाच्या मनुष्याकृतीचा दिवा येण्याची वाट बघावी लागते. काही काही कमी रहदारीच्या रस्त्यावर, फुटपाथवरील खांबावरचे एक बटण दाबले की मगच तसा पांढरा दिवा येतो आणि त्यानंतरच रस्ता पार करता येतो. "घुसेल त्याचा रस्ता" हा पुणेरी नियम तिथे अजिबात लागू होत नाही. अगदीच छोट्या रस्त्यांवर पादचाऱ्यासाठी पांढऱ्या दिव्याची सोयही नसते. पण आपण रस्ता पार करू पाहतोय असे दिसले तरी वाहनचालक थांबतात आणि अगदी अदबीने आपल्याला वाट देतात. पुण्यासारख्या शहरातून गेल्यानंतर अमेरिकेतल्या चालकांकडून मिळणारी ही वागणूक अगदी सुखद वाटते.

त्या कॉलेजकुमाराने दाखवलेला मोठा रस्ता आम्ही पार केला. आता पुढचा रस्ता चढणीचा होता. सामान ढकलत, धापा  टाकत आम्ही डाव्या हाताच्या चौथ्या वळणाला वळलो आणि काय! समोर मिडवेल अव्हेन्यूची पाटी वाचून अगदी हुश्श झाले. आम्ही पोहोचलो होतो त्या कोपऱ्यावरच्या घरांचे क्रमांक सहाशेपासून चालू होत होते. आम्हाला तेराशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाचे घर शोधायचे होते. आम्ही पुढचा चढणीचा रस्ता चढायला लागलो. पण पुढे पुढे घरांचे क्रमांक कमी होत चालले आहेत असे आमच्या लक्षात आले. म्हणजेच आम्ही शोधत असलेले तेराशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाचे घर आम्हाला पुढे मिळणार नव्हते! आता आमची चांगलीच पंचाईत झाली. रस्ता निर्मनुष्य, विचारायचे तरी कुणाला?

इतक्यात एक विद्यार्थिनी दिसली. आम्ही तिला विचारले पण ती तिथे नवीनच राहायला आलेली होती आणि तिला आसपासची माहिती नव्हती. तरी तिने लगेच तिच्या स्मार्ट फोन  वर गूगलचा नकाशा काढला. बराच वेळ खटपट करूनही तिला तेराशे अठ्ठ्याहत्तर मिडवेल अव्हेन्यू काही सापडेना. ती मुलगी निघून गेली आणि दुपारी दोन वाजताच्या सुमारास, त्या सुनसान रस्त्यावर आता पुन्हा आम्ही दोघेच राहिलो. 'एक ते चार कुणीही दारावरची  घंटा वाजवू नये' अशी 'पुणेरी पाटी' कुठेही नसली, तरीही मनावर संस्कार असतातच नां! कुठल्या घराचे दार ठोठावायची हिम्मत होईना. तेवढ्यात एक माणूस गाडीत बसून घरातून बाहेर पडताना दिसला. आनंदने जवळ जवळ धावतच जाऊन त्या माणसाला गाठले आणि पत्ता विचारला. तो तिथलाच रहिवाशी असल्यामुळे माहितगार होता. त्याने आम्हाला सांगितले की सहाशेपासूनची पुढची घरे विल्शर बूलेवार्दच्या पलीकडच्या मिडवेल अव्हेन्यूवर आहेत! म्हणजे आम्ही बरोब्बर उलट्या दिशेला २ कि. मी. चढण चढत आलेलो होतो!

अमेरिकेतल्या रस्त्यांवर आपल्या इथल्यासारख्या रिक्षा नाहीत. रस्त्यांवरून बऱ्याच Taxi धावताना दिसत असल्या तरी हात केल्यावर त्या थांबत नाहीत. आधी फोन करून Taxi बोलवायाची असते. कुणाला लिफ्ट मागायची तर सोयच नाही. पुण्यातले रिक्षावाले उध्दट असतात म्हटलं तरी चार-सहा जणांकडून नकार घेतल्यानंतर एखाद्याला तरी आपली दया येतेच. पण इथे तीही सोय नव्हती. पुन्हा सामान घेऊन उलटे चालत जाणे भाग आहे,  हे आम्हाला कळल्यामुळे आम्ही हबकलो. पण 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत, सामान फरफटत आम्ही पुन्हा उलटे चालत निघालो. तो उलटा रस्ता उताराचा असला तरीही त्यावेळी आम्हाला अतिशय कष्टाचा वाटत होता .

पंधरा वीस मिनिटांच्या तंगडतोडीनंतर आम्ही तेराशे अठ्ठ्याहत्तर मिडवेल अव्हेन्यू या पत्त्यावर पोहोचलो. दुमजली इमारतीतील तळमजल्यावर आशयचा स्टुडियो फ्लॅट होता. आशयने आमच्यासाठी लपवून ठेवलेली घराची किल्ली शोधून घरात शिरेस्तोवर जवळ-जवळ दुपारचे तीन वाजत आले होते. घरी पोहोचल्यावर आधी इंटरनेट वरून शिकागोमध्ये असिलताशी आणि कॅलटेकमध्ये अनिरुद्धशी संपर्क साधला. तसं पाहता, टेक्नॉलजीमुळे गोष्टी खूप सुकर झाल्या असल्या तरी चिंताही वाढल्या आहेत. आमचे विमान लॉस एंजेलिस विमानतळावर सकाळी दहा वाजता पोहोचलेले मुलांना इंटरनेट वरून कळलेले होते. त्यांच्या अंदाजाप्रमाणे आम्ही बारा वाजेपर्यंत आशयच्या घरी पोहोचायला पाहिजे होते. दोन वाजून गेले तरीही आम्ही अजून पोहोचलेलो नाहीत हे कळल्यामुळे ती दोघेही चिंतेत होती. आमच्या फोनमध्ये तिथले लोकल कार्ड नसल्यामुळे मुलांना फोनही केलेला नव्हता. पण आमच्याशी बोलणे झाल्यामुळे दोघांचाही  जीव भांड्यात पडला. माझ्या व्यवसायामुळे येणाऱ्या रात्री अपरात्रीच्या फोनना कंटाळून, भारताबाहेर फिरायला पडले की मी फोन वापरायचे टाळते. पण यावेळी मात्र फोन असायला हवा होता असे वाटले.

आपण पत्ता विचारल्यावर सर्वसाधारण अमेरिकन माणसे शक्य तेवढी  मदत करतात किंवा माहिती नसल्यास तसे सांगून मोकळे होतात. त्या कॉलेजकुमारासारखे  स्वत:हून मदतीसाठी पुढे येणारे अमेरिकन्स फारसे बघायला मिळत नाहीत. अर्थात, त्या अमेरिकन मुलाने त्याच्या दृष्टीने योग्य तोच पत्ता आम्हाला सांगितला होता. पण मिडवेल अव्हेन्यू नावाचे दोन जुळे भाऊ विल्शर बूलेवार्दच्या अल्याड-पल्याड स्थायिक आहेत याचा त्या बिचाऱ्यालाही कदाचित पत्ता नव्हता!"
काही इरसाल पुणेकर मुद्दाम चुकीचा रस्ता सांगून बाहेरच्या माणसाची गंमत बघतात" असे पुण्याबाहेरचे बरेच लोक सांगतात. 'तशा' पुणेकरांच्या 'पुणेरीपणाला' पुण्याबाहेरचेच नव्हे तर बाहेरून येऊन पुण्यात स्थाईक झालेले आमच्यासारखे लोकही नावे ठेवतात.
यावरून आणखी एक गंमत आठवली. अमेरिकेत काही वर्षांपूर्वीच बाहेरून येऊन स्थाईक झालेले लोक, वेगवेगळ्या कारणांसाठी अमेरिकन संस्कृतीच्या नावाने बोटे मोडतात. त्या गंमतीबद्दल पुढच्या लेखात…  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा