गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

११. अठरा डॉलरपायी शिक्षा!

तिसऱ्या अमेरीकावारीमध्येही आम्ही पहिल्या वेळेसारखेच पुन्हा आशयच्या घरी राहणार होतो. पण पूर्वीचे घर बदलून, वेस्ट वूड भागातच एका नवीन flat मध्ये तो राहायला गेला होता. आम्ही लॉस एंजेलिसमध्ये पोहोचायच्या दिवशीच Boston मध्ये सुरु होत असलेल्या गणिताच्या परिषदेसाठी आशय निघून गेलेला होता. त्यामुळे विमानतळापासून वेस्ट वूडपर्यंतची Flyaway बस पकडून त्याचे नवीन घर शोधत आम्ही जाणार होतो. २०१० साली आशयने आम्हाला तशाच Flyaway बसमधून त्याच्या घरी नेले होते. त्यानंतर Flyaway बसने लॉस एंजेलिस विमानतळावर येऊन, आम्ही बोस्टनला जाणारे विमान पकडले होते. त्यामुळे बस कुठे पकडायची, तिकीट कसे काढायचे आणि कुठे उतरायचे, या बारीक-सारीक गोष्टींबद्दल मनात धाकधूक नव्हती. Flyaway च्या वेस्ट वूड थांब्यापासून आशयचे नवीन घर पायी चालत जाण्याच्या अंतरावर असल्याचे त्याने आम्हाला सांगितले होते. घराची किल्ली ज्या 'गुप्त' ठिकाणी लपवून ठेवलेली होती, ती जागाही त्याने  आम्हाला आधीच सांगून ठेवली होती. वेस्ट वूड भागात आम्ही पूर्वी पायी भटकंती केलेली असल्यामुळे तो भाग तसा आमच्या परिचयाचा होता. आता विमानतळावरून बाहेर पडणे, Flyaway बस पकडून वेस्ट वूड थांब्यावर जाणे, तिथून आशयचे नवीन घर व घराची किल्ली शोधून, घरात प्रवेश करणे अशा सहज वाटणाऱ्या काही पायऱ्या  राहिल्या होत्या.

विमानातून उतरताना आम्ही झोपाळलेल्या अवस्थेत उतरलो होतो. पण विमानतळावर, कुत्रेवाला अधिकारी आणि पुढील सामान-तपासणीला सामोरे गेल्यानंतर आमची झोप पार उडून गेलेली होती. विमानातून बाहेर पडायच्या आधी, सुलतान-नामक सहप्रवासी विद्यार्थ्याने आम्हाला एक बहुमूल्य माहिती दिली . त्याच्या म्हणण्याप्रमाणे, UCLA विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना वेस्टवूडला नेण्यासाठी विद्यापीठाचीच एक बस विमानतळावरून दर तासा-तासाला सुटते, जिचे भाडे फक्त एक डॉलर असते. त्याच प्रवासासाठी  Flyaway बसचे भाडे मात्र दहा डॉलर होते. अमेरिकेला निघण्याच्या आधीपासून, नकळतच आमच्या मनात साठचा पाढा चालू झालेला होता. सुलतानने दिलेल्या माहितीमुळे, आता आमचे प्रत्येकी नऊ असे एकूण अठरा डॉलर,  म्हणजेच जवळपास अकराशे रुपये वाचणार, म्हणून आम्ही खुश झालो होतो. विमानतळाबाहेर पडलो तेंव्हां सकाळचे सुमारे साडेदहा वाजले होते. आम्ही दमलेलो असलो तरीही आम्हाला आशयाच्या घरी पोहोचण्याची तशी खास गडबड नव्हती. त्यामुळे विमानतळाबाहेर पडल्यावर UCLA ची ती बस शोधायची आणि तीच बस पकडून दोघांच्या तिकिटाचे मिळून हजार-अकराशे रुपये वाचवण्याचा आनंद मिळवायचा, असे आम्ही ठरवले . Flyaway बसच्या थांब्यावर, मला सामानाजवळ  थांबायला  सांगून, ती एक डॉलरवाली UCLA ची बस शोधायला आनंद गेला.

लॉस एंजेलिस विमानतळावरून वेस्ट वूडला जाणारी Flyaway बससुद्धा दर तासाला एक अशी असते.  अमेरिकेतील बसेसमध्ये कंडक्टर नसतोच, चालकाशेजारीच भाडे स्वीकारणारे एक मशीन असते. बरेचदा बसचालक ढोलगट कृष्णवर्णीय बायका असतात. मी थांब्यावर बसलेली असताना, पाच सात मिनिटांतच Flyaway बस आली. सगळे प्रवासी अगदी शांतपणे रांगेने बसमध्ये चढले. चालक बाईसाहेबांनी हास्य-विनोद करत प्रवाशांना सामान चढवायला मदत केली. त्यानंतर पाच-एक मिनिटे बस उभी करून, अजून 'शिटा' भरण्याची वाट बघत, चालक बाई माझ्यासमोर निवांतपणे सिगारेट शिलगावून उभी होती. " ही बस वेस्टवूडला जाणार आहे आणि पाच मिनिटात सुटणार आहे . तुला वेस्टवूडला जायचे आहे का ? अशी माझी आस्थेने चौकशीही तिने केली. "आम्ही वेस्ट वूडला जाणार आहोत पण माझा नवरा काही चौकशीसाठी गेलेला असल्यामुळे, तो येईस्तोवर मी निघू शकत नाहीए" असे उत्तर मी दिले. पुढे तासभर तुला बस मिळणार नाही, हे सांगून, बरोबर अकरा वाजता बाईसाहेब बस घेऊन निघून गेल्या! पुढच्या  दोन-तीन मिनिटांतच आनंद एक दुःखद बातमी घेऊन परत आला, "UCLA ची एक डॉलर तिकीट असलेली बस वगैरे काही नसतेच"! सुलतानकडून मिळालेली माहिती चुकीची होती. अठरा डॉलर वाचवण्याच्या धडपडीत आम्हाला लॉस एंजेलिस विमानतळाबाहेर पुढचा तासभर थांबण्याची शिक्षा झालेली आहे , हेही आता आमच्या लक्षात आले. खरे तर, आम्हा नवरा बायकोमध्ये अगदी हमखास वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप होण्यासारखा हा प्रसंग होता. पण अठरा डॉलर वाचवण्याचा निर्णय दोघांनी मिळून घेतला असल्याने "तेरीभी चुप, मेरीभी चूप" अशी परिस्थिती झाली!

आता आशयाच्या घरी पोहोचायला उशीर होणार होता . त्यामुळे मग आम्ही बरोबरचे Sandwiches खाऊन  घेतले. आनंद त्याच्या आवडीप्रमाणे, बसथांब्यावर लावलेल्या सगळ्या  बसेसच्या मार्गांच्या नकाशांचा अभ्यास करत होता. त्यामुळेच, बस शोधत आलेल्या आमच्यासारख्याच इतर पर्यटकांना योग्य सल्ला देण्याचे सत्कर्म तो तत्परतेने करत होता. लोकांचे निरीक्षण करणे आणि नवीन माणसांशी गप्प्पा मारणे हा माझा आवडता छंद आहे . त्यामुळे  वेगवेगळ्या वेशातील, विविध चेहरेपट्टीचे आणि नानाविध भाषा बोलणारे लोक बघत तासभर वेळ काढणे मलाही  फारसे अवघड गेले नाही. तिथे थोड्यावेळाने एक तरुण  जोडपे आले . त्यांच्या भाषेवरून ते जपानी वाटत होते . पण त्यांना इंग्रजीचा अजिबात गंध नव्हता. त्यांच्या खाणाखुणावरून त्यांना कुठे जायचे आहे हे कळल्यामुळे आनंदने त्यांना हॉलीवूडला जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले . त्यांच्या वेशभूषेवरून आणि हलचालींवरून ते कदाचित नवविवाहित असावेत आणि अगदी फिल्मी ष्टाईलने "हॉलीवूडला हनिमून" साजरे करायला आले असावेत , असा मी आपला मनोमन अंदाज केला .

इथे बसल्या-बसल्या, मनाने पस्तीस वर्षे मागे जायला लावणारा एक अनुभव मला आला. पूर्वी एकदा आम्ही बरेच जण एकत्र केदारनाथला गेलेलो होतो. केदारनाथची वाट अवघड आणि धोक्याची आहे खरी, पण धडधाकट  माणसांना अशक्य वाटावी अशी नाही . तरीही आमच्या गटामधले बरेच तरुण व धडधाकट लोक, वर चढून जाताना आणि खाली उतरतानाही कमालीची कुरकुर करत होते. केदारनाथाचे  दर्शन घेऊन आम्ही उतरत असताना एका सेवाभावी संस्थेचे दोन कार्यकर्ते वीस-पंचवीस अंध व्यक्तींचा गट घेऊन केदारनाथची वाट चढत होते. ते दृश्य बघून कुरकुरणाऱ्या सर्व लोकांचे डोळे उघडले आणि त्यांना अगदी खजील व्हायला झाले. इकडे लॉस एंजेलिस विमानतळाबाहेर आम्ही बसलेले असताना आमच्यासमोर गतिमंद आणि विकलांग अशा चाळीस-पन्नास ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन पर्यटकांचा जथा आला. त्यातले कित्येक विकलांग वृद्ध wheelchair वर होते. विशेष म्हणजे, हातीपायी धडधाकट पण गतिमंद असलेले त्यांच्यातलेच ज्येष्ठ नागरिक, त्या wheelchairs ढकलून नेत होते. एखाद्या अंध वृद्धेच्या हाताला धरून दुसरी पांगळी वृद्धा वाट काढत होती. अमेरिका-दर्शनासाठी आलेल्या त्या सर्व पर्यटकांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटवीरांच्या गणवेशासारखे पिवळेधमक टी-शर्ट आणि डोक्यावर हिरव्या रंगाच्या टोप्या घातल्या होत्या. चिरतरुण लॉस एंजेलिस शहराचे आणि स्वप्नवत हॉलीवूडचे दर्शन घ्यायला ते सर्वजण अधीर झालेले दिसत होते. त्या सर्व वयस्कर पर्यटकांचा उत्साह, आणि अंगातली धमक बघून आम्ही अचंबित झालो. आमच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण झाली आणि बारा वाजताची बस पकडेस्तोवर आमची उरलीसुरली मरगळ निघून गेलेली होती.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा