गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

९. स्मगलिंगचा माल !

आमच्या पहिल्याच अमेरिका प्रवेशाच्या वेळी आमच्याकडचे खाण्याचे पदार्थ पकडले जाणार असे आम्हाला वाटले होते, पण तसे काहीच झाले नाही. सामानात आम्ही चिवडा-लाडू आणि काही जुजबी किराणामाल नेला होता. पहिलीच वेळ असल्यामुळे हितचिंतकांच्या मौलिक सूचना ऐकून सगळे  खाद्यपदार्थ, एकावर एक अशा दोन पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अगदी व्यवस्थित सीलबंद करून नेले होते. इतकेच काय, बेसनलाडवांच्या पिशवीवर lentil flour sweets आणि चिवड्याच्या पाकिटावर puffed rice snacks अशा प्रकारच्या चिठ्ठ्याही लावल्या होत्या. इतक्या जय्यत तयारीनंतर, एखाद्या साहेबाने आपल्या bags उघडून बघाव्यात, उत्सुकतेपोटी काय काय आणले आहे ते पाहावे आणि सर्व काही शिस्तीत आहे म्हणून एखादा कौतुकाचा शब्द ऐकवावा किंबहुना, नजरेनेच का होईना पण आमच्या व्यवस्थितपणाला दाद देऊन आम्हाला बाहेर पाठवावे, असे वाटत होते. "अमेरिकन साहेब आपल्याला काहीच कसे बोलू शकला नाही", हे समाधान मिळविण्याची एक सुप्त इच्छाही माझ्या मनात होतीच. आपण नेलेले सर्व खाद्यपदार्थ अमेरिकन साहेबांचा डोळा चुकवून बाहेर काढण्याचा यशस्वी पूर्वानुभव गाठीशी बांधावा, आणि नंतर अमेरिकेला जाणाऱ्या सर्व आप्त आणि मित्रमंडळींना अधिकारवाणीने फुकट सल्ला द्यायला सक्षम व्हावे असेही कुठेतरी वाटत होते. मात्र असले काहीही विचार मनात तरळून गेलेले असले तरी,  कुठलीही तपासणी न होता आम्ही बाहेर पडल्यामुळे आम्हाला हायसे वाटले होते, हे निश्चित .

२०१२ साली, म्हणजे आमच्या दुसऱ्या अमेरिका-वारीत, आम्ही दोघेच प्रवास करत होतो. त्यावेळी शिकागोला असिलताकडे आठ-दहा दिवस राहून त्यानंतर Iowa विद्यापिठामध्ये आठवडाभराच्या एका पाठ्यवृत्ती कार्यक्रमात सहभागी होणार होतो. त्यानंतरचा आठवडा लॉस एंजेलिसला अनिरुद्धच्या कॉलेजमध्ये, त्याच्या होस्टेलवर  राहणार होतो. शिकागो विमानतळावर आम्हाला घ्यायला असिलता येणार होती. तरीही पहिल्या वेळच्या अनुभवानंतर जागरूकपणे आम्ही असिलताच्या घराच्या पत्त्याच्या दोन-दोन चिठ्ठ्या लिहून आपापल्याजवळ जपून ठेवलेल्या होत्या. काही गडबड झालीच तर कसा मार्ग काढायचा, याचाही विचार करून ठेवला होता. पहिल्या वेळी नेलेले खाद्यपदार्थ अमेरिकन तपासणी-अधिकाऱ्यांनी उघडून न बघितल्यामुळे, दुसऱ्यावेळी आम्ही खाद्यजिन्नस नेण्याच्या बाबतीत जरा निर्ढावलेले होतो. खव्याच्या आणि पुरणाच्या पोळ्या, चकल्या, शंकरपाळे, लाडू, शेगदाण्याची चटणी, चिवडा, अनेक प्रकारचे फरसाण आणि बाकरवड्या असे भरपूर खाद्य पदार्थआम्ही बरोबर नेले होते. Iowa च्या कार्यक्रमात आमच्या भावी वर्ग-मित्रांना भारतीय पदार्थांची चव देण्यासाठी आम्ही जास्तीचे काही खाद्यपदार्थ घेतलेले होते. हे सर्व पदार्थ सीलबंद करण्याची विशेष दक्षताही घेतली नव्हती.

अमेरिकेत सगळीकडे जगभरातील अनेक प्रांतातील बरचसे खाद्यपदार्थ मिळतात. त्यामुळे तिथले जेवण-खाण आम्हा दोघांनाही आवडते. तरीही दिवसातले एखादे जेवण तरी आपल्या चवीचे असावे असे मला वाटते. अमेरिकेतल्या मोठ्या शहरांत, सर्व mega stores मध्ये, भारतीय स्वैंपाकाला लागणारा जवळजवळ सर्व किराणामाल आणि भाजीपाला  मिळतो. पहिल्यावेळी मी आशयच्या घरी आणि MIT मध्ये असिलताच्या dormitory मध्ये जवळजवळ रोज एक-दोन वेळचा स्वैंपाक केला. आमची  असिलताही वयाच्या अठराव्या वर्षापासून, म्हणजे अमेरिकेतील कॉलेजच्या वसतिगृहात राहायला गेल्यापासून रोजच एका वेळचा स्वैंपाक स्वत:च्या हातांनी  करून खात होती.परंतु आशय बुरुंगळे मात्र भारतात BSc करून नुकताच एक वर्षापूर्वी अमेरिकेला गेला होता आणि गणिताच्या उच्च शिक्षणामध्ये मग्न झालेला होता. तो शाकाहारी असल्यामुळे बाहेरच्या बऱ्याचशा खाद्यपदार्थांचा आस्वाद त्याला घेता येत नव्हता आणि वेळेअभावी तो स्वत: फारसे काही बनवतही नव्हता. अशा परिस्थितीत तो माझ्या हातचे मराठमोळे जेवण जेवायला आसुसलेला होता.  पहिल्यावेळी त्याच्या घरी गेल्यावर लगेच तो आम्हाला 'Ralphs' या Megamart मध्ये घेऊन गेला.तिथे मी रोजच्या स्वैंपाकासाठी लागणाऱ्या पण आम्ही बरोबर न नेलेल्या सर्व वस्तू भराभर खरेदी करून टाकल्या. पण मला तिथे कढीलिंब आणि झणझणीत तिखट हिरव्या मिरच्या मात्र मिळाल्या नाहीत .

अमेरिकेत बाहेर मिळणारे खाद्यपदार्थ चवदार असतात पण आपल्या मसाल्यांचा स्वाद आणि लाल-हिरव्या मिरच्यांमुळे येणारा तिखटपणा तिथल्या जेवणात नाही. त्यातल्यात्यात मेक्सिकन जेवण आपल्या मराठी जेवणाच्या जवळ जाण्याइतपत तिखट असते. आमच्या सोलापुरी भाषेत सांगायचे झाले तर अमेरिकेतील खाद्यपदार्थ अगदीच 'सप्पक' असतात. माझ्या हातचे पोळी-भाजी, खिचडी, वांग्याचे भरीत, पोहे, उपमा, असे घरगुती खाद्यपदार्थ खाऊन आशय अगदी खूष झाला. पण झणझणीत तिखट हिरव्या मिरच्या आणि कढीलिंबाची फोडणी देता न आल्यामुळे माझी मनोमन चिडचिड झाली. दुसऱ्या वेळी अमेरिकेला जायच्या दिवशी, माझ्या मनाला झोंबणारी ती गोष्ट मी सहज बोलताबोलता प्राचीजवळ, म्हणजे माझ्या मुंबईच्या वहिनीजवळ बोलून गेले. प्राची  म्हणाली," स्वातीताई, इथे आपल्या घरी कढीलिंब आणि हिरव्या लवंगी मिरच्या आहेत. थोड्या मिरच्या आणि कढीलिंब सामानातून न्या." मी काचकूच करते आहे हे लक्षात आल्यावर प्राचीने धीर दिला, "अहो, कशाला घाबरता आहात? पकडले गेलात तर होऊन होऊन असे काय होणार आहे? फार तर या चार-पाच रुपयाच्या मिरच्या आणि कढीलिंब फेकून देतील ते लोक. न्या बिनधास्त 'स्मगल' करून!" वाहिनीच्या या गोड आग्रहामुळे माझ्याही मनाने उचल खाल्ली. आम्ही दोघींनी मिळून तो 'स्मगलिंगचा माल' व्यवस्थित धुऊन कोरडा केला. कागदी पिशव्यांमध्ये घालून माझ्या कपड्यांच्या घड्यांच्यामध्ये नीट लपवून ठेवला. असा हा स्मगलिंगचा माल नेताना  मला अनामिक भीती वाटत असली तरी त्यापेक्षाही जास्त thrill वाटत होते , हेही खरेच!

मी आणि वाहिनीने संगनमताने केलेल्या या 'स्मगलिंगच्या'  कटामध्ये आनंद आणि माझा भाऊ गिरीश हे दोघे मुळीच सामील नव्हते. उलट  आमच्या या कृतीला, त्या दोघांचा कडवा विरोध होता. त्यामुळे, निघायच्या आधीही त्यांनी मला बरेच काही ऐकवले होते. आनंदने तर मुंबईलाच मला निक्षून सांगितले, " पकडली गेलीस तर, माझा या गोष्टीशी काही संबंध नाही, असे सांगून तुला तिथेच सोडून मी निघून जाईन". तरीही प्राचीचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे  मी बधले नाही. पण हा 'स्मगलिंगचा माल' पकडला गेला तर कशा कशाला सामोरे जावे लागेल अशी धाकधुक मनात घेऊनच शिकागो विमानतळावर मी उतरले. अगदी खरे सांगायचे झाले तर अमेरिकन साहेबापेक्षाही, पुढे अनेक दिवस आनंदच्या आणि गिरीशच्या बोलण्याला सामोरे जावे लागणार याची भिती मला जास्त होती. Immigration form मधील 'तुमच्या सामानात काही बिया, पालेभाज्या वगैरे खराब होणारे पदार्थ आहेत का?' या प्रश्नाला 'नाही' असे उत्तर निर्लज्जपणे लिहून टाकले आणि immigration check  झाल्यांनतर, सामान तपासणी साठी असलेल्या  भल्यामोठ्या रांगेत शिरलो .

आमच्या पुढे उभ्या असलेल्या बऱ्याच भारतीय  प्रवाशांचे सामान उघडून तपासले जात होते . काही 'संशयित' प्रवाशांना रांगेतून बाहेर काढून वेगळ्याच तपासणी counter वर पाठवले जात होते. अमेरिकन साहेबांना 'आमचूर' अथवा 'मेतकूट' किंवा 'कसूरी मेथी' वगैरे पदार्थ, तुमच्या नियमांत बसणारे कसे आहेत हे आपल्या 'हिंग्लिश'मध्ये समजावून सांगणाऱ्या भारतीय बायका-पुरुषांची भंबेरी उडताना दिसत होती. अमेरिकन साहेब एखाद्या प्रवाशाला काही खाद्यपदार्थ बरोबर नेण्यास मनाई करत होते. त्यामुळे  अगदी नाईलाजाने त्या प्रवाशांना ते पदार्थ जवळच्या केराच्या टोपलीत फेकावे लागत होते. प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर आता आपले सामान सुखरूप बाहेर पडणार की  नाही? कधी या सगळ्या त्रासातून आपली मुक्तता होणार? अशी प्रश्नचिन्हे दिसत होती. माझी अवस्था तर, सोने किंवा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींच्या अवस्थेपेक्षा फारशी वेगळी नव्हती. एखाद्या नवख्या स्मगलरच्या काळजात सोने लपवून नेताना जशी धडधड होत असेल, तशी धडधड मी काही काळासाठी अनुभवली. पण शिकागोतील तपासनीसाने माझे सामान उघडले नाही आणि आम्ही अल्लद बाहेर पडलो त्यामुळे स्मगलिंगचा माल सहीसलामत सुटल्यावर एखाद्या स्मगलरला काय प्रकारचा आनंद होत असावा, हेही मी अनुभवले .

त्यानंतर पुढे, अगदी आजतागायत, "तुमच्या विरोधाला न जुमानता, अमेरिकन साहेबाच्या नाकावर टिच्चून, कसे आम्ही हिरव्या मिरच्या आणि कढीलिंब 'स्मगल' केले!" हे वाक्य आनंद आणि गिरीशच्या नाकाला झोंबेल इतक्यावेळा बोलायला मी आणि प्राची मोकळ्या झालो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा