गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

८. अमेरिकेतले अनोखे स्वागत!

२०१० आणि २०१२ मध्ये आम्ही अमेरिकेला जाऊन आलेलो असल्यामुळे यावेळची आमची अमेरिकेची तिसरी फेरी होती. २०१०च्या प्रवासात आम्ही लॉस एंजेलिसला आमच्या मुलीच्या मित्राच्या, म्हणजे आशय बुरुंगळेच्या अपार्टमेंटमध्ये राहिलो होतो. तसाच बेत यावेळीही होता. त्यामुळेच, आमच्या पहिल्या प्रवासाच्या वेळची फजिती मला आत्ता आठवते आहे. आम्हां दोघांच्या त्या पहिल्यावहिल्या परदेशप्रवासांत आमच्या बरोबर आमचा मुलगा अनिरुद्धपण होता. तो अमेरिकेला आधी दोन वेळा जाऊन सरावलेला असल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. अनिरुद्धला लॉस एंजेलिसमधील Caltech या प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. आणि आमची मुलगी, असिलता MIT मधला BS चा कोर्स संपवून PhD साठी शिकागो विद्यापीठात जाणार होती. ती MIT सोडून जायच्या आधी तिचे कॉलेज  बघून घ्यावे व अनिरुद्धचे भावी कॉलेजही पाहावे अशा दुहेरी हेतूने आम्ही प्रवासाला निघालो होतो. सर्व दृष्टीने सोयीची तिकिटे मिळाल्यामुळे मुंबई-लॉस एंजेलिस-बॉस्टन-मुंबई असा आमचा दौरा होता.

अमेरिकेला निघण्याच्या आधीपासून आम्ही आणि आशय बुरुंगळे ईमेलवर संपर्कात होतो. UCLA विद्यापीठानेच भाड्याने दिलेल्या एका flat मध्ये तो राहत होता. तिथला पत्ता त्याने आम्हाला आधी कळवलेला होता. त्याचा अमेरिकेतला फोन नंबरही आम्ही घेऊन ठेवला होता. पण पहिल्याच परदेशवारीपूर्वीच्या गोंधळात आशयच्या घराचा नेमका पत्ता लिहून बरोबर घ्यायचा आमच्याकडून राहून गेला. तुम्हाला घ्यायला मी विमानतळावर निश्चितच येणार आहे असे आशयने कळवले होते. खरंतर तशी फारशी गरज नव्हती. पण तो येतोय हे वाचून आम्हाला तसे मनोमन बरेही वाटले होते. झुरीख-लॉस एंजेलिस विमानप्रवास संपता-संपता लॉस एंजेलिस जवळ आल्यावर हवाई सुंदरीने Immigration चा फॉर्म भरायला दिला. "अमेरिकेत तुम्ही कुठे राहणार?" या प्रश्नाच्या उत्तरासाठी आशयच्या पत्त्याची शोधाशोध सुरु झाली. तो सोबत घेतला नसल्याचे आमच्या लक्षात येताच, विमानात बसून करता येईल इतपत हलक्या आवाजात, नवरा-बायकोमध्ये नेहमी होते तशी आमची तूतू-मैंमैं सुरु झाली. शेवटी, "आपल्याला घ्यायला आशय येणारच आहे ना; त्यातून काही अडचण आलीच आणि समजा तो विमानतळावर आलेला नसेल तर त्याला फोन करून पत्ता विचारू आणि  घर शोधत जाऊ" अशी समेटाची बोलणी आमच्यात झाली. फॉर्मवर UCLA campus एवढाच पत्ता लिहून आम्ही मोकळे झालो.

Immigration counter वरील अमेरिकन साहेबाने आमचा फॉर्म वाचताच, "UCLA campus हा पत्ता होऊ शकत नाही. तिथे तुम्हाला राहायची सोयच नाही त्यामुळे तुम्ही ज्यांच्या घरी राहणार त्यांचा नेमका पत्ता द्या, तरच पुढे जाता येईल."असे सांगून आम्हाला अडवले. आमच्याकडे नेमका पत्ता नाही पण फोन नंबर आहे असे आम्ही सांगताच गंभीर चेहरा करून त्याने आम्हाला आतल्या बाजूच्या टेबलावरील दुसऱ्या एका साहेबाकडे जायला सांगितले. त्या साहेबापुढे आम्ही पुन्हा तीच टेप वाजवताच टेबलावरच्या फोनकडे बोट दाखवत हसून तो म्हणाला, "मग फोन करून पत्ता विचारून घ्या ना." हे आम्हाला आधी का सुचले नसावे असा भावही त्याच्या चेहऱ्यावर दिसला. आम्ही आशयला फोन लावायचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन काही केल्या लागेना. मग त्या साहेबाने "अमेरिकेत राहण्याऱ्या दुसऱ्या एखाद्या नातेवाईकांचा पत्ता आणि फोन द्या" अशी मागणी केली. आमची मुलगी बोस्टनमध्ये MIT च्या ईस्ट कॅम्पस वर राहते असे सांगून आम्ही तत्परतेने तिचे नांव व फोन नंबर दिला. साहेबाने पटापट आपल्या computer वर बघून आम्हाला सांगितले की तिचा नंबर unlisted आहे आणि तुम्ही दिलेला तिचा पत्ताही अपुरा आहे.

आता मात्र आमची चांगलीच पंचाईत झाली. अमेरिकेतल्या अजून कोणा नातेवाईकाचा अथवा  मित्राचा पत्ता अथवा फोन नंबर तरी द्या असे साहेबाने आम्हाला सांगितले. माझा सख्खा भाऊ जयंत, नुकताच ह्यूस्टनमध्ये  शिफ्ट झालेला होता. परंतु, त्याचा  नवीन  फोन नंबर वा पत्ताही  आमच्याकडे नव्ह्ता. अमेरिकेतील ओळखीच्या इतर कोणा चेही पत्ते किंवा फोन नंबरही जवळ नव्हते. आम्ही कुणाचाही पत्ता किंवा फोन नंबर देऊ शकत नाही हे कळल्यावर त्या साहेबाने आम्हाला एका बाजूला उभे करून ठेवले. तो अमेरिकन अधिकारी आणि जाणारे येणारे लोक आमच्याकडे संशयग्रस्त नजरेने बघत आहेत असा भास होऊन आमच्या मनामध्ये  उगीचच अपराधीपणाची भावना निर्माण व्हायला लागली होती. अमेरिकेमध्ये कुठलेही कारण न देता प्रवेश नाकारला जाऊ शकतो आणि लगेच भारतात परत पाठवले जाते, अशा प्रकारच्या काही नाट्यमय घटना ऐकिवात होत्या. आमचेही तसेच होणार, या विचाराने आम्ही पार गळाठून गेलो. "आम्हाला ईमेल पहायची सोय केलीत तर आम्ही पत्ता देऊ शकू." हे सांगण्याची बुद्धि आम्हाला त्यावेळी का झाली नाही हेही एक गूढच!

शेवटी, आम्ही कोणी भामटे नाही किंवा खोटेही बोलत नाही आहोत हे दाखवण्यासाठी अनिरुध्दला Caltech ने पाठवलेले Admission letter व  इतर कागदपत्रे मी काढली आणि साहेबाला दाखवली. पण ती बघून त्याच्या कडक चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. त्याउपर त्याने आशयचे पूर्ण नाव, वय आणि कुठल्या कॉलेजमध्ये आणि काय शिकतो हेही विचारले. मग आम्हाला एका बाजूला उभे ठेऊन तो साहेब आपल्या कामाला लागला. बराच वेळ काहीच घडले नाही. हा गोरा आमच्याकडे बघतही नव्हता आणि आम्हालाही काही सुचत नव्हते. मग तो आला, एका कागदावर भरभर काहीतरी लिहून काढले आणि म्हणाला,"तुम्ही ज्याच्याकडे जाणार आहात त्या आशय बुरुंगळेचा हा पत्ता आहे, तो त्या फॉर्मवर लिहा आणि पुन्हा आधीच्याच Counter वर जाऊन त्यांना दाखवा" असे सांगितले. "संगणकयुगाचा महिमा अगाध आहे" असे म्हणत आमच्या फॉर्मवर तो पत्ता आम्ही लिहिला आणि पुढच्या Counter वरूनही आमची लगेच सुटका झाली.

हातात आशयचा पत्ता आल्यामुळे आम्हाला हायसे वाटले. जरी काही कारणाने आशय विमानतळावर येऊ शकलेला नसेल तरी आता आपल्याकडे त्याचा पत्ता आहे या कल्पनेने आम्ही निर्धास्त झालो. त्या पुढील तपासणी कक्षामधूनही बरोबरच्या खाण्यापिण्याच्या सामानासकट आम्ही सहीसलामत बाहेर पडलो. विमानातळाबाहेर आशय आमची वाट  बघत उभा होता. पण रेंज नसल्यामुळे त्याचा फोन लागू शकला नव्हता. झालेली फजिती आशयला सांगून गोऱ्या साहेबाने लिहून दिलेली, त्याच्या पत्त्याची चिठ्ठी आम्ही त्याला दाखवली. पण आशयचे उद्गार ऐकून आम्ही चकीतच  झालो. तो पत्ता त्याचा नव्हताच!

हळू हळू सर्व काही आमच्या लक्षात आले. आम्ही अगदी genuine आणि चांगली, सभ्य माणसे आहोत हे ओळखून, केवळ त्या कठीण प्रसंगातून आमची सुटका करण्यासाठी गोऱ्या साहेबाने कुठलातरीच एक पत्ता आम्हाला आशयचा पत्ता आहे असे सांगून दिला होता. कदाचित त्याने स्वत:चाच पत्ता दिला असेल. वरकारणी अगदी कडक वाटणाऱ्या पण आतून माणुसकीचा ओलावा असणाऱ्या, त्या सहृदय अमेरिकन साहेबाच्या आगळया-वेगळ्या स्वागतानंतर आमची पावले प्रत्यक्षात अमेरिकेच्या भूमीवर पडली.

देश, वेश, भाषा, रंग, रूप, धर्म, जात, यांवरून माणसांची वर्गवारी सहसा केली जाते, परंतु माणसे केवळ 'चांगली' आणि 'वाईट' अशा दोनच प्रकारची असतात या आमच्या विचाराचा आम्हालाच एक सुखद प्रत्यय आला!     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा