गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

४. जेद्दाची जत्रा

जेद्दा  विमानतळावर थोडावेळ फेरफटका मारल्यानंतर, नादियाने दिलेले sandwiches  चे packet उघडले. एक-एक sandwich खाऊनच आमचे पोट भरले.  जेद्दा विमानतळ अगदीच साधा आणि टिचका आहे. तिथे थांबल्यावर क्षणभर मला, आपण एखाद्या तालुक्याच्या जत्रेच्या वेळी तिथल्या S T stand वरच्या वर्दळीत व सावळ्या गोंधळात उभे आहोत की काय असा भास झाला.  संपूर्ण जगभरातल्या वेगवेगळ्या देशांतले, अनेक भाषांचे, अनेकविध वेशातले आबालवृद्ध मुस्लिम भक्तांचे जथेच्या जथे तिथे सतत येत-जात होते. गर्दी, कलकलाट, पोरांचे रडणे, बायकांची बडबड आणि पुरुषांची पळापळ, काही विचारू नका. त्यातून अर्धे लोक बेताच्या आर्थिक परिस्थितीतले आणि इंग्रजीचा गंध नसलेले. जमिनीवर फतकल मारलेल्या बायका आणि त्यांच्या भोवती कलकलाट करणारी त्यांची शेंबडी पोरे बघून आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहोत असे मुळीच वाटत नव्हते.

'उमराह'साठी येणाऱ्या जथ्यातल्या प्रत्येक  यात्रेकरूच्या गळ्यात त्यांच्या tour operator च्या नावाची पिशवी अडकवलेली असते. त्यामुळे त्या त्या जथ्यातले सर्वजण एकत्र  राहतात आणि आपसूकच tour operator ची जाहिरात होऊन जाते. असे जत्थे बघून, मला प्राथमिक शाळेमधले वार्षिक स्नेह सम्मेलन आठवले. मुलामुलींच्या समूह नृत्यासाठी सर्व मुलींना एकसारखा, एखाद्या विशिष्ठ प्रांतातल्या बायका घालतात त्या पद्धतीचा पोशाख व सर्व मुलांना त्याच प्रांतातील पुरुष घालतांत तसा पोशाख दिलेला असतो. प्रत्येक वर्गाचा नाच वेगळा, त्यामुळे त्या वर्गातील मुला-मुलींची वेशभूषा वेगळी. त्या त्या वर्गांची नृत्याची पाळी आली की त्यांच्या वर्ग शिक्षिका त्या सर्व मुला-मुलींना एका रांगेत उभे करून शिस्तीने रंगमंचाकडे नेतात . अगदी तसेच आपापल्या जथ्याला रांगेने विमानाकडे नेण्याचे काम त्यांचे tour operators करत होते. लहानग्या मुलांनी कलकलाट करत, कधी रांग मोडत, आपापल्या शिक्षिकेच्या मागे जावे तसेच हे यात्रेकरूसुद्धा आपापल्या tour operator च्या मागे जात होते. हे सगळे बघत माझा वेळ मस्त जात होता.

मुंबई ते जेद्दा प्रवासात आमच्या बरोबर एक तरूण गोरे जोडपे होते. तेही आमच्यासारखेच   विमानतळावर वेळ काढत हिंडताना दिसले. मग त्यांच्याशी गप्पा झाल्या. मूळचे कॅलिफोर्नियाचे रहिवासी असलेले जेसन आणि जेनिफर, अमेरिकेतून पदवी घेऊन काही वर्षांपूर्वी भारतात हिंडायला म्हणून आले होते. पाच वर्षांपूर्वी भारतात business visa वर येऊन मुंबईतल्या  मानखुर्द  भागांत त्यांनी इंग्रजी संभाषणाचे क्लासेस चालू केले. गरीब वस्तीतल्या तरुणांसाठी अगदी बेताचे मासिक शुल्क घेऊन चालवलेला त्यांचा हा क्लास म्हणजे आम्हाला एकप्रकारची समाजसेवाच वाटली. मात्र दरवर्षीप्रमाणे, मुंबईच्या पावसाळ्यापासून सुटका मिळवणे आणि त्याच वेळी कॅलिफोर्नियातील सुखद हवा अनुभवणे, अशा दुहेरी हेतूने ते अमेरिकेला निघाले होते. त्यांची भाषा इंग्रजी असली तरी त्यांची देहबोली मराठी माणसांसारखीच होती आणि त्यांच्या इंग्रजी भाषेचा लहेजाही मराठमोळा होता. भारत, भारतीय आणि भारतीय खाद्य-संस्कृती याबद्दल ते आमच्याशी अगदी भरभरून बोलत होते. भारतातून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी भारतीयांची चाललेली धडपड आपण नेहमीच पाहतो . पण या अमेरिकन्सची भारतात स्थायिक होण्याची ओढ बघून मी मनोमन सुखावले .जेसन आणि जेनिफरशी बोलण्यात थोडा वेळ मजेत गेला. पुढचा काही काळ विमानतळावरच्या बाकड्यांवर झोपण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग बराच वेळ 'duty free  window-shopping'  केले आणि शेवटी साधारण तीनच्या सुमारास, फारशी भूक नसतानाही, 'कूपनवरचे' जेवण घेतले. एक मोठ्ठा बनपाव, लोण्याची टिक्की , एक सफरचंद, भात, तळलेल्या chicken चे दोन तुकडे आणि पेप्सी असे बेताच्या चवीचे जेवेण मिळाले. पेप्सीच्या ऐवजी पाण्याची बाटली मागितली तर 'मिळणार नाही' असे 'पुणेरी' 'उत्तर मिळाले. इतक्या गजबजलेल्या जेद्दा विमानतळावर कुठेही पिण्याच्या पाण्याचा नळ नाही.  पाण्याची छोटी बाटली दोन डॉलरला विकून, इथले व्यापारी पाण्यासारखा पैसा करतात! नादियाने बळेबळेच आम्हाला पाण्याची मोठी बाटली का दिली होती ते आम्हाला तेंव्हा कळले !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा