गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

५. एक असेही पुण्य!

शकील आणि कुटुंबियांची पुढची flight रात्री साडेदहाच्या पुढे होती. आमच्या चांगल्या तास-दीड तास गप्पा झाल्या असतील. त्यांच्या आपापसांतील बोलण्यावरून असे लक्षात आले की, दुपारी साडे अकरा-बाराला जेवण केल्यानंतर त्यांनी काहीच खाल्लेले नव्हते. मुंबईकडे जाणाऱ्या विमानात काही खायला मिळेल या भरवशावर ते सर्वजण तसेच  भूक सहन करत बसलेले होते, हे आम्हाला लक्षात आले. त्यांनी यात्रेच्या खर्चापोटी भरलेल्या अठ्ठावीस हजार रुपयांमध्ये मुंबईपासून जेद्दा, आणि परत मुंबईपर्यंतचा प्रवास व यात्रेचा खर्च त्यांचा tour operator करणार होता. जेद्दा पासून नाशिकला घरी जाईस्तोवरचा खाण्यापिण्याचा खर्च आणि मुंबई-नाशिक प्रवासखर्च यात्रेकरूंनी स्वत:च करण्याची बोली झालेली होती. पण त्यांच्याकडे आता जेमतेम मुंबई-नाशिक प्रवासखर्चासाठी पैसे उरले असावेत. त्यामुळे जेद्दा एयरपोर्ट वरील महागडे खाणे विकत घेणे  त्यांना परवडण्यासारखे नव्हते . मग आम्ही बळेबळेच त्या सर्वांना आमच्याकडचे sandwiches व सफरचंद  खायला लावले. आधी त्यांनी बरेच आढेवेढे घेतलेले असले तरी भुकेपोटी त्यांनी ते लगेच फस्त केले. मग आनंदला एक कल्पना सुचली. त्याने आमच्याकडच्या जेवणाच्या एका कूपनवर जेवण आणून त्यांना खायला दिले व सर्वांना ते खायलाही लावले.  आता मात्र त्या लोकांच्या डोळ्यांत पाणी यायचे तेवढे बाकी राहिले होते. त्या सर्वांनी आमचे मनापासून आभार मानले. त्यांच्यातल्या एका वयस्कर अम्माने आपल्या सामानातून प्रसादाचा खजूर काढून आम्हाला दिला. पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांना जेवायला घालण्याने मोठे पुण्य लागते असे म्हणतात. तसेच उमराहच्या यात्रेबद्दल आहे. तिथेसुद्धा यात्रेकरुंना जेवायला घालणे हे मोठे पुण्याचे काम समजले जाते. आम्हालाही खूप पुण्य लागणार असे सांगून शकीलने आम्हाला दुवा दिला. खरे सांगायचे तर पाप-पुण्य या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. परंतु, आमच्याकडचे  नादियाने दिलेले आणि सौदी इयरलाईन्स च्या कूपन वरचे अन्न सत्कारणी लागल्यामुळे आणि त्यातूनही ते  आपल्या मातीतल्या माणसांना ते खायला घालता आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. 


इतक्यातच शकीलच्या मोबाईलवर भारतातून निरोप आला. 'पुण्यात काही कारणाने हिंदू मुस्लिम वादाची ठिणगी पडली असून मुंबई विमानतळावर उतरल्यावर दंगलीचा अंदाज घेऊन मगच नाशिककडे निघावे'. ही बातमी समजताच, १०-१२ दिवसांसाठी कुणा नातेवाईकांपाशी ठेवलेल्या आपापल्या मुलांच्या काळजीने सर्व  बायका कमालीच्या व्याकूळ आणि रडवेल्या झाल्या. "आधीच यात्रेचा खर्च झालेला, दोन आठवडे उत्पन्न बंद आणि त्याउप्पर आता गेल्यावरही धंदा बंद राहणार. मग खायचे काय?" या विचाराने पुरुषमंडळी जरी सैरभैर झाली असली तरीही उसने आवसान आणून बायकांना धीर देऊ लागली. 'आता मुंबई मधून आपण नाशिकला घरी सुखरूप पोहचणार की नाही?' असे प्रश्नचिन्ह सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसू लागले. 


शकील आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावर इतका वेळ ओसंडून वाहणाऱ्या आनंदाच्या जागी दाटलेले भीतीचे सावट बघून आम्हाला खूप वाईट वाटले. आम्ही सर्वांनीच या दंगलखोर प्रवृत्तीचा धिक्कार केला. त्यांच्या यात्रेला गालबोट लागेल असे काहीही घडू नये अशी मनोमन प्रार्थना करत व त्यांना धीर देत मोठ्या जड अंत:करणाने आम्ही त्यांचा निरोप घेतला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा