शनिवार, २० डिसेंबर, २०१४

१५. पेनी वाईज!

मिड्वेल अव्हेन्यूवर असलेल्या आशयच्या घरी पोहोचलो, आंघोळी उरकल्या, थोडेफार काहीतरी खाल्ले आणि मग सरळ ताणून दिली. जाग आली तेंव्हा संध्याकाळचे सात वाजत आले होते. रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हातपाय हलवणे आवश्यक होते. अमेरिकेत भाड्याच्या फ्लॅटमध्येसुद्धा फ्रीज, मायक्रोवेव्ह, गॅस, ओव्हन, सेन्ट्रल हीटिंग आणि इंटरनेट अशा सर्व सुविधा उपलब्ध असतात. चोवीस तास वीज, पाणी, आणि गरमपाण्याचीही सोय असते. भाडेकरूला या सर्व सोयी-सुविधांचे वेगळे पैसे लावले जात नाहीत. क्वचित काही वेळा "युटिलिटीज" या नावाखाली, थोडे जास्तीचे पैसे मोजावे लागतात. वीज, पाणी, उष्णता वगैरे गोष्टींचा तुम्ही किती वापर करता त्यावर किती पैसे ते अवलंबून असते. एखाद्या  इमारतीतल्या आठ ते दहा फ्लॅटसाठी मिळून तीन ते चार अशी वॉशिंग मशीन आणि एखाद-दोन ड्रायर असतात. सर्वसाधारणपणे ही मशीन्स इमारतीच्या तळघरामध्ये ठेवलेली असतात. कपडे धुण्यासाठी वेगळे आणि वाळवण्यासाठी वेगळे असे ठराविक पैसे मशीनमध्ये घातल्यावरच, ही मशीन्स चालतात. त्या मशीनमध्ये घालण्यासाठी अमेरिकेतील 'पावली' म्हणजे क्वार्टरची नाणीच लागतात. प्रत्येक वेळी योग्य तेवढी नाणी मशीनमध्ये टाकायची, साबण घालायचा, आपल्याला हवा तो प्रोग्रॅम निवडायचा, पाण्याचे तापमानही ठरवायचे आणि मशीन चालू करायचे. मशीनमधून कपडे धुऊन निघाले की ते काढून ड्रायरमध्ये घालायचे, पुन्हा कपडे वाळवण्यासाठी काही क्वार्टर घालायचे अशी पद्धत असते. ती वॉशिंग मशीन्स आपल्या घरातल्या मशीन्सपेक्षा बरीच मोठी असतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे एका माणसाच्या कपड्यांसाठी आठवड्यातून एखादेवेळी मशीन लावले तरीही पुरते. ड्रायरमधून कपडे फिरवून काढले की ते पूर्ण वाळून येतात आणि हाताला अगदी गरम लागतात. बाहेर काढल्या काढल्या लगेच छान दाबून घड्या करून ठेवले की कपडे अगदी इस्त्री केल्यासारखे दिसतात.

आशयच्या घरीसुद्धा सगळ्या सोयी होत्याच. बाहेर एक प्रशस्त खोली, त्यामध्ये एकाबाजूला मोठा पलंग दुसऱ्या बाजूला सोफा-कम-बेड आणि टेबल-खुर्ची ठेवलेली होती. आत एका बाजूला स्वयंपाकघर आणि दुसऱ्या बाजूला मोठी बाथरूम असे सर्व सोयीने सुसज्ज आणि नेटके असे ते घर होते. झोपेतून उठल्याबरोबर मी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. सगळी कपाटे उघडून साफसफाई केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्या कपाटांमध्ये बराच किराणामाल सापडला. आशयच्या घरात हिंग, मोहरी चिंच-गुळापासून ओरेगानोपर्यंत आणि पोह्यांपासून ते पास्तापर्यंत सगळ्याच गोष्टी मला मिळाल्या. पूर्वी ज्या विषयात आशय काठावरही पास होण्याची शक्यता नव्हती त्या विषयात म्हणजे पाककलेत त्याला अचानक रस निर्माण झाला की काय? अशी मला शंका आली. पण दोन दिवसांनंतर आशय परत आला आणि त्याने खुलासा केला. त्याच्या कॉलेजमधले एक मूळचे भारतीय प्राध्यापक, नुकतेच अमेरिकेतले आपले घर बंद करून भारतामध्ये परत गेले होते. जाताना त्यांच्या घरातले उरलेले सामान त्यांनी आशयला दिले होते. आशयकडे ते खाण्याचे सामान पडूनच होते. मी येणार हे कळल्यावर त्याला अगदी हुश्श झाले होते. मी त्यातले बरेचसे सामान सत्कारणी लावणार याची त्याला खात्री होती. ते सर्व सामान बघितल्यानंतर मला कळले की बाहेरून फक्त दूध, भाजीपाला आणि फळे आणले की भागणार होते.

मग बाहेरची खोलीही आवरायला लागलो. आशयच्या घरी आणि आमच्या मुलांच्याही खोल्यांमध्ये नेहमीच अमेरिकन नाण्यांचा साठा असतो. अमेरिकेत कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी मशीनमध्ये क्वार्टरची नाणीच लागतात. त्यामुळे ती नाणी या मुलांनीअगदी जपून वेगळी ठेवलेली असतात. एक डॉलरची नाणीही  वापरली जात असल्यामुळे, तीही जपून ठेवलेली असतात. पण पेनी (१ सेंट), निकेल (५ सेंट), डाइम (१० सेंट) अशा छोट्या किंमतीच्या नाण्यांचा साठा मात्र कुठेतरी एखाद्या मोठ्या डब्यात किंवा टोपलीमध्ये पडलेला असतो. अमेरिकेत शिकणारी आपली मुले, अशी अमेरिकन चिल्लर निदान जमा तरी करत जातात. आपल्या  मुलांना त्या पैशांची इतपत किंमत असते. पण सर्वसाधारण अमेरिकन मुलांना पेनी, निकेल आणि डाइमची काहीच किंमत नसते असे वाटते. तळघरातल्या वॉशिंग मशीन्सच्या जवळपास, कॉलेजच्या आवारात इकडे-तिकडे, अशी ही नाणी पडलेली दिसतात. कधी-कधी सुटे नसले, की अमेरिकन लोक सहज एक-दोन डॉलरसुद्धा वर देऊन टाकतात. मात्र वॉशिंग मशीन्स किंवा ड्रायरमध्यॆ वापरायला लागतात म्हणून, हे लोक जास्तीचे पैसे देऊन दुकानातून क्वार्टरच्या नाण्याचा रोल खरेदी करतात!

आम्हाला प्रत्येक पेनीच्या जागी साठ पैसे, निकेलच्या जागी तीन रुपये आणि डाइमच्या जागी सहा रुपये दिसायला लागतात. साहजिकच आहे म्हणा, आम्ही आपले रिक्षेवाल्याला मीटरप्रमाणे मोजून सतरा रुपये देणारे लोक! पुण्यात एखाद्या रिक्षेवाल्याने सतराच्या जागी वीस रुपये मागितले, की पुढची कमीतकमी तीन मिनिटे, बिनकामाची कमाई कशी वाईट असते, हे सांगून मी त्याचे बौद्धिक घेते! कधी कधी अशा रिक्षेवाल्यांचा निषेध करणारे खरमरीत पत्र लिहून, दै. 'सकाळ' मध्ये छापून आणावे असेही माझ्या मनात येते. नाही म्हटलं  तरी गेल्या वीस वर्षांपासून पुण्यात राहते आहे मी! 
सांगायचा मुद्दा म्हणजे, क्वार्टर आणि डॉलरची नाणी वगळता इतर नाण्यांचा साठा आम्ही गेल्या-गेल्या सुपर मार्केट मध्ये किवा बसमध्ये खपवतो. अलिबाबाला गुहेतला खजिना मिळाल्यावर झाला असेल त्यापेक्षाही जास्त आनंद, या मुलांच्या घरातला अमेरिकन नाण्यांचा साठा बघितला की आनंदला होतो! मग ती नाणी वेगवेगळी करणे आणि त्यांच्या पुरचुंड्या बांधण्याचा उद्योग सुरु होतो. मीही अलीबाबाच्या बायकोप्रमाणे, आनंदला लागेल ती मदत करायला सरसावते. त्यानंतर मग त्यातली एखादी पुरचुंडी बरोबर घेऊन आम्ही खरेदीला बाहेर पडतो. शेकडो पेनींची अशी मोठ्ठी पुरचुंडी किंवा पिशवी बघितली, की सुपरमार्केट मधल्या बिलिंग काउंटर वरच्या बायका-पुरुषांची अगदी भंबेरी उडते. पण एक मात्र पाहिलं आहे. ती माणसे कधीही, नाणी घ्यायला कुरकुर करत नाहीत किंवा तोंड वाकडे करत नाहीत. पण त्याचबरोबर काही वेळा अगदी मजेशीर अनुभव येतात.

मोठ्या स्टोअर्स मध्ये नाणी मोजायची मशिन्स असतात. आम्ही नाण्यांचे पुडके दिल्यावर, लाऊड स्पीकरवर पुकारा करून त्या बिलिंग काउंटरवर नाणी मोजण्याचे मशीन मागवले जाते. जिथे तसे मशीन नसते, तिथल्या काही जणांना इतकी नाणी मोजायची कशी आणि त्यांची बरोबर बेरीज करून रक्कम किती ते कसे ठरवायचे हे समजतच नाही. मग आम्हालाच त्यांना मदत करावी लागते. काही वेळा एखाद-दुसऱ्या दुकानांत आमच्याकडे कुणी संशयाने बघतात. तुम्ही इतकी नाणी कुठून आणली? असेही विचारतात. मग त्या सेल्समनना तो खुलासा करताना आनंदला खूप  मजा येते .
आमच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यामध्ये आशयकडच्या पेनी, निकेल, डाइमची सर्व चिल्लर आम्ही अशाच प्रकारे सत्कारणी लावली होती. दुसऱ्या वेळी म्हणजे २०१२ साली, आम्ही अनिरुद्धच्या हॉस्टेलवर राहिलो होतो. तिथेही असाच उद्योग केला होता. यंदा, २०१४ साली पुन्हा आम्ही आशयच्या घरी उतरलो होतो. पहिल्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी, मी आणि आनंदने आशयकडच्या असलेल्या सगळ्या खुरद्याची वर्गवारी करून ठेवली. मग पेनीचे पुडके घेऊन खरेदीला गेलो. आमच्या दौऱ्यांमधल्या पुढच्या काही दिवसांतच आशयकडे जमा झालेली जी चिल्लर आम्ही संपवली ती जवळ-जवळ ३०-३५ डॉलर एवढी भरली.
प्रत्येक वेळी या मुलांच्या घरून निघताना आम्ही त्यांच्याकडचे ओझे कमी करतो आणि वापरलेल्या चिल्लरच्या बदल्यात बंदे डॉलर्स आणि क्वार्टर त्यांच्यासाठी ठेवून निघतो. इतके पैसे आपल्याकडे होते हे अचानक कळल्यावर ते आश्चर्यचकितच होतात. आम्हाला मात्र अगदी 'पेनी वाईज डॉलर स्मार्ट' झाल्यासारखे वाटते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा