गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

३. तहानलाडू-भूकलाडू

आम्ही जेद्दा एयरपोर्टवर दुपारी बारा वाजता पोहोचलो. पुढचे पंधरा तास काढायचे असल्यामुळे आम्हाला उतरण्याची मुळीच गडबड नव्हती. सर्व सहप्रवाशांनी आपापले सामान काढेस्तोवर आम्ही आरामात विमानात बसून होतो. शेवटी हवाई सुंदऱ्याही निघाल्या. मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही रमत गमत बाहेर पडलो. सौदी एयरलाईन्सच्या Inquiry Counter वरच्या दोन-तीन पुरुषांनी मोडक्या तोडक्या इंग्रजीत स्वागत करून आम्हां दोघांना, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी प्रत्येकी दोन free coupons दिली. 'नादियाने दिलेले भरपूर खाद्यपदार्थ आहेतच, आता ही coupons काय करायची आहेत?' असेही एकदा वाटले. पण मग 'त्याच तिकिटात फुकट आहेत तर घेऊन ठेवावीत, "वेळप्रसंगी" उपयोगी पडतील असा सोयीस्कर विचार करून coupons ठेऊन घेतली.

या पूर्वी काही बिकट "वेळप्रसंगांना" तोंड द्यावे लागलेले असल्यामुळे,  प्रवासात थोडेफार तरी खाणे जवळ असलेले बरे, असे हल्ली मला वाटते.पूर्वी कॉलेजमध्ये असताना एकदा सोलापूरहून सकाळच्या रेल्वेने   मुंबईला जायला निघाले होते. आठ दहा तासांचा प्रवास होता. पोळीभाजी, दहीभात, उपमा, असे काही घरगुती आणि सात्विक खाणे बरोबर घेऊन जा, असे आई म्हणत होती. पण "दौंडला पट्टी सामोसे किंवा चिकन बिर्याणी खाईन आणि पुढे लोणावळा-कर्जतला बटाटावडा खाईन" असे माझे चमचमीत मनसुबे सांगून, तिचा तो प्रस्ताव मी पार धुडकावून लावला  होता. पण नेमका रल्वे मार्गावर अपघात झाल्यामुळे, आमची गाडी मध्येच कुठेतरी आठ-दहा तास थांबून राहिली. गाडीमध्ये काही विकत मिळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे  मी प्रथमच 'उपासमार' या शब्दाचा अर्थ शिकले. त्या प्रसंगानंतर आजपर्यंत मी कधीही, कुठलाही उपास केलेला नाही. इतकेच काय, अगदी दोन-तीन तासांच्यावर मी उपाशी राहत नाही!

असाच एक गमतीदार प्रसंग आमच्या पहिल्याच अमेरिका प्रवासांत घडला होता. भारताबाहेरचा पहिलाच प्रवास, तोसुद्धा एकदम अमेरिकेचा दौरा! अनेक हितचिंतकांनी अनेक अनाहूत सल्ले देवून 'मदतीचा हात' पुढे केला होता. त्यामुळे आम्ही दोघेही गोंधळलेले होतो. त्यामुळे, बरेच तात्विक वाद होत-होत आमच्या सामानाची बांधाबांध झाली. मुंबईहून निघताना माझ्या वहिनीने, वाटेत खाण्यासाठी म्हणून लाडू, चिवडा वगैरे कोरडे पदार्थ दिले होते. पण अमेरिकेच्या प्रवासांत cabin luggage मध्ये ठेवलेले कोरडे खाणे सुद्धा विमानतळावरच काढून ठेवायला लावतात, असे ऐकिवात आले. लाडू-चिवडा असे वाया जाण्यापेक्षा  पुढे अमेरिकेत गेल्यावर खावे असा सोयीस्कर विचार करून आम्ही ते check-in luggage मध्ये ठेवले.

त्यावेळीही झुरीखला आठ तास थांबायचे होते. त्याउपर आमची पुढची flight सहा-सात तास उशिरा सुटणार आहे हे झुरीखला उतरल्यावर कळले. मुंबई-झुरिख प्रवासातले खाणे रिचल्यानंतर भूक लागायला लागली म्हणून, विमानतळावरच्या दुकानांत काही खाद्यपदार्थ विकत घ्यायला गेलो. तिथे लक्षात आले की आमच्याकडचे सर्व डॉलर्स चुकून checked-in  baggage मध्ये गेले आहेत. काही कारणाने आमचे क्रेडीट कार्ड चालत नव्हते  आणि भारतीय रुपये घ्यायला विमानतळावरील दुकानदार तयार नव्हते! आम्हा तिघांमध्ये मिळून मोजून वीस-तीस डॉलर्स निघाले. त्यात जे काय विकत मिळाले त्यावर कसेबसे पुढचे आठ-दहा तास काढले.पुढच्या विमानात बसल्यावर मात्र मिळालेल्या खाण्यावर इतके तुटून पडलो की, तमाम भारतीय लोक hungry आणि poor असतात, असे स्विस हवाई सुंदऱ्याना निश्चित वाटले असणार!

असा पूर्वानुभव गाठीशी असल्याने यावेळच्या प्रवासात आमच्याबरोबर डॉलर्स, क्रेडीट कार्ड तर होतेच आणि आता तर नादियाच्या कृपेने बरेच खाणे पण होते. तरीही कुठलाही बिकट 'वेळप्रसंग' सांगून येत नाही असा सावध विचार करून सौदी एयरलाईन्सने दिलेली जेवणाची coupons घेऊन आम्ही विमानतळावरील waiting lounge मध्ये येऊन स्थिरावलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा