गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

१२. हॉलिवूडला हनिमून !

"हॉलीवूडला हनिमून" साठी निघालेल्या जपानी जोडप्याबद्दल माझ्या मागच्या लेखात मी तुम्हाला सांगितले होते. अर्थात ते हनिमूनला निघाले होते हा आपला माझा अंदाज. खरंतर ते विवाहित होते की नाही,  हे तरी कुठे मला माहिती होते? पण त्यांना बघून माझ्या मनाला वाटले की हे हनिमूनला निघालेले जोडपे आहे. त्यांना हॉलीवूडला जायचे होते, म्हणून मी त्यांना मनानेच  "हॉलीवूडला हनिमून" साठी पाठवून दिले! "हॉलीवूडला हनिमून"  ही कल्पना अगदी romantic  वाटते की नाही? तो विचार माझ्याही मनाला सुखावून गेला होता. पण तेंव्हां सहजच आलेला विचार पुन्हा आज सांगण्यामागे एक वेगळाच संदर्भ आहे. 

सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या सर्व मित्र-मैत्रिणींची एक-एक करून, लग्ने व्हायला लागली होती. हल्ली नवीन जोडपी लग्न झाल्यावर सत्यनारायणाची पूजा करतात की नाही, माहिती नाही. पण त्यावेळी घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे उरकल्यावरच हनिमूनला जायची पद्धत होती. मात्र, हनिमूनसाठी सिंगापूर, स्विझर्लंड किंवा ऑस्ट्रेलिया वगैरे dream destinations रूढ झालेली नव्हती. "हनिमून स्पेशल" टूर्सदेखील निघत नव्हत्या. "सेकंड हनिमून" वगैरे फॅड तर नव्हतेच नव्हते. "हनिमून" बद्दल उघडपणे सर्वांसमोर चर्चा होत नव्हती की फेसबूकवर फोटो टाकणे, स्टेटस अपडेट करणे वगैरे काही नव्हते. चर्चा झालीच तर अगदी खास जवळचे मित्र आणि त्यांच्या बायकांच्या समोर व्हायची. असाच आमचा एक मित्र आणि त्याची बायको नुकतेच महाबळेश्वरहून हनिमून ट्रिप करून आले होते. त्यानंतर जमलेल्या मित्रमैत्रिणींच्या अड्ड्यामध्ये हास्यविनोद आणि गप्पा-टप्पाच्या वातावरणात, कुणीतरी या मित्राला विचारले, "काय म्हणतेय महाबळेश्वर?"

मित्राने गौप्य स्फोट केला. "महाबळेश्वर काय म्हणणार? हनिमूनसाठी काय करायचे आहे महाबळेश्वर आणि माथेरान? महत्वाचा असतो तो एकांत, जो आम्ही पुण्यातल्या  हॉटेलमध्येच राहून मिळवला. उगाच फालतू वेळ आणि पैसा कशाला खर्च करायचा ?"
" काहीतरी थापा मारू नकोस. महाबळेश्वरहून सगळ्यांसाठी presents पण आणलीयत की तुम्ही!" कुणीतरी डाफरले.
"बरोबर आहे. आम्ही presents आणली, पण तुळशीबागेतून, महाबळेश्वरहून नाही! तुळशीबागेत महाबळेश्वरच  काय, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही शहरात मिळणारी कोणतीही वस्तू मिळेल! पुणे तिथे काय उणे?" 
'आ' वासलेल्या सगळ्या चेहऱ्यांकडे पाहून हसत तो मित्र पुढे म्हणाला, "आम्ही रुममध्ये  मस्त लोळत दिवस काढायचो. संध्याकाळी जरा उशिरा बाहेर पडायचो, खरेदीला आणि भटकायला. कुणाला काही कळले सुद्धा नाही. आम्ही presents आणल्यामुळे सासर-माहेरचे सगळे खूष झाले की नाही?"

पण हे असं कसं आणि का? हा विचार सर्वांना अस्वस्थ करत होता. त्यामुळे मग कुणीतरी शंका काढली,
"पण मग महाबळेश्वरला गेलो होतो असंच का सांगितलंत?"
"आम्ही कुठेही गेलो असतो आणि काहीही सांगितले असते तरी कुणाला काही फरक पडणार नव्हता. पण 'हनिमून" म्हटलं की, सगळ्यांच्या डोक्यात महाबळेश्वर, माथेरान, उटी किंवा काश्मीर अशा काही ठराविक जागाच येतात की नाही? मग सगळ्यांना पटण्यासारखे असे ठिकाण, म्हणून मी महाबळेश्वर सांगून टाकले. त्यामुळे कोणीही काही प्रश्न विचारत बसलेच  नाहीत!" 
कुणीतरी अविश्वास दाखवत विचारले, "पण घरच्यांना आधी माहिती असेलच ?"
"छे. आम्ही पुण्यातच राहणार आहोत असे घरी आधी सांगितले असते तर सगळ्यांनी आम्हाला यापैकीच कुठेतरी जायला भाग पाडले नसते का?" 
कुणीतरी म्हणाले, "त्यांच्यापासून लपवून ठेवलेस ते आम्ही समजू शकतो रे.  पण निदान आम्हाला तरी आधी सांगितले असतेस ना ?" 
"तुम्हाला आधी सांगायला काय आम्ही वेडे आहोत काय? तुम्ही हॉटेलवर येऊन आम्हाला छळले नसतेत का!   
तुम्ही जवळचे आहात म्हणून आत्ता तरी सांगतोय.  घरच्यांना अजूनही सांगितलेले नाही."
आपले सांगणे खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी, मित्राने आता आमच्यासमोर पुण्यातल्या हॉटेलचे बिल ठेवले आणि म्हणाला," थोडक्यात काय, आपण आपल्या मर्जीप्रमाणेच करायचे, मात्र इतरांच्या समाधानासाठी, त्यांना पटेल असे काहीतरी सांगायचे म्हणजे मग फारसे प्रश्न येत नाहीत" 
आता मात्र  आम्हा सर्वांना त्यांचे बोलणे पटले. तसेच त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचे आणि कल्पकतेचे कौतुकही  वाटले.

हल्ली 'सेकंड हनिमून' हे एक नवीन फॅड निघाले आहे. 'सेकंड हनिमून' च्या नावाखाली प्रवास कंपन्या अगदी अमेरिका किंवा युरोपचीही पॅकेजेस लोकांना खपवताहेत. खरंतर हल्ली दहावी आणि बारावीनंतरच्या सुट्टीतही बऱ्याच मुलांना आईवडिलांबरोबर प्रवासाला जायचे नसते. त्यांनी आपापले काहीतरी plans  ठरवलेले असतात. मग फक्त नवराबायको निघाले आणि त्याला 'सेकंड हनिमून' असे छान नाव दिले की जरा बरे वाटते. 'सेकंड हनिमून' या संकल्पनेवर आम्हा दोघांचा मुळीच विश्वास नाही. लग्नानंतरचा "हनिमून पिरीयड" संपला की सुरु होतो तो संसार. त्या संसारात 'हनी' ची गोडी आणि 'मून'चा गारवा असतो. अगदीच नाही असे नाही. पण त्याबरोबर बरीच "हाणामारी" देखील असते. काही घरांमध्ये त्याला तात्विक वाद किंवा वैचारिक मतभेद असे सौम्य स्वरूप असते तर काही ठिकाणी अगदी हातापायी असते! थोडक्यात काय, संसारात मुरलेले सगळे नवरा-बायको व्यवस्थित भांडतात. मग उगाच पैशाचा चुराडा करून, 'सेकंड हनिमून' अशा गोंडस नावाखाली परदेशात जाऊन  कशाला भांडायचे? असा आमचा आपला साधा सोपा विचार!

हल्ली मध्यमवर्गीयांकडेही पैसे जरा जास्तच  झाले आहेत किंवा पैसे साठवत बसण्यापेक्षा थोडे सैल हाताने खर्च करायची मानसिकता आली आहे म्हणा. त्यामुळे, अमेरिका अथवा युरोपदर्शनासाठी सहकुटुंब जाणाऱ्या मध्यमवर्गीयांची संख्या खूपच वाढली आहे. "सेकंड हनिमून"च्या नावाखाली असो अथवा सहकुटुंब ट्रिप असो, पण बऱ्याचशा लोकांना, नुकतीच अमेरिकेची ट्रिप करून आलेल्या सर्वांकडून, नायगारा ते  हॉलीवूडपर्यंतच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन  ऐकायचे असते. आम्हा दोघांची प्रवासाची आणि तिथली प्रेक्षणीय स्थळे बघण्याची कल्पना मात्र इतर बऱ्याच टूरिस्ट लोकांच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे. कुठेही गेलो तरी, धापा टाकत सर्व प्रेक्षणीय स्थळांना आम्ही भेट देत नाही. एखाद्या ठिकाणची सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून झालीच पाहिजेत हा आमचा अट्टाहास नसतो. काही लोकांना मात्र आमच्या अमेरिकावारीनंतर "आम्ही हॉलीवूड, नायगारा, Disneyland बघितले, Las Vegas च्या Casino ला भेट दिली" असेच काहीसे आमच्याकडून ऐकायची इच्छा असते. पण तशा खास tourist destinations ना आम्ही आवर्जून जातोच असे नाही. त्यामुळे,त्या लोकांना  जे ऐकायचे असते, ते आमच्याकडून ऐकायला मिळाले नाही की त्यांचा विरस होतो. किंवा मग, "तीन वेळा अमेरिकेला जाऊन आले, पण यांनी काहीसुद्धा बघितले नाही." असा, आमची कीव करणारा भाव काहींच्या आवाजात आणि चेहऱ्यावर आम्हाला जाणवतो. 

अशाच प्रकारात मोडणाऱ्या, आमच्या लांबच्या ओळखीतल्या एक नवश्रीमंत बाई आहेत. आमच्या पहिल्या दोन अमेरिका वाऱ्यांमध्ये आम्ही लॉस एंजेलिसमध्ये  राहूनही हॉलीवूडला आणि Las Vegas भेट दिली नाही हे कळल्यावर त्या भलत्याच अस्वस्थ झाल्या होत्या. "असं कसं? तुम्ही का नाही गेलात? तिथपर्यंत जाऊनही तुम्ही हॉलीवूड कसं नाही बघितलंत ?" असले अनेक प्रश्न विचारून दोन्ही वेळा त्यांनी फार पिडले होते. आमच्या तिसऱ्या ट्रिपनंतर त्या मला भेटल्या आणि आता पुन्हा त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागणार हे माझ्या लक्षात आले. सुदैवाने, मला अचानक, 'महाबळेश्वरला हनिमूनला' गेलेल्या मित्राची आणि   मी मनानेच 'हॉलीवूडला हनिमूनला' पाठवून दिलेल्या जपानी जोडप्याची आठवण झाली. मग काय,  त्या बाईंनी काही विचारायच्या आतच मी त्यांना चक्क एक लोणकढ थाप दिली ठोकून,
"यावेळी की नाही, आम्ही हॉलीवूडला सेकंड हनिमूनला गेलो होतो!"
"अय्या हो! How Nice! 
झालं! त्या बाईंचा चेहरा आनंद, आश्चर्य आणि कौतुकाने फुलून आला. त्यांना ऐकायला आवडेल असे काहीतरी छान ऐकायला मिळाल्यामुळे त्यांना एकदाचे बरे वाटले. त्या इतक्या खूष झाल्या की पुढे त्यांनी मला  आमच्या प्रवासाबद्दल एकही प्रश्न विचारला नाही!

नुकतंच माझ्या कानावर आलंय की त्या बाईंनी "हॉलीवूडला सेकंड हनिमूनकरिता जाऊ या" असा त्यांच्या नवऱ्याच्या मागे लकडा लावला आहे. त्यांचा नवरा मात्र माझ्या नावाने बोटे मोडत असेल,  हे निश्चित!  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा