गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

6. अब अच्छे दिन आनेवाले है

शकीलचे कुटुंबीय भारताकडे रवाना झाल्यावर, आपले लोक दूर गेल्याच्या भावनेने आमच्या मनांत पोकळी निर्माण झाली. थोड्या वेळाने मी प्रसाधनगृहात गेले त्यावेळी घडलेला प्रसंग. भाषा आणि पेहरावावरून भारतीय वाटाव्या अशा एका बाईने अचानक माझ्याजवळ येऊन, मला कुठल्याशा दाक्षिणात्य भाषेत काहीतरी विचारले. अंदाजे तिच्या प्रश्नाचा अर्थ लावत मी तिला इंग्रजीमधून उत्तर दिले. त्याच बरोबर हातवारे करत तिला माझे उत्तर समजावूनही दिले. तिची भाषा आणि तिचा वेश बघून मला ती भारतीयच असणार अशी खात्री वाटली होती. म्हणून मी तिला विचारले, " केरळ  या तामिळनाडू?" नकारार्थी मान हलवत ती म्हणाली, "नो, नो इंडिया, श्रीलंका". मग आम्ही दोघीं एकमेकींकडे बघून हसलो आणि निरोप घेऊन बाहेर पडलो.

त्याचवेळी बाहेर, आनंदलाही असाच काहीसा अनुभव आला. त्याच्या शेजारी, हिरवी मुसलमानी टोपी घातलेला एक पुरुष येऊन बसला आणि ओळखीचे हसून हात हलवू लागला. आपली ओळख नसताना हा मनुष्य आपल्याकडे बघून का हसतो आहे, हे आनंदला  काही केल्या कळेना. आनंदच्या चेहऱ्यावरील गोंधळलेला भाव पाहून, जवळ सरकत त्या माणसाने विचारले,"इस्लामाबाद?" त्या माणसाला कदाचित, "तुम्ही इस्लामाबादचे आहात का? किंवा इस्लामाबादला चालला आहात का?असे विचारायचे असावे. पण आनंदने त्याच्या  प्रश्नाचा सोयीस्कर अर्थ घेऊन, हसून उत्तर दिले ,"No, Los Angeles". मग त्याने आनंदला आपुलकीने सांगितले,"हम इस्लामाबाद जा रहें हैं" त्या  पाकिस्तानी व्यक्तीच्या चेहऱ्यावर, आपल्या माणसाला भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता म्हणे. एकाच वेळी आम्हाला दोघांना आलेले हे अनुभव आम्ही एकमेकांना सांगितले आणि दोघेही मनसोक्त हसलो.

थोड्या वेळात भारतीय मुस्लिम वाटावेत असे नवराबायको दोन लहानग्या मुलांना घेऊन आमच्याजवळ येऊन बसले. मी आणि ती बाई  हळूहळू मोकळेपणाने बोलू लागलो.  हे मूळचे पाकिस्तानी कुटुंब कॅनडात स्थायिक झालेले होते. त्या बाईचा नवरा  कॅनडामध्ये taxi चालवून चांगले पैसे मिळवत होता. त्यामुळे त्यांचे राहणीमान उंचावलेले होते. आर्थिक कारणामुळे पाकिस्तानात परत जाणे शक्य नसले, तरी ती दोघे मनाने मात्र अजून कराचीमध्येच होती. मुलाच्या शाळेला सुट्टी लागल्यावर ते लगेच पाकिस्तानला निघाले होते. आपल्या देशांत काही काळासाठी परत जाण्याच्या कल्पनेने ते उल्हसित झालेले होते. त्या दोघांशी बोलताना पुन्हा आम्हाला तोच आपलेपणाचा अनुभव आला.

रात्रीचे अकरा वाजून गेले. फारशी भूक जाणवत नसली तरी आम्ही उरलेल्या कूपनवरचे जेवण घ्यायचे ठरवले. बऱ्याचशा टेबल्सपाशी कोणीना कोणीतरी बसलेले होते. एकच  टेबल रिकामे दिसल्याबरोबर मी ते पकडले. आनंद जेवण घेऊन आला.  इतक्यात एका माणसाने  आमच्या टेबलाजवळ येऊन," मी तुमच्या जवळ बसू का?" असे इंग्रजीमधून विचारले. आम्ही होकार दिल्यावर तो बसला आणि गप्पा मारू लागला. इफ्तेखार नावाचा हा मनुष्य मूळचा बांगलादेशी नागरिक होता. गेली पंचवीस एक वर्षे कॅनडा मध्ये स्थायिक झालेला होता. त्याच्या बायकोने आणि मुलांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतलेले होते. पण त्याने मात्र आपले  बांगलादेशी  नागरिकत्व सोडलेले  नव्हते. तो  सौदी एयरलाइन्स मध्ये finance manager म्हणून  काम करत असल्यामुळे वरचेवर त्याला बांगलादेश, सौदी अरब, भारत आणि पाकिस्तान मध्ये जावे लागत होते. 

आश्चर्य म्हणजे, भारतातील राजकीय घडामोडींपैकी आम्हाला माहिती नसलेल्या कित्येक गोष्टी इफ्तेखारला इत्थंभूत माहिती होत्या. अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्या सभांमधले घडलेले सर्व तपशील तो आम्हाला सांगत होता. त्यामुळे भारत, बांगला देश आणि पाकिस्तान मधील राजकारण, सामाजिक व आर्थिक   परिस्थिती आणि राहणीमान यावर आमची जोरदार चर्चा झाली. आमचे बोलणे 'बांगला देशातील हिंदू लोक', या विषयाकडे वळले. इफ्तेखारच्या कुटुंबाचा आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबाचा खूप घरोबा आहे, हे त्याने आम्हाला आवर्जून सांगितले. हिंदू सण, ते साजरे करण्याची पध्दत, त्यासाठी होणारी  सजावट, पूजा आणि प्रसादाचे चविष्ट पदार्थ याबद्दलच्या त्याच्या सुखद आठवणी आम्हाला तो सांगत होता. 'हिंदु-मुस्लिम' यांच्यामधील तणाव' या विषयावर बोलताना इफ्तेखार म्हणाला, " मला minority हा शब्द अजिबात आवडत नाही. सगळे नागरिक समान असतात आणि सर्वांसाठी समान कायदे असले पाहिजेत. कॅनडात आणि अमेरिकेत तसे कायदे आहेत, म्हणूनच ते देश आज आपल्यापेक्षा बरेच प्रगत आहेत. आज सुद्धा तमाम नागरिकांसाठी समान कायदा ठेवून भारत, बांगला देश आणि पाकिस्तान एकत्र येऊ शकले, तर आपण खऱ्या अर्थाने 'Superpower' होऊ शकू. हे तिन्ही देश एकत्र येऊन एकसंध राष्ट्र व्हावे, हे वर्षानुवर्षे आम्ही मनांमध्ये   जपलेले स्वप्न, इफ्तेखारनेही उत्स्फूर्तपणे बोलून दाखवल्यामुळे आम्ही भारावून गेलो.

इफ्तेखार गेल्यानंतर आम्हाला लक्षात आले की, परभूमीवरच्या काही मिनिटांच्या सहवासातच, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेतील नागरिकांशी आमचे मनोमिलन झालेले होते. मग विचार आला, आता भारतामध्ये 'अच्छे  दिन' येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, तर 'आसेतु हिमाचल' असे एकच राष्ट्र झाले तर खऱ्या अर्थाने या तीनही राष्ट्रांना 'अच्छे दिन' येतील की काय, हे ही मनाला वाटून गेले. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत अशा एकसंध राष्ट्राची स्वप्ने बघत आणि दिवसभरात आलेले सर्व अनुभव मनांमध्ये  घोळवत, आम्ही लॉस एंजेलिसला निघालेल्या विमानात बसलो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा